बदनाम पहिल्यासारखा - तरही

Submitted by विशाल कुलकर्णी on 8 April, 2011 - 07:25

********************************************************
नाही जमाना राहिला निष्काम पहिल्यासारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा

वागेन पुंडासारखा आता पुन्हा मी लोकहो
आहे अजूनी तोच मी बदनाम पहिल्यासारखा

कंटाळलो सांभाळता माझेच हे थोतांड मी
सोडेन खोटी नम्रता, उद्दाम पहिल्यासारखा

आता नको मोठेपणा मिरवायला खोटारडा
पुन्हा जुना वाटेन मी बेफाम पहिल्यासारखा

जगलोच जेत्या सारखा मृत्यूसही ललकारतो
भोगावया तय्यार मी परिणाम पहिल्यासारखा

उरली न चिंता जिंकण्याची हरवले मोहास मी
माझा न मी माझ्यातही सुतराम पहिल्यासारखा

का घाबरू मी दर्पणा नाहीच केलेला गुन्हा
वेड्या विशाला, "वाग आता ठाम पहिल्यासारखा!"

********************************************************
विशाल

गुलमोहर: 

जगलोच जेत्या सारखा मृत्यूसही ललकारतो
भोगावया तय्यार मी परिणाम पहिल्यासारखा

का घाबरू मी दर्पणा नाहीच केलेला गुन्हा
वेड्या विशाला, "वाग आता ठाम पहिल्यासारखा!"

हे शेर आवडले. सफाईदार गझल, लिहीते रहा Happy

ओह! अलामतीचं मी बघीतलंच नव्हतं...विशाल लीलया दुरूस्त करू शकाल आपण.

धन्यवाद!

विशालराव,

बदल करून आता पुढचे काही काफिये चुकलेत. असो, मी आता किस पाडत नाही, इतर कुणी सांगायचे असले तर सांगतील. आपणास मी मित्र समजतो.

गझल आवडली विशालजी,

विशेषत:
उरली न चिंता जिंकण्याची हरवले मोहास मी
माझा न मी माझ्यातही सुतराम पहिल्यासारखा

******कंटाळलो सांभाळता माझेच हे थोतांड मी
.......सोडेन खोटी नम्रता, उद्दाम पहिल्यासारखा ******मध्ये-

(होईन) उद्दाम पहिल्यासारखा--तुटल्यासारखे झाले.

<<मतल्यातील काफिया पूर्णत: पाळायचा नसल्यास दुसर्‍या शेरात तसे स्पष्ट करावे,
ते तसे केल्यास चालते>> अशी चर्चा दुसर्‍या एका संकेतस्थळावर वाचली आहे.
त्यात पूर्वेच्या गझलेचाही संदर्भ दिला आहे.
सध्या मी त्याची लिन्क देत नाही.
वेळ मिळाल्यास शोधून मी लिन्क देईन, बहुतेक 'नचिकेत' यांनी ही चर्चा केली होती.

आत्ताच सापडली!! मात्र त्यात एकमत झालेले दिसत नाही Sad

http://www.marathigazal.com/node/73
http://www.marathigazal.com/node/44

रामकुमार

मतल्यातील काफिया पूर्णत: पाळायचा नसल्यास दुसर्‍या शेरात तसे स्पष्ट करावे,
ते तसे केल्यास चालते>>

सहमत! अपवाद म्हणून हे चालते! (अपवादात्मक शेर असल्यास अशी सूट घेतली जायची)