कोडी

Submitted by क्रांति on 6 November, 2009 - 11:16

प्रत्येक वादळाला केली बहाल होडी
तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी

साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला
आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला
पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी

एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी
वैशाखकाहिलीचीही वाट पाहिली मी
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!"

मौनातल्या क्षणांनी नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
माया अजून उरली का काळजात थोडी?

या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते?
जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते?
मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!

गुलमोहर: 

या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते?
जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते?
मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!......... छान क्रांती!आवडली

व्वा क्रांती मस्त! कविता आवडली

फक्त छोटीसी सूचना :
या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते? >>> ह्यात यति सांभाळला असतात तर अजून आवडले असते... तुम्हाला वृत्तांची जाण चांगली आहे म्हणून ही एक सूचना फक्त Happy

मस्त...

>>मौनातल्या क्षणांनी नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
माया अजून उरली का काळजात थोडी>>>> लाजवाब. लाजवाब. लाजवाब.....
माझ्या आवडत्या १०त..... मी प्रिंट आउट घेतला कवितेचा तर चालेल का माझ्या संग्रहात लावण्यासाठी? अर्थातच तुमच्या नावानेच

एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी
वैशाखकाहिलीचीही वाट पाहिली मी
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!"

वा वा मस्त कविता