आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 June, 2012 - 10:38

गझल
आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट होते!
प्रेमात गुंतले की, जगणे पिसाट होते!!

घनदाट जंगलांनी, आम्हास हे शिकवले....
पाऊल टाकले की, पाऊलवाट होते!

असते किती जणांना, अवगत कला जिण्याची?
थोड्याच माणसांचे जगणे विराट होते!

होती उभी दुतर्फा, दु:खे दरीप्रमाणे;
सुखही समोर होते, तेही अचाट होते!

साक्षात सूर्य आला जन्मास माणसाच्या!
जातो जिथे जिथे तो, तेथे पहाट होते!!

कोड्यासमान माझे आयुष्य क्लिष्ट होते;
मोजून श्वास होते, गुंते अफाट होते!

जे काय खाचखळगे होते...मनात होते;
माझेच लक्ष नव्हते...रस्ते सपाट होते!

माझ्या घरीच केला मुक्काम पावसाने;
गावात फक्त माझे घरटे जुनाट होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट होते!
प्रेमात गुंतले की, जगणे पिसाट होते!!

सुरुवात तर सुंदर आहेच, त्यानंतर आलेल्या सर्वच ओळी छान आहेत Happy

गझल म्हणून या ओळी कशा आहेत माहीत नाही.. पण कविता म्हणून नक्कीच आवडल्या.. Happy

जे काय खाचखळगे होते...मनात होते;
माझेच लक्ष नव्हते...रस्ते सपाट होते!

अगदी खरे आहे...!

"गझल" मधल मला काहीच कळत नाही पण तुम्ही लिहीलेली प्रत्येक ओळ मनाला इतकी भावली की प्रतिसाद लिहील्या वाचून पुढे जाताच आले नाही........
खूप आवडली तुमची गझल Happy