राजमाची ट्रेक - आयोजकांच्या चष्म्यातून

Submitted by कविन on 17 November, 2010 - 11:02

दिवाळीची सुट्टी लागण्याच्या जवळ जवळ महिनाभर आधी एक दिवस सहज बोलता बोलता ठरलं ह्या दिवाळीत देखील एक ट्रेक मुलांसाठी न्यायचा. ठिकाण ठरलं "नाणेघाट".त्यादृष्टीने आखणी सुरु झाली आणि मी मायबोलीवर पण नाणेघाटला जायचंय हे जाहीर केलं. जाहीर केल्या केल्या पहिला इमेल मला वाटतं पूनम आणि गुब्बीचा आला. मग पुन्हा पुणेकरांना बरोबर घ्यायचं तर नाणेघाट तस गैरसोयीचं ठरेल म्हणून काथ्याकुट होऊन शेवटी राजमाचीवर शिक्कामोर्तब झालं. नुकतेच आमच्या नेहमीच्या ट्रेकींग गृपचे कॅप्टन तिथे शारिरीक अपंगांच्या गृपबरोबर वॉलेंटिअर म्हणून जाऊन आलेले असल्याने तिथे किती जणांची सोय होऊ शकते, कशा प्रकारे ट्रेक नेता येईल ह्याची त्यांना व्यवस्थित कल्पना होती.

माबोवर माहिती टाकली असली तरी फारफार तर ३०-३५ लोकं चौकशी करतील, त्यातली २०-२५ उत्साहाने यायची इच्छा व्यक्त करतील आणि जायच्या दिवसा पर्यंत १५ जणं तरी नक्की रहातील. आमच्या नेहमीच्या ट्रेक गृप पैकी १२-१५ असं करुन देखील जेमतेम एक २७ सिटर बस पुरेशी होईल ह्या माझ्या अंदाजाला सुरुंग लावत प्रचंड उत्साहाने एकेक नाव यादीत अ‍ॅड व्हायला लागलं तशी एका वरुन दोन बस आणि शेवटी दोन बस करुन परत एक जीप करावी लागणार असं चित्र स्पष्ट दिसायला लागलं.

चला कोरम फुल्ल झाला ह्या आनंदात असतानाच काही नावं काही अडचणींमुळे गळायला लागली. एकाच दिवसात अशी ४-५ नावं कमी झाली की मला थोडं टेंशन यायचं खरं, पण इच्छाशक्ती म्हणा किंवा गूडलक म्हणा पण जितकी नावं कमी व्हायची तितकीच नावं दिवसा अखेरी अ‍ॅड देखील व्हायची आणि माझं टेंशन कुठच्या कुठे पळून जायचं नी जमेल ना सगळं हे नवीन टेंशनच भूत मानेवर यायचं. शेवटी जे होईल ते होईल, मी माझ्याकडून तरी १०१% एफर्ट्स द्यायचे ठरवलं आणि त्यातूनही काही चुकलं माकलं तर तेव्हढच शिकायला मिळालं समजून पुढे जायचं असं ठरवलं.

कामांची वाटणी करुन आमचं टिमवर्क जमून येत गेलं. थोडे अंदाज चुकत होते, कुठे नव्याने आखणी करावी लागत होती पण इतना तो चलता ही है म्हणत सगळेच एका स्पिरिटने काम करत होते. नवीन कल्पना समोर येत गेल्या. त्यातली एक कल्पना होती मुलांना प्रशस्तिपत्रक द्यायची. ती होती टिम मधल्या सुषमाची. त्यावर मेहनत देखील तिनेच घेतली. ती कल्पना खरच खुप छान होती हे प्रशस्तीपत्रक घेतानाचा लहानग्यांचा चेहराच सांगून जातोय.

ट्रेकमधे केलेली धम्माल मस्ती तर बाकिच्यांच्या वृत्तांता मधून वाचायला मिळतेच आहे. शिवाय फोटोंमधुनही समजतेय. पण मला इथे मांडायच्यात आमच्या आखणीतल्या काही गोष्टी - काही जमलेल्या नी काही कागदावरच राहिलेल्या अशा...

१) सगळ्यात महत्वाची नी पहिलीच गोष्ट जी आमच्या आखणी नुसार बस मधून उतरुन ट्रेक सुरु करण्या पुर्वी करायची होती पण कागदावरच राहीली ती म्हणजे "इंट्रोडक्शन". गडबड घोटाळ्यामधे पुण्यातल्या सिद्धूशी आदल्या दिवशी संपर्क साधायचा राहूनच गेला. ते तिघेही बिचारे बॅगा पॅक करुन फोनची वाट बघत होते माझा नंबर देखील सेव्ह केलेला नव्हता त्यांच्याकडे. आणि सकाळी बसने नाहूर सोडल्यावर काही वेळाने मी पुणेकरांना रिमांडर कॉल केला तेव्हा हे लक्षात आलं. त्यांचा ट्रेक हुकला असता तर त्यांच्या पेक्षा मलाच जास्त वाईट वाटलं असतं. त्यांना फोन गेल्यावर मग आवरुन निघायला नी पर्यायी लोणावळ्याजवळच्या पिक अप पर्यंत पोहोचायला थोडा उशीर होणार होता. आयत्या वेळी शेड्युल मधे बदल करुन जितका वेळ वाट बघण्यात जाणार तितक्या वेळात बाकिच्यांची ओळख परेड करुन घ्यायचं त्यावेळी सुचलच नाही. आणि जेव्हा गावाजवळ बस सोडून ट्रेक ला सुरुवात केली तेव्हा उन्हाच्या आत मुलं उधेवाडीतल्या मुक्कामी पोहोचली पाहिजेत हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालायला सुरुवात झाली आणि तिथेही ओळख परेड राहुनच गेली.

२) दुसरा राहून गेलेला कार्यक्रम म्हणजे मनोरंजन वर जायला निघण्यापुर्वी किंवा वाटेत ह्या दोन्ही गडांची माहिती देणे, गावाची माहिती देणे.
पावसाने हजेरी लावल्याने मनोरंजन चा कार्यक्रम शनिवार वरुन रविवार वर ढकलावा लागण्याची चिन्ह दिसत होती. पाऊस ओसरल्यावर अंधारुन यायच्या आत मनोरंजनवर जाऊन येऊयात ह्या उत्साहाच्या भरात पावलं भरभर चालण्यात नी मुलांना थांबवण्यात नी मोठ्यांना हाकारण्यात गढली नी सांगायची माहिती पुन्हा एकदा मनातच राहिली. असो पुढच्या वेळी अजून चांगल वेळापत्रक अखता येईल.

३) कोकण खिडकी/दरवाजा देखील बघायचा राहिला. मुलांचा क्विझ सदृश्य कार्यक्रम घ्यायचा राहिला

ओढा क्रॉस केल्यावर ज्या पावसाने आपल्याला गाठलं तोच पाऊस ओढा क्रॉस करायच्या आधी लागता तर आपली जीप ओढ्यातून पुढे गेलीच नसती. त्या कारणा करता कोकण खिडकीचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. अर्थात हा प्लॅन तुम्हा लोकांना माहितच नव्हता पण आमच्या शेड्युल मधे होता त्यामुळेच तुम्हाला एखादवेळेस तो हुकल्याच काही वाटणार नाही पण आम्हाला मात्र त्याची रुखरुख लागून राहीलेय.

४) झोपण्याची थोडी गैरसोय झाली असं फिड्बॅक फॉर्म वाचून जाणवतय. हम्म फिडबॅक फॉर्म वाचून जाणवतय असं म्हणायचं कारण ट्रेक मधे एका केव्हज मधे ३०-४० जणांनी झोपणं ह्याची मानसिक तयारी नेहमीच्या ट्रेकर्स ची असते पण नवख्या ट्रेकर्सना ह्या गोष्टीची कल्पना नसते. मी त्या गोष्टीची आधी कल्पना द्यायला हवी होती. हा मुद्दा माझ्या लिस्ट मधून सुटला खरा.

५) आमचा खर्चाचा अंदाज जरा चुकला. आमच्या गोवेकर काकांनी पुरणपोळी स्पॉन्सर करुन एक खर्च डोक्यावर घेतला. आणि तुम्ही सगळ्यांनी जराही "असं का?, चुकलाच कसा अंदाज?" वगैरे प्रश्न शंका न विचारता आपणहोऊन वाढलेला खर्च वाटुन घ्यायची तयारी दाखवली येव्हढच नाही तर ट्रेक भर किती द्यायचे ते सांग म्हणून माझ्याच मागे लागलात. खरच सांगते तुमच्या सहकार्यामुळे व्यक्तीशः माझ्या नी कॅप्टनच्या डोक्यावरच टेंशन एकदम उतरलं. वाटलं ही तर आपली माणसं आहेत. चुकलो तर...कायचं टेंशन एकदम कमी झालं. आणि करुन तर बघु, जमेल आपल्याला आणि थोडफार जे राहिल ते अनुभव ह्या सदराखाली जमा करुन पुढच्या वाटचालीला लागू हा आत्मविश्वास तुमच्या सगळ्यांमुळे आला.

६) कोंडू वरे ह्यांच्या घरी रहाण्याची उत्तम सोय झाली. त्यांच्याशी पैशाचे व्यवहार ठारवताना सह्याद्री टिमच्या कॅप्टनने एक खूप चांगला निर्णय घेतला असं मला मनापासून वाटतं. त्यांना द्यायच्या मोबदल्यामधे थोडा मोबदला कमी करुन त्यांना त्या कमी केलेल्या मोबदल्या इतक्या नवीन कॅरी मॅट्स घेऊन दिल्या. त्या सगळ्या कॅरी मॅट्स मुंबईतून बस मधून कॅरी करुन नेल्या. त्यामुळे ट्रेकर्स मंडळींना अंथरुणांच ओझ तरी बरोबर घ्यावं लागलं नाही.

७)एक फक्त नाईलाजास्तव करावी लागलेली गोष्ट म्हणजे पेपर प्लेट्स च्या जोडीने जेवणा साठी करावा लागलेला थर्माकोलचा वापर. अर्ध्याहून अधिक आयोजक मंडळी थर्माकोलच्या पुर्ण विरोधात असताना त्याचा वापर मनाला त्रास देत होता. पत्रावळीचा पर्याय तिथे जमु शकला नसता बफे टाईप जेवणामुळे. आणि त्या मंडळींकडे येवढी ताट वाट्यांची सोय देखील नव्हती. आपापली ताट वाटी घेऊन गेलो तरी येव्हढी सगळी ताट वाट्या घासण्यात बराच वेळ आणि पाणी गेलं असतं. असो ह्यावर अजून विचार चालू आहे पुढच्या वेळी काही वेगळी योजना करता येते का बघुयात. तुमच्या काही सुचना असतील तर जरुर सांगा.

इथे रॅपलिंग देखील करता येते पण आम्ही ते प्लॅन मधे ठेवलच नव्हतं. ह्यावेळचा उद्देश लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या वयाच्यांना सहभागी होता याव आणि ट्रेक पुर्ण करुन "आम्हालाही हे जमु शकत" हा आत्मविश्वास त्यांना आणि आम्हाला यावा हा होता. ३ वर्षाच्या श्रिशैल आणि पुर्वा पासून ते पासश्टी गाठलेल्या माळवदे काकांपर्यंत सगळ्यांना ह्यात सहभागी होता आलं हेच खूप महत्वाच आहे आमच्यासाठी

हा संपुर्ण अनुभव खुप काही शिकवुन गेला त्या गोष्टी तर जमा मधे आहेतच. अजूनहि बरच काही बाकी आहे. शिकु असेच धडपडत..

------------------------------------------

थोडंफार राजमाची (उधेवाडी) ह्या गावाविषयी नी मनोरंजन श्रिवर्धन विषयी लिहिते

लोणावळ्यापासून जवळ जवळ १५ किलोमिटर वर वसलेलं उधेवाडी हे गाव तस मोजून २५-३० घरांचं. गावात वस्ती महादेव कोळी समाजाची. गावात प्राथमिक शाळा आहे पण अजुनही वीज नाही. सोलार प्रकल्प अर्धवट झालेला दिसतो.
मनोरंजन आणि श्रिवर्धन कडे जाणर्‍या मार्गावर भैरोबाचं मंदीर आहे. श्रिवर्धनला बालेकिल्ला म्हणतात. बोरघाट हा त्याकाळचा ट्रेड रुट होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी १७ व्या शतकात ह्या दोन्ही गडांची बांधणी झाली.

गावात शंकराचं पुरातन मंदीर देखील आहे आणि मंदिरा जवळच २०० वर्ष जुनं असं एक तळं देखील आहे.
http://visitrajmachi.blogspot.com/2009/08/fort-rajmachi.html ह्या ब्लॉग वर देखील राजमाची संबंधी माहिती मिळेल

-------------------------------
आता आयोजकांचा चष्मा काढून ठेवते नी ....:P

रविवारी श्रिखंड पुरी खावी लागल्याने गिरीविहार परबांच्या सात पिढ्या नरकात गेल्या अस कानावर आलं तर त्यावर बराच विचार विनिमय करुन, जाणकारांचा सल्ला घेऊन असं लक्षात आलं की हे नुकसान भरुन काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आयोजकांपैकी ज्या आयोजक दांपत्यास ६ वर्षाची मुलगी आहे आणि मुलीचं नाव "सा" ह्या अक्षराने सुरु होऊन ते तीन अक्षरी आहे अशा ब्राह्मण दांपत्यास खास परब स्टाईल रविवारच्या भोजनाचं आमंत्रण देण्यात यावं. ते जेवून तृप्त होऊन आशिर्वाद देतील त्यानेच हे नुकसान भरुन येऊ शकेल Proud
---------------------------

हे काही निवडक फोटो

DSC00868 (Small).JPGDSC00963 (Small).JPGDSC00966 (Small).JPGDSC00969 (Small).JPGDSC06272 (Small).JPGIMG_7811 (Small).JPGIMG_7484 (Small).JPGIMG_7700 (Small).JPG

गुलमोहर: 

अहो चष्मेवाल्या बाई , चिल्लर मंडळीचे फोटोज मस्त आलेत, तो झाडाच्या फांदीवर झोपलेल्या मुलाचा फोटो तर खुप आवडला.

अहो चष्मेवाल्या बाई , चिल्लर मंडळीचे फोटोज मस्त आलेत, तो झाडाच्या फांदीवर झोपलेल्या मुलाचा फोटो तर खुप आवडला.

अहो चष्मेवाल्या बाई , चिल्लर मंडळीचे फोटोज मस्त आलेत, तो झाडाच्या फांदीवर झोपलेल्या मुलाचा फोटो तर खुप आवडला.

कविता, मुलांचा ट्रेक अ‍ॅरेंज करण्याचा आणि यशस्वीपणे पार पाडण्यात तुझा उत्साह, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट वाखाणण्यासारख आहे. सगळीकडची पोस्टिंग्ज वाचून आणि मुलांचे व मोठ्यांचे आनंदी चेहेरे पाहून माझ्या म्हणण्याला शिक्कामोर्तब झालं. प्रोजेक्ट मॅनेजमेंटची शेवटची (evaluate phase) फेजपण ह्या लिखाणाने कंप्लीट केली आहेस. कौतुक आहे.

मुलांसाठी ट्रेक आखून तो पार पाडल्याबद्दल अभिनंदन.. !
आयत्या वेळचे वेळापत्रकातले बदल, गोंधळ इ झालं नाही तर ट्रेकची मजा नाही.. Happy

सगळ्या छोटुल्यांचे फोटोज खूप छान आलेत. तो २ नं चा तर एकदम सही !
पुढील ट्रेकसाठी शुभेच्छा...आणि सहभागी होता येण्याची आशा.

कविता, अभिनंदन तुझं आणि सगळ्या चमुचं. मी भारतात असले तर लेकाला घेऊन नक्की येइन पुढच्या ट्रेकला Happy

तो चिल्ल्यापिल्ल्यांचा पळताना फोटो फार गोड आलाय.

इतका छान ट्रेक आयोजित केल्याबद्दल अभिनंदन Happy
खुप धमाल केलीत असं दिसतय सगळयांच्या चेहेर्‍यावरुन.

धन्स लोक्स Happy

श्री अरे तो छोटा मुलगा श्रिशैल आहे, इंद्राचा मुलगा.
सगळी बच्चे कंपनी एकदम धम्माल मुड मधे होती द्न्ही दिवस.
साना सारा आणि मीराने तर परत येताना भंडावून सोडल "आता कोणता गड करायला जायचय?" विचारुन.
त्यावर कोणीतरी मस्करीत "कलिंगड" म्हंटल्यावर त्या तिघीही आनंदाने "आता कलिंगडावर जायचय" म्हणत होत्या Happy

कवे, हे मुद्दे मांडून तू ट्रेकचा संपुर्ण भाग कव्हर केलास. मजा आली, पुढच्या ट्रेकला नक्की. Happy खरोखर अविस्मरणीय ट्रेक ठरला संपुर्ण मायबोलीकरांसाठी. चले चलो... चले चलो... क्रमशः

कवे सुंदर आयोजन..... three cheers for you....

आयोजकांपैकी ज्या आयोजक दांपत्यास ६ वर्षाची मुलगी आहे आणि मुलीचं नाव "सा" ह्या अक्षराने सुरु होऊन ते तीन अक्षरी आहे अशा ब्राह्मण दांपत्यास खास परब स्टाईल रविवारच्या भोजनाचं आमंत्रण देण्यात यावं. ते जेवून तृप्त होऊन आशिर्वाद देतील त्यानेच हे नुकसान भरुन येऊ शकेल >>> खुले आमंत्रण, कधी येताय बोला..

कविता, फार परिश्रम घेतेलेले दिसताहेत आयोजकांनी. असे उपक्रम नियमित होत रहावेत.
पत्रावळीसाठी गोव्याला मिळणार्‍या सुपारीच्या पत्रावळ्या हा चांगला पर्याय आहे. त्या मजबूत असतात आणि इको फ्रेंडली देखील.
कधी कधी काही आयोजकानी पुढे जाउन, त्यांनी काही पूर्वतयारी करुन ठेवली, तर जास्त सोयीचे होते.
आता मुलांच्या वृतांताची वाट बघतोय.

कविता,
पुन्हा एकदा खूप खूप कौतुक तुझं आणि टीमचं. आणि प्रांजळपणे चुका मांडल्यावर तर आदर अजून वाढला.

कविता अभिनंदन.
साध्या पत्रावळीऐवजी पुण्याच्या एस्कॉन मंदिरात प्रसादासाठी वापरतात तश्या पत्रावळी छान आहेत.
जाड असतात. मिळाला तर आज उद्या फोटो टाकते.

कविता, परत एकदा कौतुक आणि हार्दिक अभिनंदन ट्रेक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल Happy
संयोजक इतके कळकळीचे लाभले असतील, तर कोणताही उपक्रम यशस्वी होतोच. त्याबरोबर बच्चे कंपनीचा उत्साह आणि निरागसपणा आणि मोठ्यांचं सहकार्य- मग आणखी काय पाहिजे? Happy मस्त वाटलं वाचून. असे अनेक ट्रेक्स करा.. शुभेच्छा. आगे बढो, हमको मौका मिले तो हमभी साथमें आयेंगे Happy

बाळगोपाळांचा यशस्वी ट्रेक पार पाडल्या बद्दल कविता आणि 'सह्याद्री' टिमचे मनपुर्वक अभिनंदन Happy

थर्मोकॉलच्या डिश पाहून मलाही धक्का बसला होता... पण नवख्या ट्रेकर्सची संख्या बघता तो निर्णय योग्यच होता असे वाटते.

झोपण्याचा जागे बाबतीत मारामारी करावि लागली खरी... पण फॅमिली ट्रेक पुढे तो मुद्दा गौण वाटतो :p

कविताजी आणि सर्व यशस्वी संयोजक,

तुमच्या उत्साहाला, धाडसाला,पाठपुराव्याला, संयोजनाला आणि त्यातल्या त्रुटी दुर करण्याच्या उत्साहाला सलाम.

तुमचा उत्साह कायम राहो !

भाच्चे, अख्खा गड फिरलो पण हा 'व्ह्यू' पॉईंट निसटलाच नजरेतून. Proud

त्या सूचना टाक ईथेच. गंमत अशी की गाईड म्हणून भुंगा येउ शकेल पक्षीनिरीक्षणला. एक तज्ञ सापडला. आता मुंबईतली सायनचा किल्ला, बाणेश्वर तलाव, सायनच निसर्ग उद्यान असे स्पॉटस् पण कव्हर करुया ?

शाब्बास कविता!! तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन!!

तुझ्या ह्या लेखाला 'सिंहावलोकन' असं शीर्षक दे Wink

असे अनेक ट्रेक्स यशस्वी करा.. सदिच्छा तुमच्या पाठिशी आहेत. जमेल तसे सहकार्य करूच..

पानांच्या पत्रावळी डोंबिवलीतही मिळतात, चौकशी करून सांगते.

Pages