'सुधागड'च्या सहवासात..

Submitted by Yo.Rocks on 6 December, 2012 - 06:15

मुंबईहून पहाटेच निघालेला आमचा लाल डबा धडधड करत एकदाचा का होईना पालीच्या रस्त्याला लागला.. सकाळी आठची वेळ होती..सुर्यदेवांनी आपल्या ताज्या किरणांचा नजराणा पेश केला होता.. हवेतील गारवापण हा नजराणा खुषालीने स्विकारत डोलत होता... साहाजिकच 'उबदार थंडी' अनुभवत होतो.. !! अशातच क्षणभर डुलकी लागली.. जाग आली ती थेट पाली स्टँडच्या परिसरात आल्यावर..

उतरुन आजुबाजूस डोकावले तर एकाच ठिकाणी नजर रोखली गेली.. तो म्हणजे 'सरसगड' ! डोईवर तळपता सुर्य घेउन ठिम्म उभा होता.. अगदी पालीचा रक्षणकर्ता ! 'भविष्यात आपली भेट नक्की' असे मनोमनी म्हणत आम्ही मंदीराच्या दिशेने निघालो... पालीला येउन मंदीराकडे जाणार म्हणजे तेच अष्टविनायकांपैंकी एक प्रसिद्ध 'श्रीबल्लाळेश्वर' हे गणेशमंदीर.. एसटीस्टँडपासून नाही म्हटले तरी पंधरा-वीस मिनीटांची चाल आहे.. मंदीर पालीगावच्या अगदी एकाबाजूस आहे.. इतरठिकाणी दिसते तसेच इथेही चित्र पहायला मिळते.. फुल-प्रसादांचे स्टॉल्स... चप्पल, सामान इथे ठेवा म्हणत आड येणारे दुकानवाले.. देवदेवतांचे फोटोफ्रेम्स, पेंडट्स, लॉकेट्स, सिडीज.. पुजाविधीच्या सामानविक्रीचा स्टॉल.. लहानग्यांसाठी छोटया खेळण्यांचा स्टॉल.. इत्यादी इत्यादी..

या सार्‍यांनी केलेले स्वागत स्विकारुन आम्ही येथील प्रथेप्रमाणे आधी 'धुंडीविनायक'चे नि मग 'श्रीबल्लाळेश्वराचे' दर्शन घेतले.. अजुनपर्यंत माझी अष्टविनायकाची वारी झाली नसल्यामुळे या दर्शनामुळे अगदीच सुखावलो.. बल्लाळेश्वरपुढे नतमस्तक झालो... वेळेअभावी मंदीराचा परिसर फारसा न्याहाळता आला नाही तरी ट्रेकची सुरवात अश्या सुंदर दर्शनाने होत असेल तर किती छान... हो ! आम्ही निघालो होतो 'सुधागड ट्रेक'साठी.. सोबतीला मायबोलीचा प्रकाशचित्र फेम जिप्सी व त्याचे तीन मित्र: प्रशांत, संदीप व मायबोलीकर दिपक डी असे हे चौघे, माझा ट्रेकस्नेही शिव व त्याची सौ. आणि ट्रेकसाठी पहिलटकर असणार्‍या 'सौ. रॉक्स'..

या मंदीराच्या परिसरातच एका हॉटेलमध्ये पेटपुजा उरकून घेतली व तिथेच काही अंतरावर एका नाक्यावर एसटीची वाट बघत बसलो.. पाली एसटी स्टँडवरुन पाच्छापुरसाठी सुटणारी एसटी या मंदीराच्याच जवळून जाते... एसटीचे वेळापत्रक पडताळूनच आलो असल्याने जास्तवेळ थांबावे लागले नाही.. उतरायचे ठरले होते पाच्छापूर.. पण एसटीतच एका गावकर्‍याने पाच्छापुरचा पुढचा व एसटीचा शेवटचा स्टॉप ठाकुरवाडीला उतरायचे सुचवले... पाच्छापुरला ऐतिहासिक महत्त्व कारण इथेच औरंगजेबचा मुलगा पाच्छा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्याला संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यांच्या सोबत पाली येथील सुधागड जवळ ठेवले होते. (संदर्भ : http://www.maayboli.com/node/26634 ) हे गाव खरे तर पहायचे होते.. पण इथून पुन्हा पायपीटचे अंतर वाढले असते शिवाय दुपारी अकराच्या सुमारास पहिलटकरांना असे घेउन जाणे कठीणच.. शिवाय दोघे तिघे सोडलो तर बाकी नियमित ट्रेक करणारे कोणीच नव्हते.. तेव्हा उतरलो ते थेट ठाकुरवाडीलाच.. पाच्छापुरहून ठाकुरवाडीला येतानाच अवाढव्य सुधागड दिसू लागतो.. अगदी लोखंडी शिडयादेखील नजरेस पडतात..

रतनगडनंतर पुन्हा असेच भर दुपारी साडेअकराच्या सुमारास गड चढायला घेतला... वाट अगदी पायाखालची आणि सोप्पी अशी होती.. पण उन चांगलेच पडले होते.. हवेचा पत्ताच नव्हता.. तेव्हा चांगलीच कसोटी लागणार हे कळून चुकले.. त्यात आमच्या ग्रुपमधल्या महिला मंडळाला कितपत झेपेल याबद्दल साशंक होतो.. पाठीवर सॅकच्या ओझ्याव्यतिरीक्त उनाचे ओझे घेउन चढणीच्या वाटेला लागलो.. शिव व मी आमच्या सौ. वर लक्ष ठेवूनच होतो.. अपेक्षेप्रमाणे पहिल्या चढणातच काहीजणांना धापा लागल्या.. पाण्याच्या बाटल्या सॅकमधून बाहेर पडल्या.. पाणी सगळ्यांकडे मुबलक प्रमाणात होते तरीसुद्धा एकंदर चढाईसाठी लागणारा वेळ व अंतर यांचा अंदाज घेउन पाण्याचा वापर अगदी काटकसरीने करण्याचा संदेश दिला गेला..

चढताना डावीकडे दुरवर पालीचा सरसगड ऐकल्याप्रमाणे अगदी पगडी ठेवल्यागतच भासत होता... वातावरण अगदीच धुरकट होते.. त्यामुळे भोवतालचा सारा परिसर तसा अस्पष्टच दिसत होता.. वार्‍याचा थांगपत्ता नसल्याने उष्मा अधिक जाणवू लागला.. सो ट्रेकची फारशी जवळीक नसलेल्यांची आता मात्र भंबेरी उडाली.. घामाच्या धारांना सुरवात झालीच होती.. 'क्षणभर विश्रांती' आता क्षणाक्षणाला घेतली जाउ लागली.. इलेक्ट्रॉल पावडरची पाकीटे पण फोडली गेली.. सौ. लोकांनी एक-दोन ठिकाणाचे अपवाद वगळता सॅक श्री. लोकांकडे सोपावली नाही ते विशेष.. साहाजिकच 'ट्रेकला फाजिल लाड करत नाही' हा आपल्या ट्रेकचा नियम पाळला गेला.. Wink गडावर मुक्काम असल्यामुळे घाई करुन चढण्याचे टेंशन मात्र नव्हते.. तेव्हा थकत-बसतच पहिला टप्पा पार केला म्हणजेच मार्गातील लोखंडी शिडी गाठली.. अगदी सुव्यवस्थेत असलेल्या शिडीमुळे येथील मार्ग अधिकच सोपस्कर झाला आहे.. तरीसुद्धा चढताना शिडी काय हलली आणि आमच्या सौ. दचकल्याच..

चढताना एव्हाना आमच्या ग्रुपची फाळणी झालीच होती.. श्री व सौ. यांच्या दोन जोडी आणि मागे जिप्सी व त्यांचे मित्र.. आधी वाटले होते महिला मंडळाचे स्लो इंजिन असल्यामुळे ते मुद्दामहून मागे राहत असावेत.. पण नंतर कळले जल्ला मागचे इंजिन पण तसलेच.. तरीसुद्धा उन्हाचा प्रतिकार करत शक्य मिळेल तिथे सावलीचा आश्रय घेत अगदी धिम्या गतीने चढाई सुरुच ठेवली.. . वाटेत लाभणार्‍या शीतल छायेतच निद्रीस्त होउन पडावे व सांजवेळी उठून चढायला घ्यावे अशी इच्छा वारंवार होत होती.. वरती गडावर दिसणारा भगवा ही एकच त्यात आमच्या वाटचालीबद्दल समाधान देणारी गोष्ट होती.. .

उनामुळे आजुबाजूचे गवतरान चांगलेच होरपळलेले होते.. अगदी तपकिरी रंगाचा रखरखाट चोहोदिशांना जाणवत होता.. वार्‍याचादेखिल आज मूडच नव्हता.. अपेक्षा होती थंड, बोचरी हवा सोबतीला असेल.. पण छे काहीच नाही.. अगदी उन्हाळी ट्रेक करतोय असे वाटत होते.. कधी एकदाचे पोहोचतोय असे म्हणत म्हणत अखेरीस आम्ही पाच्छापुर दरवाजा गाठला.. नैसर्गिक भिंतीचा वापर करुन बांधलेल्या बुरुजांमधून जाणार्‍या पायर्‍या अगदी अर्धवट नि तुटलेल्या अवस्थेत आहेत.. आतापर्यंत क्षणभर विश्रांतीसाठी घेतलेल्या थांब्यामध्ये हा सर्वोत्तम.. इथेच काय ते वार्‍याने आमचे स्वागत केले.. बुरुजांची सावली तर होतीच..

इथला परिसर बघून आम्ही पुन्हा चढाईला लागलो.. उनामुळे इतके कासाविस झालो होतो की खालून दिसलेल्या भगव्याकडे जायचेच राहून गेले.. पुढे चढताना उजवीकडे डोंगररांगेपासून अलग झालेला घनगड दिसू लागला.. इथून वर जाताना आमच्यातला शिव पदोपदी इथे पुर्वी केलेल्या पावसाळी ट्रेकची आठवण सांगत होता.. 'इथे मस्त धबधबा होता.. पाण्यात भिजलो होतो.. ग्रिनरी होती.. पाण्यात बसून फोटो काढला होता..' इति इति थकल्याभागल्या जीवांना शक्य जितके चाळवेल असे शिवपुराण चालू होते.. अर्ध्यातासातच एकदाचे पठारावर आलो.. ऐकल्यावाचल्याप्रमाने अगदी विस्तिर्ण पठार... पावसात हिरवे वस्त्र तर आता सोनसळी रंगाचे वस्त्र पांघरलेले...

इथूनच पुढे डावीकडे तळे असल्याचे शिवने सांगितले.. नि लगेच मोर्चा तिकडे वळवला.. बर्‍यापैंकी भलेमोठे तळे.. तळपत्या उनामध्ये शांतपणे निजपत पडलेले.. पाणी पिण्यायोग्य नव्हते पण तोंडावर मारण्याइतके शुद्ध होते.. पाण्यात हात घालायला घेतला नि शेकडो मासे चुळबुळताना दिसले.. मग काय सगळ्यांचे बालपण उचंबळून आले नि काठालगत बसून माश्यांशी खेळत राहीलो.. आतापर्यंतचा थकवा, उष्म्यामुळे झालेली अंगाची लाही... सार्‍याचा विसर पडला..

तळ्यावरुन पुढे गेलो ते थेट सुधागडवरील प्रसिद्ध अश्या पंतसचिवांच्या चौसोपी आकाराच्या वाडयावर..

वाडयावर येण्याआधी एक छोटुकले घर लागते जिथे वयस्कर गावकरी राहतात.. त्यांनीच आमचे पाणी देउन स्वागत केले.. या वाडयाची निगराणी त्यांच्याकडून केली जाते.. वाडयात प्रवेश केला नि खरच एक वेगळेपण जाणवते.. ह्या वाडयाची पुर्नबांधणी झाली असल्याचे ऐकून होतो नि खरच जुनेपणाला धक्का न लावता बर्‍यापैंकी राखण झाली आहे.. शेणांनी सारवून वाडा स्वच्छ ठेवला आहे.. असा हा सुंदर वाडा मुक्कामासाठी तर छानच.. आम्ही येइस्तोवर आधीच एक तीन जणांचा ग्रुप येउन राहीला होता तर चुलीकडच्या बाजूला एका गावकर्‍याने तात्पुरता संसार मांडला होता.. चौकशीनंतर कळले ते खाली धोंडसे गावचे रहिवाशी.. आणि येथील भोराई देवस्थानाशी संबधित असणार्‍या घराण्यांपैंकी एक खंडागळे घराण्याचे.. सुधागड किल्ला हा भोराईचा डोंगर म्हणून ओळखला जातो याचे कारण येथील भोराई देवीचे मंदीर.. याच मंदीराच्या पुजेचे कामकाज हे खंडागळे पण करतात.. शिवाय आधी कळवले तर जेवणाची सोयदेखील करुन देतात.. आजही ते सारे राशन वगैरे घेउन आले होते ते तब्बल ४० जणांच्या ग्रुपसाठी !! आम्ही दचकलोच.. मग कळले पुण्याहून एक ग्रुप खास चिल्लर पार्टीला घेउन येत आहे..

आम्ही वाडयातील एक जागा पटकावली.. मॅट अंथरली आणि पेटपुजेचा कार्यक्रम थाटला.. भरदुपारच्या उनात चढताना भूकेचे भानच राहीले नव्हते.. आता मात्र तीन साडेतीनच्या सुमारास आम्ही चहापान आणि सटरफटर खाण्याचा कार्यक्रम एकत्र पार पाडला.. पिण्याच्या पाण्याची चौकशी केली तर कळले वाडयापासून पाच्छापुरच्या दिशेने जाताना पंधराएक मिनीटावर पाण्याच्या टाक्या आहेत.. इथे पोचण्यासाठी थोडे खाली उतरावे लागते.. वाटही निमुळती थोडीफार घसरणीची आहे.. साहाजिकच पाणी भरुन वरती आणताना धाप लागते ! आम्ही तर काय बाटल्या नि फारतर एक टोप घेतला होता.. पण ते गावकरी मोठेच्या मोठे ड्रम डोक्यावर घेउन ये-जा करत होते !!! तीन टाक्यांपैंकी थोडीशी एका बाजूस असणार्‍या टाकीतले पाणी सध्या पिण्यासाठी वापरतात.. हिंवाळ्यापर्यंत इथलेच पाणी पिण्यास वापरतात.. उन्हाळ्यात मात्र धोंडसेच्या मार्गावर असणार्‍या टाक्यांकडे जावे लागते असे कळले.. डोंबिवलीच्या ट्रेकक्षितीज संस्थेने 'सुधागड' ची जबाबदारी स्वखुषीने घेतली असल्याने येथील टाकी साफ करुन पाणी उपलब्ध करुन देण्याचे कामही त्यांचेच.. खरच कौतुकास्पद !

एव्हाना सुर्यदेव पश्चिमेच्या क्षितीजावर विसावले होते.. साहाजिकच आज दिवसभरात 'सळो की पळो' करुन सोडणार्‍या सुर्यकिरणांनी आपल्या कामातून रजा घेतली होती.. आम्हीदेखील आता त्या विस्तीर्ण पठारावर मुक्तपणे हिंडायला लागलो.. हिंडताना तीन चार ठिकाणी सापाची कात दिसून आली.. दिवसभरात आठ ठिकाणी सापाची कात बघितली गेली.. सुदैवाने सर्पदर्शन काही झाले नव्हते.. इथे सापांचा सुळसुळाट असल्याचे ऐकुन होतो ते आज कळतच होते..

सूर्यास्ताची वेळ.. आम्ही सारे कडयावरती बसलेलो.. डाव्या दिशेला पश्चिमेच्या क्षितीजापटलावर सुर्यदेवांचा निद्रीस्त सोहळा चालू होता.. तर खाली दरीमध्ये धुक्याचे साम्राज्य पसरलेले.. उजव्या बाजूस प्रसिद्ध 'तैल-बैला'ची भिंत मावळत्या सुर्याच्या संधिप्रकाशातदेखील लक्ष वेधून घेत होती.. त्याच भिंतीच्या खालच्या बाजूस पुण्यातून कोकणात उतरवणार्‍या सवाष्णीचा घाटाचा अस्ताव्यस्त पसारा दिसत होता.. याच घाटाचा पहारेकरी म्हणूनदेखिल 'सुधागड' ओळखला जातो !

सांजवेळ टळून गेली नि आम्ही पुन्हा वाडयावर आलो..वाटले होते सुर्यदेव निद्रीस्त झाले की थंड हवेचा झोत सुरु होईल.. पण तशी कुठेच चाहूल लागली नव्हती.. मेणबत्तीने काळोखाची जागा घेतली.. पण अगदीच गैरसोय नको म्हणून एक टॉर्च वरतून छपराच्या लाकडाला टांगली नि आमच्या घरात (जागेत) लाईट लागला.. Happy ट्रेकमध्ये नेहमीच तरतरी आणणार्‍या सूपाने पेटपुजेला आरंभ केला.. आणि मग खिचडीच्या तयारीला सुरवात झाली.. अर्थात या गडबडीत महिलामंडळ नवखे असल्याने त्यांचे अधुनमधून नाक मुरडणे सुरु होते.. 'असे नको.. तसे करा.. हे धुवून घ्या.. श्शी असे काय.... अशेच काय चड्डीला हात पुसले.. इति इति अरे किती कित्ती ते.. शिव आणि माझी त्रस्त मुद्रा जिप्स्याने ओळखली आणि त्यांना चुलीपासून दूर नेण्याचे निष्फळ प्रयत्न केले.. शिवने तर जाहीर करुन टाकले 'पुन्हा ट्रेकला आणणारच नाही' तर इकडे मी आमच्या सौ. ला 'ट्रेकला आलोय.. घरचा किचन नाही.. सवय करा' चे धडे देउ लागलो.. हुश्श. एकदाची स्वादिष्ट खिचडी तयार झाली.. पापड, लसुण चटणी, ठेचा यांना सामिल करुन चविष्ट खिचडीची रंगत अजून वाढवली..

बाटल्यांमधील पाण्याची टंचाई बघून जेवणाआधीच आम्ही (दिपक, संदीप, प्रशांत व मी) अंधारात टाक्यांकडे जाण्यासाठी बाहेर पडलो होतो.. दोन दिवसानंतर त्रिपुरारी पौर्णिमा होती तेव्हा चांदण्याप्रकाशात टॉर्चची गरज नव्हती.. तरीसुद्धा सापांच्या भितीने टॉर्चच्या प्रकाशाताच जाणे पसंत केले.. आमच्यासाठी अर्ध्यातासाचा का होईना पण एक इटुकला पिटुकला नाईट ट्रेकच झाला होता..

जेवण आटपेस्तोवर त्या चाळीस मुलांचा ग्रुप हाजिर झाला.. नि क्षणभर वाडयात एकच कल्लोळ उडाला.. ह्या मुलांना 'तैल-बैला' दाखवून धोंडसेमार्गे वरती आणले होते.. !! प्रत्येकाकडे एक सॅक व एक टॉर्च ! खरेतर त्यांच्यामध्ये एका मुलाला किरकोळ दुखापत झाली होती म्हणून वरती येण्यास उशीर झाला होता.. तरीसुद्धा एवढ्या रात्री इतक्या मोठया संख्येला ते पण चिल्लर पार्टीला सांभाळणे खरेच जिकरीचे व काहीसे धोक्याचे पण वाटले.. त्यांच्यामागोमाग अजुन तीन-चार जणांचा असे दोन ग्रुप दाखल झाले.. नि पंतसचिवांच्या वाडयाला जाग आली.. ! तसा कुठेही अगदी मोठा गडबड गोंधळ असा प्रकार नव्ह्ता.. मुले तर अगदीच शिस्तीत वागत होती..

थंडी नव्हतीच तरीसुद्धा मॅटवर पडल्यावर डोळा कधी लागला ते कळलेच नाही.. उठेस्तोवर चांगलेच उजाडले होते.. मग पटापट चहा नाश्तापाणी आटपून घेतले.. त्या वाडयातच एक ग्रुप फोटो उरकून घेतला.. निघण्यापुर्वी आमच्या तात्पुरत्या मुक्कामाची जागा केर काढून साफ केली.. तिकडची आज्जी तर खूपच प्रेमळ आहे.. 'राहूदे मी करेन नंतर' असे म्हणत होती.. पण आम्ही कसले ऐकतोय.. त्यांचा आशिर्वाद घेउन आम्ही वाडा सोडला.. वेळेअभावी टकमक टोकाकडे आणि बोलक्या कडयाकडे जाणे टाळले.. तसेही म्हणा धुसर वातावरणामुळे काही स्पष्ट दिसणार नव्हतेच.. एरवी हिरवेगार असणार्‍या या सुधागडाच्या पठारावरील आताचे सोनसळी गवत खूपच मोहक वाटत होते नि अश्या गालिच्यावर पण लोळण, उडया मारायला कोणाला नाही आवडणार. सो हौस भागवून घेतली.. Happy

इथूनच मग आम्ही वाडयाच्या मागील बाजूस असलेले शिवमंदीर बघून भोराई मंदीराकडे वळालो..शिवमंदीरात अनेक देवदेवतांच्या मुर्ती रांगेत बसलेल्या आहेत.. इथून भोराई मंदीराकडे जाताना एका बाजूस पडक्या अवस्थेतील कोठारे दिसली.. तिथेच बाजुला छोटे पावसामुळे तयार झालेल्या तळ्यात म्हशी अंघोळीची मौज घेत होते..

भोराई देवी हे सुधागडवरील प्रमुख देवस्थान.. भोराई संस्थानाचे कुलदैवत होय.. देवीचे दर्शनच घेउन मनाला प्रसन्न वाटले.. पुजारींच्या समक्ष देवीदर्शन तेदेखील सोबतीला सौ. असताना..यापेक्षा देवीदर्शनाचे समाधान कुठले.. खरंच गडांवरच्या देवीचे दर्शन हे खूपच उत्सुर्फदायक ठरते..

या मंदीराचा जीर्णोद्धार झाला असल्याने सभागृह छान नि मोकळे आहे.. दारातच वाघ आणि वर मोठी घंटा (चिमाजीअप्पांनी वसईकिल्ल्यावरील विजयानंतर इतरत्र पाठवून दिलेल्या घंटांपैंकी एक असे म्हणतात) आहे.. मंदीराच्या परिसरात समोरच प्राचीन दिपमाळ आहे तर बाजुने जत्रेच्यावेळी सोय होण्याच्या उद्दीष्टाने नव्याने बांधकाम केलेले आहे.. तिथेच बाजुला अनेक वीरगळी व समाधी (सतिशीला ?) आहेत.. या परिसरात एक वेगळेपणच जाणवते..! इथे कडयावर उभे राहीले की 'तैल-बैला'ची भिंत अगदी हाकेच्या अंतरावर भासते..

- - -

सुर्य डोईवर येण्यास सुरवात झाली होती तेव्हा उन्हाचा भडका उठण्यापुर्वीच आम्ही धोंडसेची खडकाळ वाट धरली.. वाटेच्या सुरवातीलाच रायगडच्या प्रमुख दरवाज्याची प्रतिकृती म्हणून सुप्रसिद्ध असणारा गोमुखी 'महादरवाजा' लागतो.. असे महाकाय आणि अजुनही शाबूत राहणारे मजबूत दरवाजे बघून 'तेव्हाच्या काळात कशी काय ही भव्यदिव्य निर्मीती झाली असेल' हा विचार मनाला नेहमीप्रमाणे स्पर्श करुन गेलाच.. दरवाज्यावरील नक्षीकामदेखील आपले अस्तित्व राखून आहे..

उल्लेख करावा तर हा दरवाजा म्हणे मातीच्या ढिगार्‍यात बुजला होता.. पण काही गिरीप्रेमी संस्थां, ट्रेकक्षितीजचा ग्रुप आणि अजुन काही उत्साही मंडळीनी मेहनत घेउन हा दरवाजा खुला केला ! अन्यथा एका ऐतिहासिक अमुल्य अशा ठेव्याला मुकलो असतो.. या मंडळीचे कौतुक करावे ते कमीच.. याच दरवाज्याला नमस्कार करत आणि त्या मंडळींना धन्यवाद देत आम्ही गड उतरायला घेतला.. छोटया-मोठया खडकांच्या ढिगार्‍यांना पार करताना इकडून चढाई करताना हालतच झाली असती हे कळून चुकलो.. पहिलटकरांना इथून चढणे मुश्किलच होउन बसले असते.. अश्या खोडकळ वाटेवरून उतरतानाही त्यांची कसरत होत होती.. तरीसुद्धा सगळ्यांनी यशस्वीपणे वाटचाल सुरुच ठेवली होती.. पण संपुर्ण मार्ग हा झाडींमधून असल्याने सावली अगदी खालपर्यंत सोबत देते... वाटेत उजवीकडे (किंचीत निमुळती वाट आहे) एका कातळात छोटया खिडकीच्या आकाराच टाकं खोदलेले आहे.. त्यात अतिशय थंड व शुद्ध असे पिण्याची पाणी आहे.. माझ्यामते पिण्यासाठी सुधागडवरील हा सर्वोत्तम पाण्याचा साठा ! अगदी पोटभर पाणी प्राशन केले नि उतरणे सुरुच ठेवले.. वाटेत मग 'तानाजी' नावाने कोरलेली पाषाणातील छान मुर्ती आहे.. इथेही पाण्याचे टाकं आहे, पण पाणी पिण्यायोग्य वाटले नाही.. पुढेच मग कासारपेठेचा मारुती दिसला... ही सुधागडवरून धोंडसेला उतरताना शेवटची गडओळख..

एकदाची उतरणीची वाट संपली की खालूनच गडाला वळसा घालत जाणारी सपाटीची वाट सुरु होते.. इथे मात्र उनाने आम्हाला गाठलेच.. ही वाट नदीच्या सुक्या पात्राच्या बाजूनेच जाउन 'धोंडसे' गावाकडे येउन सोडते.. पावसात इथे नदीला उधाण आलेले असते... गावाच्या अगदी अगोदर एक ब्रिटीशकालीन पूल लागतो.. इथे येईस्तोवर उनाने खूपच टोचले होते.. तरीसुद्धा मिचक्या डोळ्यांनी सुधागडला एकदा बघून घेतले नि 'येतो पुन्हा' म्हणत 'धोंडसे' गाव गाठले..

बर्‍याचजणांकडून ऐकले होते सुधागडवर बघण्यासारखे विशेष काही नाही.. पण त्यात सुधागडचा काय तो दोष.. अतिशय प्राचिन गडांपैंकी मानला जाणारा एक गड.. साहाजिकच बर्‍याच ऐतिहासिक खुणा लुप्त झाल्या आहेत.. होण्याच्या मार्गावर आहेत.. त्यामानाने गडाचा विस्तार मात्र खूप मोठा.. अशा विरोधाभासामुळे गडावर फारसे बघण्यासारखे काही नाही वाटणारच.. नाही म्हटले तरी कुठल्या ना कुठल्या कोपर्‍यात चोरवाटा, पडकी कोठारे, बुरुजाच्या भिंती, तटबंदी, पाण्याच्या टाक्या, मंदीरे आहेतच.. आणि महादरवाजा काय तो वर्णावा.. शिवाय नुसत्या दर्शनाने शक्ती देणारे भोराईदेवीचे दैवस्थान आहे.. याहून अजुन काही हवे असेल तर कडयावर उभे राहून सभोवतालचे साद घालणारे डोंगरदर्‍या आहेतच.. म्हणूनच सांगावेसे वाटते की एक दिवस तरी काढावा 'सुधागडच्या सहवासात'...

समाप्त नि धन्यवाद Happy

अधिक व सविस्तर माहितीसाठी ट्रेकक्षितीज संस्थेची खालील दोन संकेतस्थळ जरुर पहावीत..

http://trekshitiz.com/sudhagad.htm

http://trekshitiz.com/sudhagadProject/sudhagad_project.htm

आणि फोटो कमी असल्याने सविस्तर फोटोंसाठी जिप्सीने टाकलेल्या फोटोंचा दुवा.. Happy

http://www.maayboli.com/node/39506#new

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो... ब्लॅक अँड व्हाईट फोटो लई लई लई भारी आलेत...

सौ. रॉक्सचा विजय असो.. तुझे ट्रेक थांबणार नाहीत आता! Wink

पंतसचिवाच्या वाड्याला जाग आली
>> माझ्या डोळ्यासमोर उगाच इतिहासकालीन वातावरण उभं राहिलं... मोहिम मारून गडावर परतलेल्या मंडळींच्या स्वागतामध्ये अशी वाक्यं असतात... Happy

शुभेच्छा!

सुरेख वृतांत!!
आणि तो "तैलबैल्याचा" कृष्णधवल प्रकाशचित्र छान घेतलाय.

ऑस्सम लिहिलस आणि फोटोही भारी.

सेम "वाट" जायची यायची आम्ही पकडली होती आणि पावसाळ्यात जाउनही दमट हवेमुळे आलेल्या घामाने आणि खड्या चढाने सेमच "वाट" लागलेली. Proud

वाडा मस्तच आहे. तिथे बसुन पावसाचे धुमशान पाहिले होते अर्धा पाउण तास सुरु असलेले.
उतरताना ती वाट शेवाळालेली असल्यामुळे हा पहीलाच ट्रेक ज्यात उतरायला चढण्यापेक्षा जास्त वेळ लागला. Happy

तुझ्या लेखामुळे स्मृतीरंजनात फेरफतका झाला.

जबरी लिव्हलयस यो... Happy
मी हा ट्रेक मिसला... पण तुझ्या वर्णनातुन तेथे जावुन आल्यासारखे वाटले.

यो मस्त वृत्तांत..
माझ्या मते तर सुधागड हा एव्हरग्रीन ट्रेक आहे.. कुठल्याही ऋतूत जा.. मस्तच वाटते...ह्या एरीयात बरीच भटकंती, बर्‍याच घाटवाटा झाल्यात तरीही एकदा तेलेबैला वरून भोरप्याच्या नाळेने डायरेक्ट सुधागडावर जायचे आहे Happy

एकदा तेलेबैला वरून भोरप्याच्या नाळेने डायरेक्ट सुधागडावर जायचे आहे >> कधी ते कळूदे.. Happy

यो - नेहेमीप्रमाणेच भारी लिहिलंस रे...
फोटोही मस्तच...

ट्रेका सौख्य भरे स्मित >>> +१ >>> +१००....

उल्लेख करावा तर हा दरवाजा म्हणे मातीच्या ढिगार्‍यात बुजला होता.. पण काही गिरीप्रेमी संस्थां, ट्रेकक्षितीजचा ग्रुप आणि अजुन काही उत्साही मंडळीनी मेहनत घेउन हा दरवाजा खुला केला ! अन्यथा एका ऐतिहासिक अमुल्य अशा ठेव्याला मुकलो असतो.. या मंडळीचे कौतुक करावे ते कमीच.. याच दरवाज्याला नमस्कार करत आणि त्या मंडळींना धन्यवाद देत आम्ही गड उतरायला घेतला.. >>>> आपल्याकडील गिरीप्रेमी काय काय महान कार्य करतील - पत्तादेखील लागत नाही - या अशा सर्व अनामवीरांनाही मुजरा...

मस्त वृतांत. आणि प्रचि तर बेष्टच. कॅमेरा घेऊन ट्रेक कसे करतात कोण जाणे? Wink मी तर अशा वृत्तांताच्या जीवावरच सांगत फिरतो 'तैलबैला' अवघड आहे, हरिश्चंद्रगड म्हणजे कहर इ.इ.
पु ट्रे शु. Happy

धन्यवाद Happy
कॅमेरा घेऊन ट्रेक कसे करतात कोण जाणे? >> रंगासेठ.. येउन तर बघा... जिप्स्याने तर ट्रायपॉड पण आणला होता.. त्याने किती वापरला ते त्यालाच विचारा... Lol

आहाहा ! सुरेख वर्णन ! प्रत्येक फोटो एकसे एक !
१,२ आणि म्हशींचा अप्रतिम सुंदर !

ट्रेकमध्ये नेहमीच तरतरी आणणार्‍या सूपाने पेटपुजेला आरंभ केला.. आणि मग खिचडीच्या तयारीला सुरवात झाली.. अर्थात या गडबडीत महिलामंडळ नवखे असल्याने त्यांचे अधुनमधून नाक मुरडणे सुरु होते.. 'असे नको.. तसे करा.. हे धुवून घ्या.. श्शी असे काय.... अशेच काय चड्डीला हात पुसले.. इति इति अरे किती कित्ती ते.. शिव आणि माझी त्रस्त मुद्रा जिप्स्याने ओळखली आणि त्यांना चुलीपासून दूर नेण्याचे निष्फळ प्रयत्न केले.. शिवने तर जाहीर करुन टाकले 'पुन्हा ट्रेकला आणणारच नाही' तर इकडे मी आमच्या सौ. ला 'ट्रेकला आलोय.. घरचा किचन नाही.. सवय करा' चे धडे देउ लागलो.. हुश्श>>>>

हे लै भारी है..... कुठे ही गेले तरी पुरुष मेले.........

बाकी मस्तच !!! ब्लॅक अँड व्हाइट फोटो अप्रतिम.....

मस्त रे यो! स्वयंपाक करतांनाची धम्माल भारी..!! केवळ या गोष्टीसाठी बायकांना न्यायला नको कुठे... बायकांनो दिवे घ्या!!!!! Happy
आम्हांला सक्काळी त्या घरातून धारोष्ण दुध मिळाले होते, त्या घट्ट दुधाचाच चहा केला.
शिडीच्या वाटेने वर चढलात तिथे बुरुजाजवळ एक थंड पाण्याचे छोटे टाके आहे. पटकन लक्षात येत नाही. थोडे बाजूला जावे लागते.
त्या पठारावरील घुमटीचा कृष्णधवल फोटो तर एकदम फिदा.. गोनिदांनी काढलेला म्हणूनही खपून जाईल तो फोटो इतका भारी.. Happy

कुठे ही गेले तरी पुरुष मेले.........>> मोहन की मीरा.. थंड थंड.. पहिलाच ट्रेक होता ना सो तितकाच चान्स होता आम्हाला.. Wink

पटकन लक्षात येत नाही. थोडे बाजूला जावे लागते. >> पुढच्या भेटीत शोधायला हवे..

त्या चौसोपी वाड्यात राहाची मजा काही ओरच आहे....अंगणाच्या मधोमध बहरलेला लाल जास्वंद..आजून आहे का रे ?

आजून एक आठवण
- सकाळी कोंबड्याने खोलीत शिरून बांग दिली होती, काय बिशाद परत झोपाल तर !!
- बकरीच्या दुधाचा चहा प्यायला होता (पहिला आणि शेवटचा)

मस्त....खूप आठवणी जागावाल्यास !!

सुंदर फोटो... ब्लॅक अँड व्हाईट फोटो लई लई लई भारी आले - नेहेमीप्रमाणेच भारी लिहिलंस

ते दिवसा गड चढणं, चुली साठी फाटि गोळा करणं, आयुष्यात पहिल्यांदा पिलेला सूप Happy .... रात्री पाणि भरायला जाणं... ति खिचडी... एकदम तुफानी अनुभव....

लिखाण/वर्णन मस्तच... आज पुन्हा एकदा ट्रेक करुन आलो...

पहिला ब्लॅक अँड व्हाइट फोटो खुप आवडला!!!!