संवाद संपताना.......

Submitted by स्मिता द on 4 November, 2009 - 23:49

संवाद संपताना.......

संवाद म्हणजे मूलभूत गरज असते प्रत्येक प्राणिमात्रांची. संवाद म्हणजे व्यक्त होण्याचा माध्यम. नुकतच जन्मलेलं अर्भक सुद्धा संवाद साधते डोळ्यातून, स्पर्शातून. का मूलभूत गरज असते ती जन्मला येणार्‍या प्रत्येक सजीवाची? मी तर अगदी मूकवेली ,झाडे यांबरोबरही संवाद साधलाय. लहानपणी जेव्हा एकटीच बसायचे आई वर रागावून, फुरंगटून तेव्हा माझा तासन तास संवाद चालायचा त्या गुलमोहराशी आणि त्याच्या शेजारी असणार्‍या मधुमालतीच्या वेलीशी.. ते माझे सांगाती.. असा संवाद मग मुक्या प्राण्यांशी ,पक्षांशी घडतच असतो नाही....

संवाद फक्त शब्दातूनच साधला जातो? तो नजरेतून स्पर्शातूनही साधता येतो. दृष्टिहीन जसे सगळे पाहतात स्पर्शाच्या माध्यमातून. मुकबधीर संवाद साधतात विशिष्ट्य हातवार्‍यांच्या भाषेमधून.. मुके प्राणी संवाद साधतात स्पर्शातून, डोळ्यातून. गायींचे डोळे बघितलेत कधी ? किती आर्त करतात आपल्याला.. त्या भावना पोचतात आपल्यापर्यंत.... अगदी आपल्या मनाचा देखील संवाद चालू असतो कायम अंतर्मनाशी.. सतत.. म्हणजेच संवाद बाह्यच नसतो , केवळ दृश्यच नसतो तो आंतरिकही असतो.. किंबहुना कित्येकदा तो आंतरिकच जास्त असतो

तर असा हा संवाद एक मूलभूत गरज प्रत्येक सजीवाची अन हाच संवादच जेव्हा संपत येतो तेव्हा काय यातना होतात. आपण वाढवलेले जोपासलेलं हे संवादाच रोपटं जेव्हा कोमेजायला लागते , मलूल होते तेव्हा आटापिटा चालू होतो त्याला परत टवटवी आणायचा. नातं सुरू होत जेव्हा तेव्हा त्याची सुरवातच मुळी संवाद असते. संवादाचे टप्पे पार करत दोन व्यक्ती एकमेकांजवळ येतात.. तेव्हा त्यांच्यातला सेतू असतो केवळ संवाद... कधी कधी हळू हळू नात्याची सुरवात झालेला संवाद.. तो संवाद दृष्टीसुख, स्पर्श अशा एक एक पायर्‍या चढत कळसापर्यंत येतो. नात्यातली घट्टता , जवळिकता , दृढता तो संवादच तर दाखवतो..

अन हाच संवाद जेव्हा अचानक वेगळे वळण घेतो विसंवादाचे तेव्हा खरंतर मन हबकते. क्लेश होतात अनंत.

काय घडतेय असे की हा इतका छान जोपासलेला संवाद, विसंवाद होतोय.. मग धडपड सुरू होते त्या कारणांचा शोध घ्यायला.. तो कसोशीने टाळायचा प्रयत्न... त्या प्रयत्ना्त कुठेतरी थोडा धस लागलेले नाते मग पुर्णपणे फाटायला लागते. कधी आपले गैरसमज होतात तर कधी समोरच्याचे. ते गैरसमज काढून टाकायच्या प्रयत्नात कधी कधी अगदी लक्तरे होतात.. आणि मग हताशपण त्या संवादाच्या चिंध्या बघत बसण्याखेरीज पर्याय राहत नाही. त्यावेळेस पण संवाद चालूच असतो आपुला आपल्याशी हे असे का व्हावे?.. आपल्या एतक्या सुंदर संवादाचे असे वैराण वाळवंट का व्हावे.? . कुठे चुकले माझे.?. काय चुकले.. का असे घडावे? इतकं छान जोपासलेलं रोप असे कोमेजून जावे? मग सुरू होतो आपल्या चुका शोधण्याचा प्रवास. खुप चिंतन करायला लावणारा.. आणि धडपड मग त्या चुका सुधारण्याची.. पण कित्येकदा ती धडपड यशस्वी होतेच असे नाही कारण एकच संवाद असतॊ दोन ज गोष्टींतला.. एअकट्याच नव्हे.. दुसरी बाजू जर त्याला अनुकूल नसेल तर तो मग तसाच राहतो विसंवाद...... संवाद संपतानाचा अतिशय क्लेशदायक अन खूप चिंतनशील बनवणारा हा टप्पा.. आपला आपल्याला जाणून घ्यायला लावणारा.. आपल्या दोषांचे मर्मदायी समीक्षण, आत्मपरीक्षण करायला लावणारा हा टप्पा.. संवाद संपतानाचा...... आपल्याला संपवणारा.. चिमणीने काडी काडी करून जमवलेल्या घरट्या सारखा शब्द शब्द जमवून सांधलेला हा संवाद.. घरटं मोडावं तसा मोडून पडतो तेव्हा अर्ध्यात मोडलेल्या डावासारखी अवस्था होते.

गुलमोहर: 

अ‍गदी पटले बासुरी.
पण अनेकवेळा समोरची व्यक्ती संवादाला तसाच प्रतिसाद देत नसेल किंवा एखाद्या संवादाचा दोघांना अगर अनेकांना त्रास होत असेल तर असा संवाद थांबलेलाच चांगला असतो. त्याबद्दल फार विचार करण्यातही अर्थ नसतो.
कम्युनिकेशनमध्ये संवादातील अडथळ्याला नॉईज (Noise) म्हणतात. त्याचेही प्रकार आहेत. तू देहबोली पुस्तकाच्या लेखिका डॉ. अंजली घाणेकर यांनी लिहिलेलं Communication skill हे पुस्तक वाच. बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. Happy

वेल... संवादातला 'वाद' सांभाळून स्वतःला व्यक्त करणे ही तारेवरची कसरत आहे. अर्थात ते बरेचदा समोरचा/ची आपल कोण आहे.. कसा/शी आहे.. ति/त्याची मनस्थिती त्यावेळी कशी आहे ह्यावर अवलंबून असत आणि जिथे काहीतरी कशावरतरी अवलंबून असत तिथे अस्थिरता/अतर्क्यता ही असणारच.

भावनेच्या भरात आलेल्या शब्दांचा शब्दशः अर्थच घ्यायला हवा का? समजूतदारपणाची धूरा फक्त आपणच वहायची का? केवळ आपल्याला वाटत म्हणून ते तसच आहे का? असे आणि अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे आपली संवादातली स्थिरता वाढवतात. जसं रागाला आणि दु:खाला विवेक नसतो.. काहीही बोलल जात त्या भरात.

काहीही झाल तरी संभाषण अगदीच बंद करू नये.. फार फार तर विषय बदलाव प्रसंगावधानाने ह्या विचाराचा मी. एकदा संभाषणाची गाठ सुटली की गृहीतकांशी आणि गैरसमजांशी सलगी झालीच समजा.. संशय तर टपलेलाच असतो.

अरे जरा जास्तच लिहून गेलोय.. दूसर ललित ईथेच तयार व्हायचं. Happy

बासुरी.. खूप खोल विचार करायला लावणारा विषय आणि लिखाण सुद्धा मस्त. शुभेच्छा तर आहेतच तुला लिखाणासाठी. Happy

प्रथम धन्यवाद योगेश, हसरी आणि माणिक..:)

योगेश मी वाचेन नक्की ते पुस्तक.. संवाद थांबताना होतानाचा त्रास मी लिहिलाय्..संवाद थांबवावा म्हणतो आपण पण जेव्हा तो संवाद आपण वाढवलेला असतो , जोपासलेला असतो तो असा विसंवादा कडे झुकायला लागला की वेदना होतात ना..

माणिक खरय..संवाद बंद करु नये तर त्याचा जरा वळवावा..कलाटनी द्यावी..पण एक सांगते जेव्हा विसंवादाला सुरवात होते ना तेव्हा दोनही व्यक्तीना सारासार रहात नाही..बदलेल्या विषयावर पण अजुन वाद घडतात्..कारण मुळात जो पाया आहे संवादाचा तोच हललेला असतो... क्लेश होतात ते याच गोष्टिंचे

पण भावनेच्या भरात आलेल्या शब्दांचे शब्दशः अर्थ घेउ नये हे उत्तम म्हणजे विसंवाद वाढणार नाहीत