स्नेहालय परिसस्पर्श- ३

Submitted by विक्रम देशमुख on 13 August, 2016 - 09:08

हॉटेलची मालकीण - निर्मळ रेखा किशोर

मराठवाड्यातील लातूर येथे लालबहादूर शास्त्री शाळेत इ. २ री मध्ये मी शिकत होते. लहानपणीच आई-वडिलांचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला होता. तेव्हा माझा सांभाळ मावशीनेच केला. मावशीचीही आर्थिक परिस्थिती बिकट होती. माझी तब्येत पण बरी नसायची माझे वजनही कमी होते. मी अडखळत बोलायचे. ५ वी पर्यंतचे शिक्षण माझ्या मावशीनेच केले. त्यानंतर माझ्या मावशीला स्नेहालय या संस्थेबद्दल माहिती मिळाली. मावशीला संस्थेबद्दल खात्री पटल्यानंतर मावशीने मला स्नेहालय संस्थेत दाखल केले. वयाच्या १२ व्या वर्षी मुं स्नेहालय संस्थेत दाखल झाले. सुरुवातीला मला स्नेहालय संस्थेत कर्मयचे नाही. पण हळूहळू संस्थेतील काळजीवाहक माझी आई-वडिलांसारखीच काळजी घ्यायचे. मला त्यांनी कधीच आई-वडिलांची कमतरता भासू दिली नाही.

माझ्या आयुष्यात एक जबरदस्त बदल मी १२ वर्षांची असताना झाला. मुंबईतील सौ. रंजना आणि कॅप्टन अशोक ताम्हाणे यांनी एकदा स्नेहालयाला भेट दिली. व्यावसायिक पायलट असलेल्या ताम्हाणे यांना आयुष्यात त्यांच्या मुलीप्रमाणेच एखाद्या अनाथ मुलीला मदत करण्याची तीव्र इच्छा होती. ते मला भेटले. त्यांनी माझ्या विषयी जाणून घेतले. त्यांनी मला शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे ठरविले. त्यांच्या घरी मी जणू राणीच होते. उत्तम शाळा, घरी आल्यावर पूजा आणि अभ्यास, खाणे-पिण्याची योग्य काळजी येथे घेतली जात होती. परंतु स्नेहालयामध्ये असल्यापासून मला नेहमी खोकला यायचा. मी नेहमीच आजारी पडत असल्याने अशोक ताम्हाणे यांनी माझी तपासणी करण्याचे ठरविले. डॉक्टरांनी सांगितले की, रेखाला क्षयरोगाची लागण झाली आहे. हे ऐकल्यावर अशोक ताम्हाणे हे चिंतीत झाले. माझा स्वभाव हट्टी होता. क्षयरोगाच्या गोळ्यांचा मला त्रास होत असे. त्यामुळे मी अनेकदा त्या घेत नसे. मला ताम्हाणे काका-काकूंनी खूप समजावून सांगितले, पण माझ्या औषधोपचारात नियमितपणा आलाच नाही. अखेरीस त्यांनी मला पुन्हा स्नेहालय संस्थेत आणून सोडले. स्नेहालयने मी वेळच्या वेळी औषधे घ्यावीत म्हणून एका शिक्षकाला पूर्णवेळ जबाबदारी दिली. रोज सायंकाळी माझ्या गोळ्या घेण्याची वेळ आणि भोजनाचा तपशील विचारला जात असे. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर मी क्षयरोगातून मुक्त झाले. आज मागे वळून पाहिल्यावर जाणवते की, माझ्या औषधोपचाराबाबत माझ्या हट्टीपणासमोर नमून जर स्नेहालयाने माघार घेतली असती तर मी जगूच शकले नसते.

स्नेहालयने माझे शिक्षण पुढे चालूच ठेवले. मला एन. आय. ओ. एस. या विद्यालयात दाखल केले. तेथे मी इ. १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १० वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी परिचारिकेचा कोर्स पूर्ण केला. आता मी अहमदनगरमधील एका नामांकित रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करते.

२ वर्षांपूर्वी, २०१३ मध्ये स्नेहालयने माझ्या इच्छेनुसार माझे लग्न लावून दिले. माझा पती स्वप्नील पाथरकर यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. अहमदनगरच्या मध्यवर्ती पटवर्धन चौकात आम्ही राहतो. आमचा संसार देखील व्यवस्थित चालू आहे. स्नेहालयने माझी काळजी घेतली. माझे शिक्षण पूर्ण केले. मला जगण्याचा नवा मार्ग दाखवला. महत्त्वाचे म्हणजे मी चुकले तरी मदत करायला स्नेहालय कधीच चुकले नाही. आई-बाप सोडले तर अशी माया कोण करते? स्नेहालयसाठी मी काय करू, असे विचारल्यावर मला सांगण्यात आले की, तुझ्यासारख्याच काही अडचणीतील मुलींना मदत कर. मी स्नेहालयातील माजी विद्यार्थिनींचे प्रश सोडविण्यात मदत करते. त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत असतानांच माझे अल्पस्वल्प अनुभव सांगून त्यांना समजूतदार आणि सावध मी करते. ज्यांच्याकडे मुंबईत मी राहिले ते अशोक ताम्हाणे आणि सौ रंजना ताम्हाणे मला भेटायला अहमदनगरला आले होते. माझे घर व संसार पाहून त्यांना आनंद झाला. दिवाळीला स्नेहालय आणि ताम्हाणे परिवार माझी आठवण ठेवतो, तेव्हा डोळे पाणावतात. लातूरच्या मावशीचे पांग फेडायचे राहून गेले. त्यापूर्वीच ती देवाघरी गेली. आता जगात रक्ताचे नातेवाईक कोणी नसले तरी स्नेहालय परिवारामुळे सुरक्षित आणि आशावादी वाटते. माझ्या मुलीला मी डॉक्टर बनवणार आहे. तिने क्षयरोग्यांची सेवा करावी असे मला वाटते.

http://www.maayboli.com/node/59543

Group content visibility: 
Public - accessible to all site users