सीमोल्लंघन

Submitted by न.ना.गोखले on 30 September, 2011 - 21:31

|| श्री गुरुदेव ||
एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत येणे, वृत्ती अंतर्मुख होऊन चैतन्यमय होणे हा दसरा.
- प.पू.दासराम महाराज केळकर.

दहाला बाजूला सारून एकावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे दसरा. दशहरा असेच याचे नाव आहे.प्रकृतीनिर्मित जगाच्या पसाऱ्यात जीवाला अडकवणाऱ्या दाशइन्द्रीयांना हरवणे हे महत्वाचे कार्य. त्याचा आरंभ दसऱ्याला करायचा आहे.आपण आपल्या सोयीनुसार बऱ्याच गोष्टींचे अर्थ लावत असतो. सीमोल्लंघन दसऱ्याला करतात. म्हणजे ते आता प्रातिनिधिक स्वरूपातच राहिले आहे.शेतीची वगैरे सर्व कामे बरीचशी संपलेली असतात, बाहेर जाणे शक्य असते,म्हणून गावाच्या सीमा ओलांडून जाणे हे सीमोल्लंघन व्यवहारात मानले जाते.
परंतु हा एक अर्थ झाला.(माणसाने सोयीसाठी केला.) शरीराच्या इंद्रियांच्या,मनाच्या वृत्तीच्या,त्रिगुणांच्या,स्वभावाच्या संकुचीतापणाच्या,मी ,माझे या सीमा ओलांडून विश्वपाताळीवर जाण्यासाठी हा मुहूर्त आहे. एकदम कोणी जाऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी पाऊल तर टाकायला हवे. त्यासाठी हा मुहूर्त.
'हे विश्वचि माझे घर | ऐसी मति जयाची स्थिर |
किंबहुना चराचर | आपण जाहला ||' - ज्ञानेश्वरी
'चराचरी व्यापकता जयाची | अखंड भेटी मजला तयाची |
पदोपदी संगम पूर्ण झाला | विसरू कसा मी गुरुपादुकाला ||'
'जे जे भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत || '
'वासुदेव: सर्वमिती |' - गीता
या वचनांमध्ये जी विशालता आहे,व्यापकता आहे ती स्थिती गाठायची आहे. त्यासाठी हे संकेत आहेत. ही स्थिती शरीराभावाच्या स्थितीत गाठता येणार नाही हे तर उघडच आहे. देहभाव गेल्याशिवाय (देह नाही)आत्मभाव जागृत होतं नाही. देहाभावाची जी इंद्रीयाधिष्ठित अवस्था आहे ती जाऊन आत्मभावाची शुद्ध चैतन्याची अवस्था गाठायची आहे. तो खरा पराक्रम आहे.देहाभावाच्या संकुचित सीमा ओलांडून,
अखिल विश्वात जे भरून राहिले आहे, किंबहुना त्याशिवाय दुसरे काही नाहीच,त्या चैतन्याच्या असीम प्रदेशात पाउल टाकणे म्हणजे दसरा.
पण ही एका दिवसातली गोष्ट नाही. प्रत्येक रात्र ही नवरात्र, नवीन रात्र समजून साधना करायची आणि गुरुकृपेने दसऱ्याचे सीमोल्लंघन करायचे ही तळमळ पाहिजे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरीराच्या इंद्रियांच्या,मनाच्या वृत्तीच्या,त्रिगुणांच्या,स्वभावाच्या संकुचीतापणाच्या,मी ,माझे या सीमा ओलांडून विश्वपाताळीवर जाण्यासाठी हा मुहूर्त आहे. एकदम कोणी जाऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी पाऊल तर टाकायला हवे.

पण ही एका दिवसातली गोष्ट नाही. प्रत्येक रात्र ही नवरात्र, नवीन रात्र समजून साधना करायची आणि गुरुकृपेने दसऱ्याचे सीमोल्लंघन करायचे ही तळमळ पाहिजे. >>> अगदी खरं आहे.

प्रत्येकाने स्वतःलाच विचारायचं की मला नक्की काय हवं आहे? मग एखादी आपल्याला हवी असलेली गोष्ट सुचेल, एखादं ध्येय आठवेल. मग म्हणायचं, ते मिळाल्यावर तू पुर्ण सुखी होशील का? उत्तर मिळेल 'नाही'. कारण आधीचं साध्य झाल्यावर नविन काहीतरी हवंच असणार आपल्याला. असं करता करता आपल्याला एका क्षणाला जाणवतं की ह्या सगळ्या हव्या असलेल्या गोष्टी आपल्याला जीवन चालू रहाण्याच्या प्रक्रियेत हव्या आहेत पण त्यांपासून मिळणारं सुख हे शाश्वत नाही. ज्या गोष्टी नश्वर आहे त्यांपासून मिळणारं सुखही नश्वरच असणार आहे. मग आपला शोध सुरु होतो की शाश्वत काय आहे? एखादा मग त्या शोधात श्रीगुरुचरणांपाशी पोहोचतो व त्याचा शोध संपतो. नंतर आपल्या रुटीन जीवनातल्या गोष्टी आपण स्वकष्टाने, राजमार्गाने मिळवतो, काही ध्येयं साध्य करतो पण त्यात आपण गुंतत नाही. एकदा शाश्वत समजल्यावर या गोष्टी मिळाल्या तरी आनंदाने हुरळून जात नाही आणि न मिळाल्या तरी कोलमडून जात नाही. कारण नश्वर गोष्टी न मिळाल्याचं दु:खही नश्वरच आहे हे आपल्याला कळलेलं असतं. मग आपण ठरवतो की जी शाश्वताची जाणीव आपल्याला झालेली आहे तीची विभक्ती काहिही झालं तरी होऊ द्यायची नाही. हेच ते ऐहिकात राहूनही ऐहिकाच्या सीमेबाहेर पडणं.

सर्वांना सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा Happy

सर्वांना दसर्‍याच्या आणि सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा !!!!! Happy
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !!!!!

एखादा मग त्या शोधात श्रीगुरुचरणांपाशी पोहोचतो व त्याचा शोध संपतो.>>> १००% अनुमोदन !!!!