नमस्कार मंडळी. मध्यंतरी अगदी ध्यानी-मनी नसताना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. त्या अवघ्या ७-८ मिनिटांच्या कालावधीत जे आणि जसं सुचलं, तसंच अगदी अक्षराचाही बदल न करता इथं मांडलंय.
काळोखाच्या गर्तेत मी भोवंडत होते जेव्हा,
खुले होत गेले तेव्हा अंतर्मनाचे झरोके
दृष्टीहीनतेचे होते काही मोजकेच क्षण
अनुभव विलक्षण, अंतःचक्षु उघडले
मनावेगळ्या मनात शांत, कृतज्ञसे भाव,
खोल अंधाराचा ठाव घेता वृत्ती प्रकाशल्या
काळोखाशी माझे नाते होते निमिषभराचे,
तुझ्या प्रकाशघराचे दार खुले जन्मासाठी
हळूहळू फाके तेज, आणि लोपला अंधार
जसा स्वयंभू गंधार मूर्तरूप दृष्टीपुढे !
तुझ्या दिव्य देणगीचे कळो आले मोठेपण
देवा, माझे खुजेपण फुका देई दोष तुला
हळुवार अलगद जपल्यास नेत्रज्योती,
तुझ्या प्रसादाचे मोती पापण्यांच्या शिंपल्यांत
माझ्यापाशी तुझी ठेव, तिची काळजी वाहीन
नेत्ररूपाने राहीन माझ्या माघारी इथेच!


तुझ्या प्रसादाचे मोती पापण्यांच्या शिंपल्यांत
माझ्यापाशी तुझी ठेव, तिची काळजी वाहीन
छान.
७-८ मिनिटांच्या कालावधीत जे आणि जसं सुचलं, तसंच अगदी अक्षराचाही बदल न करता इथं मांडलंय.
<<<<<<<<<<<
हे असं सुचतं? ७-८ मिनिटांच्या कालावधीत? एकदम ग्रेट. जबरदस्त.
आता तब्येत ठीक असेल अशी आशा आहे.
माझ्यापाशी तुझी ठेव, तिची काळजी वाहीन
नेत्ररूपाने राहीन माझ्या माघारी इथेच!
======
मी पण!
खूप छान लिहिलंत क्रांति.
खुप छान.. !! चिंगु ला मोदक..
मस्त!
केवळ सुरेख!!

कविता छान .दानाने धन वाढत .नेत्रदानाचा निर्णय योग्य .पुढील लेखनास शुभेच्छा .
लवकर बऱ्या व्हा!
तुमच्या कविता वाचल्यावर नेहमीच वाटत होतं की तुम्ही अंतर्चक्षूनी जग पहाता. ही कविता वाचून खात्री पटली. जल्दअज्जल्द खुशहालीसाठी दुआ.
कर्णीकसाहेबांशी सहमत...
ऑल द बेस्ट मॅडमे !!!
खूपच छान! कशी आहे तब्येत आता? काळजी घे हो!
साताजन्मीचा ठेवा सापडलाय तुला क्रांतीतै , नशिबवान हैस .
तुझ्या प्रसादाचे मोती पापण्यांच्या शिंपल्यांत>>> सुरेख कल्पना क्रांती!