सिरियल किलर

Submitted by kanchankarai on 1 November, 2009 - 01:03

काही दिवसांपूर्वी शमिता नावाच्या माझ्या मैत्रीणीचा सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमाराला फोन आला. तिच्या स्वरावरून खूप डिप्रेस वाटत होती. म्हणाली, "थोडावेळ तुझ्याकडे येऊ का गं"?. म्हटलं, "ये, त्यात विचारायचं काय?" शमिता तशी बिनधास्त मुलगी. रोखठोक बोलणं पण मनाने एकदम स्वच्छ. आज अचानक परवानगी घेऊन माझ्या घरी येण्याची हिला का गरज भासली, मला कळेचना.

अखेर आली. लेकाला सोबत घेऊन आली म्हणून मीही खूष झाले. मी दरवाजा उघडल्यावर दारातूनच मान आत घालून इकडे तिकडे पाहिलं नि मग म्हणाली, "थॅंक गॉड!" ती कशाला ’थॅंक गॉड’ म्हणाली, ते मलाही समजलं नाही पण आलीय म्हणजे बोलणार आहे, हे निश्चित होतं म्हणून मी काही प्रश्न विचारले नाहीत.

सरबताचा दुसरा घोट घेताना तिने घडाघडा बोलायला सुरूवात केली. तिने जे काही सांगितलं ते, जर म्हटलं तर काहीच नव्हतं. अगदी चेष्टेवारीसुद्धा नेता आलं असतं. म्हटलं तर खूप गंभीर होतं. आजच्या महाराष्ट्र टाईम्समधील ’शंभर धागे दु:खाचे’ या लेखावरून मला त्याची कल्पना आली.

शमिता नाही, शमिताच्या सासूबाई संध्याकाळी सात वाजता टी.व्ही. वरील मालिका पहाण्यास सुरूवात करतात ते रात्री अकरा पर्यंत त्यांच्या ’बॅक टू बॅक’ मालिकांचा अत्याचार सुरूच असतो. त्यांच्या या मालिका प्रेमावर शमिता जाम म्हणजे जाम वैतागली होती.

"खरं सागते, एक वेळ त्यांनी माझा सासू म्हणून छळ केला असता, तर परवडलं असतं मला पण ह्या मालिका नकोशा वाटतात गं." शमिताच्या चेहे-यावर वैतागल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.

"तुला माहितेय, दिवसभरात कितीतरी गोष्टी विसरतात त्या पण संध्याकाळी सात वाजता त्या टि.व्ही. लावायला आजपर्यंत विसरलेल्या नाहीत. मी इकडे देवापुढे दिवा लावत असते आणि तिकडे त्यांची सिरीयल सुरु होते. इकडे मी सोहमसोबत ’शुभं करोति’ म्हणत असते आणि तिकडे हॉलमधे त्यांच्या कुठल्या ना कुठल्या सिरियलमधे काही तरी वाईट घडलेलं असतं. मग रडारड सुरू होते. दर दोन मिनिटांनी एक आलाप आळवला जातो. मला तर सिरियलमधील त्या आलापाच्या आवाजावरून आता या वेळी कोणती सिरियल सुरू आहे, हे समजतं. कधी कधी तर हे मालिकेचं संगीत आहे की कुत्र्याचं रडणं, यातला फरक कळेनासा होईल, इतपत हा आलाप आळवला जातो आणि हा अत्याचार रात्री अकरा पर्यंत सुरूच असतो."

मला हसू आवरलं नाही पण तिची समस्या गंभीर होती. तिला म्हटलं, "शमे, तुला बोलायला खूप लागतं ना? इतकं आहे, तर जरा सासूबाईंसोबत बोलत जा की. मुद्दाम आपल्या कुकींग टिप्स विचारायच्या. स्वयंपाक करता करता एखादी गोष्ट त्यांना विचारायची. इतक्या वर्षांनीही सुनेला आपला सल्ला लागतो, हे पाहून सासू म्हणून त्यांनाही बरं वाटेल. तू घरात असून त्यांच्याशी बोलत नसशील तर त्या तरी बिचा-या कशात मन गुंतवणार गं?"

"तुला काय वाटतं, मी हे सगळं करून पाहिलं नसेल? अगं, त्यांच्या मालिका सुरू असताना त्यांना नुसती हाक मारली तर त्या वैतागतात. अशा टिप्स विचारायला गेले तर काय होईल कुणास ठाऊक? परवा त्यांची भाची आली होती घरी, त्यांना भेटायला. ह्या तिच्याशी मोजकंच बोलल्या. का, तर म्हणे, "तिच्याशी बोलत बसले असते, तर ’जनम-जनम’ च्या भागात शेवटी काय होतं ते कळलं नसतं. बरं एकदा शेवट बघून भागत नाही. दुस-या दिवशी सकाळी या सगळ्या सिरियल्सचं पुर्नप्रक्षेपण होतं, तेही त्यांना पहायचं असतं. मगाशी तुझ्या घरात आले तेव्हा टी.व्ही. सुरू नाही हे पाहून बरं वाटलं."

तिच्या ’थॅंक गॉड’चा अर्थ मला आत्ता कळला.

"मग असं कर, तूही सासूबाईंसोबत मालिका पहायला बसत जा...." शमिताच्या चेहे-यावर असे काही भाव आले की मी वाक्य अर्धवटच सोडून दिलं.

"बाई गं. मालिकेत पहाण्यासारखं काही असतं तर मी एकतरी मालिका पाहिली असती. दोन दिवस मी त्यांच्यासोबत बसून मालिका पहायला बसले. सासूबाई खरंच खुष झाल्या होत्या पण खरं सांगते, त्या पहात असलेल्या एकाही मालिकेत मला काहीही विशेष आढळलं नाही. त्याच त्या गडद मेक-अप केलेल्या बायका, तेच ते प्रसंग आणि तीच ती रडारड.

परागच्या वागण्यावरसुद्धा याचा खूप परिणाम झालाय गं. पूर्वी साडेसातच्या ठोक्याला घरी येणारा पराग आता रात्री नऊ वाजले, तरी ऑफिसमधेच असतो. रात्री अकरा ही त्याची घरी येण्याची बदललेली वेळ आहे. त्याला विचारलं, "हल्ली खूप काम असतं का ऑफीसात?" तर म्हणाला, "ऑफिसच्या कामाचं टेन्शन परवडतं पण संध्याकाळी घरात आल्यावर हे जे अभद्र रडगाणं ऐकावं लागतं, त्यापेक्षा ऑफिसमधे चांगला वेळ कटतो. परागने त्याच्यासाठी मार्ग शोधून काढला. मी काय करू गं?" शमिताच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.

मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, "शमू, तू एकदा सासूबाईंशीच याबाबत बोलून बघ ना!. त्यांना समजावून सांग. त्यांना म्हणावं, सोहमशी खेळत चला थोडावेळ."

शमिताचा चेहेरा खूप केविलवाणा झाला होता.

"काही बोलायची सोय उरली नाहीये, गं. मागच्या आठवड्यात परागच त्यांच्याशी बोलला. बोलला कसला माय-लेकाचं भांडणच झालं! सासूबाई त्याला जे काही म्हणाल्या, त्यावरून त्या या सिरियल्सच्या किती आहारी गेल्यात याची मला आणि परागला कल्पना आली. परागने तर हातच जोडलेत त्यांच्यापुढे"

"का गं? काय झालं?"

"आयुष्याचा जोडीदार निघून गेला की आपल्याला जोडे खावे लागतात .... असलं काहीतरी डायलॉगवजा भंपक उत्तर दिलं त्यांनी आणि सिरियलमधल्या बायका जशा तरातरा आपल्या खोलीत निघून जातात तशाच त्या निघून गेल्या. तुला विश्‍वास बसणार नाही, त्यांचा तो डायलॉग मी आदल्याच दिवशी ’सोबत ही सात जन्मांची’ या सिरियलमधे ऐकला होता. त्या प्रसंगापासून त्या परागशी बोलतच नाहीयेत."

शमितावर अविश्‍वास दाखवण्याचा प्रश्‍नच नव्हता. तिच्या सासूबाईंबद्दल तिला किती आदर आहे, हे मला माहित होतं. प्रेमाला घरून विरोध झाला म्हणून पराग-शमिताने पळून जाऊन लग्न केलं पण परागच्या आईने म्हणजे शमिताच्या सासूबाईंनी कायम शमिताची बाजू घेतली. तिला आपल्या मुलीसारखी वागणूक दिली. त्या माऊलीबाबात शमिताला कळकळ वाटत होती. त्यांना ह्या मालिकेच्या दुष्टचक्रातून कसं सोडवावं, हे तिला कळत नव्हतं म्हणून बेजार झाली होती ती. तिला काही मदत करता येत नाही म्हणून मलाही वाईट वाटलं. थोडावेळ बसून ती निघून गेली. मी विचार करत होते.

पूर्वी रामन राघव सारख्या माणसाने निरपराध लोकांच्या खुनांचं सत्रं आरंभलं होतं म्हणून त्याला ’सिरियल किलर’ म्हणायचे. आता ह्या टी.व्ही. वरच्या सिरियल्सच आपल्या किलर झाल्यात. सिरियलमधल्या कुटुंबांमधे काय होतं ह्याची इतकी काळजी लागून रहाते की आपल्या कुटुंबात काय चाललंय याचा विसर पडतो. सिरियलचं दु:ख आपलं होतं आणि त्या दु:खाला कुरवाळत आपण आपल्याच माणसांना किती दुखावतोय, किती दुरावतोय हे लक्षातच येत नाही.

मनात हा विचार चालू असतानाच मला आईची आठवण झाली. बरेच दिवसात फोन केला नव्हता तिला. तिच्याकडे आता मोबाईल असल्यामुळे तिला कुठेही फोन करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा!

"हॅलो, आई?"

"हं! कशी आहेस गं? ब-याच दिवसात फोन नाही."

"ठीक आहे. जरा कामात अडकले होते गं आई. तू कशी आहेस?"

"मी पण ठीक आहे. ए.... मी तुला पंधरा मिनिटांनी फोन करू का?"

"बिझी आहेस का?"

"नाही पण.... अगं टी.व्ही. वर ’ताईची माया’ सुरू आहे. कालचा भाग पहाता नाही आला मला...."

मी "बरं" म्हणून हसत हसत फोन बंद केला. काय बोलणार?

कालची गोष्ट, सासूबाई ब-याच दिवसांनी घरी आल्या म्हणून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला. सर्वजण जेवायला बसलो तश्या सासूबाई आपली प्लेट घेऊन हॉलमधे गेल्या. सगळेच अवाक् होऊन त्यांच्याकडे पहात राहिले. त्यांच्याही ते लक्षात आलं. तशी ओशाळं हसून म्हणाल्या, ’परदेसी पिया’ ही माझी आवडती सिरियल आहे, एकही भाग चुकवलेला नाही ना म्हणून..."

सगळ्यांनी मुकाट जेवायला सुरूवात केली.

जेवण झाल्यावर पाहिलं तर सासूबाई आता ’अनोखा बंधन’ नावाची सिरियल पहात होत्या. शमिताचा प्रसंग काही डोक्यातून जात नव्हता म्हणून मीही कौतुकाने डोकावून पाहिलं की असं काय असेल ह्या सिरियल मधे की सासूबाई आमच्याबरोबर जेवायचं सोडून टी.व्ही. समोर जाऊन बसल्या. छान प्रसंग होता - एक सासू आपल्या सुनेच्या माहेरी जाते आणि सुनेच्या माहेरच्यांना अद्वातद्वा बोलून सुनेकडून दागिने मागून घेते. सिरियलमधील आई आणि सून दोघी रडत असतात आणि सुनेची भावजय सुनेकडे पाहून कुत्सित हसत असते.

सासूबाई सिरियलमधे चांगल्याच रंगल्या होत्या. मी माझी कामं आटोपण्यासाठी वळले आणि सासूबाईंचा मागून प्रश्‍न आला, "काय गं, ह्या सिरियलमधल्या सासूसारखी सासू तुला मिळाली असती, तर तू काय केलं असतंस?"

मला उत्तरच सुचलं नाही. मला समर्थांच्या ओळी आठवल्या, "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे."

टीप: प्रस्तुत कथेतील प्रसंग शंभर टक्के खरे आहेत. फक्त कथायोजनेसाठी प्रसंगातील पात्रांची व मालिकांची नावे बदलली आहेत. या कथेतील ’मी’ ही व्यक्तिरेखा म्हणजे लेखिका नाही. जिच्या नजरेतून ही कथा लिहीली आहे, ती ही व्यक्तीरेखा आहे.

गुलमोहर: 

खरय हो अगदि खरयं!
पण सासुबाईंच (किंवा त्यांच्या वयाच्या बायकांच ) एक समजु शकतो.... त्यांचा रिकामपणाचा विरंगुळा म्हणुन सोडुनही देता येत!
अहो पण एखाद्याच्या सौ (अगदि करिअर-बिरिअरच्या वयातल्या) असे करत असतील तर काय करावे?
(नशीब आमच्या सौना ही साईट माहीती नाहिये... म्हणुनच आम्ही हा प्रश्न विचारायचे धाडस करतोय Wink )

एका मित्राकडे गेलो असताना असा प्रसंग अनुभवायला मिळाला. त्याची आई मधेच मालिका बघायला निघून गेली. त्याने त्याच्या आईबाबांच्या खोलीत एक टीव्ही लावून दिला आहे. म्हणजे त्याच्याकडे कोणी लोक आले तर गैरसोय नको म्हणून.

माझ्याकडे ६ वर्षे टीव्ही नव्हता. मलाच घरच्यांची दया आली आणि एल सी डी टीव्ही घेतला. तो टीव्ही संध्याकाळी ०७०० ते ०७१५ याच वेळेत चालू असतो. इतर वेळी टीव्हीच्या हॉलम्ध्ये भयाण शान्ताता नान्दत असते. ............... Happy

खूप पटला हं लेख. खरोखरच घरोघरी आजकाल हेच चालू असते. जिथे सासू बघत नाही तिथे सून बघत असते. थोडक्यात टी.व्ही. चे आक्रमण भयप्रद आहे. आणि अक्षरशः व्यसन / नशा असते ह्या मालिकांची. एरवी कळतही असते ह्या लोकांना की जे दाखवतात ते हास्यास्पद आहे तरी सिरीयलची वेळ झाली की टी.व्ही. कडे पाउले वळतातच Sad
ह्यावर अजून चर्चा झाली पाहिजे.
माझे आजी-आजोबा ( आईचे आई-वडिल ) अशाच भरपूर सिरियल्स बघतात. ह्या कारणांवरुन मामा-मामी आणि त्यांचे वाद व्हायचे. मामाची मुलं लहान होती. ह्या अशा विकॄत सिरियल्स घरात ऐकू येणं त्याला आवडायचं नाही. आम्हाला अर्थात मामा-मामीचंच बरोबर वाटायचं. म्हातार्‍या लोकांना ऐकू येत नाही म्हणून बरेचदा ते टी.व्ही मोठ्याने लावतात. त्याचाही इतरांना त्रास होतो. मामाने शेवटी त्यांना त्यांच्या खोलीत छोटा टी.व्ही घेऊन दिला होता. आता सध्या आजी-आजोबा स्वतंत्र राहतात. भरपूर टी.व्ही बघतात. पण जेव्हा आम्ही दोन दिवसांसाठी भेटायला जातो तेव्हाही त्यांना टी.व्ही वरची एकही सिरियल चुकवायला आवडत नाही. छान गप्पा रंगल्या असतील तरी सिरियलची वेळ झाली की चुळबुळायला लागतात. अशा वेळी आपल्यासाठी टी.व्ही की टी.व्ही साठी आपण असा प्रश्न पडतो.

माझ्या नव-याला टीवीचे व्यसन आहे :(. संध्याकाळी सातच्या सुमारास ऑफिसातुन घरी यावे आणि देवाला दिवा लावण्याचा विचार करावा तर हॉलमध्ये कोणी आई मेलेल्या मुलासाठी विव्हळत असते, तर कोणी विलन खदाखदा हसत असतो आणि हिरोईन भयाकुल होऊन ओरडत असते. टीवी फोडुन टाकावा असेच वाटते अशा वेळी. इतर वेळी लोकांना मोराल व्हॅल्युसबद्दल लेक्चर देणा-या लोकांना आपण भलत्या वेळी भलते पाहतोय हे कळत नाही काय? मला संध्याकाळच्या वेळी टीवी चालु असलेला अजीबात आवडत नाही. पण करणार काय? Sad

हो ना...
आणि आमच्या सौ ना आम्ही बर्‍याचदा समजवण्याचा प्रयन्त केला की हे सगळ कसे टाईम किलिंग आहे, किती अर्थशुन्य आहे, ते रीअ‍ॅलिटी शो कसे मॅन्युपलेटेड असतात...
यावर दरवेळी आमच्या सौ चा प्रतिप्रश्न... त्या फिक्स झालेल्या मॅचेस दिवसदिवस बघता ना?.... आमचा क्लिन बोल्ड Happy

हुश्श , मला वाटत होतं की फक्त पुरुषानांच ह्याचा त्रास होतो Proud
तसं पाहीलं तर ज्या लोकांना फारशी कामं नसतात किंवा जे लोक रिटायर झालेले असतात मग ते आई वडील , सासु सासरे , आजी आजोबा कोणीही असु शकतील , त्यांना वेळ कसा घालवावा हा खुप मोठा प्रश्न पडलेला असतो अशातच ह्या सिरियल्स त्यांचा ताबा घेतात आणि हे सगळं रामायण सुरु होतं.

पण काळजी करु नका , २५-३० वर्षांनी आपणही त्याच भुमिकेत असु आणि आपली मुलं , सुना आपल्याला हेच बोलत असतील . Proud

|| कालाय तस्मे नमः ||

bumrang, bhaskar_lele, robeenhood, Ashwini.Gore, ashbaby, shree123,
या सिरियलच्या प्रेक्षकवर्गात सर्व वयोगटाच्या व्यक्ती सामिल आहेत. टी.व्ही. वर इतरही मनोरंजनपर कार्यक्रम असतात याचा या सिरियल्समुळे विसरच पडलेला आहे. कधी कधी आपल्या जवळच्या माणसांना आपल्यासोबत गप्पागोष्टी करण्यापेक्षा सिरियलमधे काय होणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे, हे पाहून खूप व्यथित व्हायला होतं पण ब-याचदा नाईलाजाने आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

समाजप्रबोधनाच्या नावाखाली सध्या ज्या सिरियल्स चालू आहेत, त्या पाहून डोक्यात तिडीक उठते. नेहमी नकारार्थी दृष्टीचं चित्रीकरण करून ’पूर्वी पहा कसं असायचं’ हे दाखवण्याचा अट्टहास हे सिरियल वाले का धरतात? ’काय व्हायला नको’ यापेक्षा ’काय झालं पाहिजे’ हे का दाखवलं जात नाही? सतत रडारड पाहून प्रेक्षकांच्या मनावर त्याचा किती विपरीत परिणाम होतो याची कल्पनाच या सिरियलवाल्यांना नाही का? रिमोट नेमका कोणाच्या हातात असतो, प्रेक्षकांच्या हातात की सिरियलवाल्यांच्या?

वेळ घालविण्यासाठी तसे बरेच पर्याय आहे पण सोयिस्कररित्या टि.व्ही. हा पर्याय निवडला जातो. आणि.... २५-३० वर्षांनी आपल्यालाही त्याच भूमिकेत शिरायचंय ह्या नुसत्या कल्पनेने झोप उडालीय हो!

२५-३० वर्षांनी आपल्यालाही त्याच भूमिकेत शिरायचंय ह्या नुसत्या कल्पनेने झोप उडालीय हो!

अजीबात नाही.. आपण कुठली व्यसने जडवुन घ्यायची ते आपल्यावर आहे. वेळ घालवण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. मला पुस्तके वाचताना वेळ किती आणि कसा गेला ते कळत नाही. घरी मी अजुन न वाचलेली भरपुर पुस्तके पडलेली आहेत. मी तरी टिवीसमोर बसणार नाही. आणि बसलेच तर डिस्कवरी/ट्रवेल्/नॅट जीओ आहेत.. सिरियल्सचा टीआरपी मी तरी वाढवणार नाही. Happy

ashbaby, १००% टक्के सहमत. मी स्वतःदेखील नॅट जिओ, डिस्कव्हरी वाहिन्यांचे कार्यक्रम पहाणं पसंत करते. शिवाय पुस्तकवाचनाची आवड अतिशय चांगली़. अगदी गेल्या वर्षीपर्यंत कामामुळे मला एकटीला रहावं लागत होतं तेव्हादेखील टी.व्ही.वाचून माझं काहीच अडलं नाही. मालिकेचा टी.आर्.पी. वाढविण्यासाठी हे मालिकावाले काय काय करतात यावर स्वतंत्र लेख होऊ शकेल.

चांगलं लिहिलय. पण एखादी गंगाधर टिपरेंसारखी असतेच जी आवर्जून बघावी. अर्थात त्याच्या आहारी जाणं चांगलं नाहीच.

ज ब र द स्तं!
भारतभेटीत हे बघितलय. दुपारीसुद्धा कुणाला भेटायला जायची सोय नाही... कालचाच भाग पुनर्प्रक्षेपित असला तरे नव्याने बघतात.
नाव जाम म्हणजे जाम आवडलं.

अगदी बरोबर लिहिलय. पण या मालिकांच्या किती आहारी जायचे ते आपणच ठरवायचे कारण रिमोट तर आपल्याच हातात असतो ना ? आम्ही टि व्ही वर कोणतीही सिरीअल बघत नाही. (शिवाजी महाराजांची सोडुन). कारण अशा मालिका बघुन घरातील चांगले संबंध बिघडण्याची शक्यताच जास्त असते. डिस्कव्हरी, अनिमल प्लेनेट नाहितर कार्टुन बघतो.