आभास तू..

Submitted by प्राजु on 25 October, 2009 - 19:59

मनांत माझ्या फ़ुलून आल्या
रातराणीचा सुवास तू
रंगबिरंगी वसंत फ़ुलांची
ओंजळितली रास तू

क्षणैक खांद्यावरी विसावे
तो असा निश्वास तू
मित्रत्वाच्या नात्यामधला
तो अभंग विश्वास तू

अखंड कोसळणार्‍या झिरमिर
चिंब सरींचा न्यास तू
क्षितिजावरती रंगलेली
सुवर्णाची आरास तू

डोळे मिटूनी तुला पहावे..
भास तू आभास तू
तुझ्याविना मी कसे जगावे
सांग!.. माझा श्वास तू

प्रेमवेड्या या मनाला
लागलेला ध्यास तू..
प्रणयातील उत्कटतेचा
अगळा उल्हास तू

पुढे पुढेच जात रहावे
न संपणारा प्रवास तू
कधी वेंधळा, कधी प्रगल्भ
जन्मोजन्मी हवास तू..

- प्राजु

गुलमोहर: 

छान आहे, फक्त `तू' शब्द सुरूवात करुनच सर्व काव्य फुललं असतं तर वाचताना अजून छान वाटलं असतं, पण जे मांडलंय ते ही छानच. शुभेच्छा !!

सस्नेह
देवनिनाद

मस्त

अखंड कोसळणार्‍या झिरमिर
चिंब सरींचा न्यास तू
क्षितिजावरती रंगलेली
सुवर्णाची आरास तू

पुढे पुढेच जात रहावे
न संपणारा प्रवास तू
कधी वेंधळा, कधी प्रगल्भ
जन्मोजन्मी हवास तू..

खुप आवडल्या ओळी....

खरं सांगू? भावना, कल्पना मस्त आहे. पण तुझ्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाची मांडणी वाटली. आपण जितके वर जातो तितक्या माझ्यासारख्या वाचकांच्या अपेक्षा वाढत जातात.

शरद

प्राजु, तुझी कविता वाचायच्या आधी कौतुकची "हव्यास तू" च वाचण्यात आली. म्हणजे आधी विडंबन आणि मग मुळ कविता असा उलटा प्रकार झाला. विशेष म्हणजे दोन्ही एका वरचढ एक झाल्या आहेत.

मस्त ! आवडली हे सांगायले हवे का? Happy