सुगंध खोवत वेणी करून दाट पुन्हा

Submitted by बेफ़िकीर on 16 January, 2012 - 03:19

सुगंध खोवत वेणी करून दाट पुन्हा
तुझ्या कुशीत उजाडेल का पहाट पुन्हा

उन्हास काय म्हणालो जरा पडून पहा
कधी विरूच नये का धुक्यात वाट पुन्हा

निदान भेटत होती मनास रोज मने
मला झपाट गरीबी मला झपाट पुन्हा

तुझे बघून न बघणे मला करेल कवी
पुन्हा कटाक्ष पुन्हा ओळ काटछाट पुन्हा

जगात जात इथे येत मिरवतोय..... जशी
तिराकडून फिरे सागरास लाट पुन्हा

मिळेल काय तुझी प्रार्थना करून तरी
नवीन रेखुन रेषा जुने ललाट पुन्हा

सदैव बरसत रिमझिम मनात खिन्न स्मृती
नको करूस इथे आज चिकचिकाट पुन्हा

म्हणायचास नको रोज 'बेफिकीर' गझल
बळावलाय तुझा रोग हा अफाट पुन्हा

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

तुझे बघून न बघणे मला करेल कवी
पुन्हा कटाक्ष पुन्हा ओळ काटछाट पुन्हा

व्व्वाह!!! फार आवडला हा शेर!

वृत्त कुठले आहे?

व्वा व्वा! बरेच शेर आवडले.

काही शेर ह्या गझलेत अवघडल्यासारखे वाटले

निदान भेटत होती मनास रोज मने
मला झपाट गरीबी मला झपाट पुन्हा>> फार आवडला हा..
काही सहज नाही वाटले.

खयाल आवडलेच, पण मला अजून तरी या वृत्ताची लय सापडली नाहीये. शेर लयीत वाचायला जरा अवघड होत आहेत, जे तुमच्या गझलांत सहसा.. खरं तर कधीच होत नाही.

प्रयत्न सुरू ठेवतो.

ज्ञानेश, उर्दूतील अतिशय लोकप्रिय वृत्त आहे हे Happy

लगालगाल लगागा लगालगाल लगा

(अनेकांना 'सहज वाटले नाही' असे म्हणताना काय अभिप्रेत होते हे मला समजले नाही हे अवांतर)

बाय द वे ज्ञानेश, आपल्याला आटवत असेल की सुरेश भटवर मी ह्याच वृत्तातील एक गझल प्रकाशित केली होती.

त्यातील एक शेर कदाचित आपल्याला आठवेल.

मनास दोनच पर्याय, सांग काय करू
तुझा विचार करू की तुझा विचार करू

Happy

उदाहरणः

बशीर बद्रः

अगर तलाश करू कोइ तो मिलजायेगा
मगर तुम्हारी तर्‍हा कौन मुझे चाहेगा

जायेगा / चाहेगा = गागागा = गाललगा

मनास दोनच पर्याय, सांग काय करू
तुझा विचार करू की तुझा विचार करू......वा वा वा....!

निदान भेटत होती मनास रोज मने
मला झपाट गरीबी मला झपाट पुन्हा......सही....सहीय एकदम...

आख्खी गझल वाचावी वाटते पुन्हा पुन्हा.

व्वा! लय सापडायला जरा वेळ लागला पण एकदा सापडल्यावर बहार आली! खूप छान शेर आहेत एकेक! लै खास..

सहजता नाही वाटली>>>> Sad दुर्दैव माझं! रसिकांपुढे दिलगीर!

मला एकदा वाटले की व्याकरण चिन्हांच्या अभावामुळे तर असे नसेल?

उदाहरणार्थः

मिळेल काय तुझी प्रार्थना करून तरी
नवीन रेखुन रेषा जुने ललाट पुन्हा

हा शेर

मिळेल काय? तुझी प्रार्थना करून तरी?
नवीन रेखुन रेषा, जुने ललाट पुन्हा

असा नाही लिहिला म्हणून तर नसेल?

पण अर्थातच, अभिव्यक्तीतील कमतरतेची नम्र जाणीव!

सर्वांचे प्रतिसादांसाठी आभार!

कृपया लोभ असू द्यावात! Happy

-'बेफिकीर'!

पुन्हा लिहावेसे वाटले.

सहज वाटले नाहीतः

अर्थः

१. सहज म्हणता आले नाहीत

२. विचार (शेरातील खयाल) सहजपणे समजेल अशा शब्दात नाही

(मला तरी वाटते की) 'सहज म्हणता आले नाहीत' हा प्रश्न प्रामुख्याने असावा. तसे नसल्यास कोणत्या शेरातील खयाल सहज समजेल असे नाहीत ते कृपया जाणकारांनी जरूर नोंदवावे. सहज म्हणता आले नाहीत ही बाब जर अस्तित्वात असेल तर तो फार (च) वेगळा प्रश्न आहे व त्याचे उत्तर पहिल्या (खयाल समजण्यासारख्या अभिव्यक्तीत नसणे) प्रश्नानंतर / त्याच्या उत्तरानंतर विचारात घेण्यासारखे 'असावे' असे वाटते. Happy

कविता / तंत्र / खयाल / वृत्त याबाबत मक्ता / मालकी कोणाचीच नसते याची नम्र जाणीव ठेवूनही असे म्हणावेसे वाटते की मी या विशिष्ट रचनेची (??) त्या सर्व निकषांसंदर्भात जबाबदारी घेऊ शकत आहे असे मला वाटत असून कृपया वरील मतांबाबत चर्चा करायची असल्यास करावी.

-'बेफिकीर'!

तुझे बघून न बघणे मला करेल कवी
पुन्हा कटाक्ष पुन्हा ओळ काटछाट पुन्हा

>>>>>>>>>>>>>>>>>

आह.......!!! क्या बात बेफी.......!!!

(अवांतरः बेफी, सहज वाटले नाही या प्रतिसादातला... "सहज" हा शब्द इतका मनाला लावून घेऊ नका....... बहुत करून ते त्या त्या आयडीचे "वैयक्तिक स्ट्रगल" असावे लय आणि अर्थ समजून घेण्यासाठीचे ... Happy संबंधित सर्व आयडींना Light 1 )

तुझे बघून न बघणे मला करेल कवी
पुन्हा कटाक्ष पुन्हा ओळ काटछाट पुन्हा >>> व्वा फारच छान.... बाकीचे अजून चांगले होऊ शकले असते असे वाटते...

गरिबी पण चांगला... पण 'गरीबी' हे संबोधनात्मक असल्याने आणि तसा शब्द प्रचलित नसल्याने खटकत असावे..

बर्‍याच जणांना वाक्यरचना सहज वाटली नसावी असे वाटते

उदा.
उन्हास काय म्हणालो जरा पडून पहा >>> इथे वाक्यरचना नीट कळत नाही असे वाटते.. म्हणजे हेच बोली भाषेत लिहायचे म्हणले तर 'जरा काय एकदा उन्हास म्हणालो की पड जरा (हे ही थोडे खटकतेच) म्हणून काय धुक्यात वाट विरूच नये की काय पुन्हा' ह्याचे संक्षिप्त रूप असल्याने पोचत नाही रसिकांपर्यंत...

बाकी भुंग्याच्या म्हणण्यातही तथ्य असावे Happy

अरे हां! या गझलेच्या चालीत व वृत्तात ही गझल परफेक्ट आहे, आता सगळ्यांना वाचता येईल बघा Happy

'कठिन है राहगुजर, थोडि दूर साथ चलो'

मिलिंद - धन्यवाद Happy

-'बेफिकीर'!

व्वा!!

झपाट, ललाट, चिकचिकाट पुन्हा पुन्हा वाच्ण्याजोगे!
चिकचिकाट चा वापर फारच सुंदर पद्धतीने हाताळला आहे.
चिकचिकाट या अस्वच्छ अर्थाच्या शब्दानेही शेराचे सौंदर्य वाढविले आहे.

मस्त!