कालरात्री

Submitted by नानबा on 23 October, 2009 - 21:39

पूंर्णपणे काल्पनिक!
ह्या कथेतील पात्रांचा अथवा घटनांचा खर्‍या आयुष्याशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"तुम्ही सुद्धा असल्या गोष्टीवर विश्वास ठेवता! इट्स अ बिट शॉकिन्ग टू मी!" अमित मला तावातावान पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. "विशेषतः आत्ताच्या काळातही! प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारणभाव असतो. तो कधी कधी आपल्या आकलना पलिकडे असेलही - पण तो असतो! जेव्हा पासुन आपले पुर्वज रानावनातुन भटकायचे, गुहेचा आसरा घ्यायचे, तेव्हापासुन आपल्या मनात ही भीती जन्माला आली! कारण अन्धार म्हणजे अननोन! त्यातूनच ही सगळी भीती! अगदी पिशाच्च, खवीस, हडळ, जखीण, ब्रम्हसमन्ध अशी देशी मन्डळी घ्या, किन्वा ड्रक्युला, वम्पायर, वेअरवूल्फ असली होलिवूड फेम मन्डळी घ्या! मला तर एकच गोष्ट दिसते - शतकानुशतके चालत आलेली अज्ञाताची भिती! अन्धाराची भिती! प्रदेश जितका दुर्गम, तितके असले सगळे प्रकार जास्त!
हीच भिती पुरतेय आपल्याला अजुन! सारासार विचार करायला लावणार्‍या बुद्धीवरही मात करुन!
कुणाच्या तरी कुणीतरी पाहिलेली भुतं! आपला स्वत:चा अनुभव काय! सान्गा ना काका, तुम्हाला स्वत:ला काही फर्स्ट हँन्ड अनुभव आहे का? ...."
पुढचं मला ऐकू आलं नाही: कारण माझ्याही नकळत मी भुतकाळात शिरलेलो ... मला माझ्या परिवर्तनाचे दिवस आठवले!
९५ सालातली गोष्ट. मी पन्चविशीच्या आसपास चा. अमितचा आजचा जो अटिट्यूड आहे ना, तोच माझा तेव्हा होता. जगभरातला कोलाहल पाहून देवावरचा विश्वास उडत चाललेला. भूतखेत असल्या गोष्टींवर रॅशनल मन विश्वास ठेवुन देत नव्हतं. अर्थात, तेव्हाचा काळ वेगळा होता. माझा विश्वास असो वा नसो, मी आई वडिलांकरता- समाजाकरता विश्वास नसणार्‍या गोष्टी करतच होतो की! त्यांना दुखवायचं नाही हे एक आणि काही बाबतीत त्यांच्या मनाविरुद्ध वागण्याची प्रज्ञा नव्हती हे दुसरं (आणि सगळ्यात खरं कारण)
जर तसं नसतं तर! दादामहाराजांनी दिलेला मन्त्र मी काही वर्ष तरी म्हटला नसता तर! किन्वा त्यानिच दिलेला ताइत मी घातला नसता तर!
तर कदाचित मी वाचलो नसतो. पण मग विनायक ...
'विनायक सहकारी' - माझा बँकेतला सहकारी. एकदम प्रसन्न व्यक्तीमत्व! माझी बदली नुकतीच मुंबईहून वाई ला झालेली. तो मुळचा वाईचाच. सातारा जिल्ह्यातलं हे एक टुमदार गाव! एतिहासिक पार्श्वभूमी असलेलं. वाईकरांच्या मते, वाई म्हणजे विराट नगरी, दक्षिण काशी! हे खरं असो वा नसो, अफजलखान राहिलेला तो वाईलाच.. म्हणजे, त्याकाळाच्या आधि पर्यन्तचा वाईला इतिहास आहे हे नक्की! जुने सरदारांचे वाडे आणि त्याच्याभोवताली गुन्फलेल्या गुप्त धनाच्या गोष्टी, वेशीवरल्या पिंपळावरचा ब्रह्मसमंध, कवठीवरचा मुंन्जा, ह्या आणि असल्या सगळ्या कथांची रेलचेल होती.
वाईला आलो तेव्हा कुणाशी फारशी ओळख नव्हती. खरंतर, इतक्या छोट्या गावात ओळख व्हायला वेळ लागत नाही, हे तेव्हा मला माहीत नव्हतं. त्यामुळे ऑफिसातल्या कुणाच्या तरी ओळखीनं, मी आधि जागा मिळवली आणि मगच वाई ला शिफ्ट झालो.
-----------------
भानूंचा वाडा
मित्राच्या ओळखीनं मी ज्या वाड्यात रहायला आलो, तो म्हणजे भानूंचा वाडा. दिपून जावं, इतका मस्त वाडा! प्रशस्त! लहानपणी मी गावाकडं - ओजोळी जायचो, तिथेही वाडाच, पण हा वाडा काही वेगळाच होता! भुरळ पडण्याजोगा! ती घराची जुनी रचना - पडवी, ओसरी, पुढचं अंगण, मागचं अंगण, तिथली विहीर, दिवाणखाना, माजघर, स्वयंपाकघर, कोठीची खोली .... आणि परत वरचा मजला! हा मात्र माझ्याकरता बन्द होता. मला खालच्या खोल्या तरी सगळया कुठं लागणार होत्या की मी वरच्या बंद असल्याची काळजी करु? अहो, चाळीत वाढलेला ग्रुहस्थ मी! आणि तसंही ह्या सगळ्याची साफसफाई तरी जमायला नको का!
असो, तर थोडक्यात काय तर अस्मादिक भानूंच्या वाड्यावर स्थानापन्न झाले!
राहायलो लागलो खरा, पण बँकेतल्या लोकांची रिअ‍ॅक्शन काहीशी वेगळीच होती. वाड्याचं नाव ऐकताच सुरू झालेली कुजबुज मी नजरेआड केली. एकतर वाडा मला आवडलेला आणि कॉलेज सोडल्यापासून मी जास्तच नास्तिक झालेलो! अर्थात, एका व्यक्तीच्या बोलण्याचं मात्र आश्चर्य वाटलं - ते म्हणजे विनायक!
इथे आल्यापासुन आमची चांगलीच मेत्री जमलेली. एकतर आमचं दोघांचही वय एक्झाटली सेम होतं (इतकं की आमची जन्मतारीखही एकचं निघाली), वर आमच्या आवडीनिवडी ही जुळत होत्या. अर्थात एक अपवाद वगळून. तो म्हणजे देवधर्म आणि तत्सम गोष्टींवरचा त्याचा विश्वास! मी वाड्यात राहू नये म्हणून त्यानं परोपरीनं सुचवलेलं - त्याच्याकडे कुठलंच ठोस कारण नसतानाही. इतकंच नव्हे, तर तो एकदाही वाड्याच्या आत आला नाही. येवढचं कशाला, तो कधी त्याच्या कायनेटीक वरुन खालीही उतरला नाही घरासमोर. पण त्याच्या अशा वागण्यालाही पार्श्वभूमी होती - विनायक सहकारी गुरुजींचा मुलगा. गुरुजी देवीचे उपासक. जुन्या वळणाचे. विनायकही त्याच संस्कारात वाढलेला. त्यामुळे त्यानं गावातल्या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं स्वाभाविकच नाही का! पण माणसं मुळात चांगली. सात्विक प्रव्रुत्तीची! विनायक बरोबर माझा अन त्याच्या वडलांचा स्नेह देखील माझ्या नकळत जडत गेला. मी ही हळूहळू त्यांना अण्णांच म्हणायला लागलो.
त्या दिवशी अण्णांनी अचानकच विचारलं "माधवा, तु तिथे रहातोयस खरा, पण तिथे कधी तुला काही वेगळं जाणवलं का?"
माझ्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह! "वेगळं?": मी.
"ज्या अर्थी तू हा प्रश्न विचारतोयस त्या अर्थी नसावं. पण जपून राहा बाबा! "ती" जागा चांगली नाही. विनायकाच्या सांगण्यावर तू विश्वास ठेवला नाहीस, हे मी जांणतो. तुम्ही शहरातली माणसं! तुमचा विश्वास नसणं एका अर्थी स्वाभाविकच आहे. पण जग आपल्या विश्वासावर चालत नसतं. एखाद्या आदिवासी माणसाचा ट्रान्झिस्टर वर विश्वास बसेल का? नाही ना? पण त्यांचा विश्वास नाही म्हणून ट्रान्झिस्टर चं अस्तित्व नाहीसं होणार आहे का? सांगायचा मुद्दा इतकाच की शक्य असेल तर जागा सोड. नसेल, तर निदान जपून राहा. कितीही वाजले असले तरी इथे यायला बिचकू नकोस. अर्थात तो दिवस आजच येणार नाही असं मला वाटतं. कदाचित तुझ्या बाबतीत तो कधीच येणार नाही. पण सतर्क रहा.
असो, आताकरता ही चर्चा पुरे! माझ्या पुजेची वेळ झाली आहे"
अण्णा आतल्या खोलीत निघून गेले खरे, पण माझं कुतुहल मात्र चांगलचं जाग्रुत करुन!
"विन्या (मी विनायक वरुन विन्या वर आलेलो), ही काय भानगड आहे? तुला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मला कसलाच अनुभव नाही आला तिथे. इन फॅक्ट मला आवडतो तो वाडा. पण आल्यापासून सारखी कुजबुज ऐकतोय. नक्की काय आहे हे कुणी मला सांगेल का? अगदी तुही बोलायचं टाळतोस त्या विषयावर, पण मी तिथे राहू नयेस हे सुचवायचं काही थांबत नाहीस. होय, नाहिये माझा विश्वास कुठल्या भाकडकथांवर. पण काय चाल्लयं ते तरी कळुदेत एकदा!"
--------------------
विनायक:
माधव हट्टालाच पेटलेला. कदाचित मी हे सगळं आधीच सांगायला पाहिजे होत त्याला. पण त्याचा विश्वास बसणार नाही ह्याची खात्री होती आणि त्याहीपेक्षा मला त्याच्या मनात भीती बसायला नको होती. कारण बाकी कशापेक्षा ही भीतीच सगळ्यात जास्त धोकादायक होती. निदान इथे तरी. असो. पण ज्या अर्थी अण्णा इतकं बोलले, त्याअर्थी आता मी हे सगळं लपवण्यातही अर्थ नसावा. आम्ही नदीच्या घाटावर जाउन बसलो भानूंचा वाडा चढावर दिसत होता. थोडं पुढे गेलं की आमचं घर..
"ही गोष्ट तशी पुर्वीची. तुला कदाचित माहीत असेलही. पेशव्यांचे मामा - रास्ते सरदार वाई चे. पेशवे युद्धावर गेलेले तेव्हा रास्ते निजामाला पुण्यातले वाडे दाखवत फिरत होते. निजामानं पुणं लुटलं. हया सगळ्या प्रकारात रास्त्यांच्या साथीला होते, शिवरामपंत भानू. भानूंचा वाडा ज्यांच्या कारकीर्दीत बांधला गेला, ते शिवरामपंत. लुटीतला काही माल ह्यांच्यादेखील वाट्याला आला. रास्त्यांना पुढे पश्चाताप झाला आणि त्यांनी त्यांच्या मालकीची सम्पत्ती वाईच्या विकासाकरता खर्च केली. ढोल्या गणपतीचं देउळ अन हे सगळे घाट बांधले क्रुष्णामाईच्या काठावर. शिवरामपंत मात्र धनाचे लोभी. त्यांच्या वाटणीची संपत्ती त्यांच्याकडेच राहिली. त्यातून त्यांनी हा वाडा बांधला. कुणास ठावुक, त्या लुटलेल्या संपत्ती बरोबर किती जणांचे तळतळाट त्या वाड्यात आले! असंही म्हणतात की त्या धनाबरोबर आणखीन काहीतरी त्या वाड्यात शिरलं. काहीतरी जे आपल्या जगाबाहेरच होतं.
असो. वाजतगाजत ह्या वाड्यात रहायला आलेल्या भानू कुटुंबाची लवकरच वाताहात लागणार होती. किती विचित्र घटना घडल्या होत्या नंतरच्या काही दिवसात! कोटुंबिक कलह. काही अपम्रुत्यू. काही जणान्च्या डोक्यावर परिणाम! शहाणे होते, ते वेळीच नुसता वाडाच नव्हे तर गावही सोडून गेले. एकाही वस्तूवर हक्क न सांगता आणि परत कधीच फिरकले नाहीत!
शिवरामपंतांकरता मात्र वाडा जीव की प्राण होता! सुरवातीचे काही दिवस ते घराबाहेर पडायचेही, पण हळूहळू ते ही बन्द पडलं. त्यांनी स्वत:ला वाड्यात बन्द करुन घेतलं. त्यांना भयंकर भीती वाटायची. अन्धाराची भीती. जवळजवळ सगळा वेळ ते स्वत:ला खोलीत बन्द करुन असायचे. कधी कधी 'नको, नको! दिवे लावा' असं किंचाळायचे म्हणे - भर दिवसादेखील. आणि एके दिवशी भर सकाळी ते अंगणातच पडलेले सापडले. उठले ते चालत्या कलेवरासारखे. डोळ्यात शून्य भाव! पुर्णपणे रिकामी नजर. ओठातून गळणारी लाळ! आत 'शिवरामपंत' म्हणून जे काही होतं, ते जिवंत होतं की नाही कुणास ठावुक! शरीर जिवंत म्हणून जिवंत म्हणायचं झालं! अर्थात त्यानंतर ते काही फार काळ जगलेच नाहीत. आठवड्याभराच्या आत त्यांचा म्रुत्यू झाला. (अर्थात त्या संज्ञेला काही अर्थ असेल तर!). पाठोपाठ महिन्याभरात त्यांच्या पत्नीचाही म्रुत्यू झाला. म्रुत्यूसमयी त्यांच्याही चेहर्‍यावर विलक्षण वेदना होती. जणू कशाच्यातरी विरुद्ध त्या प्रचंड झगडल्या असाव्यात. अर्थात शरीरावर खुणा शून्य! शेवटच्या काही दिवसात त्याही अन्धाराला घाबरायला लागलेल्या. त्यांना शिवरामपंतही दिसायचे म्हणे. असो! नशीबानंच शिवरामपंताचा भ्रमिष्टपणा त्यांच्या वाट्याला काही आला नाही. आता राहताराहीली - शिवरामपंतांची बालविधवा बहीण यमूताई आणि त्यांचा मुलगा भास्कर. न शिकलेली यमूताई अव्यवहारी नव्हती. वहीनी गेल्या त्याच्या दुसर्‍याच दिवशी ती भास्करला घेउन जुन्या वाड्यावर राहायला गेली. यथावकाश भास्करचे 'भास्करराव' झाले, त्यांना मुलंबाळं झाली - थोडक्यात निसर्गक्रम चालूच राहिला."
"अर्थात त्या घरात प्रत्येकालाच त्रास होतो असं नाही. काही लोकं, वेगळी फ्रेक्वेंसी चटकन पकडतात. काही उशिरा, तर काही कधीच नाहीत. पण राहू नको म्हणायचं कारण असं की उगाच विषाची परीक्षा कशाला! गावात चिक्कार घरं आहेत की! "
माधवचा विश्वास बसला नाही हे मला स्पष्ट दिसत होतं. त्याच्या मते ह्या सगळ्या कर्णोपकर्णीच्या गोष्टी! आम्ही गावातली माणसं - कशावरही चटकन विश्वास ठेवणारी! आता मात्र मला माझा अनुभव सांगणं भाग होतं! मी पुन्हा सांगायला सुरुवात केली.
"अण्णांनी मला कधीच तिकडे फिरकू दिलं नाही आणि मीही कधी गेलो नाही. एकच अपवाद वगळता! वाड्याच्या माळ्याचा मुलगा दिनू माझा मित्र होता. ब्याऐंशीच्या वाईमध्ये ही अशी विजोड मैत्री नवीन असली तरी आक्षेपर्ह नव्हती. त्यातून अण्णा अशा बाबतीत लिबरल. मी दिनू बरोबर परसात गेलो होतो. तिथून भरकटत वाड्यात कधी गेलो, कळलच नाही. कळलं तेव्हा मी पुढच्या अंगणात होतो.. हो! तिथेच जिथे शिवरामपंत सापडलेले. मी तिथे कधी पोहोचलो आणि किती वेळ होतो कुणास ठावुक. पण भान आलं तेव्हा अन्धारून आलेलं. समोर धोतर नेसलेले एक ग्रुहस्थ येरझारया घालत होते. मान हालवतं. तोंडानं 'नाही नाही' म्हणत. मी त्यांना 'काका' म्हणून हाक मारताच त्यांची नजर माझ्याकडे वळली. सावकाश! पण.. पण.. आत बुभुळचं नव्हती रे! मला ये म्हणून खुणावत होते. माझे पाय थिजलेले.. सगळीकडे अन्धार पसरत चाललेला.. माझा गळा आवळत होता. मनाचा अक्रोश चाललेला .. उजेड! उजेड! ही काळरात्र सम्पुदेत. अण्णा मला वाचवा. वाचवा! अण्णांचा विचार मनात आला आणि चक्क तो अन्धार पातळ झाल्यासारखा वाटला. अचानक सुर ऐकू आले -
"अरण्ये राने दारुणे शत्रुमध्ये| जले संकटे राजग्रेहे पर्वते|
त्वमेक गतिर्देवी निस्तरा हेतरु! नमस्ते जगद्तारीणी त्राही दुर्गे!"
अण्णांचा आवाज! शब्दोच्चराची गती वाढलेली - अण्णांच्या हालचालीलाही वेग आलेला. मी काही बोलणार तोच त्यांनी मला उचलंल आणि घराबाहेर आणलं आणि विश्वास ठेव अथवा नको ठेवुस, बाहेर चक्क ऊन होत! मावळतीला अजून कितीतरी तास होते, माधव! कितीतरी तास!!"
------------
क्रमशः
---------------
पुढचा भागः
http://www.maayboli.com/node/11572

गुलमोहर: