हौस-मौज. 'घराचे इंटेरियर' या क्षेत्राकडे फक्त व्यवसाय म्हणून न बघता त्याच्यात असलेली ग्राहकांची भावनिक गुंतवणूक समजून घेऊन त्याच्या घरातल्या जागेला योग्य तो न्याय मिळाल्यावर त्याच्या चेहेर्यावरचे समाधान- हे त्या कामातून मिळालेल्या नफ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त किंमतीचे समजणारे सुनिल गरूड हे 'हौस-मौज'चे मालक. 'हौस-मौज' या नावापासूनच त्यांची कल्पकता आणि हेतू- दोन्ही व्यवस्थित समजतात. समाधान झालेले ग्राहक जेव्हा स्वतःच त्यांच्या मित्रांना 'हौस-मौज'चे नाव सुचवतात, तेव्हाच सुनिल गरूडांच्यातला उद्योजकतेला रीतसर पावती मिळते. या समाधानी ग्राहकांमध्ये पुण्यात घर घेतलेले, पण परगावी / परदेशी स्थायिक झालेले अनेक आहेत. ज्या विश्वासाने, आणि डोळे झाकून ते 'हौस-मौज'वर आपले घर आणि जागा सोपवतात- तो विश्वास कमावणे हे किती सोपे होते, किती अवघड होते- हे त्यांच्याशी झालेल्या छोटेखानी हितगुजातून जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
प्रश्न- कसा सुरू झाला तुमच्या या व्यवसायाचा हा प्रवास?
सुनिल- अगदी सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मी शोरूम थाटले. काय कारणे असतील ती असोत, पण या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ट्रेडिंगसारख्या व्यवसायातही आम्ही आमचा एक खास ग्राहकवर्ग थोड्याच वर्षांत तयार करण्यात यश मिळवले. ग्राहकाभिमुख सेवा, नुसत्याच वस्तू मांडून ठेवून आहे ते घ्यायला लावणे- यापेक्षा टीव्ही, फृज, वॉशिंग मशिनच्या निरनिराळ्या ब्रँड्सची, प्रत्येकाच्या खासियतीच्या जास्तीत जास्त माहिती देऊन त्यांच्या निर्णयप्रक्रियेत होईल तेवढी मदत करणे. आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन आवश्यक तो पाठपुरावा करणे, यावर सुरूवातीपासूनच आम्ही भर दिला. मग अनेक ग्राहकांच्या सूचनेनुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबतच रेडिमेड फर्निचरही ठेवायला सुरूवात केली. थोड्याच दिवसांत लक्षात आले, की व्यवसाय कुठचाही असो, त्यात यशस्वी व्हायचे असेल, तर आम्ही आधीच्या व्यवसायात पाळत असलेली तत्वे सर्वत्र सारखीच असतात! मग रेडिमेड फर्निचरच्या विक्रीसोबतच घराच्या इंटेरियरबाबत निर्णय घेण्यासाठी ग्राहकांना आवश्यक ती मदतही करू लागलो. याला हळूहळू अनौपचारिक कंसल्टन्सीचे स्वरूप येऊ लागले. दरम्यान इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व्यवसायात अनेक मोठी आऊटलेट्स येऊ लागली होती, आणि त्यात गळेकापू स्पर्धाही. त्यांच्यात किंमती कमी करण्याच्या नादात ग्राहकांना योग्य सल्ले देणे, योग्य सर्व्हिस देणे याकडे दुर्लक्ष होत असलेले पाहूनही वाईट वाटत होते. इंटेरियर-फर्निचरच्या संदर्भात जे काही नवीन काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते त्यात आपण पुढे आणखी बरेच काही करू शकतो असा आत्मविश्वास वाटू लागला. आणि कोथरूडमधल्या 'हौस-मौज' चा जन्म झाला. 'तुमच्या हौसेचे मोल आम्ही जाणतो' हे आमचे स्लोगन! सामान्य माणसाचे सारे जगच 'घर' या कल्पनेभोवती फिरत असते. सामान्य मध्यमवर्गीय माणसाचे घरासोबतचे भावविश्व- हा माझा जिव्हाळ्याचा विषय. आमच्या जाहिरातींमध्येही त्याचे त्याच्या घराशी असलेले नाजूक नाते- हीच थीम ठेवली. आम्ही जाहिरातीत फोटो कधीच वापरले नाहीत- याचे त्या जाहिराती बघणार्यांनाच नव्हे तर आमच्यातल्या काही समव्यावसायिकांनाही नवल वाटे. सामान्य माणसाच्या घराशी आम्ही दाखवलेली मनःपूर्वक जवळिक आमच्या ग्राहकांचे मन जिंकून गेली. 'फ्री साईट व्हिजिट' आणि 'फ्री डिझाईनिंग, कंसल्टिंग' सारख्या व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस तर पहिल्यापासूनच होत्या. आणि खरे तर नंतर कधी फारशी जाहिरातींची गरजच पडली नाही, इतके भरभरून काम आमच्या ग्राहकवर्गाने आम्हाला दिले!
प्रश्न- तुमच्या या व्यवसायात कोणत्या समस्यांचा सामना सतत करावा लागतो असे तुम्हाला वाटते?
सुनिल- प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम, जागा आणि बजेट वेगळे हाच. म्हणजे आमच्या सार्या व्यावसायिकांचा असतो तोच. पण आता नीट विचार केला, तर याच गोष्टी अत्यंत सुंदर पद्धतीने आमच्यासमोर 'संधी' बनून पुढे आल्याचं जाणवतं. प्रत्येक प्रश्न हे आव्हान म्हणून स्वीकारले तर आपल्यासाठी नवे दरवाजे उघडतात- हे जगप्रसिद्ध वचन इथेही लागू होतेच! दुसरे म्हणजे कच्च्या मालाच्या आणि वर्कमनशिपच्या दर्जामध्ये कुठेही तडजोड न केल्याने काही ग्राहकही सोडावे लागले, काही नाराज झाले. पण तो आता धोरणाचा भाग झाला आहे. याच धोरणामुळे आम्हाला अनेक ग्राहक आजवर मिळालेले आहेत- हेही विसरून नाहीच चालणार. सतत प्रशिक्षित करत राहावा लागणारा कामगारवर्ग; त्यांचे स्वभाव, लहरी आणि या सार्यांची प्रॉडक्टिव्हिटीशी आणि ग्राहकाच्या अपेक्षांशी सतत घालावी सांगड यातही बरीचशी शक्ती खर्ची पडते. ग्राहकाला काय म्हणायचे आहे, ते नीट कळत नाही, हीही समस्याच ठरते कधी कधी. यात आम्ही आता १२ वर्षांनंतर बर्यापैकी कौशल्य मिळवलेय, असे म्हणायला हरकत नाही!
प्रश्न- या व्यवसायात आणखी काय नवीन करावेसे वाटते आहे? किंवा इतर कुठचा व्यवसाय करण्याची इच्छा?
सुनिल- 'कंप्लीट इंटेरियर सोल्युशन्स' हा माझा धंदा. यात आता आम्ही नवीन घर ग्राहकाच्या ताब्यातून घेऊन संपूर्ण फर्निश करून देऊन कुलूप किल्लीसह त्याला सुपूर्त करू लागलो आहोत! म्हणजे त्यात कस्टमाईज्ड आणि रेडिमेड फर्निचर तर आलेच. पण पीओपी, इलेक्ट्रिफिकेशन आणि प्रकशव्यवस्था- मूड लाईटिंग वगैरे, पेंटिंग, वॉलपेपर्स, पडदे- फर्निशिंगचे काम आणि वस्तू, अॅक्सेसरीज इ., शोभेच्या वस्तू आणि शोकेस, कुंड्या आणि प्लँट्स, गार्डन फर्निचर आणि इक्विपमेंट्स हे सारे आले. हे सारे एकाच वेळी आणि एकच थीम मनात ठेऊन एकाच माणसाने (किंवा हौसमौजने) केल्याने त्याचा 'एकत्रित परिणाम' अर्थातच सुरेख आणि लक्षात राहण्याजोगा होतो- हे वेगळे सांगणे नकोच.
काम आवडून कौतुकाचे शब्द कानी पडले, की धन्य वाटते. या व्यवसायात आता छान रमलो आहे. अजून खूप काही करून दाखवायची इच्छा आहे. खूप लोकांना त्यांच्या मनासारखे घर सजवून द्यायचेय. वेगळ्या व्यवसायाचा अर्थातच सध्या विचार नाही केलाय.
प्रश्न- नव्याने हा व्यवसाय करू बघणार्यांना काही सांगू इच्छिता? काही आवडते, स्वतःला पटलेले असे 'कोट' वगैरे?
सुनिल- लिसनिंग इज ए ग्रेट पॉवर हेही, आणि तुमच्या ग्राहकाशी किंवा होऊ घातलेल्या ग्राहकाशी जास्तीत जास्त बोला हेही. त्यांना बोलते करण्यातून बरेचसे प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतात! स्पेसिफिकली, या व्यवसायाच्या दृष्टीने, आणि त्यांचे घराशी असलेले नाते नीट समजून उमजून घेऊन बोललो तर त्यातून तो अर्थातच भावनिक दृष्ट्या जवळ येतो. मन मोकळे करतो. त्यातून त्याला हवे असलेले तो जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आपले काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी हे आवश्यक आहे!
याशिवाय, तुमच्या स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्स डिझाईन करा. त्यांचा सातत्याने पाठपुरावा करा. प्रसंगी कटुताही येईल, पण तुमच्या व्यवसायाच्या आरोग्याच्या दॄष्टीने ते आवश्यक आहे!
अरे वा. मस्तच. 'कंप्लीट
अरे वा. मस्तच.
'कंप्लीट इंटेरियर सोल्युशन्स' हि कन्सेप्ट आवडली. भारतात नविनच आहे असे वाटते.
तुमच्या व्यवसायासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
लिसनिंग इज ए ग्रेट पॉवर हेही,
लिसनिंग इज ए ग्रेट पॉवर हेही, आणि तुमच्या ग्राहकाशी किंवा होऊ घातलेल्या ग्राहकाशी जास्तीत जास्त बोला हेही. त्यांना बोलते करण्यातून बरेचसे प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतात! स्पेसिफिकली, या व्यवसायाच्या दृष्टीने, आणि त्यांचे घराशी असलेले नाते नीट समजून उमजून घेऊन बोललो तर त्यातून तो अर्थातच भावनिक दृष्ट्या जवळ येतो. मन मोकळे करतो. त्यातून त्याला हवे असलेले तो जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आपले काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी हे आवश्यक आहे!
फार सुंदर विचार.नवीन उद्योजकांनी लक्षात घावे असे.
छान, धन्यवाद !
छान, धन्यवाद !
तुमच्या व्यवसायासाठी
तुमच्या व्यवसायासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
तुमच्या स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्स डिझाईन करा. त्यांचा सातत्याने पाठपुरावा करा. प्रसंगी कटुताही येईल, पण तुमच्या व्यवसायाच्या आरोग्याच्या दॄष्टीने ते आवश्यक आहे!>>>>>> नक्कीच
धन्यवाद !!!
घराचे इंटेरियर हा खरंच
घराचे इंटेरियर हा खरंच जिव्हाळ्याचाच विषय झाला आहे. चांगली माहिती कळाली. 'हौस- मौज' ला अनेक शुभेच्छा. धन्यवाद!
सुनिल गरूड यांच्यासाठी काही
सुनिल गरूड यांच्यासाठी काही प्रश्न असल्यास कृपया इथे प्रतिसादात लिहावेत. त्यांच्यापर्यंत ते पोचवले जातील आणि त्यांची उत्तरेही इथेच ते स्वतः देतील.
मस्त ! मनःपुर्वक शुभेच्छा
मस्त ! मनःपुर्वक शुभेच्छा
शुभेच्छा....
शुभेच्छा....
गरूड साहेब, शुभेच्छा. मी कलर
गरूड साहेब, शुभेच्छा.
मी कलर कन्सल्टन्सी मध्ये काम केले आहे. तुमची सेवा मुंबईत उपलब्ध आहे का? तुम्ही भाडयाच्या घराचे इंटेरिअर करता का?
मस्तच... सुनिल गरूड यांना
मस्तच... सुनिल गरूड यांना पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा!
सुनिल गरूड यांचा माबो आयडी
सुनिल गरूड यांचा माबो आयडी काय आहे....मला उद्योजक ग्रुपमध्ये सापडला नाही.......
संपर्क कसा करायचा गरुड
संपर्क कसा करायचा गरुड साहेबांना? माझ्या छोट्याश्या घरासाठी मला इंटेरिअर सोलुशन हवंय
नवीन फ्लॅटचे इंटेरियर बघून
नवीन फ्लॅटचे इंटेरियर बघून माहित आहे. परंतू, पुण्यात अजूनही बर्याच ठिकाणी वाडे सुस्थितीत आहेत. तर अशा एखाद्या वाड्यातल्या / जुन्या पद्धतीच्या घराचे आपण इंटीरियर डिझाईन केले आहे का? असल्यास एखादा फोटो येथे बघायला मिळेल का? धन्यवाद.
छान! सुनिल गरुड शुभेच्छा!
छान! सुनिल गरुड शुभेच्छा! तुम्ही लहान 1bhk फ्लॅटचे इंटिरिअर करता का?
अगदीच इवलीशी आहे मुलाखत...
अगदीच इवलीशी आहे मुलाखत... अजून वाचायला आवडले असते.
मुलाखत आवडली. पुढील
मुलाखत आवडली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
कामाच्या गडबडीत सुनिल गरूड
कामाच्या गडबडीत सुनिल गरूड अजून मायबोली आयडी घेऊ शकलेले नाहीत. त्यांनी वरच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे इथे लिहितो.
तुमची सेवा मुंबईत उपलब्ध आहे का? तुम्ही भाडयाच्या घराचे इंटेरिअर करता का?
अनेक कारणांमुळे मुंबईत कामे मिळूनही अजून केलेले नाही. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजर राहणे हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. रिसोर्सेसचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे हेही. या सार्या गोष्टींचा विचार करता पुण्याबाहेरील कामाला मी सध्या तरी न्याय देऊ शकेन असं वाटत नाही. भविष्यात मात्र करण्याची इच्छा आहेच.
भाड्याच्या घराचे इंटेरियर अर्थातच करतो. ग्राहकाच्या गरजेनुसार फिक्स आणि मुव्हेबल असं काँबिनेशन करता येतच. शिवाय थोडे रेडिमेड फर्निचरही वापरता येते. मग जागा बदलल्यावर दुसर्या ठिकाणी सहजच वापरता येते.
वाड्यातल्या / जुन्या पद्धतीच्या घराचे आपण इंटीरियर डिझाईन केले आहे का?
अजून तरी नाही केले. (वाडे पाडून नवी घरे उभी राहतात- त्यांचे इंटेरियर अर्थातच अनेक वेळा केलेले आहे.)
वाडा आणि त्याचा काही पिढ्यांपूर्वीचा जूना/परंपरागत असा लूक / फील सांभाळून इंटेरियर करणे- हे म्हणत असाल, तर ते फारच कौशल्याचे काम आहे. जुने बांधकाम काही रासायनिक प्रक्रिया वापरून पक्के करणे, जतन करणे- हा महत्वाचा भाग त्यात इंटेरियर करण्याआधी येतो. ज्याचा माझ्या व्यवसायाशी अजून तरी फार संबंध आला नाही. हे झाले तरी नंतरचा, म्हणाजे इंटेरियरचा भाग करण्यासाठी मोठा अभ्यास, अनुभव आणि व्यासंग लागतो. हे सारे कधीतरी अर्थातच करायची इच्छा आहेच.
तुम्ही लहान 1bhk फ्लॅटचे इंटिरिअर करता का?
हो. जागा किती मोठी अथवा छोटी आहे, हे फारसे महत्वाचे नाही. (अवांतर- 'माझी छोटी जागा इतकी मोठी आहे, हे मला आजवर कळलंच नव्हतं!' असं माझे एक ग्राहक त्याचं इंटेरियरचं काम झाल्यानंतर म्हणाल्याचं आता आठवलं!)
धन्यवाद.
योग, उद्योजक मुलाखती आटोपशीर
योग,

उद्योजक मुलाखती आटोपशीर व्हाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांनी वाचाव्यात या दृष्टीने मूळ मुलाखतीत निवडक पण महत्वाचे प्रश्न असावेत, अशी मायबोली प्रशासनाची सूचना आहे.
आणखी प्रश्न अर्थातच प्रतिसादात विचारता येतील. आणि ज्यांची मुलाखत घेण्यात आली आहे, ते (शक्य झालं तर, रीतसर उद्योजक ग्रुपचे सदस्य होऊन) प्रतिसादातच उत्तर देतील- अशी कल्पना आहे. जास्तीत जास्त 'इंटरअॅक्टिव्ह' अशा स्वरूपाचे हे सदर व्हावे, हा हेतू.
प्रतिसादांत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं स्वागत आहे.
पुण्यात होणार्या उद्योजक गटग
पुण्यात होणार्या उद्योजक गटग ला आपल्याला भेटायला आवडेल.....वेळात वेळ काढुन नक्की या..........
धन्यवाद साजिरा. ते म्हणतायत
धन्यवाद साजिरा. ते म्हणतायत ते अगदी खरंय. तो शाही इतमाम सांभाळायचा म्हणजे कौशल्याचे आहेच आणि खर्चिकही.