ताटव्यांमधे काट्यांच्या फुलण्याचे धाडस केले!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 June, 2012 - 03:49

गझल
ताटव्यांमधे काट्यांच्या फुलण्याचे धाडस केले!
मरणाशी मैत्री केली, जगण्याचे धाडस केले!!

तू काट कसेही आता नशिबाचे माझ्या पत्ते;
मी पान पान स्वप्नांचे पिसण्याचे धाडस केले!

मी असली सोने सुद्धा विकताना कचरत होतो;
लोकांनी माती सुद्धा विकण्याचे धाडस केले!

वाकून वसंतानेही, मज सलाम केला तेव्हा.....
कातळातही मी जेव्हा, रुजण्याचे धाडस केले!

माणसे कशाची तेथे श्वापदेच रहात होती;
त्या हिंस्र माणसांमध्ये रुळण्याचे धाडस केले!

अतिरेक जाहला होता, अतिरेक्यांचा त्या गावी;
भूसुरुंगातुनी सुद्धा फिरण्याचे धाडस केले!

मी काटकुळा अन् माझा प्रतिस्पर्धी राकट होता!
घेवून नाव देवाचे, भिडण्याचे धाडस केले!!

पारधी पंख छाटाया, तैनातच होते सारे!
मी मात्र उंच आकाशी उडण्याचे धाडस केले!!

ती बड्या बड्या धेंडांची बसलेली पंगत होती;
मन घुसमटले तेव्हा मी, उठण्याचे धाडस केले!

देहाने अपंग होतो, मन सशक्त होते माझे;
इतक्याच देणगीवरती, पळण्याचे धाडस केले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

मी काटकुळा अन् माझा प्रतिस्पर्धी राकट होता!>>>

माझ्यामते प्रतिस्पर्धी या शब्दातील 'ति' च्या मात्रा दोन होतात.

<<मी असली सोनेसुद्धा विकताना कचरत होतो;
लोकांनी मातीसुद्धा विकण्याचे धाडस केले!>>

शेर आवडला. सुद्धा, देखिल असे शब्द आधीच्या शब्दांना जोडून लिहिले जातात असे वाटते.

<<देहाने अपंग होतो, मन सशक्त होते माझे;
इतक्याच देणगीवरती, पळण्याचे धाडस केले!>>

छान!

<<माणसे कशाची तेथे श्वापदेच रहात होती;
>>

'राहत' असे लिहितात बहुधा. टायपो असावा.

बाकी गझल 'महाराष्ट्र टाईम्स'सारखी वाटली.

बाकी गझल 'महाराष्ट्र टाईम्स'सारखी वाटली.>>>>>>>>>>>>>>>
Rofl

गोटीबंदपणा जपता जपता गझलेच्या लेखनगर्भनिष्ठेची(????)............ मस्त वाट लावलीय .की ................;)

_________________

लेखनगर्भनिष्ठा = हे काय असतं?........मला विचारू नका प्लीज!!
हा शब्द देवसरांनी माझ्या एका रचनेवर प्रतिसादातून दिला होता त्यामुळे हा मी निर्माण केलेला नवा शब्द असूच शकत नाही
देवसरांनी तो कोणत्या डिक्शनरीतून उचललाय त्यांनाच ठावूक Uhoh

Light 1

________________

देहाने अपंग होतो, मन सशक्त होते माझे;
इतक्याच देणगीवरती, पळण्याचे धाडस केले!

हा शेर बेफीजीना आवडला म्हणून मलाही...............!!

बेफिकीरजी! आपल्या प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
आपण उपस्थित केलेल्या मुद्दयांवर माझी मते नम्रपणे नोंदवतो.............
१)“प्रतिस्पर्धी” शब्दात दोन शब्द आहेत....प्रति+स्पर्धी.
इथे शब्दाचा अर्थ आहे बरोबरी किंवा चढाओढ करणारा competitor.
इथे प्रति (संस्कृत शब्द) एक उपसर्ग आहे ज्याचा अर्थ आहे तुल्य वा समान वा प्रमाणे. प्रतिचा अर्थ जोडी वा बरोबरी असाही होतो.
प्रति उपसर्गात ति –हस्व आहे, ज्याची १च मात्रा मोजतात.
स्पर्धा म्हणजे चढाओढ किंवा ईर्षेने केलेली बरोबरी किंवा अहमहमिका.
स्पर्धक किंवा स्पर्धी म्हणजे ईर्षेने बरोबरी करणारा, चढाओढ करणारा, मत्सरी.

मराठीत अशी बरीच उदाहरणे आहेत, ज्यांत प्रति उपसर्ग असल्याने व ति
–हस्व असल्याने ति ची एकच मात्रा मोजतात.
उदाहरणार्थ.....प्रतिकृति, प्रतिक्रिया, प्रतिगृहीत, प्रतिग्रह, प्रतिच्छाया, प्रतिजिव्हा, प्रतिद्वंदी, प्रतिध्वनी, प्रतिप्रसव, प्रतिबद्ध, प्रतिवृत्त, प्रतिष्टंभ, प्रतिष्ठापना इत्यादी.

२)सोने / सुद्धा हे दोन शब्द, माझ्या माहितीप्रमाणे एकत्र लिहीत नाहीत, कारण सुद्धा वा देखिल हे काही प्रत्यय नव्हेत.

३)रहात होती / राहत होती......दोन्ही बरोबर, जसे पहात होती / पाहत होती दोन्ही बरोबर. तेव्हा रहात होती ही टायपिंग मिस्टेक नाही.

४)बाकी गझल “महाराष्ट्र टाईम्स” सारखी वाटली<<<<<<<<<<<<
भूषणराव! मी खरेच इतका हुशार/चाणाक्ष वा चतुर नाही हो! मला कुणी शालजोडीतील मारतो आहे, गुद्दा वा धपाटा मारतो आहे की, पाठ थोपटतो आहे हे कळतच नाही. कृपया आपण आपले प्रांजळ व परखड मत नि:संकोचपणे मांडा.

अवांतर:
१)परवाच्या नभी मेघ हिंडायचे..........गझलेवर आपण पाठवलेल्या भावमुद्रेचा अर्थ काय समजायचा?

२)कशाला छंदमुक्तांना........या तुमच्या गझलेवर मी काही शेर दिले होते. आपण काहीच बोलला नाहीत. नाराज आहात का आम्हा पामरांवर?

३)वर तिघांनी “गोटीबंद” इतकाच सार्वत्रिक प्रतिसाद दिला आहे. भूषणजी, एक स्नेही म्हणून विचारतो की, मी काय समजायचे?

४)निदान मायबोलीवर येवून मला असल्या अलंकारिक भाषेचा बोध झाला तरी मी धन्य होईल, तेवढाच माझा सामाजिक बुद्ध्यांक तरी वाढेल!

..........प्रा.सतीश देवपूरकर

ते एखाद्या शेराला पर्यायी शेर सुचवती
पण मी पर्यायी गझलच रचण्याचे धाडस केले.....

क्या ब्बात क्याब्बात क्याब्बात ! Lol

रचना आवडली... !

प्रोफेसर साहेब,

महाराष्ट्र टाईम्स किंवा कोणतेही वृत्तपत्र हे बातम्या देत असते. आपले बाकीचे शेर मला वृत्तांतकथन वाटले. त्यात गझलेची आकर्षकता, मुग्धता व खोल आशय जाणवला नाही. माझ्यामते असे शेर असलेल्या शेरांची उदाहरणे:

ताटव्यांमधे काट्यांच्या फुलण्याचे धाडस केले!
मरणाशी मैत्री केली, जगण्याचे धाडस केले!!

वाकून वसंतानेही, मज सलाम केला तेव्हा.....
कातळातही मी जेव्हा, रुजण्याचे धाडस केले!

माणसे कशाची तेथे श्वापदेच रहात होती;
त्या हिंस्र माणसांमध्ये रुळण्याचे धाडस केले!

अतिरेक जाहला होता, अतिरेक्यांचा त्या गावी;
भूसुरुंगातुनी सुद्धा फिरण्याचे धाडस केले!

मी काटकुळा अन् माझा प्रतिस्पर्धी राकट होता!
घेवून नाव देवाचे, भिडण्याचे धाडस केले!!

पारधी पंख छाटाया, तैनातच होते सारे!
मी मात्र उंच आकाशी उडण्याचे धाडस केले!!

एखादी विशिष्ट परिस्थिती होती आणि त्यातही मी असे असे करण्याचे धाडस केले यापेक्षा ते शेर काही म्हणताना मला तरी आढळले नाहीत. उदाहरणार्थ, मी कातळातही रुजल्यामुळे वसंताने सलाम केला. अशा शेरांमध्ये 'कॉन्ट्रास्ट' ही एकच व्हॅल्यू आढळते. विपरीत परिस्थितीतही मी असे असे केले यापुढे काही सांगितले जात नाही.

माझे एक सांगायचे राहिले ते म्हणजे 'मन घुसमटले तेव्हा मी, उठण्याचे धाडस केले' हा शेरही आवडला.

झालेली घटना सांगणे यापेक्षा अधिक काही गझलेच्या शेरात यायला हवे असे मला वाटते. शब्दसंपत्तीने शेर नटवता नक्कीच येतो, पण त्यात मुळात काही सबस्टन्स असावा लागतो.

=============

तुम्ही 'अवांतर' मध्ये जे विचारले आहेत, त्याचे उत्तर त्या त्या गझलेखाली लगेचच देतो

धन्यवाद

-'बेफिकीर'!

विजयराव! मी प्रति उपसर्ग असलेले बरेच शब्द दिले आहेत. आपण पाहिलेत का? बर ते राहू दे. गझलेवर आपण काहीच बोलला नाहीत. कृपया आपली परखड, प्रांजळ मते जरूर कळवा. मला ती मार्गदर्शक ठरतील.

टीप: ही गझल मी आज सकाळी लिहिली आहे. माझ्याजवळ एक जुना मतला पडून होता. परमेश्वरकृपेने मूड लागला आणि ही गझल रचना हातावेगळी झाली. आज महाविद्यालयाला सुट्टी होती व फुरसतही होती!

वर तिघांनी “गोटीबंद” इतकाच सार्वत्रिक प्रतिसाद दिला आहे. भूषणजी, एक स्नेही म्हणून विचारतो की, मी काय समजायचे?>>>

ज्या तिघांनी 'गोटीबंद' असा प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्यापैकी एकाने सोडून बाकीच्यांनी आजवर एकही गोटीबंद गझल केलेली मी पाहिलेली नाही. त्यामुळे त्यांना गोटीबंद गझल पाहायला मिळाली याचाच आनंद होतो असे दिसत आहे.

निदान मायबोलीवर येवून मला असल्या अलंकारिक भाषेचा बोध झाला तरी मी धन्य होईल, तेवढाच माझा सामाजिक बुद्ध्यांक तरी वाढेल!>>>

आता खरे सांगायचे तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की मी, डॉक्टर आणि कणखर यांचा एक कटू वागणारा कंपू आंतरजालावर मराठी गझलेच्या क्षेत्रात अती सामर्थ्यवान झाल्याचे काहींनी स्पष्ट बोलून दाखवले आहे. वास्तविक पाहता तसे काहीच नाही आहे. जो तो आपली वाट चालतोय. उलट आमच्यातच भांडणं होत असतात गझलेवरून.

अलंकारिक भाषा कुठेच वापरलेली नाही आहे. ती वापरणारे जे आहेत त्यांच्यात एकजूट नाही. जो तो स्वतःला जे हवे ते बोलून निघून जात आहे. आपण चिंता करू नयेत. आपले वय, अनुभव, गझल अभ्यास व सामाजिक स्थान यांच्याबाबतच्या आदराला कोणीही ढळवू शकत नाही.

-'बेफिकीर'!

प्रोफेसर, माझ्या माहीतीप्रमाणे आपण दिलेल्या शब्दांबद्दल खाली लिहीत आहे.

प्रतिकृति - ति लघु(१ मात्रा)
प्रतिक्रिया - ति लघु(१ मात्रा)
प्रतिगृहीत - ति लघु(१ मात्रा)
प्रतिग्रह - ति लघु(१ मात्रा)
प्रतिच्छाया - हा शब्द असाच असल्यास ति गुरू(२ मात्रा)
प्रतिजिव्हा - ति लघु(१ मात्रा)
प्रतिद्वंदी - द्वंद्व असा शब्द असावा, ति लघु(१ मात्रा)
प्रतिध्वनी - ति लघु(१ मात्रा)
प्रतिप्रसव - ति लघु(१ मात्रा)
प्रतिबद्ध - ति लघु(१ मात्रा)
प्रतिवृत्त - ति लघु(१ मात्रा)
प्रतिष्टंभ - ति गुरू(२ मात्रा)
प्रतिष्ठापना - ति गुरू(२ मात्रा)

आपल्याला माहीत आहेच की नंतरच्या जोडाक्षरातील अर्धे अक्षर आधीच्या लघु बरोबर उच्चारले जात असल्यास ती मात्रा गुरू मानतात.

धन्यवाद, Happy

प्रतिकृति - ति लघु(१ मात्रा)
प्रतिक्रिया - ति लघु(१ मात्रा)
प्रतिगृहीत - ति लघु(१ मात्रा)
प्रतिद्वंदी - द्वंद्व असा शब्द असावा, ति लघु(१ मात्रा)
प्रतिध्वनी - ति लघु(१ मात्रा)

<<<

या सर्व शब्दांमधील 'ति' गुरू होणार कणखर

प्रतिगृहीत हा शब्द कसा उच्चारला जातो ते माहीत नाही, इतर शब्दांबद्दल पुन्हा उच्चार करून पाहील्यानंतर सहमत आहे बेफि.

बेफिकीरजी! आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
माझे काही म्हणणे नम्रपणे नमूद करीत आहे.........
१)मला वाटते, आपण ही गझल फारच भरभर वा वरवर वाचलेली असावी. (कृपया स्पष्ट लिहिल्याबद्दल राग नसावा!)

२)गझलेचा रदीफ आहे “धाडस केले”. म्हणजे हिंमत केली, हिय्या केला किंवा साहस केले वा धिटाई दाखवली. आता धाडस/धिटाई/साहस/हिंमत वगैरे दाखवणे म्हणजे हरेकवेळी परिस्थिती बिकट/कठीण/आव्हानात्मक/प्रतिकूल अशी असायला हवी, तेव्हाच आपण धाडस केले असे म्हणू शकतो, नाही का?

३)आपण जर माझे सर्व शेर पाहिलेत तर, मी कशाचे धाडस केले व कोणत्या परिस्थितीत केले हे पहायला मिळेल. घेतलेल्या रदीफाची तीच मूळ मागणी होती.

४)वृत्तांतकथन वर मागे देखिल कोणत्या तरी धाग्यावर आपली चर्चा झाली होती. कोणत्या धाग्यावर व नेमकी कधी ते आठवत नाही. द्विरूक्तीचा दोष पत्करूनही मी थोडीशी या मुद्याची फोड करतो...........
प्रत्येक शेराचा स्वत:चा एक आशय असतो. शायराला तो कलात्मकरित्या मांडायचा असतो, ते सुद्धा गझलेच्या आकृतिबंधात राहून! आता आशयाला आपण वृत्त/ बातमी असे संबोधत असाल तर त्या आशयाच्या अभिव्यक्तीला ओघानेच वृत्तकथन/वृत्तांतकथन/बातम्या देणे वगैरे म्हणणे वरवर ठीक वाटते.

५)प्रत्येक शेरात काही न काही सांगितलेलेच असते. म्हणून काही तो शेर बातमीपत्र वा वृत्तांतकथन ठरत नाही.

६)गझलेतला कुठलाही शेर/द्विपदी ही काव्याच्या पातळीवर पोचायला हवी, कारण मूळत: तो शेर म्हणजे दोन ओळींची स्वयंपूर्ण कविता असायला हवी. आता अमुक कवीने अमुक कवितेत हाच आशय, हेच विधान, हेच वृत्त का कथिले? असे कसे म्हणता येईल?

७)शेराला काय फक्त शारिरीकच अर्थ असतो काय? लाक्षणीक व ध्वन्यार्थाचे काय? म्हणजेच अर्थांच्या बहुपदरीपणाचे/व्यामिश्रतेचे काय?

८)शेरातील शब्दयोजना, प्रतिके, प्रतिमा, विचारसौंदर्याचे काय?

९)शेराच्या शब्दिक अर्थाची लांबीच फक्त मोजायची काय?

१०)काट्यांचे ताटवे, फुलण्याचे धाडस, (साक्षात) मरणाशी मैत्री, नशिबाचे पत्ते काटणे, स्वप्नांचे पान अन् पान पिसणे, सोने सुद्धा विकायला एखाद्याने कचरणे, उलट माती देखिल कोणी धिटाईने विकणे, (खुद्द) वसंताने एखाद्याला वाकून सलाम करणे, (कोरड्या) कातळातही एखाद्याने रुजणे, हिंस्र माणसांमधेही एखाद्याने रुळणे, जागजागी मृत्यूचे सापळे (भूसुरुंग) असून सुद्धा एखाद्याने वावरणे वा फिरणे, देवावर श्रद्धा ठेवून (देवाचे नाव घेवून) एखाद्याने आपल्या कृशतेची तमा न बाळगता परिस्थितीला/ धटिंगणाला सामोरे जाणे वा भिडणे, पंखछाटू पारधी तैनात वा जागरूक असूनही आकाशात उंच उडू पहाणे, बड्या बड्या धेंडानाही न जुमानता त्यांच्या समोरून धिटाईने उठणे, शारिरीक अपंगत्व (हालाखीची प्रापंचिक स्थिती असून सुद्धा) असूनही मानसिक सशक्ततेला दैवी देणगी मानून जीवनात पुढे पुढे चालणेच नव्हे तर धावणे इत्यादी संकल्पना काय वृत्त वा बातम्या वाटतात काय? अशा वक्रोक्तीमधे वृत्तकथन कोणत्या वृत्तपत्रात असते? कोणत्या वाहिनीवर अशा बातम्या दिल्या जातात?

११)वेळे अभावी व जागे अभावी शेरांची फोड, त्यातील काव्य, प्रतिमांची व्यामिश्रता वगैरेंविषयी अजून काही लिहिणे टाळीत आहे. परत, असे करणे म्हणजे इथे काही जणांना गुन्हा केल्यासारखे वाटते. असो.

१२)आपली इच्छा असेल तर, आपण या माझ्या गझलेवर निवांत व सविस्तर बोलू, आपण म्हणाल तेव्हा व म्हणाल तेथे (अर्थातच दोघांच्या सोयीने).

१३)मला स्वत:ला सौंदर्य शास्त्रावर बोलायला वा चर्चा करायला आवडते.

१४)प्रत्येकाची एक तबीयत असते, जगण्याची शैली असते, मनाची एक बैठक असते, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन असतो, स्वत:चे असे जीवनविषयक तत्वज्ञान असते, प्रत्यय घेणयाची पद्धत असते, वाट्याला आलेले अनुभव असतात. या सर्व बाबींचा परिणाम त्याच्या लिखाणावर होत असतो. त्यावरच प्रत्येकाची लेखनशैली, शब्दकळा, प्रतिमासृष्टी वगैरे अवलंबून असतात! एरव्ही मानवी जीवनातील अनुभव हे थोड्याफार फरकाने सारखेच असतात. फक्त माणूस ते अनुभव कसे घेतो, त्यातून काय शिकतो या मुळेच प्रत्येकाचे लेखन हे वेगळे होते.

१५)शब्द तेच असतात, वापरणारा वेगळा असतो. लिहिणा-याचे व्यक्तित्व त्या शब्दांना चिकटते व म्हणूनच शेरांची उंची, खोली (लांबी नव्हे), आकर्षकता, मुग्धता वगैरे व्यक्तीगणीक बदलतात!

१६)कित्येक उर्दूतील मोठमोठ्या शायरांचे शेर आपण पाहिलेत तर त्यांच्यात सौंदर्याची विविधता दिसून येईल. कधी वैचारीक श्रीमंती दिसेल, कुठे भाषेची श्रीमंती दिसेल. कुठे शब्दांची लाघवी चमत्कृती नजरेत भरेल. काही काही शेरात तर आशय (वरवर) सामान्य वा थोडासाच असूनही मांडणी वा अभिव्यक्ती इतकी प्रभावी असते की, वाचकांचे डोळे दिपून जावेत.

१७)पण एक गोष्ट निश्चित की, या सर्व कामयाब शेरांत मुळात दर्जेदार काव्य असते. अन्यथा शेर वा गझल लिहिण्याची गरजच नाही. सरळ गद्याचा प्रपंच करावा.

१८)काही वेळा रदीफच असे असतात की, सर्व शेर एकाच विषयाभोवती घोंगावताना दिसतात. एका ठराविक मर्यादेच्या बाहेर ते जावूच शकत नाहीत. तरीही, उस्ताद शायर त्यांच्यातही करामत करतातच! असो.

१९)मी आपणास एक विनंती करू का? फक्त एक गंमत म्हणून, हाच रदीफ व हेच काफिये घेवून आपण गझल लिहाल का? कुठलीही ओळ तरही सारखी दिलेली नाही. आपण जी गझल लिहाल ती केवळ आपली आणि आपलीच असेल. काफियांवर वा रदीफांवर वा वृत्तांवर कुणाचीही मालकी नसते.
इथेच थांबतो. बाकी प्रत्यक्ष भेटीत खुलासेवार बोलू!

आपल्या गझलांचा चाहता,
..............प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

अवश्य लिहायला घेतो प्रोफेसर साहेब Happy

या जमीनीतील एक गझल मीही करतो Happy

अर्थातच, तुलना म्हणून नव्हे, तर मला माझ्या प्रतिसादात जे म्हणायचे होते ते अधिक स्पष्ट करता येईल की नाही हे बघण्यासाठी मी एक गझल करतो या जमीनीत

धन्यवाद

-'बेफिकीर'!

(तरहीप्रमाणेच करायची असल्याने कदाचित आजही होईल)

हेच काफिये म्हणजे आपण जे काफिये वापरले आहेत तेच काफिये का? की मी 'फुलण्याचे' च्या ठिकाणी (उदाहरणार्थ) 'जगण्याचे' असा काफिया असलेला शेर केला तरी चालेल?

(तेच काफिये वापरायचे असल्यास तसेही करून बघतो) Happy

बेफीजी मला हे अजिबात आवडलेलं नाही .....

अहो कुणाचं काय ऐकायचं हे तुम्हाला सांगायची आमच्यावर वेळ यावी .छे !! तुम्हाला कळायला पाहिजे

असो तुमची इच्छा !!

विठ्ठला काय चालवलंय्स तू हे ????? :राग:........(:()

बेफिकीरजी! आपल्यातल्या खिलाडू वृत्तीला व निरागसतेला माझे नम्र वंदन!
कुठलाही काफिया, कुठल्याही शेरात, कुठल्याही क्रमाने वापरला तरी चालेल! माझे सर्व काफिये वापरात आणावेत. मतला धरून एकंदर १० शेर होतात. असो.
मी वर १९ मुद्दे दिले होते. १९व्या मुद्दयाबाबत बोललात.
कृपया उरलेल्या
१८(१ ते १८) मुद्यांवर खुलासेवार लिहिलेत तर मला माझी मते पारखायला मदत होईल. जर माझ्या संकल्पनांबाबत वा धारणांबाबत काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करायला मदत होईल!
.........प्रा.सतीश देवपूरकर

वैवकु, सुसंबद्ध प्रतिसाद द्या की? या ओळींचा इथे काही संबंध नसावा माझ्यामते

=========

मी या गझलेवरचे दोन शेर केलेले आहेत, आता उरलेली गझल करत आहे

मी या गझलेवरचे दोन शेर केलेले आहेत, आता उरलेली गझल करत आहे>>>>>>>>>

बेफीजी आता माझा जो या पूर्वीचा प्रतिसाद वाचलात त्याच्या आधीचा वाचलात का ?
तो सुसम्बद्ध होता ...............

शामराव! नुसता एक शेर काय करता राव? पूर्ण गझल, हाच रदीफ व मी घेतलेले काफियेच वापरून कराल का? तुलनेसाठी नव्हे, फक्त आणि फक्त एक गंमत म्हणून. गझल तुमची आणि तुमचीच असेल, कारण काफियांवर, रदीफांवर वा वृत्तांवर कुणाचीही मालकी नसते.

वैवकु! आपणही एक गझल लिहाल का?
पूर्ण गझल, हाच रदीफ व मी घेतलेले काफियेच वापरून कराल का? तुलनेसाठी नव्हे, फक्त आणि फक्त एक गंमत म्हणून. गझल तुमची आणि तुमचीच असेल, कारण काफियांवर, रदीफांवर वा वृत्तांवर कुणाचीही मालकी नसते.

Pages