आता वसंत घाली, माझ्या मना भुरळ

Submitted by प्राजु on 27 December, 2011 - 15:11

शिशिरात सोसली मी, बेबंद पानगळ
आता वसंत घाली, माझ्या मना भुरळ

घासून काढलेले, माझ्या मनास मी
आभाळ शिंपुनी तू, त्याला जरा विसळ

नजरेत या जराशी, घालूनिया नजर
डोळ्यात माझिया तू, स्वप्ने तुझी मिसळ

सोडून सर्व चिंता, कर्तव्यही जरासे
फ़ुटकळ असे तसेही, बोलू अघळपघळ

मी गाज सागराची, गंभीर शांत पण
होऊन लाट तूही, हृदयात या उसळ..

घेऊ नकोस आढे-वेढे उगाच तू
आहे मनांत जेही, बोलून जा सरळ

स्पर्शू नको दुरूनी, नजरेतुनी मला
ओल्या मिठीत माझ्या, ये ना जरा वितळ

रचशील प्रेमकाव्ये, 'प्राजू' कधी पुन्हा
शब्दांत साठलेले, ऐश्वर्य तू उधळ

- प्राजु

गुलमोहर: 

छान!

अघळपघळच्या पहिल्या ओळीत एक गुरू वाढला असावा. Happy

बाकी खयाल आवडले. मक्ता नीट लक्षात आला नाही. विरामचिन्हांशिवायही ही गझल तितकीच अचूक वाचता यावी असे वाटते. मतला, मिसळ,उसळ आणि वितळ हे शेर सुंदरच! घासून काढलेले यातील काढलेले ह रूढ झालेले मराठी रूप असून त्या ऐवजी 'काढले बघ' असे केल्यास ते स्वच्छ व्हावे. कृगैन व चुभुद्याघ्या Happy

-'बेफिकीर'!