Submitted by इस्रो on 22 July, 2012 - 05:18
काहीतरीच माझे! हे काय बोलतो मी ?
कळपात माणसांच्या, माणूस शोधतो मी
नाते नवे असो की, ओळख जुनी पुरानी
होणार लाभ जेथे, तेथेच गुंततो मी
नाही अता भरोसा, कुठल्याच माणसाचा
राखण करावयाला, श्वानास नेमतो मी
मी सांगतो तयांना, आहे खरेखुरे जे
कोणास बोचतो मी, कोणास टोचतो मी
म्हणतात लोक काही, लिहितोस छान 'नाहिद'
सुचते सहज मला जे, शब्दात मांडतो मी
-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०,
ईसंपर्क : nahidnalband@gmail.com]
गुलमोहर:
शेअर करा
नाहिदजी! सुंदर गझल आहे!
नाहिदजी! सुंदर गझल आहे! आवडली! खयाल सर्व छान आहेत!
पण काही ठिकाणी अभिव्यक्ती अजून जोरकस होवू शकली असती.
खालील मुद्दे सुचवावेसे वाटतात............
१)मतला......सुंदर, पण अजून सुंदर करता आला असता.
२)जुनी पुरानी ऎवजी जुनी पुराणी असायला हवे.
३)बोचतो आणि टोचतो......हे शब्द अर्थाने जवळपास सारखेच आहेत.
४)मक्त्यातला नाहिद शब्द मिस-यातल्या चार मात्रा उगाचच खातो आहे असे वाटून गेले!
म्हणून आपली ही गझल मी अशी लिहून/वाचून पाहिली....................
सगळ्या जनावरांना निरखून पाहतो मी!
कळपात माणसांच्या माणूस शोधतो मी!!
नाते नवे असो वा अगदी जुनेपुराणे.........
होतात लाभ जेथे, तेथेच गुंततो मी!
विश्वासपात्र नाही माणूस कोणताही!
रखवालदार म्हणुनी श्वनास नेमतो मी!!
मी बोलतो खरे ते! परवा करीत नाही!
कोणास आवडे मी! कोणास डाचतो मी!!
सोप्या, सुरेख गझला लिहितो अशा कशा मी?
सुचते सहज मला ते.....शब्दात मांडतो मी!
प्रा.सतीश देवपूरकर
टीप: आपली प्रांजळ मते जरूर कळवावीत, वाचायला आवडतील!
.................................................................................................
निहादजी, गझल खुपच आवडली.
निहादजी, गझल खुपच आवडली. अतिशय छान आहे, तसेच देवपूरकरांनी दिलेल्या पर्यायी गझलेमधील बदल व खयाल हे देखिल एक compare म्हणून अभ्यासण्यासाठी महत्वपुर्ण आहे.
कळपात माणसांच्या, माणूस शोधतो
कळपात माणसांच्या, माणूस शोधतो मी>>>मस्त नाहिदभाई.....
म्हणतात लोक काही, लिहितोस छान 'नाहिद'>>>>> किती खरं बोलतात नै लोक हल्ली ???:)
_____________________
तसेच देवपूरकरांनी दिलेल्या पर्यायी गझलेमधील बदल व खयाल हे देखिल एक compare म्हणून अभ्यासण्यासाठी महत्वपुर्ण आहे.>>>>>ऑर्फीशी १००% सहमत !!
[अर्थात हा असला अभ्यास रिकामटेकडे लोक करतात (रिकामटेकडे : टाईमपास कसा करावा याचा विचार करण्यातच ज्यांचा टाईम पास होतो असे लोक .....माझ्यासारखे ..!!)..]
मी ही, "रात्रीस खेळ चाले, या
मी ही,
"रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा" वर गुणगुणून पाहिली, आवडली.. मतला फारच खास!