गंध गावाकडला...

Submitted by किरू on 11 March, 2012 - 23:54

'कोकण' हा शब्द उच्चारल्याबरोब्बर लगेच डोळ्यासमोर उभं राहतं ते देवाने मुक्त हस्ताने उधळलेलं अलौकिक वैभव. देवाने सृष्टी बनवली पण कोकण मात्र त्याने अगदी वेळ काढून आणि मन लावून बनवलं.
आकाशाला भिडणारे माड,पोफळी, निर्मनूष्य आणि म्हणूनच अप्रतिम असे समुद्र किनारे, दोन्ही बाजूने हिरवेगार असलेले लाल मातीचे रस्ते, कौलारू घरं, घरासमोर हटकून दिसणारं तुळशी वृंदावन, साधेपणा जपणारी, मनांतला भक्तीभाव जागृत करणारी देवळं.., तोच साधेपणा मनांत जपणारी माणसं आणि आपुलकी काठोकाठ भरून राहीलेली मालवणी भाषा.
माझ्याकरता सर्वात आनंदाचा क्षण कुठला माहित्येय? ज्याक्षणी माझा कोकणांत जाण्याचा विचार ठरतो तो क्षण.
प्रवासाला निघाल्यापासून तिथून परत निघेपर्यंत मी एका वेगळ्याच धुंदीत असतो. देवाच्या कृपेने माझं आजोळही तिथलच.
यावर्षी फेब्रुवारीत जायचं नक्की केलं. महाशिवरात्रीला दाणोलीला (सावंतवाडी - आंबोली) साटम महाराजांच्या मठात जायचं आणि समार्थांच्या पालखी दर्शनाचा योग साधायचा असं मनांत आलं. मग लगेच प्लॅन तयार झाला.
१८ फेब्रुवारीला निघायचं ठरलं. तस ठरवण्याकरता माझ्याबरोबर इतर कोणी नव्हतच. माझ्याच मनाचा कौल घ्यायचा होता आणि बाईकने एकटाच जाणार म्हटल्यावर घरच्यांचा.
कसंबसं घरच्या मंडळींना राजी केलं. एकटाच बाईकने जातोय म्हटल्यावर अनेकांनी मला वेड्यात काढलं. पण मला हा वेडेपणा करायला लावणार्‍या बर्‍याच गोष्टी को़कणातच आहेत हे त्यांना काय माहीत?
१८ तारखेला, शनिवारी सकाळी ६:३० वाजता अस्मादिक बाईकरूढ झाले.

झाडांमध्ये लपलेला दभोलीमधला (कुडाळ - वेंगुर्ला) पूर्णानंद स्वामींचा मठ

मठाच्या बाजूचा परिसर

सावंतवाडीचं विट्ठल मंदीर

सावंतवाडीमधल्या प्रसिद्ध तळ्याचं रात्रीचं दृष्य

वाडीहून कुडाळला जाताना

मालवण

मालवणचं प्रसिद्ध भद्रकाली मंदीर.. (रेवंडी)

मंदीराबाजूचा परिसर

आंगणेवाडीच्या वाटेवर... जंगलातून जाणारे हे घाटरस्ते वेड लावतात.

गवत उंच दाट दाट, वळत जाय पायवाट, वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे...

१८०० कि.मी. च्या प्रवासात साथ देणारी माझी Thunder Bird

माळरानावरून जाता जाता मध्येच होणारं चकाकतं सागर दर्शन

भर दुपारी मालवणला बहिणीकडे पोचलो. प्रचंड भूक लागली होती. पोचल्यावर लगेच हात पाय धुवून पानावर बसलो. तर हे असं स्वागत झालं. अगदी 'सागर'संगीत जेवण झालं. Happy

माडांच्या गर्दीत आणि कर्ली नदीच्या कुशीत असलेल्या परूळ्याच्या वाटेवर...

कोण पाहूणा आलाय असं म्हणत झाडांतून हळूच डोकावणारी कौलारू घरं..

परुळे गावातली दुतोंड वाडी हे माझं आजोळ. नितांत सुंदर असा निसर्ग लाभलेल्या गावातलं हे पुरुषोत्तमाचं देखणं देऊळ

घरी नेणारा लाल मातीचा नागमोडी रस्ता

भोगव्याचा किनारा..

हे सगळं अनुभवताना मनाला तृप्तता अशी येतच नाही. अजुन फिरायचय.. अजुन पहायचय असं सतत वाटत राहतं.
कर्लीच्या पुलावरून पाहिलेला अविस्मरणीय सूर्यास्त, पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात घाटी चढून जाताना चंद्राच्या नीतळ प्रकाशात न्हाऊन निघालेला खालचा परिसर.. नदी आणि त्याही पलीकडे असलेला तो चमचमणारा चंदेरी समुद्र. अंधार पडल्यावर माझा मामेभाऊ, दीपक आणि शेजारचा गुरू यांच्याबरोबर जाऊन नदीवर पकडलेल्या कुर्ल्या, गार गार वारा अंगावर घेत, नदीवरच्या छोट्याशा पूलावर पहुडताना पाहिलेल्या असंख्य चमचमत्या चांदण्या, त्याचवेळेस त्या शांततेला चिरणारा, लांबवरून येणारा एखाद्या टिटवीचा आवाज, चुलीवरच्या जेवणाचा घमघमाट, रानातला सुगंध, काजी भाजतानाचा खरपूस वास, तेवणार्‍या एखाद्याच समईच्या प्रकाशाने आणि उदबत्तीच्या धुराने भारलेला देवळाचा अंधारा गाभारा, भर दुपारी पोफळीच्या बागेत शिरून अनुभवलेला तो थंडावा. रात्री एक, दीडच्या सुमारास आंबोलीच्या जंगलातून निर्मनुष्य रस्त्यावरून खाली सावंतवाडीत उतरताना आंत आंत शिरलेला गारवा.., दिवेलागणीला पुरुषोत्तमाच्या देवळांत अनुभवलेली अभूतपूर्व शांतता..
किती आठवणी!!
तिथला निसर्ग आणि प्रत्येक वेळेस प्रेमाने चौकशी करणारा, पाहुणचार करणारा कोकणी माणूस यांच्या प्रेमात आपण कधी पडतो हे आपल्यालाच कळत नाही. .

आलो तेंव्हा शेजार पाजारचे सगळे 'किरणो मोटरसायकल घेऊन इलो हा' म्हणत माझ्या भोवती गोळा झाले होते. सगळ्यांच्या नजरेत आश्चर्य आणि कौतुक.
'कधी इलस?, कसो इलस?' 'किती वेळ लागलो?' 'वाटेत कसलो त्रास झालो नाय मा?' 'खय थांबलस?' प्रेमाने विचारलेले असंख्य प्रश्न.. पुढच्या वेळेस मोटरसायकलने यायचं नाही असं प्रेमाने दटावणारी शेजारची आजी.
जातानाही आपल्याच घरचा पाहूणा निघालाय अशा रितीने प्रेमाचा निरोप देणारी ही माणसं. हे सगळं सोडून यायचं जीवावर येतं.

फोटोतून जमेल तेवढं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलाय. पण खरं कोकण अनुभवण्याकरता 'येवा, कोकण आपलाच असा' हे निमंत्रण मनावर घेऊन तिथे जायला हवं.. तो स्वर्ग अनुभवायला हवा.

गुलमोहर: 

मायबोलीने काय कोकण 'प्रमोट'च करायचं ठरवलंय ? काय अफलातून प्रचि व वर्णनं कोकणाची टाकताहेत माबोकर इथं !!!
किरू, मस्तच !!!

कुठल्या फोटोला "छान" म्हणावं समजत नाहीये कारण सगळेच एकापेक्षा एक आहेत Happy

'आंब्याचं वाकडं झाड' सर्वात जास्त आवडलेला फोटो Happy

मस्त.... Happy
एक फोटो मी डेस्कटॉपवर टाकलाय.

कालच मी आठवण काढली होती की किरु दिसला नाही बरेच दिवसांत, तर तू कोकण-बीबीवर होतास होय... Proud

किरू कुठल्या फोटोचं जास्त कौतुक करावं आणि कुठल्याचं कमी? सगळेच एक से एक आलेत. Happy
बाईकने कोकणाच्या बरोबरीने फुटेज खाल्लंय बाकी Proud

सही रे भिडु. Happy
फोटो मस्तच आहेत सगळे.
बाइकवरुन कोकण हा एक अफलातुन प्रकार आहे. Happy
दोन्ही आवडीच्या गोष्टीचं ह्यापेक्षा चांगल कॉम्बिनेशन होण कठीण आहे. Happy

मस्त Happy

बाइकवरुन कोकण हा एक अफलातुन प्रकार आहे.
दोन्ही आवडीच्या गोष्टीचं ह्यापेक्षा चांगल कॉम्बिनेशन होण कठीण आहे>>>>>+१
मलाही कोकण बाईकवरून करण्याची जाम इच्छा आहे. बघु कधी योग येतो ते. Happy

धन्यवाद मंडळी..
झकास.., अगदी अगदी. बाइकवरून कोकण हा खरच अफलातून अनुभव!
दक्षे :). पण फुटेज खाण्यासारखी आहे की नाही माझी TB?

जिप्शा, म्हणूनच तुला सांगत होतो एकत्र जावूया . Happy

सगळ्या प्रकाशचित्रांना कोकण प्रेमाची किनार लाभली आहे. मनोगत सुंदर... अगदी कोकणा सारखं...

कोकण आणि ते ही बाईक वरून एकट्याने... हेवा वाटतोय Happy

किरु.. बाईक वरूनकोकण??? वॉव रे.. पुष्कळांचं स्वप्नं असेल हे..तू मात्र प्रत्यक्षात उतरवून दाखवलंस..
अभिनंदन Happy
फोटोज मस्त आलेत.. सागर संगीत जेवण... टू गुड!!!! Happy

मस्त रे किरु.. आवडले फोटो.. Happy
जिप्स्या सावध हो.. तुझ्या इलाक्यात अजुन एक तगडा स्पर्धक एंट्री करतो आहे.. Proud

किरु.. Happy
सगळ्या प्रकाशचित्रांना कोकण प्रेमाची किनार लाभली आहे. > +१

किरण...
तुझ्या, जिप्सी च्या 'नजरे'ला खरोखर 'सलाम'... बालपणिचा, आणी ऐन तरुणपणाचा काळ याच भागात काढलेला होता... दोन वर्षां पुर्वी तू 'बूलेट वरून कोकण सफर' हा मनोदय माझ्या जवळ व्यक्त केलेलास, आणि या वर्षी तो अक्षरशः पूर्णत्वाला नेलास... तुझ्या 'रीस्क्'चं आणी 'निग्रहा'चं खरंच 'कौतूक' करतो... या गोष्टीं साठी लागणारी 'सर्कीट' वृत्ती, हाच कदाचित आपल्यातला 'कॉमन' दुवा असावा... आता थोडी विश्रांती घे, तो पर्यन्त पुनः तुला भेटायला येतोय... तुझे पुढचे 'प्लान' ऐकायला... Happy ...

काजी म्हण्जे????...>>>... आपण खातो तो काजूगर एका टणक कवचाखाली सुरक्षीत असतो. या अखंड कवचाला (आतमधल्या सुरक्षीत गरा सकट) मालवणी भाषेत 'काज' म्हणतात (अनेकवचन 'काजी'). हे टणक कवच भाजल्या शिवाय सहजपणे फोडता येत नाही...

Pages