नाखुषीची गोष्ट

Submitted by मंदार शिंदे on 20 October, 2014 - 13:54

जून २०१४ मधे 'डोअर स्टेप स्कूल'तर्फे 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अभियानासाठी पुण्यातल्या कन्स्ट्रक्शन साईट्सवरील कामगार वस्त्यांचा सर्व्हे सुरु होता. धानोरीतल्या एका साईटवर, ११ वर्षांची आरती, ८ वर्षांची भारती, आणि ६ वर्षांची प्रीती, या तीन मुली आपल्या आई-वडील आणि अजून एका लहान बहिणीसोबत राहत होत्या. या चौथ्या मुलीचं नाव जरा विचित्रच होतं - नाखुषी! त्यांची आई नंदाबाई सुरेश हिरवळे, या साईटवर मजुरी करुन आपला आजारी नवरा आणि चार लहान मुलींचा संसार चालवत होत्या. त्या चौथ्या मुलीच्या, नाखुषीच्या विचित्र नावाबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या की, तीन मुलींनंतर आम्हाला मुलगाच हवा होता, पण ही झाली... म्हणून आम्ही नाखूष होतो, तसंच नाव ठेवलं!

चौघींतली सर्वात मोठी आरती, यवतमाळच्या आपल्या मूळ गावी असताना पाचवीपर्यंत शाळेत जात होती. आई-वडील रोजगाराच्या शोधात पुण्याला स्थलांतरित झाल्यावर, धाकट्या बहिणींकडं लक्ष देण्याची जबाबदारी आरतीवर येऊन पडली. भारती आणि प्रीतीनं शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. आधी नंदाबाई आपल्या मुलींना शाळेत पाठवायच्या विरोधात होत्या. पण एडमिशनच्या दिवशी त्या स्वतः आपल्या दोन मुलींना घेऊन शाळेत उगवल्या. खरं तर त्यांना त्याच दिवशी नवर्‍याला उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन जायचं होतं, पण मुलींच्या शाळा-प्रवेशासाठी त्यांनी दवाखान्याचा बेत पुढं ढकलला. आपल्या मुलींचं आयुष्य आपल्यासारखं खडतर नसावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, असं त्यांना मनापासून वाटत होतं, आणि हे सगळं शिक्षणातूनच साध्य करता येईल, हे त्यांना पटलं होतं.

भारती आणि प्रीती शाळेत पोचल्या असल्या तरी आरतीला मात्र छोट्या 'नाखुषी'ला सांभाळण्यासाठी घरीच थांबावं लागलं. ती अर्थातच याबद्दल नाखूष होती. तिलाही आपल्या इतर बहिणींसोबत यायचं होतं. नंदाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घरी एकटं ठेवायला तयार नव्हत्या. त्यांचा नवरा दिवसभर घरीच असायचा, पण तो स्वतः आजारी!

भारती आणि प्रीती आता नियमितपणे धानोरीच्या मनपा शाळेत जातात, 'डोअर स्टेप स्कूल'नं अरेंज केलेल्या व्हॅनमधून. आपल्याला दिलेल्या नावाचं ओझं 'नाखुषी'ला आयुष्यभर वागवावं लागेल याची जाणीव होऊन, तिच्या आई-वडीलांनी तिला नविन नाव दिलं - पल्लवी! हा फक्त नावातला बदल नाही, मानसिकतेतला बदल आहे, मुलींबद्दलच्या दृष्टीकोनातला बदल आहे!

आरतीलासुद्धा आपल्या बहिणींसोबत शाळेत जायचं आहे. तिला कशी मदत करता येईल? कन्स्ट्रक्शन साईट्सवर काही पाळणाघरांची, डे-केअर्सची सुविधा उपलब्ध नसते. अशा मुलांच्या समस्या अजून वेगळ्याच... पण, त्या चारपैकी दोन मुली आता शाळेत जातायत आणि तिसरी छोटीदेखील जाईल योग्य वयात! सर्वसमावेशक मूलभूत शिक्षणाच्या प्रसारासाठी या 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अभियानात काम करताना भारती, प्रीती, आणि नाखुषी (आता पल्लवी) यांची उदाहरणंच तर आमची आशा आणि उत्साह वाढवत राहतात.

- डी.एस.एस. इसीसी टीम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटले वाचून!डी.एस.एस. इसीसी टीमचे अभिनंदन! जर आरतीची शाळा तिच्या तायांपेक्षा वेगळ्या वेळी असेल (सकाळ / दुपार )तर तीही शाळेत जाऊ शकेल.

आपल्याला दिलेल्या नावाचं ओझं 'नाखुषी'ला आयुष्यभर वागवावं लागेल याची जाणीव होऊन, तिच्या आई-वडीलांनी तिला नविन नाव दिलं - पल्लवी! हा फक्त नावातला बदल नाही, मानसिकतेतला बदल आहे, मुलींबद्दलच्या दृष्टीकोनातला बदल आहे!

खुप बरे वाटले हे वाचुन्.

तुम्ही खुप चांगले काम करत आहात, तुम्हाला शुभेच्छा.

उपक्रम छानच पण त्या मुलींच्या आईव्डिलांचा बेजबाबदार पणा वाटतो. तब्येत ठीक नसताना ते वडील मुलासाठी ट्राय का करतात? वर मुलीला बघत पण नाहीत ? असला काय आजार? दारू पिऊन पडलेले अस्तात का? नॉट फेअर फॉर द किडस.

जिज्ञासा - जर आरतीची शाळा तिच्या तायांपेक्षा वेगळ्या वेळी असेल (सकाळ / दुपार )तर तीही शाळेत जाऊ शकेल.>>

प्रश्न फक्त शाळेच्या वेळेचा नाही. काही शाळांमधे आम्ही अशा मुलींना त्यांच्या तान्ह्या भावंडांसहित वर्गात बसायची सोय करुन दिली होती/आहे. पण मग या लहान मुलांमुळे शिक्षकांना आणि वर्गातल्या इतर मुलांना डिस्टर्ब होण्याचीच शक्यता जास्त. शिवाय, 'घरी तान्ह्या बाळाकडं बघायला कुणी नाही' हे मुलींना शाळेत पाठवायला नकार देण्यासाठी एक हक्काचं वाक्य असतं पालकांचं. अशी केस हॅन्डल करणं जरा अवघडच!

अमा - ...पण त्या मुलींच्या आईव्डिलांचा बेजबाबदार पणा वाटतो. तब्येत ठीक नसताना ते वडील मुलासाठी ट्राय का करतात? वर मुलीला बघत पण नाहीत ? असला काय आजार? दारू पिऊन पडलेले अस्तात का? नॉट फेअर फॉर द किडस.>>>

या गोष्टी आमच्या (इन फॅक्ट, आपल्यापैकी कुणाच्याच) हातात नसतात. आईवडीलांचा बेजबाबदारपणा हा सर्व वर्गांत, सर्व स्तरांवर सारखाच असतो. चांगल्या सुशिक्षित, सधन कुटुंबांत मुलींना लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी घरी थांबवून ठेवल्याची उदाहरणं मला माहित आहेत. त्यांची शाळा नसेल बंद केली आरतीसारखी, पण मुलांच्या तुलनेत तिच्यावर जास्त बंधनं घातली जातात हे नक्की. वाहत्या ट्रॅफीकच्या बाजूला लहान मुलांना धरुन रस्त्यानं चालत जाणार्‍या आयादेखील तितक्याच बेजबाबदार, नाही का? बर्‍यापैकी डोनेशन-फी घेणार्‍या शाळांमधे, बर्‍यापैकी पैसे खर्चून स्कूल व्हॅनमधून आपल्या लहान-लहान मुलांना मेंढ्यांसारखं कोंबून नेत असलेलं बघून न बघितल्यासारखं करणारे आईवडीलही तितकेच बेजबाबदार नाहीत का? थोडक्यात काय तर, आईवडीलांचा बेजबाबदारपणा हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण त्यासाठी हे काम थांबवणं योग्य नाही, असं आम्हाला वाटतं.

छान उपक्रम! तुम्हाला शुभेच्छा!
तान्ह्या भावंडाकडे बघायला कुणी नाही म्हणून आरतीची शाळा सध्या सुटली असली तरी भावंड थोडे मोठे झाल्यावर पुन्हा सुरु होईल का? आरती सारख्या मुलींसाठी संध्याकाळी वस्तीवरच शिक्षणाची सोय होऊ शकते का? कदाचित एक इयत्ता पूर्ण करायला नेहमीच्या शैक्षणिक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल पण काहीच नसण्यापेक्षा..
यावरुन आठवले, मी शाळेत शिकत होते तेव्हा बर्‍याच मुलींना सकाळी शाळेत यायला उशीर व्हायचा. कारण सकाळी घरचे पाणी भरावे लागायचे, भाकर्‍या थापाव्या लागायच्या.

Sorry for english typing. Phone warun type karat aahe.
Door step school cha upakram khupach chhan aahe.
School on the wheels ha hi tumachach upakram aahe na? Magachya varshi tyatalya eka bus classroom che photo amachya team ne ghetale hote.
School on the wheels punyatahi aahech na.

Asha veli eka vastit school class chalu asatana exta don karyakartyanni baby sitting kele tar? Mhanaje arati sarakhya sagalyach mulinchi soy hoil.

स्वाती२ - आरती सारख्या मुलींसाठी संध्याकाळी वस्तीवरच शिक्षणाची सोय होऊ शकते का?>>

अशी सोय होऊ शकते, नव्हे अशा सोयी आहेतच. स्वतः 'डोअर स्टेप स्कूल'चे पुण्यातल्या शंभराहून अधिक साईट्सवर अभ्यासवर्ग चालतात. शिवाय 'स्कूल ऑन व्हील्स' ही चाकावरची शाळादेखील असते. पण या उपक्रमांना अनेक मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पुण्यात रोज नवनविन कन्स्ट्रक्शन साईट्स सुरु होतात आणि नवनविन कामगारांचे जथ्थे येत राहतात. यांची माहिती एकत्रितपणे कुणाकडंही नसते - ना पुणे मनपाकडं, ना बिल्डर्स असोसिएशनकडं. मग अशा वस्त्या आणि मुलं एक-एक करुन शोधून काढावी लागतात. जिथं पंधरा-वीस मुलं एका ठिकाणी सापडतील, तिथं वर्ग सुरु करणं शक्य होतं. एखाद-दुसरं मूल असेल तर वर्ग कसा लावणार? (हे रोज तिथं जाऊन शिकवण्याचं काम असल्यानं फक्त व्हॉलंटीयर्सवर अवलंबून चालत नाही. पगारी शिक्षिका/अटेन्डंट नेमाव्या लागतात!) त्यामुळं अशा मुलांना जवळच्या शाळेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. पण मग अशा आरतीसारख्या असंख्य केसेसचं काय करणार?

धन्यवाद, सावली! 'स्कूल ऑन व्हील्स' हा 'डोअर स्टेप स्कूल'चाच उपक्रम आहे, मुंबई आणि पुण्यातही. तुम्ही म्हणता तशी बेबीसिटींगची सोय अभ्यास-वर्गांवर असते, पण हे सर्व पुण्यातल्या शंभरेक साईट्सवर. आमच्या माहितीनुसार पुण्यात अंदाजे दीड हजार कन्स्ट्रक्शन्स सुरु आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, फंड्स, व्यवस्थापन... पुन्हा पालकांचं प्रबोधन, शैक्षणिक गुणवत्ता, वगैरे वगैरे... खूप काही आहे करण्यासारखं, नाही का?

खरच खुप मोठा आवाका आहे तुमच्या उपक्रमाचा.
खुप चांगले काम करत आहात, तुम्हाला शुभेच्छा.
कधीकधी मायबोलीवरच स्वयंसेवक मिळुन जातात. कधी गरज पडली तर इथेपण विचारुन पहा.
उदा. सावली संस्थेच्या मुलांना इंग्लिश शिकवायला इथलेच काही लोक गेले दीड वर्ष जात आहेत, आठवड्यातुन एकदा आणि तो उपक्रम छान चालु आहे.

यांची माहिती एकत्रितपणे कुणाकडंही नसते - ना पुणे मनपाकडं, ना बिल्डर्स असोसिएशनकडं. >> हे कसे काय? बांधकामाची परवाने देत असतील त्या खात्यात हा डेटाबेस असायला हवा.

घरीच काम करून आईचे उत्पन्न वाढेल असे काहीतरी स्कील आईला शिकवायला हवे. आई घरी सांभाळायला असेल तर मुलांची शाळा होईल. शाळेत जाणे महत्त्वाचे पण शाळेची गोडी लागणे हे त्याहून महत्त्वाचे. आईला जर शिक्षणाने परिस्थिती बदलते ह्याची जाण आली तर पुढचे सगळे थोडे सोपे होवू शकते. अर्थात ही तात्त्विक गोष्ट झाली, बरेच वेळा सोई देवूनही महिला शिकायला तयार होत नाहीत ही वस्तुस्थिती आहेच.

सीमंतिनी - बांधकामाची परवाने देत असतील त्या खात्यात हा डेटाबेस असायला हवा.>>

बांधकामाच्या परवान्याचा कामगारांच्या डेटाबेसशी काहीही संबंध नसतो. आम्ही सिटी इंजिनियरला असा डेटाबेस बिल्डर्सकडून मागवून घेण्याची विनंती केली होती, पण ते म्हणाले, बिल्डींग परमिशनसाठी आधीच इतक्या फाईल पेन्डींग असतात की काही कन्स्ट्रक्शन्स विना-परवाना सुरु झाली तरी आम्हाला कळत नाहीत, तिथं कामगारांच्या आणि त्यांच्या मुलांच्या डेटाबेसची काय कथा!

सीमंतिनी - घरीच काम करून आईचे उत्पन्न वाढेल असे काहीतरी स्कील आईला शिकवायला हवे.>>

यासाठी आईची (किंवा एकंदरीत त्या कुटुंबाची) पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. दुसर्‍या गावातून अथवा राज्यातून इथं येऊन राहणार्‍या, इथल्या भाषेशी पुरेसा परिचय नसणार्‍या, बांधकाम साईट्सशिवाय इतर राहण्याची सोयही नसणार्‍या, शिक्षणाशी कधीही संबंध न आलेल्या बायकांकडून घरबसल्या व्यवसायाची अपेक्षा करणं अवघड आहे. त्यातूनही कुणी प्रयत्न करायचं ठरवलंच तरी ते एक पूर्णवेळ काम आहे. आमचा फोकस सध्या मुलांवर आहे. पण त्याचबरोबर पालकांना, विशेषतः आईला एम्पॉवर करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. उदाहरणार्थ, मुलांना वेळेवर शाळेत पोहोचता यावं म्हणून घ्यायची काळजी, मुलांच्या आहार व आरोग्याबाबत घ्यायची दक्षता, स्वतः अशिक्षित असूनही मुलांच्या अभ्यासावर नजर ठेवण्याच्या युक्त्या, अशा गोष्टींसाठी 'पेरेंट्स पार्टीसिपेशन इन चाइल्ड्स एज्युकेशन' (पीपीसीई) हा उपक्रमही राबवला जातो.