हमी

Submitted by आनंदयात्री on 5 March, 2012 - 04:03

(बांधण जनप्रतिष्ठान आयोजित काल (४ मार्च) पुण्यात झालेल्या "गजलोत्सव २०१२" अंतर्गत मुशायर्‍यामध्ये सादर केलेली गझल. दोन मतले सुचले होते, दोन्ही इथे देतोय)

जुने नाते अजुनही रेशमी आहे
तरीही बघ तुला परकाच मी आहे!

जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!

तुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू!
तुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)

म्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर!
तुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे

भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!

कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी
तसा वरवर पुरेसा संयमी आहे

तसे नाही कुणी जे नाव मी घ्यावे!
तरी 'ती' सोबतीला नेहमी आहे

- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/03/blog-post.html)

गुलमोहर: 

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)>>>>>>>>>>>> हे बेष्ट....

पूर्ण गझलच आवडली आणि कळली... Happy

गझलोत्सवातील सादरीकरणासाठी अभिनंदन!

जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!>>
थोडासाच... अहाहा!! Happy

भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!>>
_/\_ दाद देण्यास शब्द नाहीत, क्षमा!

तसे नाही कुणी जे नाव मी घ्यावे!
तरी 'ती' सोबतीला नेहमी आहे>>
अमेंझिंगली ब्यूटीफुल, क्लास! Happy

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)

>>>>> हे खासच

बाकी शेरही छान Happy

कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी
तसा वरवर पुरेसा संयमी आहे>>> हा शेर छान

बाकी गझल ठीकठाक

पाध्यांची 'एक इच्छा' पूर्ण करून येथे उगवतो

कळावे

गंभीर समीक्षक

(गझलोत्सवातील सादरीकरणाबद्दल अनेक अनेक अभिनंदने व शुभेच्छा)

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!) >>>> खासच...!

गझल मस्तंच....
आणि बालगंधर्वमध्ये तुझं गझल सादरीकरण छान होतं..... Happy

व्वा व्वा व्वा नचिकेत...
तुमची गज़ल ऐकायला आवडेल.... अपलोड करता आली तर बघा प्लीज Happy

जुने नाते अजुनही रेशमी आहे
तरीही बघ तुला परकाच मी आहे!

अतिशय तरल संवेदना उतरवणारा असा हा मतला एका आणखी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे चमकताना दिसतो ती म्हणजे 'मी' हे अक्षर काफ्या म्हणून वापरणे. आमचे दुसरे आवडते कवी मिलिंद छत्रे यांच्या 'नकार गर्भरेशमी' या गझलेतही असेच काफिये होते मात्र त्यात त्यांनी 'मी' हा काफिया योजिला होता की नाही याबाबत आम्ही ठाम नाही आहोत. (मतला पाहून 'आह' ही रदीफ नसती तर कसे वाटले असते असे एक आपले वाटले. म्हणजे जुने नाते अजुनही रेशमी, तरीही बघ तुला परकाच मी, हेही ठीक असावे). (अर्थात त्यानुसार पुढील शेर बसतीलच असे नाही याची आम्हास व आमच्या कावळ्यास जाणीव आहेच). रेशमी असणे व परके असणे यातील दरी थोडी अधिक खोल व रुंद झाल्याचे मनाला चाटून गेले.

जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!

हा मतला उत्तम! 'अजुनही त्यात थोडासाच मी आहे' ही ओळ तर अतिशय विशेष! या ओळीत रेशमी व थोडासाच यांचा संबंध उत्तम असून त्यात दरीच नाही. 'रेशमी असण्याचे कारण मी थोडासाच असणे' अशा अर्थाने वाचून पाहिल्यास संस्मरणीय मतला ठरावा. ही गझल काल सादर करताना कवीने नक्कीच 'थोडासाच मी' यातील 'सा' वर जोर दिलेला असणार हे जुन्या परिचयामुळे आम्हाला लक्षात येत आहे. कवीचे सादरीकरण प्रभावी असून 'त्यात हा नचिकेत नाही' ही ओळ या कवीने जेव्हा सादर केली होती तेव्हा आम्ही व आमचा कावळा फार खुष झालेलो ह्तो हे आम्हास या निमित्ताने आठवले.

तुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू!
तुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे

तुझ्या पत्रातला मजकूर हे तीन शब्द मायबोलीवरील लोकांच्या चांगलेच स्मरणात असतील. या शेरात दोन ओळींमधील दरी आम्हाला ओलांडता आली नाही याचे वैषम्य परखडपणे मांडावेसे वाटत आहे.

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)

आम्ही केव्हापासूनच स्वतःला आम्ही म्हणतो, पण 'म्हणवतो' असे मात्र नाही. बाकीचे आम्हास 'तुम्ही' म्हणत नाहीत. गझलसम्राट कै. भटसाहेबांनी गझलेत सर्वप्रथम कंस आणला. (तो दुसर्‍याच ओळीसाठी वापरला हेही विशेषच). स्वतःला 'म्हणवणे' या ऐवजी 'स्वतःला म्हणणे' हे सुलभ वाटते. 'म्हणवणे' यातून दुसर्‍यांकडून म्हणवणे असा अर्थ निघतो. अता संबोधतो आम्ही स्वतःला मी अशी ओळ सुलभ झाली असती असे वाटले. 'दिलेली' या शब्दाचा वापर अतिशय खुबीने झालेला आहे. स्वतःलाच तिच्याबद्दल हमी देणे हे अतिशय सुंदर!

म्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर!
तुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे

हा शेर आम्हाला भावला नाही.

भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!

या द्विपदीमधील 'रुजायाची' हा शब्द नेमका कशाला उद्देशून आहे हे नीटसे लक्षात आले नाही आमच्या! थेंब रुजायची असे असल्यास कोणाची क्षमता हा प्रश्न पडला आणि आपणच रुजायची असे असल्यास पहिल्या ओळीचे कनेक्शन समजले नाही. मात्र दोन्ही ओळी स्वतंत्रपणे सुंदर आहेत. आमचा कावळा पहिल्या ओळीवर टाळ्या वाजवत आहे.

कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी
तसा वरवर पुरेसा संयमी आहे

व्वा

(स्वतःशी भळभळणे तर अप्रतिमच)

तसे नाही कुणी जे नाव मी घ्यावे!
तरी 'ती' सोबतीला नेहमी आहे

तसे नाही कुणी की नाव घ्यावे मी असे आम्हास सुचले. हा शेरही फारसा भावेना.

ही या कवीच्या गझलांपैकी काहीशी कमी प्रभावी गझल असून मुरलेल्या कवी नचिकेत यांच्या लौकीकापेक्षा आटीव वाटली. मात्र सेकंड जनरेशनने ही काल ऐकली असेलच आणि तोंडात बोटेही घातली असतील कारण यात वेदना, हुंदके, चांदणे, खंजीर, हाय, गडे असे कोणतेही शब्द नसतानाही पंचिंग गझल झालेली आहे.

कालच्या कार्यक्रमातील सहभाग व सादरीकरणासाठी अनेकदा अभिनंदन

कळावे

गंभीर समीक्षक

मनःपुर्वक अभिनंदन गझलोत्सवातील सहभागाबद्दल

गझल आवडली पण काही ठिकाणी थोडी संदिग्धता वाटली.

तसा वरवर पुरेसा संयमी आहे>> व्वा ह

छान.

मतल्यातला प्रयोग कितपत ऑथेंटीक आहे ह्याबद्दल विशेष ज्ञान नाही. नचिकेतचे मत ऐकायला आवडेल.

छान... पत्र आणि मजकूर... नेहमीच येतो तुझ्या गझलेत पण तित्काच मस्त...!!!

अभिनंदन मुशायर्‍यासाठी..

व्वा! पुन्हःप्रत्यय आला, आपल्या सादरीकरणातील सहजता वाखाणण्याजोगी होती !

धन्यवाद!

धन्स दोस्तहो!! Happy

सादरीकरणाबद्दलच्या सर्व प्रतिसादकांचे आभार! Happy

गंभीर समीक्षक, आपले (कधी नव्हे ते) काही मुद्दे पटले. त्यामुळे या गझलेत सुधारणा होईल असे वाटले. त्यावर विचार सुरू आहे.

विदिपा, कसला प्रयोग?

गिरीश, अजून तसा प्रयत्न केला नाहीये... माझ्या कविता माझ्या आवाजात एकदा रेकॉर्ड करायच्या आहेत.. बघू.. Happy

शाम, Happy खरंय तुमचं...

चिमुरी, पजो, बागेश्री, आसा, Happy

सत्यजित, हम्म्म... नोटेड. Happy

बादवे, गजलोत्सवाचा अनुभव खूप छान होता... शिकायला, निरीक्षण करायला मिळालं... एखादा विचार मांडला जाताना गजलकाराच्या स्वतःच्या शैली-प्रकृतीनुसार कसे आविष्कार होतात हे पाहणं ही खूप आनंदाची गोष्ट असते, असं मावैम. श्रोत्यांचा सहभाग , समेवर आल्यासारखे येणारे काफिये आणि तात्काळ येणारी/हुकणारी दाद, सादरकर्त्याची शैली... असं बरंच काही... धन्यवाद! Happy

विदिपा, कसला प्रयोग?>>>

रेशमी
परकाच मी

कफियात येणारे/येणारी कॉमन अक्षरे सोडल्यास त्याआधीच्या अक्षराच्या स्वराला अलामत म्हणतात असे माहीत आहे. प्रस्तुत मतल्यात 'मी' हा काफिया म्हणून आलेला असताना त्याच्या आधी त्याच शब्दातले अक्षरच नाही. अशा परीस्थितीत आधीच्या शब्दातल्या शेवटच्या अक्षराचा स्वर पकडणे कितपत ग्राह्य आहे ह्याचे मला ज्ञान नाही हे म्हणायचे आहे.

ह्या गझलेतल्या प्रत्येक शेरात काफिया मी ने संपत असल्याने 'ई'कारान्त स्वरकाफिया नाही हे स्पष्ट आहे.

अलामत भंगणे हा मुद्दाच नाहीये माझा.

आधीच्या शब्दातल्या शेवटच्या अक्षरातला स्वर अलामत मानायचा का हा प्रश्न आहे. मला स्वतःला खरेच माहीत नाही

प्रमाण काय आहे म्हणजे काय विचारायचे आहे हे लक्षात आले नाही.

काफिया व अलामतीची जोडी या गझलेत 'अमी' अशी आहे.

आता 'मी' या एकाच अक्षराला अर्थ आहे व ते अक्षर काफिया म्हणून वापरलेले आहे. काफिया हा एकच शब्द असतो हे जरी खरे असले तरी अलामत पाळणे वगैरे सर्व बाबी मुळात कशासाठी असतात तर उच्चारातील माधुर्यासाठी. 'एनिमी' हा काफिया या गझलेत आला तर अलामत भंगेल असे म्हणण्यामागे मूळ प्रेरणा उच्चारातील माधूर्य कमी होऊ नये हीच असते. त्यामुळे उच्चारापुरता (सदर गझलेतील सदर शेरात) त्या काफिया, अलामतीचा विचार होणे समर्थनीय ठरेल. Happy

म्हणजे असे करायला चालते तर... नवीन शिकायला मिळाले, उपयोगास येईल माझ्या भविष्यातल्या गझलांकरीता.

वर समीक्षकांनी मिलिंद छत्रेंच्या नकार गर्भरेशमीची आठवण उगीच काढलेली नसावी. त्या गझलेला रदीफ नव्हती, या गझलेला आहे. या गझलेला रदीफ असताना मी हा काफिया वापरल्यानंतर त्या विशिष्ट शेरापुरता काफिया कोणता, अलामत कोणती आणि रदीफ कोणती हा प्रश्न गोंधळ माजवू शकतो Happy Lol Happy

Pages