नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल न्यू जर्सी मधे 'जी जैसी आपकी मर्जी' (लेखिका: नादिरा बब्बर) चा प्रयोग पाहिला.
एकदा तरी पहावा असा उत्कृष्ट प्रयोग..

मुक्ता बर्वे आणि नीना कुलकर्णी यांचे छापा काटा बघितले. तसे ठीकठाक आहे पण शेवट अगदीच ठोकळेबाज झाला असे वाटले.
रीमा असताना पाहायचे होते पण राहून गेले. कुठल्याशा पेपरमध्ये आलेलं परीक्षण वाचलेले. केवळ आईच्या स्वभावाबद्दल त्यात लिहिले होते त्यामुळे एक नेगेतीव्ह प्रतिमा तयार झालेली, खूप जड जाईल असे वाटलेले. तरीही मुक्ता आणि रीमासाठी बघायची इच्छा होती. पण दुसरा अंक एकदम अनपेक्षित होता.
परीक्षण वाचून आईची व्यक्तिरेखा वरवर निरागस असावी असे वाटले होते पण प्रत्यक्षात बरीच खाष्ट आहे. जाणून बुजून मुलीच्या भल्याचा विचार न करणारी आई तितकीशी मनाला भिडली नाही. कदाचित आपलं पारंपारिक मन मानायला तयार नसेल. त्यात नीना कुलकर्णी सुद्धा खाष्ट वाटली आणि रीमाने आई कशी केली होती असावी ह्याबद्दल जाम कुतूहल चाळवलय.
परीक्षण वाचून धाडसी प्रयोग वाटलेला. शेवट थोडा वेगळा असता तर खरच तसं म्हणता आलं असतं.
३.५/५

परवा २ अंकी "वाडा चिरेबंदी" पाहिलं. महेश एलकुंचवार यांचं.
(मूळ नाटक ३ अंकी आहे म्हणे).

"झी नाट्य गौरव पुरस्कार" मध्ये याची झलक पाहिल्याने उत्सुकता वाढली होती. आणि त्या सीन मुळे नाटक फार सिरीयस किंवा रडकं असेल असं वाटलं होतं.

प्रत्यक्षात मात्र नाटक बरंच लाईट आहे. पंचेस सुंदर आहेत. कुणालाही खलनायक न केल्याने आश्चर्ययुक्त आनंद आणि आदर दाटून आला.

नाहीतर दोन भावांचा वाद म्हणजे त्यातला एक वाईट, बेपर्वा, नात्यांना महत्व न देणारा, छानछौकीत राहाणारा आणि दुसरा मरमर मरणारा, सारखा दुसर्‍या भावाची काळजी करणारा असा दाखवतात. याहीपेक्षा विशेष म्हणजे जावा-जावा तर जन्माच्या वैरीणी, महान स्वार्थी, अपार प्रेम असलेल्या दोन भावांच्या नात्यात क्लिमिष आणणार्‍या अश्याच जास्तकरुन पाहिल्या आहेत चित्रपटात वगैरे. त्या पार्श्वभुमीवर इथे दोघी आपापल्या जागी खुप योग्य वाटतात. यात मात्र पुर्ण चांगली किंवा पुर्ण वाईट माणसं न दाखवता तुमच्या-माझ्यासारखी कडुगोड माणसं दाखवली आहेत.

नाटकाच्या तिकिटाचे पैसे बरेचसे अभिनयानेच वसूल झाले. सर्वांचाच अभिनय मस्त झाला आहे. निवेदिता सराफ भाव खाऊन गेली आहे.

तरीही नाटकाला एखादा चांगला शेवट असावा असं वाटून गेलं. म्हणजे हॅपी एंडींग वगैरे. प्रत्यक्षात मात्र नाटक 'इन द मिडल ऑफ नोव्हेअर' संपतं.

या नाटकाचे दोन सिक्वल सुद्धा आहेत असं त्या दिवशी "झी नाट्य गौरव पुरस्कार" मध्ये सांगितलं. तेही आलेत का रंगभुमीवर?

नाटकाचे दोन सिक्वेल नव्हते तर त्रिनाट्यधारा म्हणुन एक सलग प्रयोग होता. मूळ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी " झिम्मा " या पुस्तकात मूळ प्रयोगाबाबत सविस्तर लिहिलेले आहे. पण हि त्रिनाट्यधारा त्यांनी नव्हे तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी ( बहुतेक ) दिग्दर्शित केली होती. या नाटकाचे हिंदी रुपांतर " हवेली बुलंद थी " या नावाने दूरदर्शनवर सादर झाले होते.

वास्तुपुरुष या चित्रपटातही मला या नाटकाचे प्रतिबिंब दिसले.

बरीच वर्षं झाली मराठी नाटक बघितले नाहे आहे .सध्या कुठ्ले चांगले नाटक आहे का चालु ?
( कल्पना आहे की "चांगले " हा शद्ब फार सापेक्ष आहे. Happy )

मला साधारण थोडी सस्पेन्स / थ्रिलर टाईप्स , किन्वा हलकाफुलका नर्म विनोद असलेली आवडतात.
फार गंभीर विशय , राजकीय ,सामाजिक अशा प्रकारची आवडत नाही .

त्रिनाट्यधारा पुण्यात पाहिले होते. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशी तीन नाटके. वाडा चिरेबंदीचीच कथा पुढच्या दोन नाटकांत पुढे नेली होती. पण सगळ्यात वाडा चिरेबंदीच उजवे आहे. मूळ तीन अ़ंकी नाटकाचा शेवटही योग्य तसा केला आहे त्यामुळे कथा अजून पुढे वाढवण्याचे प्रयोजन कळले नाही. त्यावेळी नाटकात सचिन खेडेकर होता..उत्तम काम केले होते.
आता त्रिनाट्यधारेचा प्रयोग परत होतो की नाही ते माहीत नाही.

मला साधारण थोडी सस्पेन्स / थ्रिलर टाईप्स << लव्हबर्डस आणि कहानी मे ट्विस्ट ही दोन नाटके सध्या सुरू आहेत.

मला आठवताहेत ती मराठी नाटकातली सिक्वेल्स अशी.

अश्रुंची झाली फुले - घरात फुलला पारीजात
सामना ( चित्रपट ) - दुसरा सामना ( नाटक )

कल्पवृक्ष कन्येसाठी - दिवा जळू दे सारी रात ( याबाबत खात्री नाही )

आणखी काही होती का ?

"पती सगळे ऊचापती" पाहिलं बालगंधर्वला. सीडीवर पाहिलेलं बरंच बरं होतं त्या पेक्षा. पहिल्या ५ रांगा सोडल्या तर पूर्ण सभागृह रिकामं होतं.

चेतन दळवी सोडून पूर्ण नवा संच. उगाच पुतळे उभे केल्यासारखे. चेतनला एकट्याच्या खांद्यावर ओढावं लागलं पूर्ण नाटक.

रीही नाटकाला एखादा चांगला शेवट असावा असं वाटून गेलं. म्हणजे हॅपी एंडींग वगैरे. प्रत्यक्षात मात्र नाटक 'इन द मिडल ऑफ नोव्हेअर' संपतं.>> हाच तर पर्फेक्ट एन्ड आहे नाटकाचा. आणि पहायला गेलं तर त्यातल्यात्यात हॅपीही आहे. पैसे गेले, पण मुलगी शाबूत परत मिळाली. नाती कदाचित सांधली जातील, कदाचित नाही, पण संपूर्ण तुटली नाहीत. प्रत्यक्षाच्या अतिशय जवळ जाणारं नाटक ज्यात कोणीच बरोबर नाही आणि कोणीही चूक.
काय संवाद आहेत नाटकाचे!! एकेक शब्द चपखल. ना कमी ना जास्त. एलकुंचवार इज एलकुंचवार. वाडा इज वाडा इज वाडा! Happy

मिलिंद बोकीलांच्या 'समुद्र'वर आधारित 'समुद्र' पाहिलं. कादंबरीचा आणि त्याचमुळे नाटकाचा जीव लहान आहे. पण नाट्यरूपांतर जमलंय. चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशीचा अभिनय सुरेख!

मराठी रंगभूमीवरच्या दहा निवडक प्रवेशांचं आणि त्यांना जोडणा-या एका एकरावं नाटक 'नांदी' पाहिलं. हृषिकेश जोशी लिखित-दिग्दर्शित-अभिनित या नाटकात अजून नऊ दिग्गज आणि पॉप्युलर कलाकार होते. नाटकाचे ९९ प्रयोग झाले आहेत आणि मे महिन्यात शंभरावा आणि शेवटचा प्रयोग होणार आहे. एक वेगळंच नाटक होतं नांदी. एक जबरदस्त अनुभव.

समुद्र. कादंबरी म्हणून मला खुप कंटाळवाणी वाटली. एखाद्या कथेचाच ऐवज आहे असे वाटले. नाटक बघितले नाही.

आज दुपारी ४:३०ला गडकरीला प्रयोग आहे समुद्रचा. पण आजपासून उपवन फेस्ट. सुरू झालाय. नाटक सुटल्यावर घरी येताना त्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो तर वाट लागेल या विचाराने मी आजच्या प्रयोगावर पाणी सोडलंय.
(गेल्या वर्षी फेस्ट.च्या ट्रॅफिकमध्ये दोन-अडीच तास अडकलो होतो. त्यामुळे यावेळी चांगलाच धसका घेतलाय Sad )

व्हिवीयाना साइडला ट्राफिक लागेल का साडेसहा सात च्या सुमारास? सांगा कृपया मला डिन्नर प्लस मुव्ही वेळेवर करायचे आहे. लौकर निघते नाहीतर. उपवन फेस्ट वर्थ आहे का जायला?

लव्ह बर्ड्स आहे कालीदासला रवीवारी साडेचार.

बाईंनी केलेल्या वाडा चिरेबंदीबद्दल झिम्मामधे वाचलंच होतं आणि पर्वा बाई पण अधूनमधून त्यातले संदर्भ घेऊन बोलत होत्या.
चंदूने केलेल्या त्रिनाट्यधाराबद्दल बरीच वेगवेगळी मते होती/ आहेत. मला मात्र तो प्रयोग आवडला होता.
कलाकारांचा आणि प्रेक्षकांचा पेशन्स बघता त्रिनाट्यधाराचे प्रयोग बरेच झाले म्हणायला हरकत नाही.
हल्लीचा नवीन प्रयोग बघितला नाहीये अजून.

वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त असं तिन्ही एकत्र करून म्हणजे वाडा चिरेबंदी हा पहिला अंक आणि मग्न व युगान्त मिळून दुसरा अंक असं करून चेतनने (चेतन दातार) आधी आमच्या ललित कला केंद्रात आणि मग आविष्कारतर्फे 'वाडा' या नावाने प्रयोग दिग्दर्शित केला होता. सुंदर प्रयोग होता. चेतन स्वतः लेखक होता, हुशार तर प्रचंड होता त्यामुळे नेमकं काय आणि किती आणि कुठे वगळायचं ते त्याला फार मस्त जमलं होतं.

श्या चेतन फार अकाली गेला.. Sad

गेल्या महिन्यात 'समुद्र' पाहिलं. फार छान नाटक. समुद्राकाठची वाळू आणि डोंगराचं नेपथ्य आवडलं.
चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी दोघांनीही मालिकांपेक्षा नाटकच करावं - असं मला फार वाटलं. स्पृहा जोशी तर स्टेजवर एकदम वेगळीच कुणीतरी भासते.

काल 'दोन स्पेशल' पाहिलं. ते ही खूप आवडलं. इथेही जितेंद्र जोशीबद्दल तेच वाटलं. त्यानं नाटकांतच अधिकाधिक कामं करावीत.
अभिनय, संवाद, वातावरणनिर्मिती, नेपथ्य, पार्श्वसंगीत सगळंच उत्तम. रोहीत हळदीकरची छोटीशीच भूमिका आहे. पण ती देखील लक्षात राहते. काही बारीकसारीक जागाही अगदी सहज आणि छान घेतल्या आहेत. विशेष उल्लेख पार्श्वसंगीताचा!
चुकवू नये असं नाटक!

कहानी मे ट्विस्ट पहायचे आहे पण प्रयोग फारच कमी होतात त्याचे. >>> इतक काही ग्रेट नाही कहानी मे ट्वीस्ट.. दुसरा अंक तर सरळ सरळ गुंडाळल्यासारखा वाटतो..

मस्कत मराठी मित्रमंडळाने या शुक्रवारी 'गोष्ट तशी गमतीची' चा प्रयोग ठेवला होता. अनेक वर्षांनी नाटक पहायचा योग आला. ठीक-ठाक आहे. स्टोरी वेगळी नाही. जनरेशन गॅप, बाप-लेकातली धुसफूस, आई/बायको ची कुचंबणा हे सगळं हलक्याफुलक्या पद्धतीने सादर केलंय. लीना भागवत, मंगेश कदम आणि शशांक केतकर, तिघांची कामं छान झाली आहेत. नाटक संपल्या नंतरही मात्र लीना भागवतच लक्षात राहते.

लिना भागवत फार गुणी अभिनेत्री आहे, पण तिला मी अजून मुख्य आणि महत्वाच्या भुमिकांत बघितले नाही. अर्थात छोट्या भुमिकेतही ती छाप सोडतेच.

मी तिला पहिल्यांदा अधांतर मधे बघितले ( काय संच होता महाराजा ! ज्योति सुभाष, राजन भिसे, भरत जाधव, संजय नार्वेकर, सविता मालपेकर, लिना भागवत, नंदु माधव... सर्वच भुमिकात कसलेले आणि नाववाले कलाकार होते )

गंध मधे मोलकरणीच्या भुमिकेत आणि आजचा दिवस माझा मधे टायपिस्टच्या भुमिकेत पण तिने छान सोडली होती. अश्या कसबी कलाकारांना होणार सून.. सारख्या बकवास मालिका कराव्या लागतात, हे प्रेक्षक म्हणून आपले दुर्दैव आहे.

मला कधीपासून तळ्यात मळ्यात चा प्रयोग बघायचा आहे, पण मी भारतात असताना, त्याचे प्रयोगच होत नाहीत.

या विकांताला 'कळत नकळत' आणि 'तू तू मी मी' नाटके पाहिली.
संजय खापरे आणि मिनल बाळ सेम जोडगोळी दोन्ही नाटकात्.

सर्वच कलाकारांनी छान कामे केलीत्. 'तू तू मी मी' ची नेपथ्ययोजना फार आवडली.

गेल्या काही महिन्यांत पाहिलेली आणि प्रचंड आवडलेली नाटकं म्हणजे दोन स्पेशल, कोडमंत्र, हा शेखर खोसला कोण आहे, ओ वुमनिया आणि नसिरुद्दीन शाह आणि रजित (का रजत? माझा नेहमी घोळ होतो!) कपूरचं अ वॉक इन द वूडस.

गोष्ट तशी गमतीची पाहिलं पण एव्हढं आवडलं नाही.

Pages