Submitted by बेफ़िकीर on 25 April, 2012 - 06:07
खुरटलेल्या ऋतूंचे वेच तू प्राजक्त थोडेसे
सुगंधाच्या सयीने गाल कर आरक्त थोडेसे
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ आता फक्त थोडेसे
कशी बांधायची मोळी विखुरलेल्या विचारांची
इथे आसक्त थोडेसे तिथे आसक्त थोडेसे
क्षणापुरतेच गुंतवलेस तू डोळ्यांमधे डोळे
जुन्या आश्वासनांचे रंग झाले व्यक्त थोडेसे
कुठे अन्याय झाला की सलामी झोडतो आता
स्मरेना शेवटी केव्हा उसळले रक्त थोडेसे
समाधानी धुमार्यांची पिके घेणार आहे मी
मला देशील का अश्रू तुझे अव्यक्त थोडेसे
तुझीही वाहवा केली असा मी 'बेफिकिर' मित्रा
तुला बदनाम करती पण तुझे हे भक्त थोडेसे
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
भन्नाट... त्रिवार मुजरा
भन्नाट... त्रिवार मुजरा
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ आता फक्त थोडेसे..... वा वा
कुठे अन्याय झाला की सलामी झोडतो आता
स्मरेना शेवटी केव्हा उसळले रक्त थोडेसे..... व्वा
तुझीही वाहवा केली असा मी 'बेफिकिर' मित्रा
तुला बदनाम करती पण तुझे हे भक्त थोडेसे.... क्या बात है!!
मस्त गझल.
मस्त गझल....
मस्त गझल....
गझल आवडली. फक्त मतला जरा
गझल आवडली. फक्त मतला जरा उलगडून सांगाल का?
सयीने म्हणजे आठवणीने असा अर्थ लावायचा का?
प्राजक्त थोडेसे....म्हणजे थोडी प्राजक्ताची झाडे....असे म्हणायचे का?
वेचतात ती साधारणपणे प्राजक्ताची फुले.....
प्राजक्त वेच.......जरा खटकले.
“खुरटलेल्या ऋतूंचे प्राजक्त".....जे वेचायचे.....पूर्ण बोध होत नाही.
सुगंधाच्या नुसत्या आठवणीने तुझ्या गालावर लालिमा येवू दे वा गाल आरक्त होवू दे ......असा अर्थ दुस-या ओळीचा काढायचा का? कृपया खुलासा कराल का?
हेच काफिये घेवून असा मतला लिहिला तर तो कसा वाटेल?
“तुझ्या परसामधे उरले जरी प्राजक्त थोडेसे;
नसे हेही कमी, तू हो जरा आरक्त थोडेसे!”
.........................................................................................................
“कशी बांधायची मोळी विखुरलेल्या विचारांची
इथे आसक्त थोडेसे तिथे आसक्त थोडेसे”
इथे पहिली ओळ सुंदर आहे. “विचारांची मोळी” कल्पना हृद्य आहे.
पण दुसरी ओळ खटकते. दोन्ही ओळी एकजीव नाही वाटत.
इथे थोडेसे आसक्त विचार... तिथे थोडेसे आसक्त विचार.... नाही पटत बुवा!
आसक्त विचार ही कल्पना नाही भावली.
शिवाय हे विखुरलेले विचार तुमचे म्हणायचे की वेगवेगळ्या माणसांचे म्हणून विखुरलेले म्हणायचे?
तुमचे विचार इथल्या माणसांत थोडे आसक्त आणि तिथल्या माणसांत थोडे आसक्त.... असे आहे का?
आसक्त शब्द मन अडकणे अशा अर्थाने बहुधा येतो.
मनात विचार उत्पन्न होतात व मन आसक्त होते, म्हणून विचार आसक्त असे म्हणायचे का?
असे लिहिले तर कसे वाटेल?
“कशी बांधायची मोळी विविधरंगी कवींची या?
अनासक्ती कुणामध्ये, कुणी आसक्त थोडेसे!”
बाकीचे शेर सुंदर व सुबक आहेत!
................प्रा. सतीश देवपूरकर
सतीशजी : माझ्यावर आपण
सतीशजी : माझ्यावर आपण रागावणार हे माहीत आहे तरीही.........मनापासून सान्गूका?
प्लीज गम्भिर्याने विचार करा!!
एखद-दुसरा शेर पर्यायी असू शकतो ; पण आपण बर्याचदा (म्हण्जे इथे नाही......पण बर्याचदा ) अख्खी गझल पर्यायी करता ......... मूळ रचनाकाराच्या इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी वर अधिकार सान्गितल्यासारखेच आहे ते...........................
तुझे ते शेर पर्यायी भ्रमान्चे दाखले देती
तयान्च्या सावलीतुन होच मित्रा मुक्त थोडेसे
आपला वरील प्रतिसाद मलातरी अज्जिबात पटला नाही
सुरेख गझल.
सुरेख गझल.
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ आता फक्त थोडेसे >>> क्या बात!
क्षणापुरतेच गुंतवलेस तू डोळ्यांमधे डोळे
जुन्या आश्वासनांचे रंग झाले व्यक्त थोडेसे >>> ओहोहो! खास बेफि टच!
खूप आवडेश!
अवांतर :
( कधी नव्हे ते!) वैवकुंना अनुमोदन !
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ आता फक्त थोडेसे
समाधानी धुमार्यांची पिके घेणार आहे मी
मला देशील का अश्रू तुझे अव्यक्त थोडेसे >>>> वाह! खासच!
वैवकु, मला गझलेतलं काही कळत
वैवकु,
मला गझलेतलं काही कळत नाही. ती एक काव्य व्यक्त करणारी कलाकृती आहे एव्हढं मात्र मी सांगू शकतो (काय अगाध ज्ञान आहे बघा तरी! :फिदी:).
बेफिकीरांना त्यांच्या स्वत:च्या तर्हेने व्यक्त व्हावेसे वाटते. तर प्रा. सतीश यांना त्या व्यक्तीकरणाची चिकित्सा करून त्यात बदल करावासा वाटतो. यात कवीच्या बौद्धिक अधिकारांवर अतिक्रमण झालेले वाटत नाही. किंबहुना अशी चिकित्सा (चिरफाड म्हणा हवं तर! ;-)) करावीशी वाटणे यातच मूळ रचनेचे यश दडलेले आहे (असे मला वाटते).
साधारण असाच विचार बेफिकीरांच्या एका कथेबाबत मांडला आहे.
कथेबाबत म्हणता येईल की लेखक पात्रयोजना करतो, तर वाचक पात्रचिकित्सा करतो. दोघांची क्षेत्रे वेगळी आहेत. तसंच काहीसं गझलेबाबत म्हणता येईल का? गझल म्हणजे नक्की काय? तिचं मूळ स्वरूप कोणतं? कवीच्या मनातलं की रसिकाला जाणवतं ते? की आजून काही? की गझलेचा फार मोठा भाग (=खयाल?) अव्यक्त असतो? की हा अव्यक्त रस रसिकांना प्राशन करता यावा म्हणून लालित्यपूर्ण शब्दांचा योजलेला नक्षीदार प्याला म्हणजे गझल?
विठ्ठलाचं कीर्तन वा नामस्मरण करतांना ही अडचण येत नाही. देवाचं नाम वा कथा देवाहून वेगळ्या नाहीत. मात्र मायेतल्या कालाकृतींबद्दल मूळ स्वरूपाचा प्रश्न उभा राहतो. तुम्हाला देवाचं अंग आहे म्हणून हा प्रश्न विचारला.
आ.न.,
-गा.पै.
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ आता फक्त थोडेसे
>> व्वा !
व्वाह बेफी..... !!! मस्तच.
व्वाह बेफी..... !!! मस्तच.
संपूर्ण गझल आवडली.
संपूर्ण गझल आवडली.
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ आता फक्त थोडेसे
कशी बांधायची मोळी विखुरलेल्या विचारांची
इथे आसक्त थोडेसे तिथे आसक्त थोडेसे
क्षणापुरतेच गुंतवलेस तू डोळ्यांमधे डोळे
जुन्या आश्वासनांचे रंग झाले व्यक्त थोडेसे
हे तीन फार आवडले!
इथे आसक्त थोडेसे तिथे आसक्त थोडेसे मिसरा खास!
कशी बांधायची मोळी विखुरलेल्या
कशी बांधायची मोळी विखुरलेल्या विचारांची
इथे आसक्त थोडेसे तिथे आसक्त थोडेसे......... व्वाह... हा शेरसुद्धा खासच. आधी वाचताना लक्षात आले नव्हते.
गा. पै . : बेफिकीरांना
गा. पै . :
बेफिकीरांना त्यांच्या स्वत:च्या तर्हेने व्यक्त व्हावेसे वाटते. तर तसे होवु दिले पाहिजे ...........
प्रा. सतीश यांना त्या व्यक्तीकरणाची चिकित्सा करून त्यात बदल करावासा वाटतो.तर तसा करू दिला पाहिजे.......
(पण यात कवीच्या बौद्धिक अधिकारांवर अतिक्रमण झालेले मला तरी क्लीअर दिसते. )
किंबहुना अशी चिकित्सा (चिरफाड म्हणा हवं तर! डोळा मारा) करावीशी वाटणे यात मलातरी त्या प्रतिसादकाचा फुशारकी मारण्याचा हेतू स्पष्ट जाणवतो (असे मला वाटते).
मुद्दा खयालाचाच आहे. कवाफी (अलामतीसह) / रदीफ /वृत्त /जमीन या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा घेवून तरही करतातच की लोक
पण खायालही उचलायचे म्हणजे त्या "पर्यायी गझलकारा"चे स्वताचे असे काय आहे त्यात .....अभिव्यक्ती म्हणाल तर ज्याची त्याची एक स्वतःची पद्धत असते ती असू द्यावी "तिला बदला" असे आपण का म्हणायचे?
इस्लाह म्हणाल तर तो मागितल्या शिवाय दिला जात नाही कधी ................ म्हणजे मोठे शायर तसा देत नाहीत पण स्वतःला मोठा शायर म्हणवणारे शायर देत असावेत बहुधा !!(.......ऐकीव माहिती....... )
व्यक्तीकरणाची चिकित्सा: एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तीकरणाची नेमकी चिकित्सा करायला स्वतःचा जन्म पुरत नाही. इतराना एक शेर कितीसा पुरणार मग ..........
गझलेच मूळ स्वरूप कोणतं : अर्थातच त्या त्या गाझालेपुरतं त्या त्या गझल कारानं ती करताकरता जे सर्वात आधी पाहिलेलं असतं ते.......... इतरजण त्यांच्या सौंदर्य-बोधाच्या कुवतीनुसार ते स्वतःच्या नजरेनं पाहतात ते नंतर पाहीलं गेलेलं..... ते मूळ रूप नाही होवू शकत .
असो :
मला कथेतलं काही कळत नाही. ती एक गोष्ट व्यक्त करणारी कलाकृती आहे एव्हढं मात्र मी सांगू शकतो (काय अगाध ज्ञान आहे बघा तरी! ).
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ आता फक्त थोडेसे
.
कुठे अन्याय झाला की सलामी झोडतो आता
स्मरेना शेवटी केव्हा उसळले रक्त थोडेसे
हे दोन फारच प्रभावी झालेत.
समाधानी धुमार्यांची पिके
समाधानी धुमार्यांची पिके घेणार आहे मी
मला देशील का अश्रू तुझे अव्यक्त थोडेसे >>>> भारीच !!
तुझीही वाहवा केली असा मी 'बेफिकिर' मित्रा
तुला बदनाम करती पण तुझे हे भक्त थोडेसे >>>>>
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ आता फक्त थोडेसे>>>>>>> तत्वज्ञानाचा दैवी स्पर्श .... आस्वादाचा दैवी हर्ष देणारा शेर .
अख्खी गझलच अप्रतिम ...
वैवकु, >> गझलेच मूळ स्वरूप
वैवकु,
>> गझलेच मूळ स्वरूप कोणतं : अर्थातच त्या त्या गाझालेपुरतं त्या त्या गझल कारानं ती करताकरता जे
>> सर्वात आधी पाहिलेलं असतं ते..........
यासंबंधी एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. बेफिकीरांना स्वत:चे बरेचसे लेखन (गझलेसकट) नावडू लागल्याचे लिहिले आहे. तसं असेल तर मग बेफिकीर गझल शब्दात व्यक्त का करतात? नवी गझल पाहताक्षणी त्यांना नावाडलेली असते. मग शब्दबद्ध करायचीच कशाला? रसिकांसाठी...?
आपला काय अंदाज आहे?
आ.न.,
-गा.पै.
वैभवजी! तुमच्या, माझ्या
वैभवजी! तुमच्या, माझ्या प्रतिसादांवरील “निर्भय”(?) प्रतिक्रिया वाचल्या. अशा सूचनात्मक दबावाला मी कधीच जुमानत नाही.
आपण (त्यात मी सुद्धा आलो) जेव्हा आपली एखादी रचना (गझल, कविता इत्यादी) मायबोली किंवा कोणत्याही साईटवर पोस्ट करतो तेव्हा ती रचना प्रसिद्ध/प्रकाशित झाली असे समजतात. ती तुमचीच रचना म्हणून राहते. मग त्यावर कोणत्याही प्रतिक्रिया आल्या तर त्या सोसण्याची मानसिक तयारी कवीची असावी. अन्यथा ती बौद्धीक मालमत्ता आपल्या कस्टडीत सेफ(वहीतच) घरात ठेवावी! असो.
आता प्रतिक्रिया कशी द्यावी हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा व कुवतीचा प्रश्न आहे. “छान छान” “वा! वा!”, “वाहवा”, “आवडली”, “नाही बुवा आवडली” अशाच प्रतिक्रिया प्रत्येकजण देईलच असे नाही. प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक रचनेला स्तुतीस, प्रशंसेस, टीकेस सामोरे जावेच लागते.
आता मी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल...............
वेळेअभावी व कार्यबाहुल्यामुळे मी प्रत्येकाच्या गझलेवर प्रतिक्रिया देवू शकत नाही, याचे मला मनापासून वाईट वाटते. मुळात ज्या रचनेत मला “दम” आहे असे वाटते तीच रचना मी प्रतिक्रियेसाठी निवडतो. त्या गझलेचा मी सखोल अभ्यास करतो, चिंतन करतो. गझलेच्या तंत्रावर मी फारसे भाष्य करत नाही. शुद्धलेखनाच्या चुका मात्र निदर्शनास आणून देतो. मी शेरांचा आत्मा बघतो. मूळ कवीशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करतो. त्याला सुचलेले (हृदयातले) मूळ काव्य, त्याच्या भावना, त्याच्या मनातील तगमग इत्यादी गोष्टी मला जाणवू लागतात. मूळ कल्पनाविलास सुंदर, चांगला पण केवळ अभिव्यक्तीत कमी पडल्यामुळे हृदयातले मूळ सुंदर काव्य हृदयातच राहते, ते गझलेत पूर्णपणे उतरत नाही. असे जेव्हा मी पाहतो, तेव्हा माझा जीव तुटतो व मी पर्यायी शेर देत असतो!
इथे कुणाच्या बौद्धीक संपदेवर हक्क सांगण्याचा किंवा स्वत:ची फुशारकी मिरवण्याचा किंवा मूळ कवीशी तुलना करण्याचा प्रश्नच नाही. पर्यायी शेर हे मी केवळ मूळ कवीच्या समोर ठेवतो. चिंतनासाठी. ते आवडायलाच हवेत, पटायलाच हवेत, स्वीकारायलाच हवेत असा माझा हट्ट कधीच नसतो. ती रचना मूळ कवीच्याच नावावर राहते. हे पर्यायी शेर मी माझ्या नावावर कधीच खपवत नाही. सुदैवाने इतके कल्पनादारिद्र्य माझ्याकडे नाही! माझा तो स्वभावही नाही!
जेव्हा आपण (म्हणजे मी सुद्धा) एखादा रदीफ, काफिया व जमीन निश्चित करून मतला लिहितो , तेव्हा तो रदीफ, ते काफिये आपल्याला किमान ५ शेरांत तरी पेलता आलेच पाहिजेत. काही काही वेळा रदीफ पेलता न आल्यामुळे तो नुसताच शेपटासारखा पुढील शेरांत फरफटत येत राहतो. शेराचे कामयाबपण म्हणजे, नुसता तोच शेर वाचला तरीही अर्थबोध व्हायला हवा व तो एक शेर म्हणजे स्वयंपूर्ण कविता व्हायला हवी, ज्यात नाट्य, चमत्कृती, कडेलोट, सौंदर्य, नादमधुर शब्दकळा, प्रासादिकता इत्यादी गुणविशेष हे आपोआप आलेले असतात. कुठेही खोगीरभरतीचा एकही शब्द नसतो. प्रत्येक शब्द अनिवार्यपणे आलेला असतो. त्याची जागाही निश्चित असते. त्या शेरास अर्थांचे अनेक पदर असतात, जे शेराचे चिंतन केल्यावर उलगडतात! म्हणूनच कामयाब शेर आपला पिच्छा पुरवतो, परत परत गुणगुणायला लावतो, कारण त्यात असते अर्थांची व्यामिश्रता! कामयाब शेर हा कालातीत असतो. एखाद्या वयोगटातल्या कवीसच तो शोभतो असे नाही.
आता हे सर्व मला प्रत्येक वेळेस जमतेच असा दावा मी कधीच करत नाही, पण त्या दिशेने माझी धडपड मात्र चालू असते! त्यासाठी कितीही थांबायची, कुणाचीही मदत घ्यायची, अहंकार बाजूला ठेवण्याची, डोळे, कान व मन उघडे ठेवण्याची तयारी मात्र करावी लागते. असो.
व्यक्तीश: मी जर माझ्या गझलेवर कुणी पर्यायी शेर लिहिले तर त्याचे स्वागतच करीन. ते शेर आवडले तर मानाचा मुजरा करेन, त्या प्रतिसाद देणा-याला! मला माझ्या बौद्धीक मालमत्तेवर कुणी कब्जा करत आहे असे मुळीच वाटणार नाही! पर्यायी शेरात मूळ शेराचा अर्थ असेल किंवा नसेलही! पण काफिया, रदीफ व वृत्त मात्र तेच असेल. माझ्या मते पर्यायी शेर देणे म्हणजे मूळ कवीच्या गझलेच्या अंतरंगावर केलेले एक परिक्षण आहे. हाडाचा गझलकार/कवी/कलाकार जे जे सुंदर आहे त्याचा आस्वाद घ्यायला कधीच घाबरत नाही. कलेमधे तो अहंकार/हेका कधीच आणत नाही.
माझी अशी धारणा आहे की, समस्त गझलकार हे गझलपंढरीचे वारकरी आहेत. प्रत्येक गझल लिहिणे म्हणजे एक गझलपंढरीची वारीच आहे! वारक-यांत कसली आली स्पर्धा? कसला आला द्वेष, कसली आली चुरस?
गझल हा एक काव्याचा सुंदर व सशक्त आकृतीबंध आहे. गझल हे एक फक्त माध्यम आहे, त्या अंतीम सत्याचा वेध घेण्याचे! अंतीम सत्य हे सोपे व सुटसुटीत असते, व सोपे लिहिणे हेच खूप अवघड असते. मायबोलीच्या साईटवर गझलेवर अशी सशक्त व प्रांजळ चर्चा व्हावी व माझ्यासारख्या गझल शिकणा-याला त्याची गझलभक्ती करायला उपयोग व्हावा, त्याची रचना अधिक समृद्ध व्हावी, सत्याच्या म्हणजेच त्या परमात्म्याच्या जवळ जायला मदत व्हावी हीच माझी कळकळ आहे.
माझ्या प्रतिसाद पद्धतीचे प्रदीर्घ स्पष्टीकरण मी इथे केले आहे. माझे काही चुकले का? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. शेवटी माझा एकच शेर लिहितो व माझे हे पाल्हाळ संपवतो!
“रक्ताचे पाणी केल्यावर मला समजले.........
रक्ताला पाण्याइतकीही किंमत नाही!”
..................प्रा. सतीश देवपूरकर
..
..
सुंदर गझल!
सुंदर गझल!
खूप छान गझल! कशी बांधायची
खूप छान गझल!
कशी बांधायची मोळी विखुरलेल्या विचारांची
इथे आसक्त थोडेसे तिथे आसक्त थोडेसे..............हे म्हणजे भारीच!
प्राध्यापक महाशयांना उगाच प्रतिसाद दिलास.
सतीशजी :(म्हणजे मी
सतीशजी :(म्हणजे मी सुद्धा)>>>>> मात्र एवढेच वाक्य सूचनात्मक दबावाला जुमानत गेल्याचा फील देते !!
बाकी प्रतिसाद वाचता-वाचताच आपले प्रामाणिक व व्यक्तिगत मनोगत उमगत गेले.........पण ते मान्य कारावे असे फक्त .<<<<<<,माझी अशी धारणा आहे की, समस्त गझलकार हे गझलपंढरीचे वारकरी आहेत. प्रत्येक गझल लिहिणे म्हणजे एक गझलपंढरीची वारीच आहे! >>>>>>>. यावरून वाट्ले
बाकी काहीका खरे असेना हे मात्र खरे आहे !!!
गा. पै.: गझलकार शेवटी गझल शब्दातच करतो कारण त्याच्या रक्तात वाहणारी ही चीज ("गोष्ट") व्यक्त करण्यासाठी आपले रक्त सान्डणे हे किती अव्यवहारी आहे हे त्यास माहीत असते.................
नावडलेली असते. मग शब्दबद्ध करायचीच कशाला : हो..... हीच वैफल्याची भावना प्रा. साहेबानी मस्त व्यक्त केलीय बघा......
रक्ताचे पाणी केल्यावर मला समजले.........
रक्ताला पाण्याइतकीही किंमत नाही!”>>>>>( वा याला म्हणतात ओरिजनल शेर )
पण वैफल्य येते ........ कर्म करूच नये असे नाही ना !! मग............??
थोरपण पऱ्हांचि सांडिजे,
थोरपण पऱ्हांचि सांडिजे, व्युत्पत्ति आघवी विसरिजे, जैं जगा धाकुटें होईजे, तैं जवळीक माझी.
येर प्राकृत हेंदरे, केविं
येर प्राकृत हेंदरे, केविं जाणोंलाहे.
यालागीं शरीरसांडोवा कीजे, सकळगुणांचें लोण उतरिजे, संपत्तिमदु सांडिजे, कुरवंडी करुनी.
धन्यवाद सर्व वाचक रसिकांच्या
धन्यवाद सर्व वाचक रसिकांच्या प्रतिसादांसाठी
अरेच्चा ! ही कशी सुटली
अरेच्चा ! ही कशी सुटली वाचनातून?
मक्ता वगळता सगळीच्या सगळी अफलातून.
-सुप्रिया.
धन्यवाद!
धन्यवाद!