असीरगढ अर्थात दख्खनचा दरवाजा

Submitted by सारन्ग on 12 June, 2012 - 22:14

पुणे ते पानिपत मोहिमेवर असताना असीरगढ बघायचा योग आला.
आपल्यासारख्या भटक्यांना बघण्यासारखा किल्ला आहे आणि पूर्ण भटकायचं म्हणालं तर २-३ दिवस कमी पडतील. आम्ही वेळेच्या अभावामुळे तासाभरात आटोपला त्याची काही प्रकाशचित्र टाकत आहे.

असीरगढ विषयी थोडेसे :
हा किल्ला बऱ्हाणपूर पासून २२.४ किमी वर आहे. खंडव्याच्या दक्षिणेला ४८ किमी वर आहे. बऱ्हाणपूर-खंडवा मार्गावर उजव्या बाजूला एक रस्ता फुटतो. गाडी अगदी वर पर्यंत जाते. रस्ता मात्र बऱ्यापैकी खराब आहे.
जमीनीपासूनची उंची : २५९.१ मी
हा “ दख्खनचा दरवाजा ” म्हणूनदेखील ओळखला जातो. किल्ल्यावरती जामा मशीद तसेच शंकराचे देऊळ आहे.
आशा अहिर नावाच्या जाटने किल्ला बांधल्यामुळे नाव असीरगढ पडले आहे असे म्हणतात.पूर्वी किल्ला ‘आशा अहिर गढ’ या नावाने ओळखला जायचा कालांतराने त्याचा असीरगढ असा अपभ्रंश झाला.
हा किल्ला सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसला आहे. बऱ्हाणपूरला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देण्यामागे या किल्याचे फार मोठे योगदान आहे. या किल्याची उंची समुद्रसपाटीपासून ७०१ मी आहे. हा किल्ला पूर्वी जंगली क्षेत्रामध्ये येत असे. आता तिथे काही जंगल नाहीये. किल्ल्यावर थोडीफार झाडी आहे. पाण्याची ३ मोठे तलाव आत मध्ये आहेत.हा किल्ला तीन भागांमध्ये विभागला जातो. १.असीरगढ २.कमरगढ ३. मलयगढ .याची पूर्व-पश्चिम लांबी ३३०० फुट असून उत्तर-दक्षिण रुंदी १८०० फुट आहे. किल्ल्याच्या तटांची उंची ८० ते १२० फुट आहे.
फिरोजशाह तुघलकाचा शिपाई मलिक ख़ाँचा मुलगा नसीर ख़ाँ फ़ारूक़ी याचा या किल्ल्यावर डोळा होता. तो बऱ्हाणपूरला आला. त्याने आशा अहिरची भेट घेतली व त्याला सांगितले कि "मेरे भाई और बलकाना के ज़मीदार मुझे पेरशान करते रहते हैं, एवं मेरी जान के दुश्मन बने हुए हैं। इसलिए आप मेरी सहायता करें और मेरे परिवार के लोगों को इस सुरक्षित स्थान पर रहने की अनुमति दें, तो कृपा होगी"
आशा अहिर उदार मनाचा होता त्याने नसीर ख़ाँ च्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याला किल्ल्यामध्ये राहायची परवानगी दिली. नसीर ख़ाँ नी पहिल्या काही डोल्यांमध्ये बायका मुलांना पाठवले आणि नंतरच्या डोल्यांमध्ये हत्यारधारी शिपाई पाठवले. आशा अहिर आणि त्याची मुलं त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. जसा डोल्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केला, शिपायांनी डोल्यांमधून अचानक बाहेर पडून बेसावध आशा अहिर आणि त्याच्या मुलांना ठार मारले. आणि अशा प्रकारे किल्ला नसीर ख़ाँ फ़ारूक़ीच्या अधिपत्याखाली आला. आदिलशाह फ़ारूक़ीच्या मृत्युनंतर बहादुरशहा फारुकी सत्तेवर आला.
अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशाहाला हि गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त यवढा होता कि किल्ला सर्व बाजूनी वेढला गेला तरी किल्ला १० वर्ष लढला असता. अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारूगोळ्याचा मारा सुरु केला. रात्रंदिवस तोफगोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबराने दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहाला आमंत्रण दिले. फारुकी बादशाहाने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तो तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याचवेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशाहावर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केले. अशा प्रकारे कुटनीतीने अकबराने फारुकी बादशाहाला कैद केले.
"यह तुमने मेरे साथ विश्वासघात किया" है। यावर अकबरने "राजनीति में सब कुछ जायज है।" असे उत्तर दिले. किल्लेदार आणि शिपायांना सोने-चांदी देऊन किल्ला काबीज केला. अशा प्रकारे १७ जानेवारी १६०१ ला अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला.
अकबराने बहादुरशहा फारुकीच्या मुलांना व बहादुरशहा फारुकीला बंदी बनवले. बहादुरशहा फारुकीला ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये तर त्याच्या मुलांना इतर वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये बंदी म्हणून ठेवले गेले. ज्या प्रकारे फारुकी बादशहाने कुटनीतीने किल्ल्यावर सत्ता स्थापन केली होती तशाच प्रकारे किल्ला त्याच्या हातामधून गेला. अशा प्रकारे मुघलांचे बऱ्हाणपूरवर आणि असीरगढवर साम्राज्य आले आणि फारुकी वंश नाश पावला. अकबर नंतर १७६० ते १८१९ पर्यंत किल्ला मराठ्यांच्या हातात होता. त्यानंतर किल्ला इंग्रजांकडे आला.
अभेद्य मानल्या जाणाऱ्या किल्ल्यांमध्ये याची गणना होते.
‘मदार दरवाजा’च्या समोर काळ्या दगडामध्ये अकबर, दानियाल, औरंगज़ेब आणि शाहजहाँचे चार फारसी भाषेमधील शिलालेख आढळतात. या शिलालेखांवर किल्ल्याच्या किल्लेद्वारांवर विजय प्राप्त करणाऱ्यांचे, सुभेदारांचे आणि इतर वर्णन आहे. शाहजहाँच्या शिलालेखावरून ज्ञात होते कि इथे काही वास्तू त्याने बनविल्या.
१५८० मध्ये राजा अली खानने (आदिलशहाने) किल्ल्यावर जामा मशीद बांधली. (याबद्दल देखील वाद आहेत.)
‘मदार दरवाजा’ राजगोपालदास या सुभेदाराने बनवला होता. आतमध्ये जाताच जमा मशिदीचे दोन मीनार स्पष्टपणे नजरेस पडतात. कोणेकाळी किल्ल्यावर शेती केली जात असे. हि मशीद पूर्णपणे काळ्या दगडांमध्ये बनवलेली आहे. हि मशीद फारुकी शासकांच्या वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हि मशिद बऱ्हाणपूरच्या जामा मशिदीच्या ५ वर्षे अगोदर बांधण्यात आली. हि मशिद ९३५ फुट लांब आणि ४० फुट रुंद आहे. ५० खांबांवर याचे छत तोलले गेले आहे. या मशिदीमध्ये एकाचवेळेस १२०० माणसे सहज नमाज पढू शकत होती. मशिदीच्या मध्यभागी अरबी भाषेमधला शिलालेख आहे ज्यामध्ये मशिदीचे निर्माण वर्ष ९९२ हिजरी असे अंकित आहे.

3DSCN1840.JPG3DSCN1843.JPG
‘मदार दरवाजा’
3DSCN1845.JPG3DSCN1847.JPG3DSCN1848.JPG3DSCN1850.JPG3DSCN1852.JPG3DSCN1854.JPG3DSCN1855.JPG3DSCN1859.JPG3DSCN1863.JPG3DSCN1866.JPG3DSCN1867.JPG3DSCN1868.JPG3DSCN1869.JPG3DSCN1872.JPG3DSCN1876.JPG3DSCN1877.JPG3DSCN1878.JPG3DSCN1879.JPG3DSCN1885.JPG3DSCN1888.JPG3DSCN1895.JPG

असा हा किल्ला नीट बघायचा म्हटल्यास कमीत कमी ३ दिवस हवेत.
परत असीरगढ बघायला चांगले ४-५ दिवस काढूनच यायचं, असे मनातल्या मनात ठरवत असीरगढ चा निरोप घेतला.

टीप: असीरगढ तसेच त्यावरील जामा मशिद यांच्या बांधकामाबाबत अनेक उलट-सुलट उल्लेख आढळतात. जाणकारांनी प्रकाश टाकावा. वरील सर्व माहिती किल्ल्यावरील फलक आणि आंतरजालावरून साभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तटबंदी सुस्थीती आहे आणि किल्ल्यात हिरवळ बरीच आहे. छान माहिती आणि सुंदर प्रचि.

दख्खनचे प्रवेशद्वार म्हणून देवगिरी (दौलताबाद)चा उल्लेख वाचला होता.

तटबंदी सुस्थीती आहे आणि किल्ल्यात हिरवळ बरीच आहे. छान माहिती आणि सुंदर प्रचि. >>>+१
स्वच्छताही दिसतेय. धन्यवाद Happy

बरेच बांधकाम शाबूत दिसते आहे एवढा जुना किल्ला असूनही.......

चांगली माहिती सांगितलीस, पण फोटो जरा अजून हवे होते - किल्ल्याचा एकंदर आवाका लक्षात येण्यासाठी.... तरीही जे इथे दिलेस त्याबद्दल शतशः आभारच......