पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... पहिला दिवस - पुणे ते श्रीवर्धन

Submitted by विमुक्त on 25 February, 2012 - 01:03

जानेवारीतला ३ रा आठवडा उजेडला आणि अजून फक्त ५ दिवसांनी ट्रीप सुरु होणार हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता... पण, नेमकं कधी नाही तर ह्याच आठवड्यात ऑफिसमधे भरपुर कामं आलं... कामाच्या गडबडीत ट्रीपसाठी खुपशी तयारी नाही करता आली, पण एका अर्थी ते बरच झालं कारण... "आपण ट्रेकला कसं खुप प्लान न करता जातो, अगदी तसंच ट्रीपला जावूया... सगंळच जरा फ्लेक्झीबल ठेवूया... मग जास्त मजा येते..." असं यशदीपच म्हणनं होतं...

२० जान ला ऑफिसहून घरी यायला रात्रीचे साडेसात होवून गेले... सोबत खूप सामान वाहायच नाही असं आधीच ठरलं होतं, म्हणून एक जोडी टी-शर्ट - हाफ चड्डी आणि एक टॉवेल पाठपिशवीत भरले आणि "ऑल सेट आणि रेडी टू हीट द रोड..." असं म्हणत ट्रीपची तयारी संपवली...

ठरल्या प्रमाणे पहाटे पावूणे-सहाला घराबाहेरच्या गणपती मंदिरा जवळ आम्ही तीघेजण आणि आमच्या घरची माणसं जमा झालो... गणपती-बाप्पाचा आशिर्वाद घेतला... घरच्यां कडून थोडं कौतुक, थोड्या सुचना आणि भरपूर शुभेच्छा घेवून बरोबर सहा वाजता ट्रीपचा श्रीगणेशा केला... तसा अजून काळोखच होता... रस्त्यावर खूपच कमी वाहनं होती... पहाटेच्या गारव्यात चांदणी-चौकाचा चढ चढू लागलो... छोटा असला तरी चांगलाच स्टीप आहे हा चढ... पेडलवर उभा राहीलो, मान खाली टाकली आणि हळू-हळू पेडल मारत पीरंगुटच्या रस्त्याला लागलो... गेले कित्येक दिवस ट्रीप बद्दल डे-ड्रिमींग चालू होतं... "सकाळ-दुपार-संध्याकाळ नुसती सायकल चालवायची... सायकलवर गोवा गाठायचं... गोव्याला पोचल्यावर काय भारी वाटेल..." असे बरेच विचार डोक्यामधे सारखे चालू असायचे आणि आज एकदाची ट्रीप सुरु झाली होती... भलत्याच आनंदात आणि उल्हासात एक-एक पेडल आम्हाला गोव्याच्या जवळ ढकलत होतं... मानस सरोवरचा चढ संपवला आणि काळोखातच पीरंगुट ओलांडून पौडच्या रस्त्याला लागलो... थंडी चांगलीच बोचत होती... हात तर खुपच गारठले होते... नारायणाच दर्शन झालं तेव्हा आम्ही पौड मागे टाकून मुळशीच्या दिशेने सुटलो होतो...

शनीवारचा दिवस आणि सकाळची वेळ असल्यामुळे, रस्त्यावर शाळेला चाललेल्या मुलांची किलबिल चालू होती... सायकलवर आम्हाला बघून काहीजण छानस हसत होते, काहीजण थोडावेळ सायकलच्या मागे धावत... 'डबल-सीट घे ना' म्हणत होते तर काहींना अजिबातच इंटरेस्ट नव्हता... त्यांना टाटा करत आम्ही पुढे निघालो... कोवळ्या उन्हात न्हालेला सभोवताल लोभसवाणा वाटत होता... गारठलेल्या हातांना उन्हामुळे जरा उब मिळत होती... कधी गप्पा मारत तर कधी एकमेकांना फॉलो करत मुळशी धरणाच्या भींतीजवळ पोहचलो... डावी कडे वळलो आणि चढ सुरु झाला... चढ तर होताच आणि त्यात रस्त्याचे बारा वाजलेले, त्यामुळे चढताना चांगलीच दमछाक होत होती... सगळ्यात पुढे यशदीप, मग मी आणि एकदम माघे प्रसाद असे आम्ही चढत होतो... चढावर यशदीप फॉर्मात असतो, त्यामुळे एका शार्प यू-टर्न नंतर तो दिसेनासा झाला... प्रसाद तर अगदीच हळू पुढे सरकत होता... मी सीट वरुन उठलो, शरीराचा तोल जरा पुढे टाकला आणि एका लयीत पेडलींग सुरु ठेवलं... त्या शार्प यू-टर्न नंतर तर चढ अजूनच वाढला... पाठीवरच्या पाठपीशवीमुळे चढताना अजूनच कस लागत होता... छातीची धडधड वाढत होती आणि पेडलींगचा स्पीड कमी होत होता... पण न उतरता तो चढ पार करुन हॉटेल Paradise cafe जवळ पोहचलो... चढावर सायकल चालवायला खरंच एक्स्ट्रीम एफर्स्ट लागतात... संपुर्ण शरीर एका लयीत काम करावं लागतं... आणि चढ सर केल्याच फिलींग तर भन्नाटच असतं... ही तर सुरुवातच होती, असे बरेच चढ पुढच्या सहा दिवसात चढायचे होते...

तीघांना पण भुक लागली होती, पण गर्दी असल्यामुळे 'इथं नको, जरा पुढे खाऊ...' असं करत-करत आम्ही पळसे गाव माघे टाकलं... आता तर हॉटेल्स पण नव्हती... मग एक छोटा ब्रेक घेतला आणि मुळशी काठी बसून सोबत आणलेल्या केळ्यांचा नाष्टा उरकला...

ह्या हंगामात पळसाला बहर येतो... हा संपुर्ण परीसर पळसांनी फुललेला असतो... आकाशाच्या निळ्या पार्श्वभुमीवर लाल-केशरी रंगानी बहरलेला पळस तर खासच दिसतो...

इथून पुढे ताम्हीणी पर्यंतचा रस्ता मुळशीच्या पाण्याला चिकटूनच जातो... वर्दळ अगदीच कमी होती... पळस, पाणी, जंगल आणि डोंगर ह्यांचे नजारे बघत निवांतपणे आम्ही पुढे सरकत होतो...

(यशदीप आणि प्रसाद )

(मी )

डोंगरवाडीचा स्टॉप आला आणि आम्हीपण ब्रेक घेतला... इथून खुपदा मी खालच्या दरीत उतरलोय...एकदा तर दरीत मुक्कामपण केलाय... पण इथून पुढचा रस्त्यावरचा प्रवास तर फार कमी वेळा केलाय...
(यशदीप आणि मी)

पुन्हा पेडलींग सुरु झालं आणि आम्ही माणगावच्या दिशेने पुढे सरकु लागलो... रोड खरंच खुप बाद होता... सारख्या, नेता लोक आणि गव्हर्मेंटला शिव्या घालतच होतो... खड्डा लागला कि एक शिवी, असं पार विळे फाट्याला पोहचे पर्यंत चालू होतं... माझ्या सायकलची तर सारखीच चैन (chain) पडत होती... एखादा मोठ्ठा घाट चढताना, 'हा घाट कधी संपेल?' असं जितक्या प्रखरतेने वाटत असतं... त्यापेक्षा कितीतरी पटीने हा ताम्हीणी घाट उतरताना मला तसं वाटत होतं... रस्त्यावरच्या खड्यांमुळे बसणारे हादरे सोसल्यामुले मनगटं आता दुखायला लागली होती... भर दुपारी साडे-बारा वाजता घाटाच्या पायथ्याशी विळे फाट्याला पोहचलो... आता तर भुकेने पुरते व्याकुळ झालो होतो, तरी माणगावलाच जेवण करु असं ठरवून पुढचा प्रवास सुरु केला... अर्ध्या तासात निजामपुर गाठलं... यशदीप आधीच पोचला होता आणि एका रसवाल्याशी गप्पा मारत आमची वाट पाहत होता... प्रत्येकी दोन ग्लास रस प्यायलो आणि माणगावचा रस्ता धरला... वाटेत काही दुचाकीवाले स्लो होवून आमच्याशी गप्पा मारत... 'कुठुन आलात? कुठे चाललात?' असे बरेच प्रश्न त्यांना पडलेले असायचे... उत्तरं मिळाली की प्रोत्साहन देवून पुढे निघून जायचे...

दुपारी दीड वाजता माणगावला पोहचलो... जेवणासाठी हॉटेलची शोधा-शोध सुरु केली आणि एका खानावळीत जेवणासाठी थांबलो... जेवता-जेवता बाहेर लावलेल्या सायकलवर पण लक्ष होतं... काही उत्साही आणि काही उपद्रवी मुलं आमच्या सायकलींशी खेळत होते... जेवण संपवल आणि गावा बाहेर एका झाडाच्या सावलीत विश्रांती साठी थांबलो... अजून बराच पल्ला गाठायचा होता म्हणून फक्त १०-१५ मिनीटं आराम केला आणि पुन्हा प्रवास सुरु केला... आधी म्हसळा आणि मग हरीहरेश्वर असा प्लान होता...

इथून पुढे आता घाट वगेरे लागणार नाहीत असा आमचा समज होता... पण माणगाव सोडलं आणि अर्धा-तासाच्या आत घाट लागला... दुपारच डोक्यावर आलेलं उन्ह, उघडा-बोडका घाट, एक इंच सुद्धा सावली नाही, नुकतच जेवण झालेलं आणि दमलेलं शरीर... अश्या अवस्थेत तो घाट चढताना प्रत्येक पेडलवर स्व:ताशीच झगडत होतो... घामाच्या धारा डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरत होते... एका हाताने घाम पुसत पेडलींग चालूच होतं... कोणाच्या नावाने बोंब मारायला पण चान्स नव्हता, स्वःतालाच शिव्या घालत होतो... 'अरे, कोणी सांगीतलं होतं?... इतक्या उन्हात झाडाखाली निवांत झोप काढायची सोडून, असं हे हा-हू करत सायकल चालवायची कसली हौस?...' अश्या अनेक प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची डोक्यात मारामारी चालू होती... पण कसाबसा तो घाट सर केला आणि मघाशी चालू असलेल्या मारामारीत उत्तरांचीच जीत झाली हे कन्फर्म झालं...

घाट संपला आणि साई नावाच गाव लागलं... अजून थोडा चढ-उतार आणि मग एक मोठ्ठा घाट उतरुन म्हसळा गावात पोहचलो... थोडी चौकशी केल्यावर कळलं की दिवेआगारला सरळ सपाट रस्ता आहे आणि श्रीवर्धन-हरीहरेश्वरला अजून एक घाट चढावा लागेल... खरंतर अंगात अजिबात त्राण नव्हते, पण ठरलेल्या जागीच मुक्काम करु म्हणून घाटाचा रस्ता धरला... वाटलं होतं की हा तरी छोटा असेल, पण नाही इथे सुद्धा बराच चढ होता... आता सुर्य पण कलायला लागला होता... ट्रीपच्या पहिल्याच दिवशी काळोखात सायकल चालवायची वेळ येते कि काय असं वाटू लागलं... पण परत एक-एक पेडल वर कॉन्संट्रेट करुन स्वःताशीच झगडायला सुरुवात केली... मान खाली घालूनच प्रवास चालू होता... असंच जरा मान वर केली आणि समोर खूपच सुंदर नजारा होता...

दिवसभर आमची साथ देवून आता नारायण आपल्या घरी निघाला होता... आमचा प्रवास मात्र चालूच होता... चढ संपला आणि आम्ही जोरात सुटलो... उतारावर काही चार-चाकी वाहनांना मागे टाकून संध्याकाळी साडे-सहा वाजता श्रीवर्धनला पोहचलो... आता हरीहरेस्वर केवळ १५ कि.मी. होतं, पण काही केल्या प्रसाद पुढे यायला तयार होईना म्हंटल्यावर, श्रीवर्धनलाच मुक्काम करायच ठरवलं... घरगुती राहण्याची सोय झाली... तीघेजण मस्त गरम पाण्याने अंघोळ करुन रेडी झालो आणि रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडलो... जवळच एका हॉटेलात जेवण केलं आणि रुम वर येवून आडवे झालो... 'पहिला दिवस संपला... खूपच दमलो राव आपण, पण ठीक आहे १६५ कि.मी. अंतर आपण एका दिवसात कापलं... बरेच घाट चढलो... ट्रीपची सुरुवात मस्तच झाली... उद्या पासून समुद्र किनारीपण सायकल चालवायला मिळणार... ' असे अनेक विचार करत शांतपणे झोपी गेलो...

विमुक्त
(http://murkhanand.blogspot.in/)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१६५ किमी एका दिवसात. सही!
अरे तुम्ही इतका लांबचा पल्ला गाठायला काही तयारी केली होती का ते ही लिहा. म्हणजे रोज इतके किमी सायकल चालवणे वगैरे.

बाप्रे...एका दिवसात १६५ किमी? सहीच!

<<म्हणजे रोज इतके किमी सायकल चालवणे वगैरे<< अनुमोदन!.

पुढचा भाग येउद्या लवकर!

अभिनंदन या सायकलसफरीबद्दल !

जरी फ्लेक्झिबल असेल तरीही थोडीफार का होईना काय तयारी केली होती ? सामान काय काय घेतलंत ? काळजी काय घ्यावी, सायकल कुठली असावी हे सर्व येऊ द्यात.

व्वा! भारीच! १ दिवसात १६५ कि.मी.
हं............वर लोक्स म्हणताहेत त्याप्रमाणे.....तयारी काय केली ते लिही...
अनील+१

आयला १६५ किमी एका दिवसात...मी बाईकवरून जाताना पण दमेन.....

तुम्ही लयं ग्रेट आहात राव...आता पुढचे भाग टाकायच्या सगळे म्हणतात तसे पूर्वतयारी म्हणून एक भाग टाका....
आणि फोटोपण येऊ द्यात....सायकली कुठल्या होत्या...

विमुक्त, दिवसाला १६५ किमी म्हणजे चांगला पल्ला गाठलात. फार्फार वर्षांपूर्वी आम्ही तिघे जण कुठलीही तयारी नसतांना ठाण्याहून पुण्याला सुमारे १४० किमी एका दिवसात (पहाटे ०४०० ते रात्रौ २१००) गाठले. ३ तास दुपारी खोपोलीत विश्रांती, २ पंक्चरे आणि स्वामी मालिका यांजसह! खोपोली ते लोणावळा घाटात सायकली ट्रकात टाकल्या होत्या! Uhoh
-आ.न.,
-गा.पै.

अरे विमुक्ता, तु सायकलवरून केलेला प्लॅन मी ४ चाकीनी करुया असे ठरवले तरीही २/३ जणांचे बरोबर यायला नकार येतील. तु एका दिवसात १६५कि.मी. म्हणजे जबरी सुरुवात. आगे बढो, पुढील भागांची आतुरतेने वाट पहात आहे.

१६५ किमी. कमाल आहे! फोटोवरुन दिसत आहे की जास्त काही सामान बरोबर नव्ह्ते.
तरी पुर्वनियोजन कसे केले ते वाचायला आवडेल.

आमचे तिघे मित्र M Tech झाल्यानन्तर सायकल चालवत चेन्नइ पासुन गोवा मर्गे पुण्याला आले होते. त्यानी हे अन्तर दहा दिवसत पार केले होते, पन्च्वीस वर्शान्पूर्वीची गोश्ट आहे ही !

अजुनहि असे वेगळ्या अर्थाने "वेडे" लोक जगात आहेत तर !

Bravo !

Pages