अक्षय संवर्धन

Submitted by नितीनचंद्र on 20 April, 2015 - 23:58

आजची म्हणजेच २१ एप्रील २०१५ ला आलेली अक्षय तृतीया साडेतीन मुहुर्तापैकी एक आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा, दसरा आणि दिवाळी पाडवा हे तीन शुभ मुहुर्त मानले जातात. अक्षय तृतीया हा अर्धा मुहुर्त मानला जातो. अर्धा असल्याने याचे महत्व कमी होत नाही कारण अक्षय म्हणजे कधीही क्षय म्हणजे अंत न होणारे कार्य या मुहुर्तावर करायचे असते.

आपण ज्योतिष विषयक "१४ एप्रीलला कोणाचा वाढदिवस" या लेखात मेषेचा सुर्य व त्याचा राजयोग पाहिला. मेषेत सुर्य किंवा रवि असताना मीनेचा शुक्र हा दुसरा राजयोग याच दिवसात घडणे शक्य असते. पण अक्षय तृतीया या दिवशी मेषेचा सुर्य आणि वृषभेचा चंद्र हा राजयोग द्विगुणित होण्याचा योग खात्रीने असतो म्हणुन अक्षय तृतीया या दिवसाचे महत्व ज्योतिष शास्त्र दृष्ट्या महत्वाचे आहे.

या वर्षी आज तीन ग्रह उच्च राशीत आहेत. मेषेचा सुर्य, वृषभेचा चंद्र याच बरोबर कर्केचा गुरु सुध्दा उच्चीचा असल्याने हा योग त्रिगुणीत होत आहे.

आज सराफांनी दुकाने सजवली आहेत. त्याच्या व्यापार धर्माला साजेस आहे. सर्वच लोक आज सोने खरेदी करु शकतील असे नाही. गेल्या २-३ वर्षात सोन्याचे भाव नेहमीच्या भाव वाढण्याच्या परंपरेला छेद देत कमी झाल्याचे पाहिले आहे यामुळे सध्यातरी सोने खरेदी फारशी फायद्याची नाही असा विचार अनेकांच्या मनात तरळुन जाईल.

मग काय करावे ?

माझ्या मते अक्षय तृतीया आणि मटेरीयल गोष्टींचा फारसा संबंध नाही कारण या दिवशी रवी जो आत्माकारक आणि चंद्र जो मनाचा कारक असे दोन ग्रह बलवान असतात. जर शुक्र आणि मंगळ याच्या योगाने आजचा दिवस असता तर मटेरीयल गोष्टींची खरेदी करायला योग्य मुहुर्त मानता आला असता.

चंद्राचा मनाशी आणि मनाचा नातेसंबंधाशी संबंध असतो. आजचा दिवस उत्तर भारतात आणि दिल्ली परिसरात लग्नाचा मुहुर्त मानला जातो. कारण या दिवशी अक्षय टिकावे असे वैवाहीक नाते निर्माण व्हावे असे कारण असते.

माणसाचे आयुष्य नाते संबंधाशिवाय पुर्ण होत नाही. कौटुंबीक नाते असो की मैत्रीचे नाते, माणुस नातेसंबंध जपल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येक नाती जपायला कोणता ना कोणता दिवस आपल्या संस्कृतीत राखीव आहे. काही दिवस आपण पाश्चात्य संस्कृतीतुनही घेतले आहेत. उद्देश नाते निर्मीती किंवा संवर्धन हा आहे.

काही नाती अशी रहात असतील ज्यांच्या जपणुकीसाठी विशीष्ठ दिवस नाही अश्या नात्यांचे आज संवर्धन करावे असे मला वाटते. कारण जे आज कराल त्याला क्षय नाही.

एक साधा फोन असो, एखादी इमेल असो किंवा वेळ काढुन भेटायला जाणे असो आज अवश्य करावे. जपलेली नाती अडचणीच्या वेळेला सोन्याहुन जास्त मौल्यवान कामगिरी करुन जातात असा माझा विश्वास आहे.

सेवन हॅबीट्स या जगप्रसिध्द पुस्तकात त्याचे लेखक स्टीवन कोवेन ह्या संदर्भात जास्त प्रकाश टाकतात. ते त्या भेटीला खात्यात पैसे गुंतवण्याची उपमा देतात. त्यांच्या मते अशी भेट किंवा नाते संवर्धन हे जणु काही नाते संबंधांच्या बँकेमध्ये केलेले डिपॉझीट असते.

माझ्या मते नाते संबंध संवर्धन ही जाता जाता करण्याची गोष्ट नसुन जाणिव पुर्वक करण्याची गोष्ट आहे. मग अक्षय नातेसंबंध टिकवण्यासाठी काढाल ना आज थोडा वेळ ? नातेसंबंध निर्माण करण्याची नाते संबंध जपण्याची, इतकी चांगली सवय करायला आणि आयुष्यभर टिकवायला आजच्या पेक्षा चांगला मुहुर्त कोणता असेल ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लेख Happy

काही नाती अशी रहात असतील ज्यांच्या जपणुकीसाठी विशीष्ठ दिवस नाही अश्या नात्यांचे आज संवर्धन करावे असे मला वाटते. कारण जे आज कराल त्याला क्षय नाही.
>>>>>>>> हे जास्त आवडलं

काही नाती अशी रहात असतील ज्यांच्या जपणुकीसाठी विशीष्ठ दिवस नाही अश्या नात्यांचे आज संवर्धन करावे असे मला वाटते. कारण जे आज कराल त्याला क्षय नाही.
>>>>>>>> हे जास्त आवडलं + १

नाते संबंधाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे ही खूप चांगली संकल्पना आहे. अक्षय्य टिकणारी अशी नाती या निमित्ताने जोपासली जातील !

अक्षय्यतॄतियेच्या शुभेच्छा !!

.

छान लेख, मांडणी आवडली.
मटेरिअल/सामान/वस्तु खरेदीपेक्षा चंद्र/रवि संबंधाने मन व आत्मा या संदर्भातुन नातेसंबंध द्विगुणीत करणे, किमान उजाळा देणे हा विचार पटला.