तृषार्ततेच्या काठावरील

Submitted by जो_एस on 25 June, 2013 - 02:51

उन्हाळ्यात झाडाना पाणी घालताना पडलेलं हे पाणी . ..
हे कबुतर असं पाय वाकवून पीत होतं, त्याला त्रासदायक वाटणार नाही अशा बेताने हा फोटो घेतला
आणि त्या वेळी मला धामणसकरांची ही कविता आठवली.
kabu.jpg

साधना

तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे....तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही...

कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही...

द भा धामणसकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो - काय जबरी कविता आहे ही .... हॅट्स ऑफ कविराजांना ....

प्र चि देखील अप्रतिमच ....

रच्याकने - तू काय जिप्सी काय नॉर्मल डोळ्याने काही बघतच नाही का रे - सगळे बघता ते कॅमेर्‍याच्या लेन्समधूनच ???? Happy

व्वा! सुंदर कविता!
ह्या फोटो करता आणि त्यावरून आठवलेल्या कवितेकरता __/\__ !!
नॉर्मल डोळ्याने काही बघतच नाही का रे >>>> खरंय! असे डोळे आणि उत्कट मन लाभणं हे भाग्यच!

वा, सुंदर फोटो.
कबुतराची आणि इतर पक्ष्यांची पाणी पिण्याची तर्‍हा वेगवेगळी असते असे वाचले होते. बाकी पक्ष्यांना मान वर केल्याशिवाय पाणी गिळता येत नाही.. असे काहीसे..

आदिती, भारती, दिनेशदा धंन्यवाद.

दिनेशदा
खरतर मी तिथेच बाजूला थोडं पाणी तुंबवून ठेवलं पक्षांसाठी पण या कबुतराला हे उथळ पाणीच प्यायचं होतं बहुतेक आणि इतकं उथळ पाणी ते कसं पिणार अस मनात येई पर्यंत त्याने ही पोझ घेतली.

जो मस्त फोटॉ!
रच्याकने हे खरचं आहे! आमच्या घरी किती वेळा पाणी भरुन वाट्या ठेवल्या असतील पण चिमणी, कावळे असे अनेक पक्षी ते पाणी न पिता कुंडीतलंच साठलेलं पाणी पितात. मी आई-बाबांशी चर्चा केली तेंव्हा आम्ही असा निष्कर्ष काढला की कदाचित ते गार पाणीच प्यायचं असेल त्यांना म्हणून मी एक दिवशी फ्रिजमधलं पाणी ठेवलं त्यांना प्यायला पण त्यांनी प्यायलं नाही. मग मला वाटलं मातीचा वास आवडत असेल म्हणून ते पाणी पित असतील... तर मी माठातलं पाणी ठेवलं तरी ते प्यायले नाहीत....

मग मी निष्कर्ष काढला की ते मेंटल आहेत Proud