हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा

Submitted by जिप्सी on 1 May, 2013 - 00:58

सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!

गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी महाराष्ट्रादिनानिमित्त आम्ही (ओंकार (सह्याद्रीमित्र), योगेश (यो रॉक्स), आशिष (आशुचॅम्प), दत्तराज (इंद्रधनुष्य) आणि योगेश (जिप्सी) घेऊन येत आहोत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या गडकोटांवर आधारीत चित्रमालिका "हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा".

शिवरायांच्या जन्मापासून म्हणजे किल्ले शिवनेरीपासून त्यांच्या निधनापर्यंत म्हणजेच किल्ले रायगडापर्यंत शिवरायांच्या कारकिर्दीत महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या किल्ल्यांच्या इतिहासाची सचित्र माहिती असलेली मालिका. आजपर्यंतच्या कोणत्याही मराठी वेबसाईटवरचा शिवरायांना वाहिलेला अशा प्रकारचा बहुदा हा पहिलाच उपक्रम !!!!

" राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा" असा हा "महाराष्ट्र" दुर्गांचा देश. यातील बहुतेक दुर्गांनी श्री शिवछत्रपतींची चरणधूळ मस्तकी धारण केली आहे. जेथे शिवनेरी किल्ल्याने स्वराज्याचा सूर्योदय पाहिला तेथेच रायगडाने या तेजस्वी सुर्याचा अस्त होताना पाहिला. ज्या भूमीने तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधलेले पाहिले, रायगडावर शिवराज्याभिषेक पाहिला त्याच भूमीने तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे अशा कैक विरांना स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले पाहिले. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली असता चार-दोन शिखराआड एखादं शिखर तटा-बुरुजांचा शेला-पागोटं चढवून उभा राहिलेला आढळतो.

इतिहासाच्या या साक्षीदारांच्या सोबतीने चला पाहुया आज शिवबा ते छत्रपती शिवराय.
=======================================================================
=======================================================================

=======================================================================
=======================================================================
शिवजन्म स्थळ - शिवनेरी
दुर्गपुष्प १ - **किल्ले शिवनेरी**

इ.स. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक उत्तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक उत्तुजार प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. "शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन", त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार’.

शिवनेरीवर सुर्य जन्मला, तेज तयाचे झाकेना
फौज तयाच्या रणमर्दांची खेळ झुंजीतही वाकेना
चिमण्या शस्त्रांची, ह्रदयाची वाढत राही धार
गर्जे शिवबा " हे गड माझे, मी जिंकुन घेणार!!"

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प २ - **किल्ले तोरणा**

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ले तोरणा. किल्ल्यावर "तोरण" नावाची भरपूर झाडे असल्याने याचे नाव तोरणा पडले. पुढे महाराजांनी गडाची पाहणी करताना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव "प्रचंडगड" असे ठेवले. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर महाराजांनी तो घेतला व गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आगर्याहुन आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेबाने १० मार्च १७०४ रोजी लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.

बालशिवाच्या पाहुनि अवघ्या थोर बाललीला
भविष्य जाणुनि हर्ष जाहला जिजाऊमातेला
गड जिंकले, राज्य निर्मिले, आता दैन्य जावे
सिंधू नदी दर्याला मिळते, तिथवर स्वराज्य व्हावे

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प ३ - **किल्ले राजगड**

"राजगड" स्वराज्याची पहिली राजधानी. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. राजगडाचं सभासद बखरीमधील अजून एक नाव म्हणजे मुरबाद डोंगर (मुरुंबदेव डोंगर). मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकारने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणापेक्षा मोठा आहे. सन १६४६ ते १६४७ दरम्यान शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबतच राजगड किल्ला जिंकू घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली.

अफजलखानाविरुद्ध रचलेली व्युहरचना, तानाजींनी 'आधी लगीन कोंडाण्याचे' म्हणत आखलेली सिहंगड मोहीम, आग्रावारीहून गोसाव्याचे रुप घेउन सुखरुप आलेले महाराज, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेल्या ह्या गडावरूनच स्वराज्याची जडण घडण सुरु होती. जवळपास वीसपंचवीस वर्षे शिवाजीराजांचे इथे वास्तव्य होते..

शंभू-तुळजेच्या भूमीवर पात्र असे स्त्री आदराला
पिंडीवरच्या बिल्वदलाचे मोल नारीच्या पदराला
महिलांवरती जुलुम करती, नीति न स्मरती जे पुंड
अब्रुघातकी हात न उरतिल, कितीही असो कुणी बलदंड!!

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प ४ - **किल्ले सुभानमंगळ**

सातारा जिल्ह्यातल्या शिरवळ गावात नीरा नदीच्या काठावर एक बुरुज इतिहासाच्या आठवणी जपत कित्येक वर्षांपासून एकटाच उभा आहे. तो तिथे असल्याचं कौतुक कोणाला नाही ना स्वराज्याच्या पहिल्यावहिल्या विजयाचा साक्षीदार पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे याचं दु:खही कोणाला नाही. हा अतिशय दुर्लक्षित दुर्ग म्हणजे किल्ले सुभानमंगळ….!!!!

शिरवळच्या या छोटेखानी गढीवजा भुईकोटावर आदिलशहाचं राज्य होतं आणि या किल्ल्यात त्याचा मिया रहिम मुहम्मद नावाचा सरदार किल्लेदारी सांभाळत होता. शिवाजीमहाराजांनी १६४८ च्या सुमारास सुभानमंगळ जिंकला. पण पुढे आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या स्वारी दरम्यान त्याने बाळाजी हैबतरावामार्फत पुन्हा सुभानमंगळाचा ताबा मिळवला. शिवाजी महाराजांनी सुभानमंगळ जिंकण्यासाठी कावजी नावाच्या सरदाराची निवड केली. निवडक सैन्यानिशी कावजीने सुभानमंगळावर प्रचंड हल्ला चढवला. आदिलशाही सैन्याची काही वेळातच त्याने पुरती दाणादाण उडवली आणि हिंदवी स्वराज्याचा श्रीगणेशा या छोटेखानी ठाण्यावर भगवा फडकावून केला !!!!

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प ५ - **किल्ले पुरंदर/वज्रगड**

इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले.

पुरंदरचा तह: शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते. 'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.' मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला, 'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.'

खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प ६ - **किल्ले प्रतापगड**

१६५६ मध्ये चंद्रराव मोर्यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी ‘जावळी‘ ताब्यात घेतली. जावळीच्या खोर्यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ‘‘भोरप्या डोंगर‘‘ एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. ह्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली.

इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्यात आणले. दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी दुपारी २ वाजता शिवरायांनी अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. इ.स १६६१ मध्ये महाराजांनी गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही.

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प ७ - **किल्ले पन्हाळा**

महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व असलेला किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला होय. अफझलखानच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसात शिवाजी महाराजांनी सोमवार, २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा गड जिंकला. शिलाहर राजा भोज (इ.स.११७८-१२०९) याची पन्हाळा किल्ला ही राजधानी होती. देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवाम्या ताब्यात गेला. यादवांनंतर १४८९ मध्ये पन्हाळा किल्ला विजापूरकरांकडे गेला. इ.स. १६५९ मध्ये अफजलवधानंर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला घेतला. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला. सिद्द जौहरच्या वेढ्यानंतर महाराजांनी हा किल्ला विजापुररांच्या ताब्यात दिला. पण ६ मार्च १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून महाराजांनी तो पुन्हा किल्ला ताब्यात घेतला.

सिद्दी जोहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना पन्हाळगडापासून विशाळागडापर्यंत सुखरुप पोहोचवण्यात नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशिद यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जोहरच्या सैन्याला बाजीप्रभूंनी प्राणाची बाजी लावत पावनखिंडीत रोखून धरलं होतं. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर" हाच ज्यांचा हट्ट होता, उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला ज्यांना सवडच नव्हती, "तोफेआधी मरे न बाजी, जा सांगा मृत्यूला!" असा निरोप मृत्युला ठणकावून सांगणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे १३ जुलै १६६० रोजी धारातीर्थी पडले. गजापुरची हि खिंड बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावनखिंड झाली.

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प ८ - **पावनखिंड-विशाळगड**

२८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले. ३ मार्च १६६० ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर १२ जुलै १६६० रोजी सुखरुप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूनीं सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहूती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प ९ - **किल्ले संग्रादुर्ग (चाकणचा किल्ला)**

पुणे जिल्ह्यात पुणे - नाशिक महामार्गावरच्या चाकण गावात जवळपास जमीनदोस्त झालेला चाकांचा किल्ला उर्फ संग्रामदुर्ग आजही उन्हा - पावसाचे तडाखे झेलत इतिहासाची पानं स्मरत उभा आहे.
निजामशाहीचा अस्त झाल्यावर त्यातील काही भाग मुघलांना तर काही भाग आदिलशहाला मिळाला. इ.स. १६५७ मध्ये या दोन्ही शाह्यांमधील झालेल्या एका तहानुसार निजामशाहीच्या दक्षिणेकडील मुलुख जो सद्यस्थितीला आदिलशाहीकडे होता तो मुघलांना मिळावा असे एक कलम होते. या कलमानुसार हा मुलुख जिंकून घेण्यासाठी औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान याची या मोहिमेसाठी निवड केली. २५ फेब्रुवारी १६६० ला अहमदनगरवरून निघालेला शाहिस्तेखान त्याच्या सेनासागारासह ९ मे १६६० रोजी पुण्यात येउन पोचला. अल्पावधीतच पुणे बेचिराख केलेल्या शाहिस्तेखानच्या तावडीतून संग्रामदुर्ग तेवढा वाचला होता. ही गोष्ट सहन न झाल्याने शाहिस्तेखानाने संग्रामदुर्ग काबीज करण्याचा निश्चय केला. २१ जून १६६० रोजी वीस हजार सैन्यानिशी शाहिस्तेखानाने संग्रामदुर्गाला वेढा घातला तेव्हा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्या हाताखाली किल्ल्यात फक्त पाचशेच्या आसपास फौज होती. तिकडे शिवाजी महाराजही पन्हाळ्याच्या वेढयात अडकून पडले होते. पण फिरंगोजी आणि त्याच्या मुठभर मावळ्यांनी तब्बल छप्पन्न दिवस संग्रामदुर्ग झुंझता ठेवला. अखेर शाहिस्तेखानाने चिडून किल्ल्याला सुरुंग लावला. मराठ्यांची या स्फोटात प्रचंड जीवितहानी झाली आणि या संधीचा फायदा घेऊन मुघलांनी किल्ला काबीज केला. फिरंगोजी नरसाळयांनी जिवाजी बाजी लावून लढवत ठेवलेला हा संग्रामदुर्ग अखेर १५ ऑगस्ट १६६० रोज़ी मुघलांच्या ताब्यात गेला.

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प १० - **किल्ले लोहगड आणि विसापूर**

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती.

स. १६६१ च्या जानेवारीत शाहीस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले. कारतलबखानाबरोबर, कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार होती. याशिवाय पायदळ व घोडदळ अंदाजे २०,०००, घोडे, बैल, छोट्या तोफा, बंदूका, डेरे, हत्ती, खजिना असा मोगली सरंजाम होता. खान पूणे, तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली.खानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेण जवळ सैन्याची जमवाजमव केली व ही खबर खानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. खानाने कुरवंडा घाटाने उतरण्याचा निर्णय घेतला व खानाची फौज तो दुष्कर घाट उतरु लागली. फौज दुपारपर्यंत कशीबशी चालत चावणी गावात आली. जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी नव्हते. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने व घाट उतरल्यामुळे गलितमात्र झाली होती. अशावेळी खानाने सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैन्य उंबरखिंडीच्या नळीत गाभ्यात शिरले. सैन्याचे पुढचे टोक ठाकूरवाडीच्या टेकडीजवळ व मागील टोक चावणी गावात अशी अवस्था असतांना महाराजांच्या सैन्याने अचानक मोघली सैन्यावर हल्ला केला. बाजूच्या टेकड्यामुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होत. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती. त्यांना हल्ला कुठून होत आहे तेच कळत नव्हते. त्यातच शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे आहेत, म्हटल्यावर मोघलांचा धीर खचला मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, तो रस्ता नेताजीच्या सैन्याने बंद केला होता.अशा परिस्थितीत शरण जाण्याशिवाय खानाला पर्यायच नव्हता. त्याने महाराजांकडे अभयदान मागण्यासाठी वकील पाठवला. महाराजांनी खानाला सर्व साहीत्य आहे तसेच सोडून जाण्याचा हुकूम दिला. खानाचे सैन्य रिकाम्या हातानी परत पुण्याकडे गेले. उंबरखिंडीत २ फेब्रुवारी १६६१ रोजी खानाचा सपशेल पराभव झाला. मोगलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे साहित्य मराठ्यांना मिळाले.

विकसित तंत्राधारे केली उभी दुर्गशृंखला
एक एक गड बुलंद व्हावा म्हणे स्वराज्यातला
अशी प्रगतीची आस मनाला, असा विलक्षण धीर
शिवरायांशी लढता लढता थकला आलमवीर

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प ११ - **किल्ले माहूली**

ठाणे जिल्ह्यात भंडारदुर्ग,पळसदुर्ग आणि माहुली या तीन बुलंद पहाडांचा त्रिशूळ आभाळाकडे रोखलेला आणि सुळक्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा माहुली नावाचा दुर्ग शहापूर तालुक्यात आसनगाव जवळ वसला आहे.

साधारणपणे १६३५-३६ च्या सुमारास शहाजीराजांनी निजामशाहीच्या शेवटच्या वंशजाला म्हणजेच अल्पवयीन असणा-या मुर्तझा निजामाला जीवधन किल्ल्यावरून मुघलांच्या कैदेतून सोडवून संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर आणले आणि स्वत: शहाजीराजे निजामशाहीचा कारभार सांभाळू लागले. नंतर मुघल आणि आदिलशाहीच्या संयुक्त फौजांनी निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न सुरु करताच शहाजीराजांनी मुर्तझा निजाम,जिजाबाईसाहेब आणि बालशिवबा यांना घेऊन माहुलीचा आश्रय घेतला. खानजमान नावाच्या मुघल सरदाराने यावेळी माहुलीला वेढा घातला. पण शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मागितलेली मदत त्यांनी नाकारल्याने शहाजीराजांनी शरणागती पत्करली आणि आदिलशाहीची नोकरी स्वीकारली.

पुढे शिवाजीमहाराजांनी ८ जानेवारी १६५८ रोजी माहुली पुन्हा जिंकला. पण जून १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात माहुली पुन्हा मुघलांकडे गेला. शिवाजीमहाराजांनी १६७० च्या फेब्रुवारी मध्ये स्वत: नेतृत्व करून रात्रीच्या वेळी किल्ल्यावर हल्ला केला. पण किल्ल्यावरच्या मनोहरदास गौड या जागृत रजपूत किल्लेदाराने सुमारे हजार मराठे कापले आणि हा हल्ला मोडून काढला. पण पुढे मराठ्यांनी या किल्ल्यावर अलावर्दिखान बेग या नावाच्या किल्लेदाराची बदली झाल्याचा पुरेपूर फायदा उठवत माहुलीवर कडवा हल्ला केला आणि १६ जून १६७० या दिवशी माहुली पुन्हा स्वराज्यात दाखल झाला.

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प १२ - **स्वराज्याचे आरमार - किल्ले सिंधुदुर्ग**

स्वराज्याची किनारपट्टी सुरक्षित असावी तर त्यासाठी आरमाराची उभारणी करायला हवी. ही दूरदृष्टी ठेवून महाराजांनी सशस्त्र आरमाराचा पाया रोवला तो मालवण नजिकच्या कुरटे बेटावर. मालवण किनारपट्टी पासून अंदाजे ५०० मिटर अंतरावर पाण्यात कुरटे बेटावर उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे स्थापत्य, जिद्द, मेहनत आणि निसर्गाच्या देणगीचा उत्तम नमुना आहे.

सदर किल्ल्याच्या बांधकामात महाराजांनी जातीने लक्ष पुरविले होते. हजारो होन आणि कामगारांच्या कष्टाने साकारलेल्या किल्लाचा पाया शिसे ओतून भक्कम केलेला आहे. सिंधुदुर्गाचे बांधकाम २९ एप्रिल १६६७ रोजी पूर्ण झाले. दर्याचा वारा आणि लाटांचा मारा सोसत या किल्लाचे काम पुर्ण करणार्‍या हर एक कारागिराचा महाराजांनी सोनकड्या आणि रौप्यकड्या देऊन सन्मान केला होता.

सागरतीरी गोड पाणी कुरटे बेटावरी
मोल तयाच्या स्वराज्यसेवेचे शिवदृष्टीकरी
ऐसी जागा नाही म्हणाले चौर्‍यांशी बंदरी
सिंधुदुर्ग साकारे "अठरा टोपकरांच्या उरी"

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प १३ - **किल्ले विजयदुर्ग**

विजयदुर्ग किल्ल्याचे दुसरे नाव " घेरिया ". जवळच्या गिर्ये गावावरून त्याला हे नाव पडलं असं म्हणतात. हा किल्ला शिवपूर्वकालीन असून हा शिलाहार भोज राजाने बांधला असेही तज्ञांचे मत आहे. हा किल्ला इ.स. १६६४ च्या सुमारास शिवरायांकडे आला. पुढे हा किल्ला कान्होजी आंग्रेंच्या ताब्यात आला. इंग्रजांनी कान्होजींची कोकणातील सत्ता नष्ट करण्याकरता गव्हर्नर चार्ल्स बून च्या नेतृत्वाखाली विजयदुर्गवर हल्ला केला. पण त्यांना त्यात अपयश येउन त्यांनी माघार घेतली.

पुढे याच गव्हर्नर बूनने एक खूप मोठी युद्धनौका बांधून तुला " फ्राम " असं नाव दिलं आणि आणि या मोहिमेची जबाबदारी ब्राऊन नावाच्या अधिका-यावर सोपवली. पण किल्ल्यावर रुद्राजी अनंत नावाचा पराक्रमी किल्लेदार होता. त्याच्या आदेशानुसार या युद्धनौकेवर झालेल्या तोफांच्या प्रचंड मा-यामुळे इंग्रजांचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यांनी पुन्हा माघार घेतली. ही तारीख होती ८ सप्टेंबर १७२०. नंतर २९ सप्टेंबर १७२० रोजी इंग्रजांनी रात्री केलेल्या हल्ल्यातही इंग्रजांनी मराठ्यांकडून प्रचंड मार खाल्ला. त्यामुळे इंग्रजांना विजयदुर्गाचा विषय सोडून द्यावा लागला. १७२४ मध्ये डचांनी या किल्ल्यावर केलेल्या हल्ल्यातही त्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागलं आणि रुद्राजी अनंतने शेवटपर्यंत विजयदुर्ग अजिंक्य ठेवला.

अखेर कान्होजी आंग्रेंच्या मृत्युनंतर काही वर्षांनी म्हणजे १७५६ साली इंग्रजांनी गडाला वेढा घातला आणि ९२ वर्षांच्या अथक पण यशस्वी झुंजीनंतर अखेर विजयदुर्ग दि. १३ फेब्रुवारी १७५६ रोजी इंग्रजांच्या ताब्यात गेला. इ.स. १६६४ मध्ये शिवरायांनी जिंकलेला हा अभेद्य दुर्ग १७५६ पर्यंत तब्बल ९२ वर्ष मराठी मातीत न्हाऊन निघत होता. नावातच "विजय" असणा-या या अभूतपूर्व किल्ल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात मात्र आपलं नाव सुवर्णाक्षरात कोरून ठेवलं आहे !!!!

पिऊनी गेला तुला सागरा एक अगस्ती मुनी
बुलंद ताकद मराठमोळी मी आलो घेऊनी
विजय झुंजीच्या खुणा ठेवूनी लाटालाटांवरी
अस्मानी यश मिरवित जाईन भूमीवरल्या घरी!!

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प १४ - **किल्ले कंचना**

नाशिक जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध अशा सातमाळा रांगेत धोडप किल्ल्याच्या शेजारीच कांचना व मंचना अशा दोन शिरांचा कांचना किल्ला उभा आहे.

शिवाजीमहाराजांनी इ.स. १६७० मध्ये पुन्हा एकदा सुरत लुटली. ही लुट घेऊन शिवाजीमहाराज महाराष्ट्रात नाशिकमार्गे परतत आहेत ही खबर शहजादा मुअज्जमने दाउदखान कुरेशीला कळवली आणि त्याला शिवरायांवर चाल करून जायला सांगितले.दाउदखान आणि इख्लासखान हे दोन मुघल सरदार सुमारे तीन चार हजाराचं सैन्य घेऊन कांचना किल्ल्याजवळ पोहोचले. मराठ्यांचे सैन्य सुमारे दहा हजारांच्या आसपास होते. आघाडीवर असलेल्या इख्लासखानाने प्रचंड शौर्याने मराठी सैन्यावर निकराचा हल्ला केला. अतिशय पराक्रमी असलेला हा जवान असा इख्लासखान मराठी सैन्यावर तुटून पडला. मागून दाउदखानही मैदानात येउन दाखल झाला. एक प्रचंड असं रणकंदन त्या ठिकाणी माजलं. पण मुघलांचा तिखट अशा मराठी तलवारींपुढे निकाल लागला नाही. अखेरीस दाउदखान आणि इख्लासखान या दोघांनी जबर जखमी झाल्याने माघार घेतली आणि या विजयामुळे शिवरायांचा पुढचा मार्ग सुकर झाला. ती तारीख होती १७ ऑक्टोबर १६७० !!!!

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प १५ - **किल्ले पद्मदुर्ग**

अलिबाग जवळच्या प्रसिद्ध अशा मुरूडच्या समुद्रकिना-यावर उभं राहिलं की सिंधुसागरात एका बेटावर एक मजबूत बांधकाम दिसून येतं. हा जलदुर्ग म्हणजे कासा किल्ला उर्फ पद्मदुर्ग…!!!!!

मुरुडचा अभेद्य असा जंजिरा किल्ला जिंकून घेण्यासाठी मराठ्यांनी केलेले हरत-हेचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. त्यामुळे सिद्दीच्या नाकावर टिच्चून त्याच्याच किल्ल्याच्या समोर एक जलदुर्ग उभारावा आणि त्याच्या हालचालींना शह द्यावा अशी योजना महाराजांनी आखली आणि कासा बेटावर पद्मदुर्गाचे बांधकाम सुरु झाले. सिद्दीने या मोहिमेत अनेक विघ्न आणण्याचे प्रयत्न केले पण मराठ्यांनी ते प्रयत्न हाणून पाडले. पद्मदुर्गास लागेल ती मदत करा अशा हुकुम शिवाजीमहाराजांनी सुभेदार जिवाजी विनायक याला दिला. पण त्याने कामात दिरंगाई केल्याचे समजताच महाराजांनी संतापून एक अतिशय खरमरीत पत्र त्याला पाठवलं. "एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू पहाल यावरी साहेब रिझतील काय. याउपरि तुमचा मुलाहिजा करणार नाही" हे या पत्रातले शब्द शिवरायांच्या कडक प्रशासनाची ग्वाही देणारे आहेत. ह्या पत्राची तारीख होती १९ जानेवारी १६७५. पुढे पद्मदुर्गाचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्याची सुभेदारी सुभानजी मोहिते यास देण्यात आली.

अजिंक्यतेचा गर्व जंजिर्‍या, आता तुझा उतरेल
खळखळाट तुझ्या तोर्‍याचा, उद्या विश्व विसरेल
झुंजीस पुन्हा सिद्ध जाहल्या अमुच्या छात्या निधड्या
नव्या पद्मदुर्गावरूनी या तुझ्या करू चिंधड्या!!

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प १६ - **किल्ले सिंहगड**

१६४७ साली सिंहगड शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे शहाजी राजांच्या सुटकेसाठी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगडपण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा मूलचा राजपूत पण बाटुन मुसलमान झालेला अधिकारी होता.कोंढाणा किल्ला हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे.या युद्धाबाबत सभासद बखरी पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मावळियांचा होता त्याने कबूल केले की, "कोंडाणा आपण घेतो", असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडुन रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफांचे व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेंव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपूतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडाली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडाले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरी वोढ घेऊन, दोधे महारागास पेटले. दोधे ठार झाले. ४ फेब्रुवारी १६७४ रोजी कोंडाणा किल्ला काबीज झाला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेंव्हा ते म्हणाले, "एक गड घेतला, परंतु एक गड गेला".

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प १७ - **किल्ले पट्टा (विश्रामगड)**

१६७९ साली जालन्याची लूट करून मराठी सैन्य परतत असताना मोगल सरदार रणमस्तखानाने त्यांचा पाठलाग सुरु केला. शिवाजी महाराजांनी त्याचा दणकून पराभव करून त्याला कैद केलं. पण मागून सरदारखान व केसरीसिंह यांची ज्यादा फौज महाराजांवर चालून आल्याने त्या खजिन्याची मोगलांच्या मगरमिठीतून सुटका कशी करावी हा पेच पडलेला असताना स्वराज्याच्या हेर खात्याचा प्रमुक बहिर्जी नाईक मराठी फौजेच्या मदतीला धावून आला आणि त्याने अत्यंत शिताफीने ही सगळी फौज खजिन्यासकट एका आडवाटेने पट्टा किल्ल्यावर नेली आणि मोगलांच्या जाचातून मराठ्यांची आणि खाशा महाराजांची सुटका केली.पुढे महाराजांनी काही दिवस या किल्ल्यावर विश्रांती घेतली आणि नंतर ते रायगडी रवाना झाले. पट्टा किल्ल्याच्या अस्तित्वाला महाराजांच्या पदस्पर्शाने एक नवा अर्थ प्राप्त झाला आणि त्याने आपली जुनी कात टाकून नवे नाव धारण केले "विश्रामगड"!!!! ती तारीख होती २२ नोव्हेंबर १६७९ !!!! शिवाजी महाराजांच्या महापराक्रमी कारकिर्दीतली हि शेवटची लढाई !!!! पट्टा ख-या अर्थाने इतिहासात गाजला !!!!

=======================================================================
=======================================================================
दुर्गपुष्प १८ - **दूर्गदुर्गेश्वर रायगड**

पराक्रमाने स्वराज्यांगणी तेजकार्य घडविले
कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज
रचितो वर्णन, करीतो वंदन शिवभूषण कविराज!!

१५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला करुन मोर्यांचा धुव्वा उडवला. मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला; तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५७ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.

महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते,"राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा."

शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती. गडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. दिनांक २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.

कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ’शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’

रायगडाने अनुभवलेला अत्यंत दु:खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ’ते दिवशी पृथ्वीकंप जाहला अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.

आयुष्याची उणीपुरी ५० वर्षे मोहिमा, लढाया, घोडदौड, दगदग यात खडतरपणे व्यातित करणारा "जाणता राजा" रायगडावर चिरनिद्रा घेता झाला. त्याची चिरनिद्रा आजपर्यंत शांततेच चालली आहे. ती तशीच अखंडपणे याहीपुढे चालू राहो. आपण फक्त "शिवस्मरण" करावं.

शिवस्मृती - रायगड

शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या या गडकोटांना आजही भेट देताना नकळत शब्द कानावर पडतात... "ज्यास जे सांगितले ते त्याने करावे, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा".
=======================================================================
=======================================================================
ऋणनिर्देशः
१. किल्ल्यांची माहिती आम्हा पाचजणांकडुन तर काही किल्ल्यांची माहिती आंतरजालाहुन साभार.
२. शिवनेरी आणि रायगड प्रचिंवरचे मोडीलिपी लेखन आमचे मित्र परेश जोशी.
३. इंद्रधनुष्य, सह्याद्रीमित्र, योरॉक्स, आशुचॅम्प - यांच्याशिवाय हि चित्रमालिका होणे शक्य नव्हते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच........

.जय महाराष्ट्र
.
.
.
( बर्याच चित्रांवर नावांचा वॉटरमार्क नाही आहे)

मित्रा,
फारच छान . कौतुक करायला शब्दच नाहीयेत...
तुम्हा सर्वांच्या फोटोग्राफी, लेखन व मेहनतीला..
__/\__

महाराष्ट्राचे पाच शिलेदार....ओंकार (सह्याद्रीमित्र), योगेश (यो रॉक्स), आशिष (आशुचॅम्प), दत्तराज (इंद्रधनुष्य) आणि योगेश (जिप्सी).....मुजरा त्रिवार ....

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्‍याखोर्‍यातील शिळा

हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली न मान

हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील
मायदेशांतील शिळा

- कवी- कुसुमाग्रज

जिप्सी,इंद्रधनुष्य, सह्याद्रीमित्र, योरॉक्स, आशुचॅम्प या सचित्र इतिहासातून शिवकाल पुन्हा मूर्त स्वरूपात उभा केलात डोळ्यांसमोर..

आभाराचे शब्द फारच लहान वाटताहेत या महान कार्यापुढे

____/\____

आहाहा! नुसत्या छायाचित्रांनीच रोमांच ऊभे केले.. संपूर्ण लेख सवडीने वाचणार.

तोपर्यंत.. शिलेदारांनी त्रिवार मुजरा घ्यावा.
जय महाराष्ट्र!

जिप्सी, इंद्रधनुष्य, सह्याद्रीमित्र, योरॉक्स, आशुचॅम्प::
भन्नाट कल्पना, प्रचि अन् माहिती संग्रह!!!
खूप खूप अभिनंदन!!!

आजचा दिवस सार्थकी लावलांत. फोटो तर सुंदर आहेतच. पण त्याहून सुंदर आहे ही कल्पना आणि या कल्पनेमागची मेहनत!!!!

जय भवानी!! जय शिवाजी!!!!

मस्त्! एवढी माहिती आणि ईतके सुंदर फोटो एकत्र संकलित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार्....जय महाराष्ट्र!

सर्वांना खूप खूप धन्यवाद....खरंतर ही सर्व धडपड जिप्सीची जास्त...आम्ही आपले नाममात्र..त्यानेच सगळा पाठपुरावा करून, फोटो जमा करून, माहीती घेऊन ही मालिका साकार केली.
जिप्सी अभिनंदन रे...फारच सुरेख

खुपच सुंदर फोटो... आणी माहिती...

एवढी माहिती आमच्या सारख्या वाचकान साठी एकत्रित केल्या बद्द्ल खुप खुप आभार..

__/\__
जिप्सी, इंद्रधनुष्य, सह्याद्रीमित्र, योरॉक्स, आशुचॅम्प.... फार सुरेख प्रचि अन् माहिती संग्रह!! मुळात ही थीम सुचणे आणि सादर केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार Happy

व्वा मस्त फोटोज , माहिती पण वेळ काढुन वाचेनच
हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा <<< हो का ? माझी पण इच्छा आहेच Proud

सुरेख फोटो...

नुसते ट्रेक न करता ट्रेकबरोबरच त्याविषयावर काहीतरी कलात्मक, दीर्घकाळ आठवणीत राहिल असं कामही तितकंच महत्त्वाचं आहे. तुझे हे थीमबेस्ड वर्क त्यापैकीच एक...

कीप इट अप.. Happy

शुभेच्छा!

सर्वच प्रकाशचित्रे सुंदर!
राजगडाच्या संजीवनी माचीचा फोटो तर अप्रतिम आलाय.

मस्तच प्रकाशचित्रे. जिप्सी.
-----
राजगडाच्या संजीवनी माचीचा फोटो तर अप्रतिम आलाय.
<<
<<
असेच म्हणतो.

सुरेख फोटो नेहमेप्रमाणेच ...

नुसते ट्रेक न करता ट्रेकबरोबरच इतिहासही समजण्याचा प्रयत्न करणे __/\__

अगदी समयोचित, कीप इट अप..

शुभेच्छा!

Pages