सुंदर माझे पुणे - तळजाई टेकडी

Submitted by हर्पेन on 3 September, 2013 - 14:54

वाढत्या वस्तीला, वाहनांच्या प्रदुषणाला पुरून उरून पुण्याचे हवामान अजूनही बरेच चांगले / टिकून आहे, याचे एक प्रमुख कारण पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या टेकड्या.

ह्या टेकड्या म्हणजे जणू पुण्याला ऑक्सिजन पुरवठा करणारे कारखानेच होत.

जेव्हा केव्हा गडाकिल्ल्यांवर जाता येत नाही तेव्हा तेव्हा दुधाची तहान ताकावर भागवायला उपयोगी पडतात या टेकड्या.

कोणा नवख्या माणसाला तो गडाकिल्ल्यांवर जाऊ शकेल की नाही याचा अंदाज बांधायला मदत करतात या टेकड्या.

घरातल्या लहान मुलांना पुण्यातल्या पुण्यात सह्याद्रीची ओळख करून द्यायला उपयोगी पडतात या टेकड्या.

खालील प्रकाशचित्रे ही एका बाजूला सहकारनगर तर दुसर्‍या बाजूला सिंहगड रस्ता असणार्‍या तळजाई टेकडीवर गेलो असताना काढलेली आहेत.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव,सगळे फोटो सुंदर आलेत. हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा, झाडांतून झिरपणारी प्रकाशकिरणे, धुके असल्याचापण भास होतोय काही फोटोत, सर्वच सुंदर.

तळजाई टेकडी परीसर सुंदरच आहे.... कॉलेजच्या दिवसात सहकारनगरला रहात असताना कधीमधी फिरायला जायचो तिकडे.... भल्या पहाटे आणि संध्याकाळी खुप छान आहे फिरायला जायला!
सुंदर प्रचि Happy

हर्पेन,
सुंदर फोटोंसाठी मनापासून धन्स ....

तळजाई टेकडी/ पाचगाव पर्वती वनविहार - अगदी सुंदर निसर्गरम्य भाग - पुणे शहराचे वैभवच म्हणाना - १९७४-७६च्या आसपास पुण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी (श्रमदानाने) येथील वृक्षारोपण केलेलेही मला आठवते. वेगवेगळ्या भागात लावलेली एका ठराविक प्रकारची झाडे व त्यांना देलेली सुंदर सुंदर नावे - उदा. वंशीवन - असा मस्त माहोल होता. इथे सध्या रानससे व मोर आहेत. पूर्वी हरणे व भेकरेही सोडली होती - (ज्यांची नेहमीप्रमाणे पुढे हत्या होऊन दोन-चार दिवस वर्तमानपत्रात फक्त चर्चा वगैरे झाली).

तिथे त्याच्या पायथ्याशी असलेल्या सहकारनगर भागातच रहातो आम्ही - मी व शांकली.
या भागात मी १९६३-६४ पासून रहातोय - त्यावेळेस बाकीचे सगळे पुणेकर मित्रमंडळी - काय अरण्यात रहाताय तुम्ही ? असे म्हणत असत - इतकी झाडी व निर्मनुष्य भाग होता तो. एवढी मोकळी हवा व वारा असायचा की १९८४ -८६ पर्यंत आम्हाला फॅनचीही गरज वाटत नव्हती. भर उन्हाळ्यातही रात्री चांगल्याच थंडगार असत - इतक्या की मध्यरात्री उठून खिडक्याही बंद कराव्या लागत. आजूबाजूला बंगलेवजा वसाहती असल्याने टेकडीवरुनही अजूनही सर्वत्र हिरवेगारच दिसते. तुळशीबागवाले कॉलनी/सहकारनगर भाग २ यांचा जो भाग टेकडीला भिडलेला आहे तिथे दगडाच्या खाणीही होत्या.
आता वरपर्यंत (तळजाई मंदीरापर्यंत) वहाने जात असल्याने रहदारी व प्रदूषणही वाढलेले आहे. पण वरती पाचगाव पर्वती वनविहारात वहानांना बंदी आहे.

अंजू, सातू, स्वरुप, झकासराव, धन्यवाद.

शशांक, सगळ्या प्रतिसादाला अनुमोदन. मी पहिल्यांदा, वरती ह्या टेकड्या पुण्याच्या सभोवती आहेत असेच लिहिले होते आणि मग लक्षात आले की आता त्या शहराच्या अगदी मध्यभागातच आल्या आहेत. Happy

ह्या टेकडीवर मी देखिल माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून (१९८८-८९) येतो आहे. सोनजे (आड)नावाचा माझा एक मित्र त्या टेकडीच्या पायथ्याशीच रहायचा, त्यावेळेस तळजाई मंदीरापर्यंत रस्ता झाला नव्हता. आम्ही ठुबे बंगल्यापासून चढून जायचो. खूप मजा येत असे. सध्या सिंहगड रस्त्यावरील रांकाच्या समोरून कॅनॉलच्या बाजूने वर चढतो.

एखादे टेकडी गटग करायला मजा येईल. सातारा रस्ता आणि सिंहगड रस्ता या दोन्हीकडच्या माबोकरांना निसर्गाच्या सानिध्यात भेटता येईल.

बघू केव्हा जाता येईल तिथे. >>> आता जाण्यातच मजा आहे - सगळीकडे हिरवेगार झाले असल्याने मस्त वाटते अगदी .....
नंतर गवत वाळल्यावर हा हिरवा नजारा दिसणार नाही .....

रंगासेठ, शशांक म्हणताहेत तसे आता जाण्यातच मजा आहे. लवकरात लवकर मनावर घ्याच, न विसरता कॅमेरा पण सोबत ठेवा म्हणजे आम्हाला अजून काही भारी फोटो बघायला मिळतील. Happy

वर्षा_म, सुनिल परचुरे, चैत्राली धन्यवाद Happy

हर्पेन ......मस्त मस्त .....इथे कडाक्याच्या उन्हाळ्यात सुखद गारवा जाणवला ..... missing all this .....

मस्त प्रचि.
माझे माहेर तिथेच पायथ्याशी आहे. आम्ही ईथे रहायला आलो तेव्हा बोटीवर जसा वार्‍याचा आवाज येतोना तसा आवाज यायचा. पंखा कधीच लावावा लागत नव्हता. आता तिकडे गेल्यावर टेकडीवर जायला वेळच मिळत नाही. Sad
माझे बाबा रोज तळजाईवर फिरायला जातात. माझी लेकपण पुण्याला गेली की त्यांच्याबरोबर जाते. नाहितर ईकडे मुंबईत राहुन कुठले एवढे भाग्य. Happy
माझा भाऊ बेलसरेबाईंच्या बालवाडीत जायचा तेव्हा पावसाच्या दिवसात आजी त्याला चिखलातून घेऊन जायची, पाय आतमध्ये रुतायचे. सगळीकडे गावासारखे वातावरण होते.

हा भाग तळजाई मंदीरापासून नक्की कुठे येतो? मंदीराच्या मागच्या जंगलात शिरावे लागते का?
मी बर्‍याच वेळा गेलोय तिथे पण हा भाग नाही पाहीला.....

खासच आलेत फोटो Happy

हा भाग तळजाई मंदीरापासून नक्की कुठे येतो? मंदीराच्या मागच्या जंगलात शिरावे लागते का? >>>> अगदी बरोबर मंदीराच्या मागच्या जंगलासच पाचगाव पर्वती वनविहार म्हणतात - तिथलेच फोटो आहेत हे ...

सुंदर मित्रा.
लहानपणी ईथे आम्ही रविवारी भटकायला जायचो पण त्यावेळी ही टेकडी शहराबाहेर होती आणि जागाही एव्हढी हिरवी नव्हती. सुंदर बदल.

प्रचि मस्त आले आहेत.
मी सह्कारनगर मध्ये राहात असल्याने तळजाईच्या एकदम प्रेमात. एकदा देवळामागच्या रानात शिरल्यावर पुण्यात आहोत, हे विसरायलाच होत. उन्हाळ्यात पळस, काटेसावर अशी फुले क्रमाक्रमाने फुलतात. पावसाळ्यात जाता येत नाही. एरवी जवळपास रोज चक्कर असतेच. तिथल्या मोरान्च्या केका घरी ऐकु येतात. आता आम्हाला सवयीचे झाले आहे. पाहुण्या लोकाना अमाप आश्चर्य वाटते!

प्रकाशचित्रे सुंदर आहेत...
कोथरुड मध्ये परमहंसनगरच्या मागे टेकडी आहे.....तिथे खूप झाडे नाहीत पण पावसाळ्यानंतर हिरव्यागार गवतामुळे खूप सुंदर दिसायचे....तसेच MIT च्या मागेही टेकडी आहे.....शाळा- कॉलेज मधे असताना सुट्टीच्या दिवसात रोज टेकडीवर फिरायला जात होते...हे फोटो पाहून ते दिवस आठवले...

लहानपणी तळजाई टेकडी च्या पठारावर भरपूर क्रि़केट खेळलेलो आठवतय... त्या भूत-बंगल्याच्या समोर. नंतर कॉलेजच्या दिवसात भूत-बंगल्यात (भर दुपारी) मित्र जमून कुणा-कुणाची दर्दभरी कहाणी वगैरे सुद्धा ऐकायचो.

दिवाळी च्या सुट्टीत अगदी लवकर उठून कुडकुडत त्या ग्राऊंड वर जायचो, कारण दुसरं कुणी येऊन जागा जायला नको. कधीकधी तर इतक्या लवकर जाऊन स्टंप्स लावायचो की थोडा सुर्यप्रकाश येईपर्यंत थांबून रहावं लागे.

एकदा एका टीमशी क्रिकेट मॅच रंगात आली होती. आदल्याच मॅच मधे त्यांनी आम्हाला थोडक्यात हरवलं होतं. त्या मॅच मधे त्यांच्या ४ विकेट्स झटपट काढून आम्ही मॅच जिंकण्याच्या जवळ असताना नेमकं तिथे अशोक सराफ च्या कुठल्यातरी मूव्ही चं शूटिंग सुरू होणार म्हणून आम्हाला हाकलून दिलं होतं. तेव्हा अशोक सराफ ला जवळून पाहिलं होतं आणी खोट्या मिशा लावणार्या आणी पडद्यावर इतके विनोद करत असूनही प्रत्यक्षात इतक्या शांत आणी ब्लँक चेहेर्यानी बसलेल्या अशोक सराफ ला पाहून कसंतरीच वाटलं होतं.

हर्पेन....आणि शशांक पुरंदरे....

मी कोल्हापूरसारख्या पुण्याच्या तुलनेने ग्रामीण म्हटल्या जाणार्‍या आणि वनराईने वेढलेल्या गावात राहूनही तुमच्या भाग्याचा हेवा करावासा वाटतो, इतके सुंदर सहकारनगर तळजाई टेकडीचे सौंदर्य तुम्हाला लाभले आहे. मी पुण्यात अधुनमधून मुलाकडे येत असतो {हडपसर/फुरसुंगी इथे}; पण असे पहाटे कधी फिरायला जाण्याचे भाग्य लाभलेले नाही. पुढेमागे जर जादाचा मुक्काम करण्याचा योग (सुदैवाने) लाभलाच तर नक्की वरील फोटोतील लोकेशन्स पायी घालण्याचा यत्न करणे. रोजचा किमान आठ-दहा किलोमीटर चालण्याचा माझा नित्यनेमाचा व्यायाम इथेही असल्याने तळजाई परिसार मस्तपैकी फिरता येईल....शक्यतो तुम्हा दोघांबरोबरही.

अशोक पाटील

अरे वा! या टेकडीशी असे जीवाभावाचे सख्य असणारे बरेच मायबोलीकर आहेत की Happy
मी तर लहानपणी टेकडीच्या बाबतीत खूप पसेसिव्हपण होतो, आम्ही वॉटरबॅग मधून पाणी नेऊन घालायचो झाडांना, माझ्या काही खास जागा होत्या Happy

सगळ्यांचेच प्रतिसाद वाचून खूप छान वाटतंय, अनेकानेक धन्यवाद.

जाता जाता एक जरा अवांतर गोष्ट नमूद कराविशी वाटते आहे, ही हिरवाई नेत्रसुखद आहे यात वादच नाही पण यातील एक न्युनत्व म्हणजे मधल्या काळातील शासकिय धोरणांनुसार सामाजिक वनीकरण योजने अंतर्गत जी झाडे लावली गेली त्यांचा एकमेव निकष होता लवकर वाढणारी झाडे लावणे. (ही बहुतांश झाडे सुबाभुळासारखी परक्या वाणाची आहेत). त्याचे फलित म्हणून आज जरी ह्या टेकड्या निदान पावसाळ्यात का होईना हिरव्यागार दिसत असल्या तरी ह्या अशा झाडांना आपल्याकडचे प्राणीमात्र / जीवजंतू आपले म्हणत नाहीत, त्यांना चटकन स्वीकारत नाहीत. अगदी गुलमोहरासारखे झाड ज्याने आपल्या साहित्यामधेदेखिल स्थान मिळवले आहे त्यावर शक्यतो आपले पक्षी घरटी बांधत नाहीत. हे पहिल्यांदा ऐकल्यावर मी मुद्दाम लक्षपुर्वक नजरेस पडणारी गुलमोहराची झाडे बघून खातरजमा करून घेतली. एकूणात त्यांचे इथल्या साखळीतले स्थान नगण्य ठरून ऑक्सिजन तयार करणारे कारखाने असेच ठरत आहे. सध्या टाटांच्या लोणावळा येथिल धरणाजवळच्या जमिनीवर पुर्वी लावलेली एक्सॉटिक झाडे काढून परत नविन पण देशी झाडे लावण्याचे काम चालू आहे.

हे सर्व थोडे अवांतर असले तरी इथे सांगण्यापाठचा उद्देश हा की ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी नविन देशी झाडे लावणे, हे निसर्गातल्या इकोसिस्टीमचा समतोल राखण्याच्या दृष्टीकोनातून गरजेचे आहे. कृपया नवीन सर्व झाडे देशी लावावीत.

अशोक. यावेळी पुण्यात आलात की नक्की जाऊ आपण, मला खूप आनंद वाटेल Happy
के अंजली - पर्वती पायथ्यावरून सहकारनगरकडे सरळ पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक शाळा आहे तिथून वर तळजाईच्या देवळाकडे जाणार्‍या रस्त्याचा फाटा फुटतो तो थेट वर देवळापर्यंत जातो. देवळामागेच या वनविहारात प्रवेश करण्याचे फाटक आहे. या टेकडीवर सिंहगडरस्त्याच्या बाजूने देखिल येता येते.

रोजचा किमान आठ-दहा किलोमीटर चालण्याचा माझा नित्यनेमाचा व्यायाम इथेही असल्याने तळजाई परिसार मस्तपैकी फिरता येईल....शक्यतो तुम्हा दोघांबरोबरही. >>>>> अशोकराव, लवकरात लवकर हा महाभाग्याचा दिवस उजाडावा...

हर्पेन म्हणतो तसे इथे एक गटग करायला काहीच हरकत नाही - छोट्यांना घिंगाणा घालायला भरपूर जागा, निसर्गात रमणार्‍यांना भरपूर निसर्ग, केवळ गप्पा मारणार्‍यांसाठीही छान जागा असे हे एक भारी ठिकाण आहे. तळजाई मंदीरापर्यंत दुचाकी - चारचाकी येऊ शकते त्यामुळे कोणाचीही अडचण होणार नाही.

पर्वती पायथ्यावरून दक्षिणेकडे/कात्रज डोंगराकडे (सातारा रोडला समांतर) येत राहिले की गजानन महाराज मंदीर लागेल -सारंग सोसा.- सातव जिम्नॅशिअम हॉल - त्याला लागूनच लक्ष्मीबाई शिंदे हायस्कूल व त्याला लागूनच उजवीकडे तळजाईला जाणारा रस्ता (छोटासा घाटासारखा) लागतो - तो थेट तळजाई मंदीराकडेच. त्या मंदीरामागे हे पाचगाव पर्वती वनविहार आहे. नवरात्रात मात्र फारच गर्दी असते - त्यामुळे ते दिवस सोडून केव्हाही गटग करता येईल.

हर्पेन....शशांक....दिनेश.....

तुम्ही तीन हिरे जर सोबतीला असाल तर मी अगदी चातक पक्ष्याप्रमाणे तुमच्या अंगणात टपकेन. दिवस तारीख तुम्ही ठरवा....मला अगदी उद्या बोलाविले तरी येईन अशी सध्याची माझी स्थिती आहे.

गटग चे रुपडे कसेही असले तरी मला १००% मान्य असणारच.

अशोक पाटील

Pages