बिनचूक भविष्य

Submitted by रघू आचार्य on 26 March, 2023 - 05:12

महाबळेश्वरला मस्त सीनरी दिसली म्हणून गाडी उभी केली आणि थोडा खाली उतरून फोटो काढू लागलो. बायका पोरं चिंचा पाडून कठड्यावर खात बसली होती.

इतक्यात वीस बावीस वर्षांचा शेंडी राखलेला, धोतर सदरा आणि झोळी अशा अवतारातला मुलगा आला. सर्वांना अरे तुरे करून मोठ्या आवाजात बोलू लागला.

सर्वांचं चांगलं केलंस, वेळेला कुणी मदतीला येत नाही. आई वडलांची सेवा केलीस, भावांना मदत केली पण कुणाला जाणीव नाही.
कामात प्रामाणिक आहेस, खूप मेहनती आहेस, पण कदर होत नाही.
तू केलेल्या कामाची फळं दुसराच चाखून जातो. पण तक्रार केली नाहीस कधी.
पैसा येतो पण टिकत नाही. खर्च भागत नाहीत. संकटं येतात.
मुलांची चिंता सतावतेय. त्यांना मार्क्स पडतील का, अ‍ॅडमिशन मिळेल का या चिंतेनं तुला घेरलंय
आई वडलांची आजारपणं आहेत. सगळं तुलाच बघायला लागतं.

मग कानात कुजबुजू लागला.
"कितीही हवं नको बघितलं, साडी घेऊन दिली, घर घेतलं, गाडी घेतली तरी बायकोला समाधान नाही. पगारात खर्च भागवत नाही. बरोबर ? "

नंतर त्याने बायकोकडे मोर्चा वळवला.
"गूहकृत्यदक्ष आहेस. नाकी डोळे चांगले आहेत. दुसर्‍या बायका जळतात तुझ्यावर.
जादू टोणा होतोय. मनासारखं काही घडत नाही.
नवरा चांगला आहे पण त्याला तुझ्या मनातलं कळत नाही."

आता बायकोला ऐकू जाईल अशा कुजबुजत्या आवाजात काहीतरी बडबडला.
बायकोला ते अगदी पटल्यासारखं दिसलं.
पोटात धस्स झालं

माझ्याकडे वळून म्हणाला

" बाळ ! "
मी चमकलो. फार तर फार त्याचं २५ वय असेल. मी बाळ मग हे कोण ?

"आतापर्यंत जे काही सांगितलं त्याच काही जरी चुकीचं असलं तरी सांग"
मी काही बोललो नाही तर बायकोकडून वदवून घेतलं.
मग चेव चढल्यासारखं त्याचं सुरू झालं.

"लबाड बोलत नाही. खोटं भविष्य सांगतच नाही. फक्त ललाटरेषा बघून भूत सांगतो. भविष्य पण जाणतो.
मोठ्या संकटातून सुटायचं तर विधी सांगतो. आयुष्यात नंतर कधी काही समस्या येणार नाही.
पैशाची हाव नाही पण त्याच्यावाचून जमत नाही. पोट आहे. समजून उमजून द्या काहीतरी "

आता खरा मुद्दा आला म्हटल्यावर मी विचारलं "किती ?"
"भविष्य सांगायचे फक्त १००१ द्या. बाकी विधी करायचा तर सामान लागेल, अजून एक माणूस पूजा सांगायला लागेल.
मार्केट मधे चौकशी करून बघा. ५१००० च्या खाली कुणी घेत नाही. तुमच्यासाठी म्हणून ३५००० रूपयात बसवून देऊ.
ग्यारण्टीने पूजा सांगणार "

घासाघीस करत करत २० हजारापर्यंत रक्कम खाली आली. पण जास्त होतात एव्हढंच मी म्हणत राहिलो.

शेवटी वैतागत "किती देणार ते सांग" असा पवित्रा घेतला.
मी म्हणालो "१०१"

मग त्याचा संयम सुटला.
त्याच्या एकंदर बोलण्यावरून मला गुणांची कदर नसून याचमुळे लोक मला त्रास देतात हे समजले. जे प्रामाणिक आहेत त्यांना असं रस्त्यावरच्या ज्योतिषा सारखी ट्रीटमेंट दिली तर त्याचं तसं वाईट फळ नक्कीच मिळणार.
कडक साधना करून आलेल्या त्या तपस्वीचा जो अपमान झाला त्यामुळे मला कसला तरी शाप लागणार होता.
या शापापासून मुक्ती मिळायची तर ज्याचा अपमान झालाय त्याच्याच हातात असतं ते.
दुसरा कुणी मधे पडू शकत नाही.
अजून बरंच काय काय बोलला.
त्यावरून मी एकदम पाजी, हलकट आणि नास्तिक मनुष्य असून धार्मिक कार्यात जराही योगदान नसल्यानेच माझ्यात वाईट गुणांचा संचय झालेला आहे हे कळले. म्हणजे आधी सांगितलेले सगळे खोटे होते तर,...

हे मी विचारताच तो आणखीन भडकला.
"आता काय ते १००१ पण द्यायचा विचार नाही वाटतं ? याचे परिणाम वाईट होतील. घाट उतरायचाय अजून "

बायको घाबरली होती. देऊन टाका म्हणाली.
पण म्हटलं परीक्षा घेऊ.

मग वळून म्हणालो
"जर भविष्य बिनचूक आलं तर दरीत कोसळण्या आधी १००१ रस्त्यावर टाकून देईन. ठिकाण माहीतच असेल. मागून येऊन घेऊन जा. नाहीतर दुसरा कुणी घेऊन जाईल. आणि नेलेच तरी कुणी नेलेत ते तुमच्यापासून लपणार आहे का ?"

काल फेसबुकवर एका महिलेने क्लिक टू प्ले सारखी पोस्ट शेअर केली होती.
क्लिक केल्यावर भविष्य येतं..

त्यात सेम टू सेम मजकूर होता.
म्हटलं , बाबाने अ‍ॅप बनवलेलं दिसतंय. बिनचूक भविष्याचं !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळं चांगलं चाललंय त्यामुळेच इथपर्यंत आलो आणि तू भेटलास. याअगोदर एक ऋषिकेशला भेटला होता त्याला सोडून देऊ का? तिकडून येताना घाट लागलाच नाही.

नसेल काही कौशल्य ....
>>>>

हे बोलीबच्चन देता येणे एक कौशल्यच आहे.
. येणाऱ्या भविष्यावर, न पाहिलेल्या देवावर, पत्रिकेवर, कुंडलीवर, धार्मिक विधींवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही ईथे. त्यातला एखादा नाजूक क्षणी विश्वास ठेवतोच.
आता तो मुलगा रस्त्यावर वणवण न फिरता एखाद्या मंदिरात बसत असता तर त्याने नक्कीच छापले असते. कोणीतरी त्याचे हे कौशल्य हेरून त्याला तो जॉब ऑफर करायला हवा Happy

धन्यवाद सर्वांचे.
@srd , मी हास्यजत्राच काय टीव्हीवरचा कोणताही कार्यक्रम बघत नाही.
कनेक्शन्स बंद करून आठ वर्षे झाली आहेत. हे माझ्यासोबत घडलेले आहे. दोन्हीही किस्से.
शक्यतो सगळे हेच भविष्य सांगतात.