जिंदगी

Submitted by मिल्या on 8 September, 2008 - 06:48

जशी जिंदगी ढळू लागली
काळसावली छळू लागली

कुपोषणाची कीड पसरता
नवी पालवी गळू लागली

शांति-ज्योत ही पेटविल्यावर
शांतता होरपळू लागली

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली

कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली

जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली

गंध तिचा वाऱ्यावर फिरला
कळी कळी दरवळू लागली

अशी जन्मभर तेवलीस की
ज्योत उराशी जळू लागली

पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली

गुलमोहर: 

>>दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली

कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली

अशी जन्मभर तेवलीस की
ज्योत उराशी जळू लागली

पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली

व्वाह! खूप छान..

>>गंध तिचा वाऱ्यावर फिरला
कळी कळी दरवळू लागली

वाह मिल्या !! सुरेख.

धन्यवाद चिन्नू, नकुल

    ================
    गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!

      दुनियेची बस तुडुंब भरली
      जिंदगी लोंबकळू लागली>>
      मस्त!! लोंबकळताना अडखळायला होते आहे थोडे!!

      जरी आंधळा तरी जगाची
      नेत्रपल्लवी कळू लागली

      पाय रोवुनी उभी रोपटी
      वादळेच उन्मळू लागली -- हे ही चांगले आले आहेत!!

      धन्यवाद नचिकेत...

      लोंबकळताना अडखळायला होत आहे हे एकदम मान्य.. पण त्यामुळे ते लोंबकळणे अजून अधोरेखित (किंवा दृष्य) होते आहे कारण आपण तिथे वाचता वाचता ही लोंबकळतो Happy

      म्हणून मग तसेच ठेवले...

      होरपळू ला जो यतीभंग होतेय तिथे काही वेगळे लिहिता येईल का ह्याचा विचार करतोय...

      शांति-ज्योत का तुम्ही लावली
      बघा शांतता जळू लागली असे काहीसे.. पण होरपळू ची मजा इथे जळू ला येत नाही हे माझे मत

      तुला काय वाटते जरूर कळव...

        ================
        गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!

          शाब्बास मिल्या... एकदम झ्याक...

          गझल जराशी कळू लागली... Happy

          धन्यवाद सत्या...

            ================
            गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!

              छानय मिल्या, आवडली. मतला, मक्ता सुरेख. कळीचा शेर अगदी आवडला.

              वाह!
              पाय रोवुनी उभी रोपटी
              वादळेच उन्मळू लागली >>> खूपच आवडले!

              _________________________
              -A hand that erases past can create a new begining.
              _________________________
              -A hand that erases past can create a new begining.

              जरी आंधळा तरी जगाची
              नेत्रपल्लवी कळू लागली

              क्या बात है !

              क्या बात है मिल्या......:)