कात टाकून उभा राहतोय : विश्रामबागवाडा

Submitted by ferfatka on 6 November, 2013 - 05:32

पुण्याने आपल्या वाढत्या आधुनिकतेबरोबर आपले पुरातनपण वास्तू रूपात जपले आहे. शनिवारवाडा, पर्वती, महादजी शिंदेंची छत्री, विश्रामबागवाडा या त्यापैकीच एक वास्तू. पेशवेकाळात पुण्यात अनेक वाडे बांधले गेले. त्यापैकी अनेक काळाच्या पडद्याआड गेले. खुद्द दुसºया बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या राहण्यासाठी व आरामासाठी बांधलेला ‘विश्रामबागवाडा’ सध्या दुरुस्ती व डागडुजीकरणामुळे त्याच्या मूळ रुपात येत आहे. त्या विषयी....

DSCN4663.jpgदुसºया बाजीरावांविषयी (थोडक्यात)
दुसºया बाजीरावाने राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला. रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा बाजीराव हा मुलगा. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळव्यातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथे १० जानेवारी १७७५ ला बाजीराव यांचा जन्म झाला. दुसरा बाजीराव म्हणून ते ओळखले जाऊ लागले. वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढले. १७९६ ला पेशवेपद व पेशवे पदासाठी झालेले राजकारण, पेशवेपद मिळणं दरम्यानच्या काळात मराठी सत्तेची अवकळा, ब्रिटिशांकडून ३ जून १८१८ ला धुळकोट येथे शरणागती व त्यानंतरची कानपूरजवळील ब्रह्मावर्तास रवानगी. १८७० रोजी मृत्यू असा बराच मोठा इतिहास या दुसºया बाजीरावांच्या कारकिर्दीत घडला.
दुसºया बाजीरावांविषयी पुढे वेगळा लेख लवकरच...

विश्रामबाग वाड्याविषयी :
पुण्यातील भरवस्तीत असणारा हा विश्रामबाग वाडा. त्यांच्या अनेक कथांनी प्रसिद्ध आहे. दुसरा बाजीरावांचा हे विश्रामगृह. सध्या येथे ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ हा प्रवास विविध चित्रांच्या माध्यमाने पहावयास मिळतो. काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक वास्तू, त्यांच्या खुणा सांगण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. ‘पुनवडी ते पुण्यनगरी' या प्रदर्शनात पुण्याचा पुनवडीपासून १७७२ पर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यानंतर १८५५ पर्यंतचा इतिहास, माहिती चित्रे, नकाशे, छायाचित्रे यांच्या साहाय्याने मांडण्यात आला आहे. शनिवारवाडयाचा जुना नकाशा, पहिले बाजीरावा, नानासाहेब पेशव्यांनी वसविलेल्या पुण्यातील पेठा, बंदीस्त नळयोजजेसाठी कात्रजवरून आणलेला पाणीपुरवठा, पुण्यातील विविध देवस्थाने, घाट, त्यांचे भौगोलिक स्थान, निर्मितीची प्रक्रिया यांची माहितीही छान व विस्तृत दिली आहे. आहे. वाड्यातील ही सर्व माहिती बघून मन इतिहासकाळात जाते.

वाड्याचे बांधकाम :
दुसºया बाजीरावाने राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला. वाडा बांधण्यासाठी ६ वर्ष गेली. २६ मार्च १८०३ रोजी वाड्याच्या बांधकामाला सुरूवात झाली. २० नोव्हेंबर १८०८ रोजी वाड्याची वास्तूशांत झाली. ३९ हजार चौरस फुटांची ही वास्तू आहे. वाड्याची मूळ जागा पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांची. या जागेवर प्रथम बाग होती. शनिवारवाड्यापासून काहीच अंतरावर मोकळ्या जागेत असलेल्या या जागेमुळे ही जागा विकत घेऊन त्यावर सध्याचा वाडा बाजीरावांनी बांधला. १६ फेब्रुवारी १७९७ रोजी बाजीरावांचे सासरे सरदार दाजीबा ऊर्फ हरिपंत फडके यांनी मुलगी राधाबाई हीच्या लग्नात हुंड्याच्या स्वरुपात ही जागा दिली गेली असेही वाचण्यात आले. वाडा बांधण्यापूर्वी येथे सुंदर अशी बाग होती. बागेची निगा राखणाºया माळ्याचे नाव विश्राम असे होते. तसेच आराम करण्यासाठी ही जागा बांधल्याने याला ‘विश्रामबाग’ वाडा असे म्हणण्यात येऊ लागले.

DSCN4798.jpg

वाड्याचे बांधकाम हे विटांचे आहे. दुसºया मजल्यावर नृत्यदरबार आहे. या ठिकाणी पिवळ्या रंगातील मोठे पडदे असून, त्याकाळातील व्यवस्था कशी असेल याचे सादरीकरण केलेले आहे. हॉलच्या मुख्य जागी गादी व शेजारी दोन लोड ठेवण्यात आलेले आहेत. वरती गणपतीची मूर्ती आहे. पडद्यांच्या शेजारील खांबांवर, छतावर बारीक सुंदर नक्षीकाम केलेले आहे. लाकडी महिरपीतून साकारलेले सुंदर कोरीव खांब असून छतावर नक्षीदार आकृत्या कोरलेल्या आहेत. चौकात लाकडी मोर व वेलबुट्टीच्या नक्षीकामामुळे सुंदरता प्राप्त झाली आहे. संपूर्ण वाड्यात सुरू व सागाच्या लाकडांचा वापर केलेला आहे. वाई येथील नाना फडणवीसांच्या मेणवली वाड्यात सुद्धा असेच बांधकाम आहे. विश्रामबागवाड्याचे बांधकाम जुने झाले असल्याने वाड्यातील मेघडांबरीत (बाल्कनीमध्ये) पर्यटकांना सध्यास प्रवेश बंद केलेला आहे. तीन चौक असणारा हा प्रशस्त वाडा असून चारही बाजूंनी मोकळा असा मोठा चौक येथे आहे. वाड्यात अतिथ्यगृह, विश्रामस्थान, भोजनगृह, खलबतखाने अशी विविध दालने आहेत. चौकामुळे सर्व दालनात हवा व उजेड भरपूर प्रमाणात मिळतो. १३ मे १८७९ ला वाड्यात आग लागली. या आगीत पुढील चौकाभोवतीचा इमारतीचा भाग जळाला. मागचा भाग मात्र तेवढा वाचला. त्यावेळच्या बांधकामाशी मिळता जुळता अशा स्वरुपाचा वाडा इंग्रजांनी पुढे बांधला. त्यामुळे या वाड्याला पेशवे व इंग्रज धाटणीच्या बांधकामाचे स्वरुप दिसून येते. सजावटीसाठी लाकडी खांब, तुळ्या, पटई यावर कोरीव काम केलेले आहे. आतील बांधकाम हे लाकडामधील कोरीव काम असल्याने एक प्रकारची भव्यता वास्तूला प्राप्त होते. वाड्यात असलेले काचेच्या हंड्यांमुळे वाड्याची शोभा आणखीनच वाढली आहे. वाडा सजवताना पक्ष्यांच्या आकृत्यांचा वापर केलेला आहे. तेल लावून हे लाकडीकाम चकचकीत करण्यात येत असे. वाड्यात कात्रजच्या तलावातून भूमिगत नळातून पाणी आणून चौकातून कारंजी उडवीत असत. वाड्यात एक छोटी विहिर सुद्धा आहे. सध्या ती बंद केलेली आहे. ब्रिटिशांनी अटक करेस्तोवर बाजीराव ११ वर्ष याच वाड्यात राहत होते. त्यानंतर बिठूरला बाजीरावांची उचलबांगडी होईपर्यंत त्यांची पत्नी वाराणशीबाई राहत होत्या. १८२१ मध्ये वाड्यात वेद व संस्कृत शिकविण्याची शाळा सुरू करण्यात आली. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी येथील दिवाणखान्यात महात्मा जोतिबा फुले यांचा इंग्रज सरकारतर्फे मेजर कॅडी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
दुसºया बाजीराव पेशव्यांनंतर ब्रिटीश सत्तेच्या उदयानंतर प्रथम वाडा जेल म्हणून उपयोगात आणला गेला. त्यानंतर १९३० ते १९५८ दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात होता. सध्या वाड्याच्या तळमजल्यावरील बहुतांश मोठा भाग हा पोस्ट आॅफीससाठी उपयोगात आणला जात आहे. शासकीय ग्रंथालय सुद्धा येथे आहे. तर दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूची जागा वापरण्यासाठी देण्यात आली आहे. यात भारतीय हस्तकला, कपड्यांवरील भरतकाम आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे उपहारगृह आहे.
दुसºया बाजीरावाने शनिवारवाड्यात नारायणरावाचे भूत वावरते या सबबीखाली बुधवार, शुक्रवार व विश्रामबागवाडा हे वाडे बांधले. कोथरूड, पाषाण येथेही वाडे बांधले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी गड किल्यांना महत्त्व दिले. पुढे १८ व्या शतकानंतर या गडकिल्यांऐवजी जमिनीवर मोठमोठे आलिशान असे वाडे बांधण्याकडे लक्ष दिले जाऊ लागले. बहुधा महाराजांच्या काळात धामधुमीमुळे असले वाडे बांधणे संरक्षण दृष्ट्या शक्य नव्हते. पुढे किल्यांची गरज कमी भासू लागल्याने वाडे बांधण्यात येऊ लागले. श्रीमंत व्यापारी, सावकार, सरदार यांनी १८ व्या शतकात आपआपले मोठे वाडे बांधले.

प्रतिकृती :
वाड्याच्या मागील बाजूस पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या वास्तूंच्या छोट्या प्रतिकृती तयार करून त्या काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या विषयी थोडक्यात माहितीही येथे देण्यात आलेली आहे. पुण्यातील प्रसिद्ध गोखले हॉल, कसबा गणपती, मंडईची जुनी इमारत. फर्ग्युसन कॉलेज, ससून हॉस्पिटल, महादजी शिंदे यांची छत्री, पेशवे दफ्तर अशा वास्तूंचे छोटे छोटे दरवाजे, खिडक्या व इतर बारीकसारीक गोष्टी या प्रतिकृतींमधून तयार केलेल्या आहेत.

DSCN4665.jpg

ऐतिहासिक वारसा असलेल्या या वाड्याचे सध्या नुतनीकरण सुरू आहे. हा वाडा पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार हे निश्चित. वाडा पुण्यातील सगळ्यात जास्त रहदारी असलेल्या बाजीराव रस्ता व लक्ष्मी रस्त्यावर आहे. पुण्याच्या कुमठेकर, रस्त्यावर, सदाशिव पेठेत हा वाडा आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. वाड्याच्या समोरच्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे. पुण्यातील प्रसिद्ध मिठाईवाले चितळेबंधू, महिलांचे दागदागिने, कपडे यासाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग आहे. त्यामुळे विश्रामबाग परिसरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी असते. अनेकजण तुळशीबाग, मंडई व विविध कपड्यांची दुकाने यांच्याकडे आवर्जुन जातात. परंतु या वाड्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. दुपारच्या वेळी वाड्याच्या ओसरीत ताणून देणारे महाभाग ही येथे आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. पुणे शहराचा इतिहास समजण्यासाठी एकदा आवश्य येथे भेटी द्यावी.

वाहतुककोंडी नित्याचीच :

DSCN4846.jpg

पुणे शहराच्या मध्यभागी आणि एक महत्त्वाचा रस्ता म्हणून बाजीराव रस्त्याची ओळख आहे. जवळच असलेली तुळशीबाग, मंडई यामुळे हा परिसर नेहमीच खरेदी करणाºयांनी गजबजलेला असतो. त्यातच अरुंद रस्ते व फुटपाथची कमी जागा, या जागेवरच पथारीवाल्यांनी उदरनिर्वाहासाठी मांडलेला त्यांचा व्यवसाय, खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे या भागात नेहमीच वाहतुककोंडी असते. मोकळा श्वास घ्यायला येथे मोठी मारामारी करावी लागते.

अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

http://ferfatka.blogspot.com/2013/11/blog-post_3.html

तिकीट दर :
पुणवडी ते पुण्यनगरी पाहण्यासाठी माणसी ३ रुपये असे तिकीट दर् आहे. तिकीट आठवणीने घेणे.

कसे जाल :
पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेटवरून रिक्षा, बसेस या भागात येतात. पुणे स्टेशनपासून अंदाजे ४.५ ते ५ किलोमीटर आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhaan maahitee.
fakt baaherunach baghitalaa aahe, ekadaa aatun paN baghaayalaa havaa aataa.

छान माहिती.

पुणवडी ते पुण्यनगरी पाहण्यासाठी <<< म्हणजे काय ?
तिकीट वाड्यात प्रवेश करण्यासाठी आहे का ?

स्टॉल यामुळे या भागात नेहमीच वाहतुककोंडी असते. मोकळा श्वास घ्यायला येथे मोठी मारामारी करावी लागते.
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
<<
हे एकापाठोपाठ आल्याने, वाहतुककोंडीचे अधिक फोटो पाहावेत का ? का ? असा विचार करण्यात आला Proud

तुम्ही पेशव्यांच्या (चांगल्या अर्थाने) मागेच लागला आहात असं दिसतंय Happy

वाड्याची डागडुजी करताहेत हे ऐकून बरं वाटलं!! ही वास्तु पहिल्यांदा पाहिली तेंव्हा खरंच आवडली होती पण दुरवस्था पाहून वाईट वाटले होते. आता छान देखणेपण मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

तिथे सिटी पोस्टाचे ऑफिस होते. आहे का ते अजून तिथे?

<<<<पुणवडी ते पुण्यनगरी पाहण्यासाठी <<< म्हणजे काय ?>>>>>>

मिलिंदाजी
चित्र व प्रतिकृतींच्या माध्यमातून पुण्याचा इतिहास सांगणारा ‘पुणवडी ते पुण्यनगरी’ हा विश्रामबागवाडातील एक छोटे दालन आहे. प्रवेशासाठी ३ रुपये तिकीट आहे. बहुतेक वेळी तिकीट देणारे टिकीट न देताच आत प्रदर्शन पाहण्यासाठी सोडतात. त्यामुळे आवर्जुन तिकीट घ्या.

<<<तुम्ही पेशव्यांच्या (चांगल्या अर्थाने) मागेच लागला आहात असं दिसतंय>>>
पेशव्यांच्या मागे लागण्याचे कारण हेच आहे की आपल्याला शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज माहिती आहे. पण संभाजीमहाराज गेल्यानंतर महाराष्ट्रात मराठेशाही टिकवून ठेवण्याचे काम पेशव्यांच्या काळात घडले. या पेशव्यां संदर्भात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. यातील बरीच पुस्तके भाषाशैली अवघड असल्याने समजायला अवघड जाते. त्यात पेशवे घराण्यातील वंशावळीमुळे ही बराच घोळ होतो. पहिला बाजीराव, राघोबादादा, दुसरा बाजीराव, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, सवाई माधवराव असे अनेक पेशवे घराण्यात कर्तृत्ववान पुरुष होऊन गेले. १८१८ साली पेशवाई बुडाली. पेशव्यांमुळे काही काळ तरी ब्रिटीश साम्राज्याला भारतात पाय रोवणे कठीण झाले. नाहीतर १५० वर्ष राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांना कदाचित २०० ते २५० वर्षांची परंपरा त्यांना लाभली असती. अशा पेशव्यांविषयी थोडेबहुत माहिती इतरांनाही व्हावी हाच उद्देश आहे.

के अंजली

<<<<<<तिथे सिटी पोस्टाचे ऑफिस होते. आहे का ते अजून तिथे?>>>>>

वाड्याच्या काही भागात अजूनही सीटी पोस्टाचे आॅफीस आहे.

वाड्याच्या डागडुजीबद्दल म्हणाल तर एका नामवंत संस्थेला हे काम दिलेले आहे. पुरातन वस्तूंना शोभेल असे बांधकाम करण्याचे काम सुरू आहे.

बाकी सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

‘पुणवडी ते पुण्यनगरी’ हा विश्रामबागवाडातील एक छोटे दालन आहे. <<< आता अर्थ लागला. धन्यवाद.

अशा पेशव्यांविषयी थोडेबहुत माहिती इतरांनाही व्हावी हाच उद्देश आहे.
<<
नक्कीच. स्तुत्य काम करता आहात. कीप इट अप.

विश्रामबागवाड्यात आमच्या लहानपणी मयताचे पास मिळत. नशीबाने कधीतरी शासन जागं झालं आणि ते ऑफिस तिथून हललं.. विश्रामबागवाड्याच्या कुमठेकर रस्त्याच्या बाजूला फूटपाथवर एक तत्कालीन हौदही आहे. पूर्वी पेठापेठांमधून हे पेशवेकालीन (नानासाहेब पेशव्यांनी उभ्या केलेया सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतले) हौद दिसायचे. आता बहुतेक सगळे कॉन्क्रीटच्या जंगलात हरवलेत किंवा रस्तारुंदीकरणात गेलेत.
ही पोस्ट फार जुन्या दिवसांचे उमाळे आणणे या कॅटेगरीत बसल्यासारखी वाटल्यास क्षमस्व. पण ते उमाळे काढायचा उद्देश नसून पुण्याचा पेशवेकालीन नगर-वास्तू वारसा कसा बेफिकीरपणे नष्ट झाला याचं दु:ख आहे.

पुण्यात कधी कुणाला रस असेल तर शनिवारवाड्याकडून अमृतेश्वराकडे जो रस्ता जातो त्याने खालच्या पुलावर जावं. पुलाचा चौक ओलांडण्याआधी उजवीकडे बघा. अमृतेश्वराच्या देवळाचं प्रवेशद्वार असं मधेच दोन इमारतींमधे बेचक्यात शिल्लक आहे. पटांगणातून खूप पूर्वीच हमरस्ता गेलाय.

पुण्याचा पेशवेकालीन नगर-वास्तू वारसा कसा बेफिकीरपणे नष्ट झाला याचं दु:ख आहे >> अगदी अगदी वरदा.. आपल्याकडं पुण्यातच नाही तर बाकी सगळीकडं पण हाच प्रॉब्लेम आहे. इथं युरोपमधे फिरताना तर ते अगदी आवर्जून जाणवतं. या लोकांनी बरचसं चांगलं जतन केलं आहे.

फेरफटका.. चांगली माहिती Happy

पूर्वी पेठापेठांमधून हे पेशवेकालीन (नानासाहेब पेशव्यांनी उभ्या केलेया सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतले) हौद दिसायचे. आता बहुतेक सगळे कॉन्क्रीटच्या जंगलात हरवलेत किंवा रस्तारुंदीकरणात गेलेत...अगदी.
शुक्रवार पेठेत होता असा एक हौद भाऊ महाराज बोळात.

वरदा, मलाही लहानपणी गावात असंख्य ऐतिहासिक महत्त्वाच्या वाटणार्‍या गोष्टी बघितल्याचे आठवते. आता त्यातील बर्‍याच दिसत नाहीत. नुसते हौदच कितीतरी होते. तो एक कुमठेकर रोडवर सहज दिसणारा हौद अजून दिसतो की नाही कोणास ठाउक.

Chaitrali

<<<<<पूर्वी पेठापेठांमधून हे पेशवेकालीन (नानासाहेब पेशव्यांनी उभ्या केलेया सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतले) हौद दिसायचे. आता बहुतेक सगळे कॉन्क्रीटच्या जंगलात हरवलेत किंवा रस्तारुंदीकरणात गेलेत...अगदी.
शुक्रवार पेठेत होता असा एक हौद भाऊ महाराज बोळात.>>>>>

नानासाहेब पेशव्यांनी कात्रजच्या तलावावरून पुणे शहरापर्यंत बंदीस्त पाणीपुरवठा केला होता. त्यांच्या विषयी विश्रांतवाड्यात दोन माहिती आहे.

DSCN4829.jpgDSCN4832.jpg