छोटासाच प्रसंग पण नात्यांमधले कंगोरे दाखवून जाणारा !

Submitted by पशुपत on 26 November, 2026 - 04:48

दिवाळीची खरेदी प्रत्यक्ष दुकानात जाऊन करण्याचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने गजबज असलेल्या भागातल्या बाजारपेठेतल्या कपड्यांच्या दुकानात गेलो.
माझं एक तत्त्व आहे. चांगला दिसतो आहे म्हणून कपडा घेतला जात नाही. पाच पंचवीस शर्ट लावलेले आहेत आणि त्यातल्या एकाच शर्टाकडे जर झटकन नजर आकर्षित झाली तरच तो शर्ट घेण्यात मला जास्ती रस असतो. तशा प्रकारचे काही आजूबाजूला दिसते का याची याची माझी नजर वेध घेत होती.
तेवढ्यात पलिकडेच एक साधारण दिसणारा गरिबीतला पन्नाशीचा माणूस शर्ट बघत होता, तिकडे लक्ष गेले. किरकोळ देह , उन्हाने रापलेला चेहरा आणि शरीर, आणि डोळ्यात गाई सारखा अतिशय हळवा भाव ! आयुष्यात या माणसांने कधी नजर उचलून कोणाकडे बघितलेही असेल असं वाटत नव्हतं. पापभिरू मनुष्य . खूप काबाडकष्ट करून बायको मुलांना सुखी ठेवून संसार आनंदी करणे एवढे एकमेव उद्दिष्ट घेऊन जीवन जगणारे जे लोक असतात, त्यातला हा प्रातिनिधिक मनुष्य!
तेवढ्यात पलीकडून एका बाईंचा आवाज आला; "घ्या घ्या ! तुम्हाला आवडलेला आहे ना शर्ट , घेऊन टाका . मी सांगते ना तुम्हाला !"
सहजच माझं लक्ष तिकडे गेलं. तर ती बाई सधन दिसत होती. वावरण्यात बोलण्यात एक अधिकार वाणी होती आणि हा मनुष्य कसनुसा होऊन ; एवढा महागाचा शर्ट कसा घ्यायचा, या मनाच्या द्वंद्वात अडकलेला! तरी त्या बाईने बळजबरीने त्यांना तो शर्ट पॅक करायला लावला.
"आणखीन एक टी-शर्ट पण घेऊन टाका.. मी सांगते ना .. घेऊन टाका. जा जा "
माझं मन लगेच हिशोब करायला लागलं. या बाई या मनुष्याची पत्नी किंवा बहीण तर दिसत नाहीये. वयाने त्याच्यापेक्षा लहानही आहेत. सधन दिसताहेत.
बायकोच्या लक्षात आले की हा मनुष्य या बाईंचा ड्रायव्हर आहे.
आणि माझं मन आणि डोळे एका विलक्षण आश्चर्याने आणि आनंदाने चमकून गेले.
तो मनुष्याच्य जिकडे गेला होता तिकडेच मी ही गेलो होतो. तेव्हा त्याचा टी-शर्ट सिलेक्ट करून झाला होता. पटकन त्यानी विचारले, "किंमत काय असेल?"
तर तो दुकानदारा एकदम म्हणून गेला, "चारशे रुपये; पण तुम्ही कशाला विचार करताहात! मॅडमनी सांगितले आहे तुम्हाला काही सांगायचं नाही म्हणून..."

आणि तो आणखीनच खजील होऊन पटकन काउंटर कडे निघून गेला.
माझं मन विचार करू लागलं.
आपण सगळेच आपल्याकडे काम करणाऱ्या बायकांना एक पगार दिवाळीचा बोनस म्हणून देतो, तसे या बाईनं करता आलं असतं .. पण तसं न करता ; आपल्या वडिलांना ज्या कौतुकाने आणि प्रेमाने एखादी मध्यमवयीन स्त्री शॉपिंग करायला घेऊन जाईल , त्याच आनंदाने या बाई आपल्या ड्रायव्हर साठी दिवाळीची खरेदी करत होत्या.
एक थोडसं कौतुकाचं , जबाबदारीच्या भावनेतून.. कर्तव्य पूर्ण करण्याचं आनंदी स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत.
आपल्याला तर हे नेहमी ऐकायला मिळतं, की हे जग खूप स्वार्थी, यांत्रिक, भावना शून्य अशा लोकांनी भरलेलं आहे. पण अशा या भावनारहित यांत्रिक जगात कृतज्ञता, प्रेम, आपुलकी, जबाबदारी आणि त्यापेक्षाही मानवतेच्या धाग्याने सानिध्यातल्या माणसाना आपलीशी करून घेणारी माणसेही ; जरा आजूबाजूला बघितले तर सहज दृष्टीस पडतात.
लक्ष वेधून घेणारा शर्ट खरेदी करण्याच्या आनंदा बरोबरच त्याहीपेक्षा एक जास्ती खोल आश्वस्त करणारा आणि मन भारून टाकणारा समाधानाचा आनंद घेऊन मी त्या दुकानातून बाहेर पडलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अनुभव .. लिहिलं ही छान आहे. अशी ही माणसं असतात अजून ही.. मला ही छान वाटलं वाचून.

हो Happy

छान

छान

नवीन प्रतिसाद लिहा