यावेळी भारतात जाताना, मालेश्वरला जायचे असे ठरवले होते. माझी आजी तिथे जात असे, त्यावेळी तिथे जायची वाट फार अवघड होती, असे ती सांगत असे. पुढे मिलिंद गुणाजीने काढलेला तिथल्या धबधब्याचा फोटो पण बघितला होता, पण माझे तिकडे कधीच जाणे झाले नव्हते.
मग इथे नंदीनी आणि जिप्सी ने पण लिहिले होते, या सगळे वाचून मला आपण अजून का गेलो नाही, असे वाटत राहिले.
मकरसंक्रांतीला श्री मार्लेश्वराचे गिरिजेशी लग्न लागते आणि त्यानिमित्त जत्रा असते ते माहीत होते पण यावर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारीला येणार आहे ते लक्षात आले नाही. त्यामूळे आम्ही गेलो होतो तो दिवस, नेमका मंगलसोहळ्याचा होता. आणि वेळही शुभमुहुर्ताची.
दर्शनासाठी हजारो लोक रांगेत वाट बघत होते. (आता वर चढायला सुबक पायर्या आहेत.) आम्ही गुहेजवळ न जाता आधी धबधब्यापर्यंत गेलो. रांग तिथपर्यंत होती. मग परत फिरलो तेवढ्यात मामाचे साडू भेटले (ते मारळवासीच) त्यांच्या ओळखीने थेट गुहेत प्रवेश मिळाला. प्रचंड गर्दीमूळे तिथे काही मिनिटेच थांबता आले.
मग मामाच्या आग्रहावरुन संगमेश्वरच्या जवळ असलेल्या कर्णेश्वर देवळाला भेट दिली.
संगमेश्वर जवळ (४ किमी) कसबा नावाचा भाग आहे, तिथे आतमधे हे देवस्थान आहे.
जवळपास वस्ती मुसलमान आहे पण मामाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरात पुरातन तुळशी वॄंदावन आहे.
संभाजी महाराजाना या गावात औरंगजेबाने अटक केल्याचे सांगतात. गावात केविलवाण्या अवस्थेत संभाजी महाराजांचे स्मारक पण आहे.
गावात होळीच्या दिवशी मोठा उत्सव असतो आणि त्यासाठी मोठा हौद बांधला आहे.
(याबाबत कुणीतरी सविस्तर लिहा रे, मी काही वाचल्याचे आठवत नाही.)
प्रत्यक्ष देवस्थान मात्र खुपच अनोखे आहे. सर्व बाजूनी मोकळे आवार आहे आणि मधोमध भरपुर कोरीव काम असलेले देवालय आहे.
मूर्तींची हेतूतः विटंबना केल्याचे जाणवतेच पण बाकी देवालय सुरक्षित आहे. तिथल्या पुजार्यांना विनंति केल्यास ते सर्व बारकावे दाखवतात. (जे एरवी आपल्याला कळणार नाहीत.)
मी त्यातला तज्ञ नाही, पण मला काही गोष्टी तिथे प्रकर्षाने जाणवल्या. तिथे दिसणार्या मूर्ती या वेगवेगळ्या शैलीतल्या वाटतात. त्या वेगवेगळ्या कलाकारांनी किंवा वेगवेगळ्या काळात घडवल्या असतील का ? १६०० वर्षांपूर्वी ते बांधल्याचे, कुठेतरी वाचले.
तसेच एकंदर देऊळ आणि खास करुन कळस एकसंध म्हणजे एकाच पाषाणातून कोरल्यासारखा वाटत असला तरी, दगडात अनेक रंग जाणवतात. ते रंग मूळचेच कि हवामानाचा, रसायनांचा परिणाम म्हणून तसे झालेय, कळत नाही.
देवळासमोरची दीपमाळ पण जरा वेगळ्या धाटणीची आहे.
त्या आवारातच सूर्यदेवाचे देवालय आहे. ती मूर्ती पण विद्रुप केलेली होती. गावकर्यांनी मग तिचे जोडकाम केले आणि ते जोडकाम दिसू नये म्हणून ती मुर्ती रंगवली आहे. तरी ती प्राचीनच आहे, असे पुजारी म्हणाले.
मी कुठेतरी वाचले होते, कि सूर्याची मानवरुपात आपल्याकडे पूजा होत नसे. ती प्रथा आपल्याकडे इराणमधून आली. पण तिथल्या मूर्तींच्या पायात चामड्याचे बूट असत आणि तोपर्यंत आपण चामडे देवळात वर्ज्य मानले होते. त्यामूळे आपल्याकडे ती मूर्ती कायम रथात दाखवलेली असते (म्हणजे बूट घातलेले पाय दिसायला नकोत. ) पण ही मूर्ती वेगळी आहे. म्हणजे रथात नाही आणि प्रभावळीत बारा राशी कोरलेल्या आहेत.
दुसरे म्हणजे या देवळाच्या बांधकामात सरळ रेषांचा वापर आहे, नेहमीप्रमाणे कमानी नाहीत. नक्षीकामातही काही वेगळे नमुने दिसतात, छत आणि भिंतीवर तर ते आहेच पण पायर्यांवर पण आहे.
इथे काही मोजके फोटो देतोय (बाकीचे फेसबुक वर आहेत.)
२) मार्लेश्वराच्या गुहेच्या समोर असणारा हा धोकादायक धबधबा. हे कुंड फारच खोल आहे.
३) हा मागचा प्रसिद्ध धबधबा. पावसाळ्यात तो अनेक टप्प्यात कोसळतो. पण एरवी क्षीण का असेना, वाहता असतोच.
४) हे कर्णेश्वराच्या देवळाचे प्रथम दर्शन
५) देवळाचे एक प्रवेशद्वार
६) दीपमाळ
७) छत
८) खांब
९) दशावतार
१०) समुद्रमंथन
११) ओवरीमधला खांब
१२) पायरी
१३) शेषावरचा विष्णू, लक्ष्मी, ब्रम्हा (त्यावर दशावतार आहेत, पण दाखवल्याशिवाय दिसत नाहीत.)
१४) भिंतीवरच्या मंगलमूर्ती
१५) छतावरचा आणखी एक नमुना
१६) वेगळ्या शैलीतले कोरीवकाम
१७)
१८) आतल्या बाजूचा खांब
१९)
२०)
२१) सूर्यदेव
२२) मागच्या बाजूचा संगम (इथेही काही देवळे आहेत.)
छान फोटो !
छान फोटो !
सुंदर निळा रंग... नवीन
सुंदर निळा रंग... नवीन माहिती..
मंदिर तसे फार मोठे दिसत नाही
मंदिर तसे फार मोठे दिसत नाही पण दगडातील कोरीवकाम किती सूंदर आहे. तूम्ही हवामानाचा, रसायनांचा परिणाम असावा म्हणतात पण ते तर चक्क कळसावर पांढरा रंग ओतल्यासारखा वाटतोय..
खरं तर यावर काही उपाय असावा का? पारदर्शक लेप वगैरे..
सुंदर ! पावसाळ्यात हा परिसर
सुंदर !
पावसाळ्यात हा परिसर अधिकच खुलून दिसतो.
काय अचंबित करणारे कोरीवकाम
काय अचंबित करणारे कोरीवकाम आहे या देवळाचे, नक्कीच पहायला जाणार....
वर्णन व प्र चि दोन्ही सुरेखच...
सुंदर फोटो आणि माहिती
सुंदर फोटो आणि माहिती
दिनेशभौ, लई खास मस्त भटकू
दिनेशभौ, लई खास
मस्त भटकू शकता राव तुम्ही.
माझे मार्लेश्वर राहिलय बघायच
प्रयत्न करणार. 
कर्णेश्वरची देखिल वाट विचारुन बघायला हवे.
फोटो दिसत नाहीत.
कोरीवकाम मस्तच आहे, आणि
कोरीवकाम मस्तच आहे, आणि आपल्याकडील कठीण दगडत ते करणे अजून विशेष.
मला वाटत होते की अशी कलाकृती (उदा. प्रचि-१५) केवळ राजस्थानातच आहे.
दिनेशदा, मी सुध्धा आत्ताच
दिनेशदा, मी सुध्धा आत्ताच जाने. च्या पहिल्या आठवड्यामध्ये कोकण ट्रीपच्या शेवटी मार्लेश्वरला गेलो होतो.
त्याचा झब्बू -
त्याचा झब्बू -
मस्त ओळख आणि माहिती.
मस्त ओळख आणि माहिती.
छान आहेत फोटो आणि
छान आहेत फोटो आणि माहीतीसुद्धा...
खरच अनोखा प्रकार आहे... मस्त
खरच अनोखा प्रकार आहे... मस्त
दिनेश सुंदर आहे कर्णेश्वराचे
दिनेश सुंदर आहे कर्णेश्वराचे मंदिर. त्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. त्या दिपमाळेचा आण्खी एखादा फोटो असल्यास इथे द्याल का? वेगळीच आहे ती.
फार छान...... मार्लेश्वरचे
फार छान...... मार्लेश्वरचे फोटो बर्याचदा पाहिलेत... पण आज फारच फ्रेशनेस जाणवला.
छानच! सुंदर फोटो आणि माहिती
छानच! सुंदर फोटो आणि माहिती !
याचे आणखी फोटो फेसबुक वर
याचे आणखी फोटो फेसबुक वर टाकलेत. (दीपमाळेचा पण आहे.)
अतुल, एवढे पाणी असून डोंगर मात्र ओकेबोकेच वाटले. त्या डोंगरावर कुठून चढायची वाट असेल असे वाटत नाही.
कर्णेश्वरला जरा जास्त वेळ द्यायला हवा होता. आणि देवळात जायला पायर्या वगैरे चढाव्या लागत नाहीत. गावाच्या टोकाशी सपाटीवरच आहे.
तिथली माहिती मात्र अचूक मिळवायला हवी. संगमावरचे देऊळ कार्तिकाचे सांगतात पण आत गाभार्यात शिवलिंगच आहे. परीसरात आणखीही काही देवालये आहेत.
देवळात एकच अशी शैली नाही जाणवत, अगदी मूर्तींच्या चेहरेपट्टीत पण फरक आहेत. ब्रम्हाची आपल्याकडे क्वचितच दिसणारी मूर्ती आहे.
साधारण असेच देवालय, गोव्यातल्या तामडी सुर्ला इथे आहे, पण ते काळ्याभोर पाषाणात आहे. त्यातले कोरीवकाम एकसंध वाटते. तसेच त्याला फक्त एकच मुख्य द्वार आहे. पण नदीकाठचा परीसर आणि एकंदर ठेवण अशीच वाटते. त्याचे बांधकाम मात्र ७०० वर्षांपूर्वीचे सांगतात.
खुपच छान. मार्लेश्वराच्या
खुपच छान.
मार्लेश्वराच्या गुहेच्या समोर असणारा हा होकादायक धबधबा. हे कुंड फारच खोल आहे.>> म्हणजे कुठला म्हणता आहात? मला पावसाळ्यात तो मोठा फक्त दिसला होता. आणि जाताना उजवीकडे डोंगरातुन येणारे छोटे धबधबे (एकत्र येउन एकच मोठा होतो) ते दिसले होते फक्त. गुहेसमोर तर ते प्रसाद देणारे बसतात ना. आणि त्यांच्या मागे रेलिंग लावुन जागा बंदिस्त केली आहे.
माझी काहि गडबड होतेय कि काय?:अओ:
सुंदर दिनेशदा... खुपच शांत
सुंदर दिनेशदा...
खुपच शांत परिसर दिसतोय हा...
मोनालि, त्या गुहेसमोर दुकाने
मोनालि, त्या गुहेसमोर दुकाने आहेत, त्याच्या खालून मोठ्या धबधब्याकडे जाणार्या पायर्या आहेत, त्याच्या खाली हे कुंड (कुंड कसले विवरच ) आहे.
त्याला संरक्षक कठडा वगैरे दिसला नाही. मामा सांगत होता, किमान १२०० फूट खोल आहे ते. एका बुडालेल्या व्यक्तीला काढण्यासाठी तेवढा दोर टाकला होता, पण ती व्यक्ती वाचू शकली नाही.
<< माझी काहि गडबड होतेय कि
<< माझी काहि गडबड होतेय कि काय? >> गुहेकडे न थांबतां सरळ वर चढत गेलं कीं छान नजारा दिसतो धबधब्याचा, असं आठवतंय !
मार्को, तूमच्यापैकी कुणीतरी
मार्को, तूमच्यापैकी कुणीतरी तिथे जाऊन खास फोटो काढले पाहिजेत. आजूबाजूला आणखी काहितरी विशेष असणार. मुसलमान वस्तीत असल्यामूळे कि काय माहीत नाही, पण फारसा राबता दिसला नाही. फुलांची, प्रसादाची दुकाने पण नाहीत.
भाऊ, तो मुख्य धबधबा. त्याच्यावर जाणे शक्यच नाही. त्याच्या खाली पण कुंड आहे पण ते फारसे धोकादायक वाटत नाही. हे कुंड मात्र गुहेच्या समोरच आहे. पुर्वी कदाचित गुहेवरूनही पाणी कोसळत असणार.
मुख्य धबधब्याच्या वरती उदगीर नावाचे गाव आहे, असेही मामा सांगत होता.
किमान १२०० फूट खोल आहे ते >>
किमान १२०० फूट खोल आहे ते >> अरे देवा... हे माहितच नव्हते... मोठ्या धबधब्याच्या प्रवाहात उतरण्यासाठी खाली रेलिंग आणि पायर्या आहेत...
२००१ च्या जुलै महिन्यात आम्ही पन्हाळगड ते विशालगड ट्रेकची सांगता त्या धबधब्याच्या प्रवाहात आंघोळ करून केली होती. पाणी इतके गार होते की एक सेकंद प्रवाहात डोके बुडबवून ठेवले तरी डोक्याला झिनझिन्या येत होत्या.
सुंदर फोटो आणि माहिती....
सुंदर फोटो आणि माहिती....

कर्णेश्वराचं मंदिर पांडवांनी
कर्णेश्वराचं मंदिर पांडवांनी घडवल्याची आख्यायिका आहे. एका रात्रीत हे मंदिर उभं केलं कारण पहाट व्हायच्या आत त्यांना कोणाच्याही दृष्टीस न पडता दुसरीकडे कूच करायचं होतं. मंदिर घडवलं आणि पांडव जेवायला बसले, पण तेवढ्यात कोंबडा आरवला किंवा बहुतेक कोकिळा ओरडली, पण पहाट झाल्याचं कळल्यामुळे पांडव आपली जेवणाची ताटं तशीच उपडी ठेवून निघून गेले. तत्पुर्वी त्यांनी तिथे एक शीलालेख लिहून ठेवला.
देवळाच्या चार दिशांना चार आणि मधे एक मोठं (भीमाचं) ताटसदृश कोरीवकाम बघायला मिळतं. तो शीलालेख कोणी संपूर्णपणे वाचू शकलं तर ती ताटं पालथी होतील आणि त्याखाली दडलेला (पांडवांच्या अन्नाचा तयार झालेला) रत्नमाणकांचा खजिना त्या व्यक्तीस मिळेल अशी कहाणी कर्णेश्वराला गेल्यावर ऐकवली जाते.
एक मात्र खरं की एवढं पुरातन देऊळ आहे, पण त्याची हवी तशी काळजी घेतली गेली नाहीये. तो परीसर खूपच रमणीय आहे.
मोनालि, त्या गुहेसमोर दुकाने
मोनालि, त्या गुहेसमोर दुकाने आहेत, त्याच्या खालून मोठ्या धबधब्याकडे जाणार्या पायर्या आहेत,>>> तरिच कारण मोठ्या धबधब्याकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात बंद केला होता. आता मधे कधितरी परत जायला हवे.
दिनेशदा छान प्रचि आणि
दिनेशदा छान प्रचि आणि माहिती.
मंजूडी>>>+१ हिच आख्यायिका लिहायला आलो होतो.
पहाट झाल्याचं कळल्यामुळे पांडव आपली जेवणाची ताटं तशीच उपडी ठेवून निघून गेले. तत्पुर्वी त्यांनी तिथे एक शीलालेख लिहून ठेवला. देवळाच्या चार दिशांना चार आणि मधे एक मोठं (भीमाचं) ताटसदृश कोरीवकाम बघायला मिळतं.>>>>दिनेशदा, याचे फोटो असेल तर इथे द्या ना.
छान प्रकाशचित्रे आणि वर्णन
छान प्रकाशचित्रे आणि वर्णन दिनेशदा!
काही वर्षापूर्वी सह्याद्रीतील कुडी आणि प्रचितगडाला भेट दिलेली तेंव्हा या ठीकाणी गेलो होतो. अतिशय रम्य जागा. मार्लेश्वर धबधबा बघण्याची खरी मजा मात्र पावसाळ्यातच येते. डोंगरावरुन पडणार्या पाण्याच्या प्रचडं वेगाने या डोहातील मोठे-मोठे प्रस्थर पाण्यात (योग्य शब्द सुचत नाही) गोल-गोल फिरत असतात.
मंजूडी, फिरोझ रानडे यांचे
मंजूडी, फिरोझ रानडे यांचे इमारत नावाचे एक पुस्तक आहे, त्यात या देवळांच्या निर्मितीच्या कहाण्या आहेत.
आपल्याकडे बर्याच बांधकामांचे, लेण्यांचे श्रेय पांडवाना दिले जाते (ओमानमधल्या सलालाह जवळ पण लेणी आहेत आणि त्यांचे पण... ) पण वनवासात असताना एवढी उसंत आणि धन त्यांच्याकडे कुठून असणार ?
आणि निष्काळजी पण तर जाणवतोच. पावसाळ्यात भरपुर शेवाळे जमत असणार.
वेताळ, त्या प्रकाराला बहुतेक उखळ म्हणतात. मार्लेश्वरला जायला आम्ही जो शॉर्टकट घेतला होता, तिथे खाली गावातल्या नदीत असे बरेच गोल गोटे दिसले.
पुणे नगर मार्गावर पण एका नदीत आहेत. तिथे दगड गोल गोल फिरुन खड्डे पडले आहेत.
अहाहा... मार्लेश्वर सुंदरच.
अहाहा... मार्लेश्वर सुंदरच. कधीही जा.. आणि हे मंदिर मात्र प्रथमच पाहिले.. ऐकले सुद्धा नव्हते. ती दीपमाळ कित्ती सुंदर आहे ना.. संपूर्ण कलाकुसर अप्रतिम पण दुर्लक्षित...
चक्क कळसावर पांढरा रंग ओतल्यासारखा वाटतोय..
>>> हो ना.. रतनवाडीच्या अमृतेश्वरला पण तेच.. भीमाशंकरला तर आख्खा निळा रंग मारलाय असे ऐकून आहे.. अजून याची देही डोळा बघणे बाकी आहे..
Pages