परीस

Submitted by क्रांति on 30 June, 2011 - 15:03

खुशीत यावा पहाटवारा, धुके झरावे हळूहळू
सुगंध माळून सायलीने फुलून यावे हळूहळू

मिटून जाव्या जुन्या खुणा अन् तुटून जावीत बंधने,
नव्या दिशेला नवीन वाटेवरून जावे हळूहळू

उगाच काटे जपायचे की मनाप्रमाणे फुलायचे,
झुरायचे की झुलायचे हे तुला कळावे हळूहळू

उदासवाण्या नको विराण्या, नवे तराणे मला हवे,
अबोल तारा सुरांत येता सुनीत गावे हळूहळू

पुन्हापुन्हा आठवांत राती सरायच्या, ओसरायच्या
कळ्या स्मृतींच्या खुडून, जावे उडून रावे हळूहळू!

असा मिळावा परीस ज्याने सुवर्ण व्हाव्यात वेदना,
व्यथेस यावा झळाळ, दु:खास तेज यावे हळूहळू

गुलमोहर: 

व्यथेस यावा झळाळ, दु:खास तेज यावे हळूहळू>>>

दर्जेदार, उमदी, आपल्या लौकिकास साजेशी व संतुलीत, मस्त गझल! Happy

('त' या अक्षराचीमात्र उणीव जाणवली तीन ठिकाणी)

-'बेफिकीर'!

( नवे तराणे मला हवे'त', जावे'त' उडून रावे, मिटून जाव्या'त' जुन्या खुणा वगैरे )

Happy

खूप शुभेच्छा व अभिनंदन!

उगाच काटे जपायचे की मनाप्रमाणे फुलायचे,
झुरायचे की झुलायचे हे तुला कळावे हळूहळू

क्या बात है...

असा मिळावा परीस ज्याने सुवर्ण व्हाव्यात वेदना,
व्यथेस यावा झळाळ, दु:खास तेज यावे हळूहळू

फारच अश्वासक आणि उमदी सकारात्मक गझल.

क्रांतीजी अभिनंदन ...

उगाच काटे जपायचे की मनाप्रमाणे फुलायचे,
झुरायचे की झुलायचे हे तुला कळावे हळूहळू

............खूप आवडला बाकी नेहमी प्रमाणे!!!भारी!

उगाच काटे जपायचे की मनाप्रमाणे फुलायचे,
झुरायचे की झुलायचे हे तुला कळावे हळूहळू

क्या बात है...

मस्त !

क्रांती ताई
सहीच.....! Happy

<असा मिळावा परीस ज्याने सुवर्ण व्हाव्यात वेदना,
व्यथेस यावा झळाळ, दु:खास तेज यावे हळूहळू>

मस्तच!

गझल सुंदरच.. आपल्या लौकिकास सार्थ करणारी...
पण
कळ्या स्मृतींच्या खुडून, जावे उडून रावे हळूहळू!
याचा अन्वय सांगाल?

उगाच काटे जपायचे की मनाप्रमाणे फुलायचे
......
असा मिळावा परीस ज्याने सुवर्ण व्हाव्यात वेदना,
.....
अन सगळे "हळूहळू" फार फार आवडले Happy

पुन्हापुन्हा आठवांत राती सरायच्या, ओसरायच्या >>> सरायच्या, ओसरायच्या >>> सहज सरळ सुंदर!
कळ्या स्मृतींच्या खुडून, जावे उडून रावे हळूहळू!

असा मिळावा परीस ज्याने सुवर्ण व्हाव्यात वेदना, >>> बोहोत्तच खूब!!!!!!!
व्यथेस यावा झळाळ, दु:खास तेज यावे हळूहळू

दोन्ही शेर आवडले!

धन्यवाद मंडळी.

नचिकेत, कळ्या स्मृतींच्या.............संबंधी..........

रोज भल्या सकाळी पाखरांचे थवे समोरच्या औदुंबरावर फळं खायला येऊन बसतात. एके दिवशी वेगळेच आवाज आले, म्हणून पहाते, तर छानसा पोपटांचा थवा पिवळ्या घंटेच्या [यलो बेल्स] झाडावर कळ्या वेचत बसलेला, बराच वेळ हा खेळ चाललेला त्यांचा आणि मग जशी मुलांची गर्दी वाढली, तसा तो थवा कलकलत उडून गेला मनात या द्विपदीचं बी रुजवून! Happy

क्रांतिताई, अन्वय हवा होता...
अर्थासाठी फारशी अडचण नाही आली.. अर्थात तुमच्या स्पष्टीकरणामुळे तो अर्थ अजून सुंदर झालाय... Happy
कळ्या स्मृतींच्या खुडून, जावे उडून रावे हळूहळू! - रावे उडून जावे की गेले?
कळ्या स्मृतींच्या खुडून, गेले उडून रावे हळूहळू! असं असायला हवं होतं का?

नचिकेत, जावे यासाठी घेतला, की जितक्या सहजपणे झाडांच्या कळ्या खुडून पक्षी उडून गेले, तशाच आठवणीही त्यांनी न्याव्या वेचून, खुडून. वरच्या ओळीतला 'सरायच्या ओसरायच्या' हा भूतकाळ नाही, तर वर्तमानात आणि भविष्यातही अव्याहत, अखंड सुरू रहाणारी ती प्रक्रिया आहे. ती कुठेतरी थांबावी, म्हणून
'कळ्या स्मृतींच्या खुडून, जावे उडून रावे हळूहळू!'

त्या आठवणी हव्याशाही आहेत आणि नकोशाही, म्हणून हळूहळू त्या दुरावत जाव्यात!
जुन्या वाटा सोडायच्या आणि नव्या दिशेला जायचं तर जुन्या आठवणींचं कोठार हळूहळू रितं करायला हवं ना? पण ते आपण नाही करू शकत, म्हणून पाखरांनी ते करावं! Happy

क्रांती, ह्या गझलेच्या मी एकदम प्रेमात! Happy इतकी गोड गझल आहे की पुन्हा पुन्हा वाचत रहावीशी वाटतेय... तिचा आस्वाद घेतच रहावासा वाटतोय...निवडक १० त नोंदवत आहे. Happy

पुन्हापुन्हा आठवांत राती सरायच्या, ओसरायच्या
कळ्या स्मृतींच्या खुडून, जावे उडून रावे हळूहळू!>>> हा शेर अन्वयार्थ समजल्यावर तर प्रचंड आवडला... ह्यातील भावार्थाच्या अगदी विरुद्ध विचार असलेल्या पण तरीही तितक्याच भावलेल्या उल्हास भिडेंच्या कवितेतील ओळीच या निमित्ताने आठवल्या. तुमचाही प्रतिसाद तिथे आहेच...पण तरीही संदर्भासाठी इथे देतेय.

निरोप घेउन निघेन जेव्हा अनंतात मी विलिन व्हावया
सांग विधात्या देशिल का रे आठवणी या सवे न्यावया

ही त्या कवितेची लिंकः आठवणी