मुन्नाभाई चले येरवडा

Submitted by मिल्या on 20 October, 2007 - 06:04

ज जेलमध्ये सगळीकडे एकच गडबड, धावपळ सुरू होती. कुणालाही एक क्षणभर सुद्धा फुरसत नव्हती. कैदी म्हणू नका (कैद्यांना कैदी नाही म्हणायचे, तर काय जज म्हणायचे? पण मानव हक्क आयोगाने कैद्यांना कैदी म्हणणे हा त्यांचा अपमान असून त्याऐवजी त्यांना कृष्णजन म्हणावे असा फतवा काढला आहे. कृष्णाचा जन्मही कैदेतच झाला हा विचार त्यामागे आहे.) तर कृष्णजन म्हणू नका, शिपाई म्हणू नका की स्वत: जेलर साहेब म्हणू नका... सर्वांची नुसती लगबग चालली होती. जो तो आपापल्यापरीने समारंभाची जोरदार तयारी करत होता. जेलमध्ये असे उत्साहाचे वातावरण होते की जणू दिवाळी आणि ईद एकाच दिवशी साजरी होत होती.

येरवडा जेलच्या जुन्या-पुराण्या भिंतीही अचंबित होऊन ही तयारी बघत होत्या. त्याही आज कात टाकून नवे रंग लेऊन उभ्या होत्या. गांधीजींनंतर त्यांनी सुद्धा एवढा मोठ्ठा उत्साह, आनंद, जल्लोश तुरुंगात पाहिला नव्हता. पण गोष्टच तशी होती ना. आजच्या तरुणांचा लाडका हिरो आणि ज्याला लोक प्रतिगांधी समजू लागले होते, तो संजय दत्त आज येरवडा तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी येणार होता. गांधीजींप्रमाणेच त्याला पण सहा वर्षांची शिक्षा झाली होती. हा काही सामान्य योगायोग नव्हता. त्यामुळेच कधी नव्हे ते कृष्णजन आणि पोलीस, मुशर्रफ आणि वाजपेयी एकत्र यावेत तसे एकत्र आले होते आणि त्यांनी त्याच्या आगमनानिमित्त तुरुंगात भव्य स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यानिमित्त गेले दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केलेले होते.

त्याची सुरुवात कालच २०-२० च्या सामन्याने झाली होती. सत्य गट (ह्यात सर्व घरफोडे होते ज्यांनी अंडर ट्रायल जेलला कंटाळून न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला होता) आणि अहिंसा गट (ह्यात सर्व खुन्यांचा समावेश होता.) सत्य गटात गोगली (चोरी करुन झाल्यावर हा इतका हळू पळायचा की पोलिसांना सुद्धा सहज सापडायचा) आणि भिंताड (हा कुठलीही वॉल अगदी लीलया फोडायचा) होते तर अहिंसा गटात टेंगूळकर आणि गोणी होते. (टेंगूळकर हा गेली सतरा वर्षे जेलमध्येच होता आणि ह्याने पंचाहत्तरच्या वर मर्डर आणि शंभराच्या वर हाफ मर्डर पचवले होते म्हणे. गोणीने एकदा गवळ्याने तीन लिटर च्या ऐवजी पावणेतीन लिटर दूध दिले म्हणून अख्या गवळीवाड्याची, तिथल्या म्हशींची आणि रेड्यांची यथेच्छ धुलाई केली होती). त्यामुळे सामना फार चुरशीचा झाला होता. पण अहिंसा गटाचा कप्तान 'रिकी रास्कल' दुबईस्थित गॅंगस्टर खाऊदचा खास आदमी असल्याने सत्य गटाने घाबरून ऐनवेळी हार मानली. (नंतर मॅच फिक्स होती आणि ती बोमन मेहता आणि बेबी जहन्नुम ह्यांनी फिक्स केली होती अशी कुणकुण पण ऐकायला आली.)

त्यानंतर विविध खेळांच्या स्पर्धा झाल्या. त्यात एका मिनिटात जास्तीत जास्त तिजोर्‍या फोडणे (जो जास्तीत जास्त तिजोर्‍या फोडेल त्याला 'शी मराठी' तर्फे एक जोधपुरी बक्षीस होतं), सुर्‍या, गुप्ती, सायकल चेन्स हे वापरून द्वंद्वयुद्धे, हातोडा फेक, चाकू फेक, सायकलवरून आडथळा शर्यत (म्हणजे सायकल शर्यतीमध्ये वाटेत ठिकठिकाणी मंगळसूत्रं गळ्यात घातलेले पुतळे ठेवले होते. जाता जाता त्याच्या गळ्यातून मंगळसूत्रे हिसकावयाची) अश्या अनेक स्पर्धांचा समावेश होता.

ह्या सर्व स्पर्धांचे लाईव्ह टेलीकास्ट टीव्ही वाहिन्यांवरून होत होते आणि विविध कंपन्यांनी स्पॉन्सरशिप पुरवल्यामुळे त्यांना वेगळेच वलय आणि वजन प्राप्त झाले होते. (खरेतर वाहिन्यांनी ह्याचे टेलीकास्ट करायला आधी नकारच दिला होता कारण काय तर कार्यक्रमात एकही स्त्री नाही. मग कार्यक्रम कसा चालणार आणि टी. आर. पी. कसे वाढणार? अहो जिथे आम्हाला चड्डी पासून दाढीपर्यंत सर्व जाहिरातीत बाई लागते तिथे एवढ्या मोठ्ठ्या कार्यक्रमात बाई नाही म्हणजे?.. पण मग जेव्हा संजयचा निरोप समारंभ असेल तो अजून भव्य करू आणि त्यावेळी स्त्री कृष्णजनांनाही बोलवून... 'नाच जेलमे' सारखी स्पर्धाच ठेवू असे आश्वासन देऊन संयोजकांनी त्यांची समजूत काढली होती.)

त्यानंतर जेल-ए-सिंगर ही स्पर्धा झाली. सा (साठेमारी करणारे), रे (रेपिस्ट), ग (गँबलर्स), म (मर्डरर्स) आणि प (पाकीटमार) असे पाच गट होते. प्रत्येक गटाला मार्गदर्शन करायला एका प्रसिद्ध संगीतकाराची निवड करण्यात आलेली होती. त्यात प्रसिद्ध गायक (का नायक.. नाकातून गातो तो नायक अशी नवीन व्याख्या ह्यांनी तयार केली आहे), संगीतकार 'नाकेश कर्कशिया' पण होते. अंतिम फेरीत 'पप्पू पेजर', 'मुन्ना मोबाईल' आणि 'टोपी टपोरी' पोचले. पुढील डॉन (अरेच्च्या डॉन नाही दोन) तासांत प्रेक्षकांकडून आलेल्या एस्. एम्. एस्. नुसार नाकेशच्याच गटाचा टोपी टपोरी, ह्याला विजेता घोषित करण्यात आले. त्याला सर्वात जास्त मेसेजेस दुबईमधून आले होते. ( नाकेश कर्कशिया ह्यांना सपोर्ट म्हणून कित्येक लाख गाढवांनी पण एस्. एम्. एस्. धाडले होते म्हणे). टोपी टपोरीने मग आपल्याला मार्गदर्शन केले म्हणून नाकेशला उद्देशून 'गायक बनाया, गायक बनाया, गायक बनाया आपने' गाणे सादर केले. टोपी टपोरी ला टोमॅटो कार्स तर्फे जेलमध्ये फिरण्यासाठी नवी कोरी टोमॅटो कार आणि उच्चप्रतीची कृष्णकृत्ये करण्यासाठी दुबई आणि पाकीस्तानमध्ये फुकट प्रशिक्षण असे बक्षीस मिळाले. तर उपविजेत्यांना ऑर्थर रोड आणि तिहार जेलमध्ये प्रत्येकी दोन आठवड्यांचे हॉलीडे पॅकेज आणि सायबर क्राईम ह्या नव्या विषयाचे मोफत प्रशिक्षण अशी बक्षीसे मिळाली.

अशा रितीने सर्व स्पर्धा शांततेत ( फक्त सात कृष्णजन आणि सत्तावीस पोलीस ह्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले, पाच जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले आणि तीन जण मरता मरता वाचले) पार पडल्या आणि सर्वचजण उत्सुकतेने संजयची वाट पाहू लागले. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून थोर नेते 'जयरंजन सदा खुनशी' जातीने उपस्थित होते.

थोड्याच वेळात संजयचे आगमन झाले आणि त्याला पाहण्यासाठी त्याच्या गाडीभोवती सर्वांचा एकच गराडा पडला. जेलरसाहेबांनी कसेबसे संजयची सुटका करून त्याला व्यासपीठावर आणले. संजयने आल्या आल्या जेलर साहेबांच्या बंदुकीमधून सहा बार काढून सत्कार समारंभाचे स्वत:च उद्घाटन केले. तेव्हा काहीही झाले तरी आधी चरखा चालविण्याचे गांधीजींचे व्रत आठवून अनेक लोकांचे डोळे पाणावले.

मग समारंभाला सुरुवात झाली. सर्वप्रथम 'हसन हातोडा आणि मंडळी' ह्यांनी भजन सादर केले -

कैदशाळंचं देऊळ झालं चमत्कार झाला
दत्त मानूस तुरुंगात आला हो दत्त मानूस तुरुंगात आला ॥

त्यानंतर विविध कैद्यांनी - चुकले - कृष्णजनांनी एकपात्री प्रयोग सादर केले. ज्यात अनेक कृष्णजनांनी संजय दत्तने आपल्या 'अभिनयाने' अजरामर केलेल्या भूमिका सादर केल्या. त्यापैकी खलनायक, वास्तव, मुसाफिर, प्लॅन, कांटे इत्यादी व्यतिरेखा तर त्यांच्या डाव्या हातची गन होत्या. साजन, नाम, मिशन काश्मिर ह्यातील व्यक्तिरेखा मात्र जरा अवघड होत्या पण काही भामट्यांनी त्यापण बेमालूम सादर करून सर्वांचीच वाहवा मिळविली. संजयनेही त्यांना चांगले मार्गदर्शन केले आणि जर चुकून-माकून जेलमध्ये राहिलोच तर एक अभिनय कार्यशाळा घेण्याचे वचन पण दिले.

त्यानंतर सुप्रसिद्ध 'दीप' नर्तिका बेबी जहान्नुम, हीचे 'माझे सट्ट्याचे प्रयोग' तर सुप्रसिद्ध महसूल आणि अर्थतज्ञ तेलघी ह्यांचे 'मुद्रांकमुद्रा' ह्या जेलमध्येच लिहिलेल्या आत्मचरित्रांचे प्रकाशन संजयच्या हस्ते झाले. जेलमध्ये प्रकाशित झालेली ती पहिलीच पुस्तके असल्याने गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने पण त्यांची नोंद घेतली.

मग संजयच्या सन्मानार्थ अनेक जणांनी भाषणे केली. ती सर्व काही त्यांच्याच भाषेत इथे दिली तर माझ्या ह्या वृत्तांत कथनाला 'ए' सर्टिफिकेट मिळायचे तेव्हा त्यातील एक दोन भाषणाचा सारांश माझ्या भाषेत तुम्हाला सांगतो.

प्रथम उभी हयात तुरुंगात काढलेल्या एका ज्येष्ठ कृष्णजनाचे भाषण झाले.

सभ्य(?) जनहो,

आजचा दिस ह्यो माझ्या आयुष्यातील लई आनंदाचा दिस हाय. संजूबाबा सारख्या थोरामोठ्यांचे पाय आज ह्या तुरुंगाला लागले ही खरोखरच फार मोठ्ठ्या भाग्याची गोष्ट हाय बगा (टाळ्या). संतांनी म्हणलेच आहे 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले'. संजूची पावले बगा ह्योच मार्गावर पडत्यायत. एके फिफ्टी शिक्श त्याने ठेवली जवळ म्हणजे ठेवली. अरं मर्दानं छातीठोकपनं सांगितलेया तसे. कधी नाय बोलला का तो आं? आता बगा यवढी भारीची वसतू जवळ असेल तर कुणालाबी वाटणार किनाई की ती वापरावी म्हणून. पण नाय... संजू असल्या मोहापासून कैक मैल लांब हाय बगा जसा आपला खाऊदभाई पोलीसांपासून लांब हाय (टाळ्या). संकटकाळी मदत करील तोच खरा मित्र. संजयने फकस्त आपल्या दोस्ताला मदत केली बगा. ह्यात त्याचा काय बी दोष नाय. तर अश्या संत विभूतीला अपराधी ठरविणार्‍या समाजालाच मी अपराधी ठरवितो (थू तिच्या मारी.. व्यासपीठावरच थुंकतो). अहो कालच म्या डी.व्ही.डी. वर 'शूटऑऊट' आनि 'नेहले पे देहला' बगीतला. अहो ज्याच्या चेहर्‍यावरची माशी हालंना तो काय ओ बंदूक हलविनार? (टाळ्या). आता हे भाषण करताना माझ्या एका डोळ्यात हासू आहे तर एका डोळ्यात आसू. ( हे सभ्य वाक्य मी घुसडलेय नाहीतर मूळ वाक्य असे होते... ह्यो भाशन करताना तिच्यायला माझा एक डोळा मिरचीची पूड पडल्यावानी लाल झालाय तर एक डोळा खूप मोठ्ठा गल्ला पाहिल्यावर चमकतो तसा चमकत्योय बगा). चमकत्योय ह्याच्यासाठी की संजूबाबा इकडून लवकरच भाईर पडणार आणि लाल ह्योसाठी की आपल्याला संजूबाबा फार दिवस नाही गावणार.. पण संजूबाबासाठी ह्यो कुर्बानी द्यायची आमची तयारी हाय (टाळ्या). लई दिसांची इच्चा होती की त्याच्याबरुबर तो शिनेमात ओढतो त्या इश्टाईलने बिडी ओढावी ती मात्र म्ह्या पूर्ण करुन घेणार बगा. (हशा) तर आता जास्ती वटवट न करता मी संजूबाबाला खूप सारे आशिर्वाद देतो आनि खाली बसतो. (शेवटाला 'लई गुनाचा संजू माझा' अशी एक जुनी कविताही म्हणतो).

Munnabhai.jpg

मग नंतर प्रमुख पाहुणे जयरंजन सदा खुनशी भाषण द्यायला उभे रहातात. -

माझ्या बंधू आणि भगिनींनो, (जोरदार हश्या कारण तिथे खुनशी साहेबांच्या धर्मपत्नी सोडल्या तर कुणीच स्त्रीपार्टी नाही.)

आज खरे तर ह्या तुरुंगाच्याच नाही तर देशाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय दिवस आहे. पंचाऐंशी वर्षांपूर्वी गांधीजींना दुष्ट ब्रिटीशांनी सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि सारा देश हळहळला होता आणि आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे (टाळ्या). आज सरकारने परत तीच चूक केली आहे. आता परत एकदा गांधीजींनी लिहिला होता तसा "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा अग्रलेख लिहायची वेळ आलेली आहे (तेवढ्यात पाठीमागून सचिव येऊन कानात कुजबुजतो.. सर तो लेख टिळकांनी लिहिला होता आणि जरा जपून. सरकार तुमचेच आहे अजूनतरी. सावरून लगेच विषय बदलतात.)

मी तर म्हणतो ह्या जेलची संजयने अजिबात पर्वा करू नये. खरे तर हे जग म्हणजेच एक तुरुंग आहे (टाळ्या). इतका भयानक तुरुंग की त्यापेक्षा 'आत' बरे (हशा). पोलीस प्रोटेक्शन तरी असते (पुन्हा हश्या). तुम्ही इथे निवांत मोकळे वावरत आहात पण बाहेर प्रत्येकाचेच हात कशा न कशाने बांधलेले आहेत. प्रत्येकाच्याच पायात बेड्या आहेत. मी तर म्हणतो तुम्हीच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगत आहात (टाळ्या).

संजय आणि गांधीजींमध्ये खरे तर खूप साम्य आहे. गांधीजी उठल्यावर दुर्मिळ असे बकरीचे दूध पीत. संजय सुद्धा उठल्यावर 'दुर्मिळ' पेयेच पितो. गांधीजी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते तर संजयची आई मुस्लीम व वडील हिंदू असल्याने तो हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मूर्तीमंत प्रतिक आहे (टाळ्या). गांधीजींनी सांगितले 'बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो' पण त्यांनी कुठेही 'बुरा मत करो' असे म्हणले नाहीये. (जोरदार टाळ्या) आणि शिक्षा द्यायला संजयने असे काय केलेय हो? गांधीजी सांगून गेले 'वैष्णव जन तो तेणे कहिये जे, पीड परायी जाने रे'. संजयनेही आपल्या दोस्ताची पिडा जाणली. (काय पिडा आहे असं नाही म्हणला तो) आणि हत्यारे लपवायला त्याला मदत केली इतकेच. आता ह्याला जर गुन्हा म्हणत असतील तर मला वाटते न्यायमूर्ती महोदयांच्याच डोक्यात केमिकल लोचा झाला आहे आणि त्यांना शुभेच्छांची गरज आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त शुभेच्छा कार्डस् त्यांना पाठवावीत अशी मी तुम्हाला विनंती करतो. शुभेच्छा कार्डांचा सर्व खर्च सरकार करेल. (प्रदीप सरकार नाही हो. तो त्याच्या पायजम्यावरचे डाग धुवत बसला असेल. 'लागा करीअर को दाग छुपाऊ कैसे..." असे गुणगुणत) (टाळ्या). तुम्ही माझ्यासाठी एवढे करा आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की एका आठवड्यात संजयला इथून बाहेर काढेन नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा देईन (जोरदार टाळ्या).

भाषण संपवून खाली बसतात.

ह्यानंतर संजयला दोन शब्द बोलायची विनंती करण्यात आली. पण रायटर ने लिहिल्याशिवाय मी बोलू शकत नाही असे सांगून त्याने नम्रपणे नकार दिला.

मग संजयला प्रमुख पाव्हण्यांच्या हस्ते 'जेलश्री' व 'तुरुंगरत्न' असे दोन पुरस्कार आणि खास कृष्णजनांची असते तशी टोपी देऊन गौरवण्यात आले.

सरते शेवटी संजयवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करणारे आरतीसदृश गाणे सुप्रसिद्ध कलाकार 'दादा डिस्को' सादर करतात.

नर्गिसबानो सूता, तुला नेत्यांचे वरदान ।
एक मुखाने बोला, बोला संजय दत्त महान ॥

अरे दिव्य तुझी उर्मट वृत्ती, भव्य तुझी माया
तरुणपणी गेलासी तू, चरस चराया
दगडाऽमधुनी रॉकी, करी बाप रे निर्माण
एक मुखाने बोला, बोला संजय दत्त महान ॥

एक एके फिफ्टी सिक्स, आणली ह्याने घऽरी
त्याच्यापायी घडली ह्याला, तुरुंगाची वारी
मूर्ख, खुळ्या जनतेचा हा तरीही पंचप्राण
एक मुखाने बोला, बोला संजय दत्त महान ॥

अबू जान माने ह्याला आतल्या गोटातला
करून सरून म्हणतो हा तर मी नव्हे हो त्यातला
वास्तवात खलनायक हा, 'वास्तव' मधला डॉन
एक मुखाने बोला, बोला संजय दत्त महान ॥

टाडातून सुटण्यासाठी गाठलेस 'बाळा'
काय जादू केली त्याने, बाहेर तू आला
सौद्याऽमध्ये बाप, करी खासदारकी कुर्बान
एक मुखाने बोला, बोला संजय दत्त महान ॥

दोष तुला खटल्यामध्ये, कायद्याने लावला
होम-हवन, पूजेकरता, जागोजागी धावला
चुकले नाही तरीही, सहा वर्षाचे फर्मान
एक मुखाने बोला, बोला संजय दत्त महान ॥

सजा तुला होता सारे, नेते व्याकुळले
मिडीयासही मग फुटले, फुकटचे उमाळे
टी. आर. पी. चे लोणी, खाती गिधाडे हैवान
एक मुखाने बोला, बोला संजय दत्त महान ॥

धन्य गांधीगिरी मुन्ना, धन्य तो दिखावा
काळ असा आला काक, हंस की बनावा
भजती मुखवट्याला, विसरून चेहरा जन
एक मुखाने बोला, बोला संजय दत्त महान ॥

तळटीप : ह्या कार्यक्रमाला भारतात जगप्रसिद्ध असलेले मराठी दैनिक 'ब्रह्मानंद'चे वार्ताहार श्री. ना. क. खुपसे जातीने हजर होते. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हा लेख उतरला आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी आणि ह्यातील किती खरे आणि किती खोटे हे ठरवावे.

-मिल्या

विशेषांक लेखन: