संथ चालती ह्या मालिका, त्यांच्यावरची आमची टिप्पणी ऐका

Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2010 - 01:08

मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.

वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.

वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.

वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.

-----

गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."

"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.

"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"

"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."

बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"

कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"

कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.

"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.

इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.

तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.

रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना....................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
बस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!!!
आत्ता एवढच म्हणू शकते.
आणि हो एकंदरीत पलिकने "गैर" ला धुतलेलं दिस्तय! असो!

limbutimbu घरी फक्त पवित्र रिश्ता बघतात. त्यामुळे तो ताप नाहिये. माझ्या हातात रिमोट आला की मी कधीच मराठी/हिंदी चॅनेल्स लावत नाही.

मानुषी Happy

"काय ग मने, कोणाचे एव्हढे एसएमएस येताहेत आजकाल तुला? बघावं तेव्हा तो फ़ोन वाजत असतो ते." वसुधाताई वैतागून विचारतात.
"काही नाही ग आई. हे प्रॊडक्ट घ्या, ते घ्या म्हणून वैताग आणत असतात, दुसरं काही नाही" गोरीमोरी होत मनिषा म्हणते पण एसएमएस वाचताना तिच्या चेहेयावर हसू फ़ुटलेलं वसुधाताईच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही.
"मग काय तू त्यांना मला तुमचं प्रॊडक्ट नको आहे म्हणून सांगते आहेस का उत्तर देऊन?" तिला फ़टाफ़ट काहीतरी टाईप करताना पाहून त्या संशयाने विचारतात. तिचं लक्ष नसतं. त्यामुळे ती काहीच उत्तर देत नाही.
"काय ग? काय विचारतेय मी?"
"अं? काय म्हणालीस?" मनिषा विचारते पण तिचं लक्ष अजूनही फ़ोनवरच असतं. एव्हढयात परत एसएमएस येतो. आता मात्र वसुधाताईंची खात्रीच होते. त्या मनिषाच्या हातातून फ़ोन हिसकावून घेतात. "कोणाचा आहे बघू मला"
"अग आई..." असं मनिषा म्हणते आहे तोवर त्या सेन्डरचं नाव बघतात "मन्या"
"कोण हा मन्या?"
"अं?"
"कोण हा मन्या?"
"अग आई...."
"मनिषा, उत्तर दे"

"ठीक आहे, उत्तरच हवंय ना तुला. बाबा, बाबा, इथे या बघू"
दिनकरराव आतल्या खोलीतून बाहेर येतात. "हं, इथे बसा असे"
"अरे देवा! काय ऐकवणार आहेस बाई आता आम्हाला?" वसुधाताई रडू फ़ुटायच्या बेतात.
"मन्या कोण विचारतेस ना तू? तो मला आमच्या कॊलेजच्या रस्त्यावर भेटला."
"तुमच्या कॊलेजात का आहे?"
"नाही, मन्या दहावीनंतर काहीच शिकला नाही"
"त्याच्या आईवडिलांनी नाही सांगितलं त्याला?"
"मन्याला आईवडिल नाहीत. दहावीपर्यंतचं शिक्षण एका संस्थेने केलं"
"बरं मग? आता काय करतो हा मन्या?" दिनकरराव विचारतात.
"अहो ते काय विचारताय? मने, तुझी आणि त्याची ओळख कशी?"
"दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकच आहेत आई. गेल्या महिन्यात कॊलेजला जाताना माझी पर्स लांबवायचा एका चोरट्याने प्रयत्न केला. मन्या तिथे होता म्हणून बरं. त्याने असला बुकललाय त्या चोराला. म्हणाला आपण पाकेटमार असलो तरी बाईमाणसाची पर्स नाही मारायची कधी."
"अरे रामा! पाकेटमार आहे का हा मन्या?" वसुधाताई
"असेना का पाकेटमार. पण मनाचा अगदी सच्चा आहे. त्याचे म्हणून काही कायदेकानू आहेत. कोणी मुलींची छेड काढत असेल तर त्यांना कानपटतो. म्हाताया लोकांना रस्ता क्रॊस करून देतो. पाकीटातून मिळालेले काही पैसे रस्त्यावरच्या भिकायांना देतो"

"अहो, काय बोलतेय ही? एका पाकेटमाराची बाजू घेतेय बघा"
"अग, काय सारखं पाकेटमार पाकेटमार लावलंयस? त्याला संधी मिळाली असती तर तोही शिकला असता. हो की नाही बाबा?"
"खरं आहे"
"अहो, काय खरं आहे? काही कळतंय का तुम्हाला? मने, तू ह्या मन्याच्या प्रेमा-बिमात तर नाही ना बाई पडलीस"
"काय की. पण मला आवडतो खरा."

"अरे देवा!" वसुधाताई कपाळाला हात लावतात.
"काय ग आई? तुझ्या त्या ८:३० च्या सिरियलमध्ये तो आर्याचा दादा नाही का अर्जुनला एक संधी द्यायला तयार झाला? तेव्हा तर खूश झाली होतीस ते पाहून"
"अग पण ते वेगळं"
"का म्हणून? अमीरोंका खून खून, गरीबोंका खून पानी?"
"अग बाई, ती सिरियल आहे"
"नही मा, ये हकीकत है"
"आता कसं समजावू तुला? अहो, तुम्ही तरी काही सांगा."
"काही नको मला समजवायला, मला काही समजूनच घ्यायचं नाहिये" मनिषा पाय आपटत बाहेर निघून जाते.

"आता काय करायचं हो?"
"मला काय विचारतेस? तरी तुला सांगत होतो की ह्या असल्या सिरियल्स बघणं बंद कर. पण तुझं आपलं एकच ’मला विरंगुळा नको का?’. घ्या आता विरंगुळा. उद्या ऒफ़िसात मित्रांनी विचारलं की तुमचा जावई काय करतो तर सांगेन लोकांची पाकिटं मारतो म्हणून."
"कानाला खडा लावते मी. उद्यापासून तीच काय कुठलीच सिरियल पहाणार नाही. तुमच्याबरोबर फ़िरायला येत जाईन संध्याकाळी आणि कधीची लायब्ररी जॊईन करायचं म्हणतेय ती करेन. पण मनेच्या डोक्यातून ते मन्याचं भूत कसं हो काढायचं?"
"त्याची काळजी तू करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. पण तू मात्र तुझ्या निश्चयावर ठाम रहा म्हणजे झालं."
"होय हो"
"बरं, चल मी आता बाहेर जाऊन येतो थोडा वेळ"

दिनकरराव बाहेर जातात तेव्हा सोसायटीच्या आवारात मनिषा आणि तिची मैत्रीण निधी गप्पा मारत असतात. वडिलांना बघून मनिषा विचारते "काय बाबा? मोहिम फ़त्ते?"
"अग १००% फ़त्ते. तुझ्या आईने तीच काय पण कुठलीही सिरियल न पहाण्याचा पण केलाय. मीही तिला सांगून आलोय की तुझ्या डोक्यातून मन्याचं भूत काढून टाकेन म्हणून. बरं पण तो मन्याचा नंबर काढून टाक बघू आधी फ़ोनमधून. तुझ्या आईचा काही नेम नाही. त्याला फ़ोनबिन करायची आणि ह्या निधीने फ़ोन उचलला तर आपला सगळा बेत फ़सायचा."
"हा घ्या काढला मन्याचा नंबर" मनिषा म्हणते आणि तिघे जण खळखळून हसतात.

जनठोकपाल:

१. कोणतीही मालिका सहा महिन्यांच्या वर चालू रहाता कामा नये.
२. मालिकेत एखादा रोल करणारी व्यक्ती बदलल्यास प्रेक्षकांना तसं स्वच्छ सांगावं. आधीच अगम्य असलेल्या कथानकाची आणखी तोडफ़ोड करू नये.
३. मालिकेत खपलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करता येणार नाही.
४. एकाच मालिकेत स्मृतीभ्रंशाच्या एकापेक्षा जास्त केसेस असू नयेत.
५. मालिकेतल्या गरोदर व्यक्तिरेखांचं गर्भारपण, बाळंतपण वेळेत आटपावं. त्या बायका आहेत, हत्तीणी नाहीत.
६. एकाच वाक्यावर दहा लोकांच्या प्रतिक्रिया दहा वेगवेगळ्या ऎन्गलमधून दाखवू नये. त्यांना मुळात अभिनयच येत नसल्याने त्याच्या वेगवेगळ्या छटा वगैरे दाखवण्याचा फ़ुका आग्रह नको.
७. मालिकेच्या लेखकाला चरस, गांजा वगैरे जास्त झाल्याने संवाद लिहिता न आल्यास मालिकेचा एपिसोड दाखवू नये. व्यक्तिरेखांना स्वत: संवाद लिहावयास सांगू नये.
८. मालिकेच्या एपिसोडसबद्दल लेखकाकडे तक्रार करायची सोय व्हावी म्हणून लेखकाचा फ़ोन नंबर आणि इमेल प्रत्येक एपिसोडच्या शेवटी ठळकपणे जाहिर करावा.
९. 'पार्श्वसंगीत' म्हणजे पार्श्वभूमीवर वाजणारं संगीत. किमान संवाद ऐकू येतील इतपत ठेवावे एव्हढी माफक अपेक्षा आहे.
१०. प्रेक्शकांना डोकेदुखी, रक्तदाब, हदयविकार असे रोग लावू शकतील अश्या मालिका काढणायांना भर चौकात १०० फ़टके आणि त्यानंतर उलटे टांगून मिरचीची धुरी देण्याची सोय कायद्यात असावी.

ठोकपाल:

१. मालिका वर्षानुवर्षे चालायला हव्यात. प्रेक्षक संपले तरी चालतील, मालिका संपता कामा नयेत.
२. मालिकेत एखादा रोल करणारी व्यक्ती बदलल्यास त्यानुसार कथानक बदलेल. अधिक तपशिलासाठी पहा भाग्यलक्ष्मी.
३. मालिकेत खपलेल्या लोकांना लाईफ़टाईम व्हॆलिडीटी. अर्थात ते कधीही परत येऊ शकतील.
४. एकाच मालिकेत स्मृतीभ्रंशाच्या किती केसेस असाव्यात ह्यावर काही बंधन असू नये. प्रेक्षकांना स्मृतीभ्रंशाचा आजार जन्मजात आहे असं समजणं हा आमचा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच.
५. मालिकेतल्या गरोदर व्यक्तिरेखांचं गर्भारपण कथानकाची गरज असेल तर ९ महिन्यापेक्शा जास्त काळ चालेल. बाळंतपण किती एपिसोडमध्ये आटपावं ह्यावर काही निर्बंध नसावेत.
६. कॆमेरा एन्गल आदि गोष्टी तांत्रिक प्रकारात मोडत असल्याने प्रेक्शकांनी त्यात नाक खुपसू नये.
७. मालिकेचा लेखक काही कारणाने संवाद लिहू न शकल्यास ते इतरांकडून लिहून घेण्याची मुभा असावी.
८. मालिकेच्या लेखकाचे नाव आणि ठावठिकाणा निर्मात्यांना माहित असेल तरच जाहिर करण्याची सवलत द्यावी.
९. 'पार्श्वसंगीत' मालिकाचा अविभाज्य भाग आहे. ते कधी, किती वेळा, किती वेळासाठी आणि किती मोठ्याने लावावं ह्यावर प्रेक्षकांचं नियंत्रण नसावं
१०. प्रत्येक एपिसोडच्या आधी ’ये एपिसोड देखना सेहत एवं स्वास्थ्य के लिये हानीकारक है’ असा वैधानिक इशारा देण्यात यावा. ह्या उप्पर प्रेक्षक आणि त्यांचं नशीब.

वि.सू. अण्णा हजारे किंवा त्यांचं आंदोलन ह्यांची थट्टा करण्याचा मुळीच हेतू नाही ह्याची नोंद घ्यावी.

मामी, अक्षरी धन्यवाद! Happy

वि.सू - दिवे घेऊन पुढील परिच्छेद वाचावा. कोणाच्या धार्मिक भावना दुखावायचा अजिबात हेतू नाही.

कालचा द्वारकाधिशचा एपिसोड अतीव मनोरंजक होता.

तर सुरुवात झाली तेव्हा सत्यभामा आपल्या बांगड्या वाजवत होती. (इथे बोले चुडिया बोले कंगना, खनन खन चुडीया खनक गयी देख साहिबा, मेरे हाथोमे नौ नौ चुडिया है वगैरे तमाम हिंदी गाणी डोक्यात चमकून गेली!) आणि डोळ्यावर पट्टी बांधलेला कृष्ण त्या आवाजाच्या अनुषंगाने मडक्यांवर बाण सोडत होता. म्हटलं चला, कृष्णाला महालात कोंडून ठेवल्याचं सार्थक झालं. पण मग सत्यभामेने कृष्णाला आपल्याला धनुर्विद्या शिकवायचा आग्रह केला. काय तर म्हणे मला कधी तुम्हाला युध्दात मदत करायची झाली तर त्याचा उपयोग होईल. मला एकदम ’शोले’तले वीरू-बसंती आठवले. मग थोडा वेळ त्यांच्यात प्रेमळ वादावादी झाली. कृष्ण म्हणाला मी असताना तुला युध्दात जायची गरज पडणार नाही तर सत्यभामा म्हणे गरज लागलीच तर मला शिकवून ठेवा. आता ह्या वादात सकाळ होते की काय म्हणेतो श्रीकॄष्णाने माघार घेतली. करतो काय बिचारा? स्त्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्टापुढे कोणाचं काय चाललंय कधी? पण तो धनुष्यावर बाण चढवून तिला शिकवतोय तर ही आपली त्याच्याकडेच पहातेय. तिची चूक नाही. कृष्ण आधीच इतका गोड दिसतो. 'ऐसे लगे तेरे हातोमे बन्सिया, जैसे कटारी लियो थाम". इथे तर हातात चक्क धनुष्यबाण आहे डोळा मारा मला पुन्हा वीरू-बसंती आठवले. फ़क्त इथे बसंती वीरुकडे पहात होती. आता धनुर्विद्याच शिकायची होती तर सकाळी शिकायची ना, त्यासाठी एव्हढं हट्टाने त्त्या नवर्‍याला रात्री महालात कोंडून ठेवायची काय गरज म्हणते मी.

मग एकदम नरकासुर आणि त्याचा एक साईडकिक स्वर्गावर चाल करून गेले. इंद्र नेहमीप्रमाणे अप्सरांकडून लाड करून घेण्यात मग्न होता. आत्तापर्यंतच्या एकाही पौराणिक सिरियल्मध्ये मी देखणा इंद्र पाहिलेला नाही. हाही इंद्र तसाच. नरकासुर आणि त्याच्या बरोबरच्या राक्षसाला (हा असा काही चालत होता की त्याच्या धोतराची नाडी तुटली आहे आणि ते खाली न पडू द्यायची कसरत करत तो चालला आहे असं वाटावं) पाहून अर्धे देव पळाले. इंद्राने वज्रबिज्र फ़ेकून पाहिलं पण बाकीचा वेळ तो ट्रॅफ़िक जंक्शनवर मारामारी पहात पोलिस उभे रहातात तसा स्वस्थ उभा होता. नरकासुराने इंद्राच्या शेजारी उभ्या असलेल्या देवमाता अदितीची कुंडलं पाहिली आणि ’ये कुंडल मुझे दे दो माते’ असा पुकारा केला. पुनश्च शोलेतला गब्बर आठवला ’ये हात मुझे दे दे ठाकूर’ म्हणणारा. आता ही बाईची कुंडलं घेऊन नरकासुर काय करणार ते तोच जाणे. लगेहात त्याने इंद्राच्या मागे उभ्या असलेल्या अप्सरेलाही धरून नेलं. ही अप्सरा जरा जास्तच अमृत पित असावी असं तिच्या शरीरयष्टीकडे पाहून वाटत होतं. बाकीच्या अप्सरांबद्दल न बोललेलंच उत्तम. क्वालिटी कंट्रोल म्हणून नाही.

इथे कृष्ण आणि सत्यभामा धनुर्विद्येची प्रॅक्टिस करताहेत तोच सगळे देव दरवाजा वगैरे न ठोठवता थेट त्यांच्या अंत:पुरात ’बीम डाऊन’ झाले. सत्यभामेच्या चेहेर्‍यावर जराही आश्चर्य नाही. इंद्राने लगेच आपल्या तक्रारीचा पाढा वाचला. कृष्णाला इंद्राचा युध्दात पराभव झाल्याचं आश्चर्य वाटलं. त्याने पौराणिक कथा बहुधा वाचल्या नसाव्यात. मला त्याला सांगावंसं वाटलं की अरे बाबा, हा इंद्र लढलाच कुठे पराभव व्हायला. आणि तो कधी कुठल्या युध्दात जिंकलाय म्हणून आज जिंकणार होता. वर इंद्राने ब्रह्मदेवाच्या वरदानाने नरकासुराचा वध करणं अशक्य असल्याचं सांगितलं. काय तर म्हणे एखादा सामान्य माणूस आपल्या पत्नीला रणांगणावर घेऊन लढायला आला तरच नरकासुराचा वध होईल, अन्यथा त्याला कोणाकडूनही भय नाही. देव तरी काय एकेक वर देतात.

मग पुढचा शॉट नरकासुराचा. इथेही एक माता प्रकट झाली. आता ही माताजी कोण असा विचार करेतो ती त्याची आई पृथ्वी असल्याचं स्पष्ट झालं. तिने नरकासुराला तुझा वध करणारा भूतलावर आहे अशी अ‍ॅडव्हान्समंदी वार्नींग दिली. ह्या सगळ्यांच्या आया रात्रीच्या झोपत नाहीत काय?

शेवटच्या शॉटमध्ये ब्रह्मदेवाच्या वरदानाविषयी ऐकून कृष्णाने आपण पत्नीला घेऊन रणांगणात जाऊ शकणार नाही असं सांगितलं. लगेच सत्यभामा पुढे झाली आणि तिने मी येणार असं जाहिर केलं. बघा, ह्याला म्हणतात ’आयजाबाई आली घरा, बायजाबाई तुम्ही बाजूस सरा’. ती रुक्मिणी राहिली बाजूला. सत्यभामा स्वत:वर स्पॉटलाईट ठेवण्यात पटाईत आहे. पुढे पारिजातकावरून हाणामारी आहेच. असो.....असा क्यूट नवरा मिळाला तर आम्हीपण त्याच्याबरोबर युध्दावरच काय परग्रहावर पण जाऊ Proud

आता ही बाईची कुंडलं घेऊन नरकासुर काय करणार ते तोच जाणे. << हो ना आज सोन्याचे भावही कोसळलेत
बाकी नेहमीप्रमाणेच मस्त स्वप्ना Happy

"अरे उदय, इकडे ये. तो पुढल्या आठ्वड्यात आबासाहेबांना हॉस्पिटलात अ‍ॅडमिट करायचा सीन आहे. सगळ्यांना ग्लिसरीन लागणार आहे. आणून ठेवलं आहेस ना?"
"साहेब, ग्लिसरीन आऊट ऑफ स्टॉ़क आहे सगळीकडे"
"आं? काय सांगतोयस काय? हे असलं काहीतरी पहिल्यांदा ऐकतोय मी"

"साहेब, अहो, तुम्ही टीव्ही बघत नाही की काय? कुंकू मध्ये किल्लेदार लवकरच रस्त्यावर येणार आहेत. त्यांच्या घरात ५-६ माणसं आहेत. ती सगळी रडणार. अरुंधतीमध्ये तिला आपला नवरा आंधळा असल्याचं नुकतंच कळलंय. त्यामुळे ती आणि तिचे वडिल काही एपिसोड रडणार आहेत. एकाच ह्या मध्ये तर अंजलीच्या नशिबात रडणंच लिहिलंय. आणि आभास हा मध्ये मायाताई आर्याविरोधात नवा कट शिजवताहेत. म्हणजे एक आर्याच नाही तर विश्वा आणि मावशीबाई पण रडणार"

"अरे, त्यात काय नवीन आहे? ह्या मालिकांत सदोदित रडारड चालूच असते. म्हणून काय ग्लिसरीन आऊट ऑफ स्टॉ़क?"

"साहेब, तुम्ही हिंदी चॅनेल्स विसरताय. द्वारकाधिशमध्ये पांडव आणि कुंती लाक्षागृहात जळून मेलेत असं हस्तिनापुरात सगळ्यांना वाटतंय. त्यामुळे धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म,हस्तिनापूरचे रहिवासी ह्यांचे खरे अश्रू आणि शकुनि-दुर्योधनाचे खोटे अश्रू दाखवायाला किती ग्लिसरीन लागेल ह्याचा विचार करा. तसंच 'बालिका बधू' मध्ये आनंदी गायब झाली आहे. त्यांच्या घरातले ५-६ लोक धबाधब रडताहेत. 'ससुराल सिमरका' मध्ये प्रेमने आपलं लग्न रोलीशी झालं असल्याचं सांगितलंय. त्यामुळे सिमर, रोली, त्यांची आई, प्रेमची आई ह्यांचा सामुदायिक अश्रूपातांचा प्रोग्रॅम चालू झालाय कालपासून. आता 'औषधाला'ही ग्लिसरीन नाही मिळायचं."

"मग आता आबासाहेबांना हॉस्पिटलात अ‍ॅडमिट करायच्या सीनचं काय करायचं रे?"
"साहेब, एक सजेशन देऊ का? त्यांना एका महिन्याने अ‍ॅडमिट करा. नाहीतर आता कांद्याचा स्टॉक मागवावा लागेल. त्यांच्या किंमती ऐकूनच रडायला येतंय आजकाल"
"उदय?"
"हा साहेब?"
"आय हेट टिअर्स"

वि.सू. - मला मालिकांच्या निर्मितीबद्दल काहीही माहित नाही. त्यामुळे ह्यात तपशिलाच्या चुका असू शकतात. आजकाल कदाचित ग्लिसरीन वापरतही नसतील. त्यामुळे हसायला आलं तर हसा नाहीतर सोडून द्या ही विन्ंती Happy

<< मालिकेतल्या गरोदर व्यक्तिरेखांचं गर्भारपण, बाळंतपण वेळेत आटपावं. त्या बायका आहेत, हत्तीणी नाहीत.>> जबर्दस्त....
मला सुद्धा हे अगदि असेच वाटायचे...

सकाळी सकाळी पृथ्वीवर जायला निघालेल्या नारदमुनींना स्वर्गातल्या एकुलत्या एका फोटोग्राफरच्या दुकानाबाहेर गर्दी पाहून आश्चर्य वाटलं. पृथ्वीवर कोणा सिनेकलावंताचं नाहीतर पुढार्‍याचं निधन झाल्याने त्याच्या आत्म्याबरोबर फोटो काढायला तर ही गर्दी नाही ना असं त्यांना वाटून गेलं. 'छे, छे, पुढारी इथे स्वर्गात येणं शक्यच नाही. कोण आहे बघू तरी' असं म्हणत ते पुढे गेले तर गर्दीत शिव-पार्वती, इंद्र-इंद्राणी, विष्णू-लक्ष्मी वगैरे समस्त देव एव्हढंच काय तर चक्क यमाचा रेडाही त्याच्या म्हशीसोबत आलेला दिसला. सगळेजण सपत्नीक आलेले पाहून नारदमुनींची उत्सुकता शिगेला पोचली. आहे काय ही भानगड?

कशीबशी वाट काढत ते आत गेले.
'नारायण नारायण, आज बरंच काम दिसतंय' त्यांनी फोटोग्राफरकडे चौकशीचा पहिला बॉल टाकला.
'होय मुनिवर, माफ करा, आज बोलायची ही उसंत नाही'
'अरे पण झालंय काय? कोणी प्रसिध्द व्यक्ती दिसत नाहिये तरी सगळे सपत्निक फोटो काढून घेताहेत. काय चाललंय काय? ते आधार कार्ड इथे स्वर्गात पण लागायला लागलं का?'
'छे हो, पण तुम्हाला खरंच माहित नाही?' फोटोग्राफरने आश्चर्याने विचारलं.
'नाही' नारदमुनींनी नाईलाजाने कबूल केलं.
'आश्चर्य आहे. अहो, त्या नरसिंह किल्लेदाराच्या आत्याबाईंचं काल निधन झालं'
'अरेरे! बरं मग? त्याचा ह्या फोटोसेशन्सशी काय संबंध?'
'अहो, असं काय करताय मुनिवर? ती आत्याबाई इथे स्वर्गात आली आणि तिने सगळ्या देवांची लग्न झालेली नाहीत असं म्हणून त्यांची लग्नं जमवायचा घाट घातला तर आप्लं काय होणार ह्या भीतीने धास्तावून जाऊन देवांच्या बायकांनी हे फोटो काढून घ्यायचं ठरवलंय. आता बायकांनी एकदा काही ठरवलं की त्या कोणाचं, अगदी देवाचंसुध्दा, ऐकत नाहीत हे तुम्हाला सांगायला.......लागेल म्हणा' फोटोग्राफर रांगेतल्या पुढल्या देवाला आत यायची खूण करत म्हणाला आणि नारदमुनिंनी स्वर्गातून काढता पाय घेतला.

नरसिंहाची आत्याबाई गेली...... ए धतर धतर धतर धतर...... पार्टी.......... Biggrin

ती बघा मृण्मयी (जानकी) पण नाशिक बेंजोच्या तालावर नाचतेय...... Wink आणि महागुरू "यापूर्वी इतकं बेभान नाचताना तुम्हाला कधीच नाही पाहिलं... " असं म्हणत एक नोट खिशातून काढतायत.

पुणेरी मिसळ नावाचा भंपक प्रकार कुणीच बघत नाही वाटते. श्या, असले प्रकार माझ्याच वाटेला का येतात? Sad

स्वप्नाने लिहिलेला कुंकू मालिकेच्या शेवटाचा सारांश. ज्यांचा ज्यांचा म्हणून बघायचा राहिला असे त्यांच्यासाठी कायमचा ठेवा जतन व्हावा हा उद्देश Proud

कुंकू - दिवस D - २

'अहो, चहा घेताय ना? थंड झाला तर मी पुन्हा गरम करून आणून देणार नाही हं सांगून ठेवते'
'खड्ड्यात जाऊ दे ग चहा. आजचा एपिसोड चुकवणार नाहिये मी'
'अगबाई, तुम्ही कधीपासून कुंकू पहायला लागलात?'
'बघते आहेस ना आजकाल झीवाल्यांचं काय चाललंय ते. जुन्या सिरियल्सचे टाईम स्लॉट्स बदलून नव्या सिरियल्स आणताहेत. माझ्या सिरियलवरपण कधी गदा येईल माहित नाही. सिरियल कशी नीट गुंडाळावी ते बघतोय.
'आहाहा, तोंड बघा आरश्यात. साधी सतरंजी गुंडाळता येत नाही आणि सिरियल गुंडाळायला निघालेत'
'शू, ते बघ सुगंधा आणि कान्हाची तंतरली आहे. अरे, वाकनीस कसा आला एव्हढ्यात त्यांच्या खोलीत? दोघांची गचांडी धरलीन. हे बहुतेक कोणाला तरी दिसत असणार'
'ओ दिग्दर्शक, कोणाचं स्वप्नरंजन दाखवण्याइतका वेळ नाही त्यांच्याकडे. तो वाकनीस खराच आलाय'
'अरेच्चा! खरंच की. अब आयेगा मजा. ने म्हणावं दोघांना ओढून जानकीकडे. जान्कीचे डोळे बघितलेस? कसे खदिरांगासारखे फुललेत? किल्लेदारांची सून शोभतेय ती ह्या शेवटच्या एपिसोडमध्ये. आता काय सुगंधा माफी मागणार आणि जानकी तिला माफ करणार'
'अहो, कधी हो तुम्हाला अक्कल येणार? सुगंधा अहिल्येचं नाव घेईल बघा. पण जानकी माफ नाही करणार तिला आता. शेवटून तिसरा एपिसोड आहे हा. बुर्‍याला शिक्षा व्हायलाच हवी हा विचार भारतीय चित्रपट, मालिका वगैरेंचा पाया आहे.'
'हायला, तू म्हणतेस तसंच होतंय. माझ्या पुढच्या मलिकेचं लेखन-दिग्दर्शन तूच का करत नाहीस ग?'
'कशाला? लोकांच्या शिव्या खायला?'

'हा, वाकण्या, फेक त्या दोघांना घराबाहेर. वा! सुगंधा आणि कान्हा घराबाहेर जमिनीवर आणि घराचा दरवाजा हळूहळू बंद होतोय. वा! क्या सीन है बॉस. मानलं! तेरा क्या होगा अहिल्या?'
'ती गेलीय पार्टिला. येईल उशीरा घरी'

'हं, ते बघ अहिल्या उठली. पेपरमध्ये नरसिंहाची बातमी शोधतेय. वामन्या तिला काय शोधतेस म्हणून विचारतोय बघ. त्याला नक्की माहित असणार सगळं'
'लावता पैज? त्याला काही माहित नसेल.....जानकी सांगेपर्यंत.'
'हो ग, तो सकाळी आलो असं म्हणतोय. आता ब्रेकफास्टच्या टेबलवर सगळे जमलेत. ही आत्याबाईची बहिण अजून इथेच आहे? गेली नाही अमेरिकेत परत?'
'अहो, अहिल्येचा भांडाफोड करायला ऑडियन्स नको का? द मोअर द मेरियर'
'अहिल्या आली. जानकी कुठाय?'
'ती काय येतेय सीडी आणि नरसिंह-अनुजाच्या लग्नाचं सर्टीफिकेट घेऊन'
'शू शू. ऐकू देत. सर्टीफिकेट वामनच्या हातात आलं., त्याच्या चेहेर्‍यावर कन्फ्यूज्ड लुक. नरसिंह नक्की काय प्रतिक्रिया द्यायची ह्या दुग्ध्यात. जानकी अहिल्येला विचारतेय. अहिल्येने कानावर हात घेतलेत. तिथून निघून चालली आहे. आणि जानकीने सगळं काही तमाम किल्लेदारांना सांगितलं आहे. हा आत्याबाई नं २ चा हात तोंडावर गेला. अमृता अवाक. नरसिंह बेहाल. वामन परेशान. आणि.....आजचा एपिसोड संपला. क्या अहिल्या कबूल करेगी अपना गुनाह? क्या जानकी उसे माफ कर पायेगी? क्या लौट आयेगी किल्लेदार परिवारकी खुशी? सेकन्डलास्ट एपिसोडमे देखेंगे हम लोग'

कुंकू - दिवस D - १

'संपवतोस की नाही ताटातलं जेवण? का त्या खिडकीखाली उभ्या असलेल्या हडळीला बोलावू? बोलावू तिला?' अश्या शब्दात लहान मुलाला धमकवावं तसं जानकीने अस्मिता किंवा खोटं सर्टिफिकेट बनवून देणारा माणूस ह्यांना बोलावण्याची धमकी दिली आणि अहिल्या बोलू लागली. पण जित्याची खोड...त्यामुळे एका भिक्कार मोलकरणीला एव्हढा मान का वगैरे मुक्ताफळं तिने उधळलीच. मग वामनचा 'मला एक नवरा म्हणून तुझी लाज वाटते' वगैरे ड्वायलॉग झाला. त्यावर कुठलीही बायको म्हणेल तेच अहिल्या म्हणाली 'एव्हढी लाज वाटते तर जा मला सोडून'. आता ही संधी सोडतोय तो नवरा कसला? वामनने तेच करेन म्हणून सांगितलं. अहिल्येने जानकी आणि नरसिंहाची माफी मागितली. पण ते दोघं ढिम्म होते.

अमृता, नरसिंह, रेणुआजी, जानकी ह्यांची गोलमेज (मराठीत 'राऊन्डटेबल') परिषद भरली. आजीने 'मी तुला ओळखण्यात चूक केली' हे वाक्य जानकीला 'न'व्या वेळा (एन्थ टाईम) म्हटलं. वाकनीस खाजगी सचिवालाच शोभेल अश्या थाटात तिथे तडक आला. नरसिंहाने अहिल्येच्या बापाकडून कर्ज घेतलं होतं. त्याच्या अ‍ॅग्रिमेन्टमध्ये अहिल्येच्या सांगण्यावरून तिच्या बापाने बंगला कधीही ताब्यात घेता येऊ शकेल असा क्लॉज घातल्याचं त्याच्या वकिलाकडून वाकनीसाला समजलं. ते त्याने त्वरीत येऊन सांगितलं. प्रथम जानकीचा आश्चर्यचकित चेहेरा, मग नरसिंहाचा, मग अमृताच्या चेहेर्‍याचे क्लोजअप्स. ह्या लोकांना अहिल्येच्या कुठल्याही कृतीचं अजूनही आश्चर्य कसं वाटतं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय. नरसिंह तर राजकारणी माणसाच्या नावाला कलंक आहे!

असो. हे अ‍ॅग्रिमेन्ट घरातच कुठेतरी आहे ह्याचा वामनला साक्षात्कार झालाय. इथे रेणुआजी आत्याबाईच्या आठवणी काढताना दाखवली आहे. अमृता येऊन तिला 'आम्ही रमावतीला गेलो तरी तिथे येत जा' असं मोठ्या प्रेमाने म्हणते. रेणुआजी अतिप्रेमळ असल्याने 'जाऊनयेऊन तिकिटाचा खर्च काय तुझा बाप करणार का?' असं तिला विचारत नाही. अमृता मग प्रेमाने तिला 'आत्याआजी' म्हणते. थोडक्यात रे़णुआजीचं प्रमोशन. हे प्रेमाचे कढ बघायची सवय नसल्याने जोरदार ठसका लागून प्रेक्षकांच्या नाकातोंडात चहा जातोय त्याचं कोणालाच काही नाही.

||इति कुंकूअध्यायं समाप्तम||

'शेवटचा दीस गोड व्हावा' म्हणून जानकी सध्या टीव्हीवर येऊन सांगतेय की गेली अडीच वर्षं आमच्यावर प्रेम केलंत तसंच ह्यापुढेही करत रहा. म्हणजे कुंकू सिझन २ येणार काय रे भाऊ? ** प्रचंड घाबरलेली बाहुली **

कुंकू - D Day

अहिल्या पुन्हा जानकी आणि नरसिंहाची माफी मागायला आली. जानकीने 'तुम्ही चुका करायच्या, माफी मागायची, मग मी तुम्हाला माफ करायचं हे नेहमीचंच आहे. आजही मी तुम्हाला माफ केलंच असतं' असं म्हटलं. तिची क्षमाशीलता पाहून पृथ्वीही लाजली असेल. असो. नरसिंहरावांनी तिला ह्यापुढे हा प्रश्नच येणार नाही असं म्हणून हॉलमधे येण्यास सांगितलं. तिथे आपण दुसर्‍या पक्षात प्रवेश करणार आहोत हे सांगायला एखादा बंडखोर पत्रकार परिषद घेईल त्या थाटात नरसिंहरावांनी मला एक घोषणा करायची आहे असं जाहिर केलं. घोषणा ऐकायला हजर कोण? तर अमृता, वामन, वाकनीस, अहिल्या आणि जानकी. जित्याची खोड.......तर असो.

नरसिंहरावांनी आपण अमृता, जानकी, चिऊ आणि माऊ ह्यांसह रमावतीला जात असल्याचं जाहिर केलं. गण्याचं नाव घ्यायला विसरले. वामनला वाड्याच्या अ‍ॅग्रीमेन्टचे मूळ पेपर्स मिळाले होते ते नरसिंहरावांनी अहिल्येच्या हवाली केले. जानकीने तिजोरीच्या चाव्या तिच्या हाती दिल्या. अहिल्येच्या वडिलांकडून घेतलेले १० कोटी आप्ण लवकरच परत करू आणि तरीही वाडा तिच्याच नावे राहिल असं त्यांनी तिला सांगितलं. तिजोरीतले पैसे-दागिने सुध्दा अहिल्येलाच दिले असं त्यांनी जाहिर केलं. (ते राजकारणी होते हे लक्षात घेता हीही रक्क्म कोटींच्या घरात असणार!). रमावतीच्या वाड्याचं हेरिटेज हॉटेल करण्याचा बेतही त्यांनी रद्द केला. आता रमावतीला जाऊन हे करणार काय? पैसे कसे मिळवणार? कर्ज कसं फेडणार हे प्रश्न आपल्या मध्यमवर्गीय मनाला पडतात. तमाम किल्लेदार निवांत.

वामनने नरसिंहरावांबरोबर जाणार हे जाहिर केलं. वर अहिल्येला म्हणाला 'घाबरू नकोस. मी तुला घटस्फोट देणार नाही. पण तुझ्यासोबत रहाणारही नाही. मधूनमधून तुला भेटायला येत जाईन'. तिला काय घाबरायला झालंय? एव्हढा वाडा, पैसा, दागिने मिळाले, वर नवर्‍याची कटकट आयती टळली. दुनियामे ऐसा कहा सबका नसीब है.

वाकनीसनेही नरसिंहरावांबरोबर जायची इच्छा प्रकट केली. त्यांनी त्याला रमावतीमधून अपक्ष म्हणून उभं रहायचा सल्ला दिला आणि त्यासाठी वाटेल ती (!) मदत करायचं कबूल केलं. वाकनीसने अनुजा आणि तिचा मित्र दोघांनी लग्न केलं आणि त्या लग्नाला तिची बहिण आणि मामा हजर होते हे सांगितलं. तसंच सुगंधाची केस परत उभी राहतेय हेही सांगितलं. परशूचा काहीही उल्लेख नाही. जानकीचे आईवडिल, अमृताची सासू गायब.

शेवटी अहिल्या एकटीच रडताना दाखवली आहे. वाड्यातून निघताना जानकी वामनला समजावू पहाते पण वामन आपला निश्चय कायम असल्याचं सांगतो. वर हेही म्हणतो की प्रत्येक कुटुंबात एक अहिल्या असते (हायला!), तिच्यावर वेळीच कठोर उपाययोजना व्हायला हवी. हे अडीच वर्ष झाल्यावर लक्षात आलं! मग एकेक करून सगळे दिवाणखान्यातून चालते झाले. शेवटी उरले जानकी आणि नरसिंह. ब्याकग्राऊन्डला 'माझं कुंकू, हॅहॅहॅ कुंकू'

|| इति झी मराठी चॅनेले मस्तिष्कशूलकारकं कुंकू नाम अरिष्टं संपूर्णम ||

त्या राजस्थानी सिरिअल्सनी वात आणलाय. अशा प्रत्येक सिरिअल मधली घरचा कंट्रोल ज्या बाईकडे असतो ती बाई नेहमी खवट, राक्षसी आकाराचा रसगुल्ला असावा अशी अतिप्रचंड लठ्ठ, सदैव वरच्या पट्टीत बोलणारी आणि मारक्या म्हशीसारखी सगळ्यांच्यावर "चार्ज" करायला तयार आहे अशी का दाखवतात तो दिग्दर्शकच जाणे.
ते रोज आपलं घरी आलं की "म्हारे को, थारे को, मामीसा, अमुकसा, तमुकसा" हे शब्द ऐकून वीट आलाय.

स्वप्नाच्या रोजनिशीतलं एक पानः (तिकडे वाहून जायला लागलं आणि बाईसाहेब स्वतःची सगळी विचारमौक्तिकं इथे चिकटवतातच असं नाही म्हणून मी टाकतेय)

१३ एप्रिल, २०१२

माझ्या डोळ्यांतले अश्रू आटलेत. डोळे अगदी कोरडेठ्ठाक आहेत. आजचा अरुंधतीचा एपिसोड एव्हढा ह्रदयंगम का काय म्हणतात तसा होता की मला अश्रुपात आवरेनासा झाला. प्रथम दिग्विजयभाऊंनी आपलं तमाम सरंजामेंशी नातं संपलं असल्याची घोषणा केली. आईवडिलांविना वाढलेलं पोर आणि आता उरलीसुरली नाती पण संपली. देव शत्रूवरही अशी वेळ न आणो. श्रीराम वनवासाला निघाले तेव्हा जानकीला सोबत घेऊन गेले होते. पण इथे तर दिग्विजयभाऊंनी खर्‍या अरुंधतीला आप्ला संबंध नाही असं सांगून टाकलं. काय ही त्या पतिव्रतेवर वेळ. पण पोर चकार शब्द बोलली नाही हो. शेवटी त्या सायलीला मैत्रीणिचा पुळका आला. ती हेही विसरून गेली की आपण काही काळ आपल्याच मैत्रिणीच्या नवर्‍यावर डोळा ठेवून होतो. तिने अरुंधतीला ओढत ओढत दिग्विजयभाऊंच्या खोलीत नेलं आणि त्यांना अरुंधती त्यांच्याशी खोटं का बोलली ते समजावून दिलं. दिग्विजयभाऊ सद्रदित का काय म्हणतात ते झाले. दिग्विजयभाऊ आणि अरुंधतीचे हात एकमेकांच्या हातात देऊन सायली बाहेर पडली. मीही सद्गदित का काय म्हणतात ती झाले. खोटं का लिहू?

मग हातात एक बॅग घेतलेले दिग्विजयभाऊ आणि अरुंधती घरातून बाहेर पडले. दोघांचे कपडे एकाच छोट्या बॅगेत कसे मावले हा प्रश्न मला नको-नको म्हणत असताना पडलाच. असो. राम-जानकी गेल्यावर लक्षुमण (अरुंधतिचा दीर) कसा मागे राहिल? तोही पद्मिनीरा़जेंना 'मी मेहनत करेन आणि जगेन पण खून करुन मिळवलेल्या ह्या इस्टेटीवर जगणार नाही' असं सुनावून बाहेर पडला. म्हणजे आत्तापर्यंत तो मेहनत न करता जगत होता तर. ऑफिसमध्ये काय करायचा हे मज पामराला उमगले नाही. तरी भावाभावांचं प्रेम पाहून माझे डोळे भरून आले हो. कलियुगात फक्त टीव्हीवरच असं प्रेम पहायला मिळतं.

दिग्विजयभाऊ आणि अरुंधतीवहिनी आता गावाकडल्या घरात राहिलेत. पण दिग्विजयभाऊना ते पसंत नसल्याने ते हातात एक फोल्डर घेऊन नोकरी शोधायला निघालेत. अर्थात पद्मिनीरा़जेंच्या कृपेने त्यांना नोकरी मिळत नाहिये. दोघे सकाळच्या पारी भुकेने कासावीस झालेत. पण इथे कुठला ब्रेकफास्ट? मग नाक्यावरच्या टपरीवर कटिंग चहा प्यायला गेले नेमक्या तिथे पद्मिनीरा़जे टपकल्या. त्यांनी भाऊंच्या सेलफोनच्या सिग्नलवरून त्यांना नेमकं ट्रॅक केलं असणार बघा. त्यांनी अरुंधतीला सांगितलं आहे की तू पैसे घे आणि दिग्विजयभाऊच्या आयुष्यातून बाहेर पड. म्हणजे त्याला नोकरी मिळेल अशी मी व्यवस्था करेन. बाई आहे का कैदाशिण? कुठे फेडेल हे पाप? काय हे पोरांचे हाल. मला रडू आवरलं नाही

एपिसोडच्या शेवटी अरुंधती पद्मिनीरा़जेकडे आलेली दाखवली आहे. उद्या काय होणार ह्या चिंतेने मला झोप येणार नाहिये आज.

ता.क. प्रोमोमध्ये अरुंधती सांगत होती की माझ्यावर जसं प्रेम केलंत तसंच मंजिरीवर करा. ती सोमवारपासून ७ वाजता भेटायला येणार आहे तुम्हाला. आणि वृंदाला भेटा ७:३० वाजता. म्हटलं ते सगळं ठीक आहे गं बाई 'लेकिन तेरा क्या होगा अरुंधती?'

Pages