Submitted by मी अभिजीत on 13 May, 2008 - 10:22
पदोपदी बघ चकवा आहे.
किरण तमाहुन फ़सवा आहे.
रांगेमध्येच जीवन सरले
सांग मोजुनी कितवा आहे..!
दोन्ही हातां पाचच बोटे
कसला डावा उजवा आहे..!
त्यांची हृदये ‘दगडी’ झाली
मजला म्हणती हळवा आहे..!
अरे किनार्यासाठी नाही,
लाटांसाठी मचवा आहे.
मिठी मारण्याआधी खाना,
कमरेला बघ बिचवा आहे ?
ठिणगी ज्याला आज समजता,
तोच उद्याचा वणवा आहे.
आम्ही नक्की स्वतंत्र झालो,
की ही अजुनी "अफ़वा" आहे..!
– अभिजीत दाते
गुलमोहर:
शेअर करा
शेवटचे २
शेवटचे २ शेर फार आवडले! मतलाही मस्त.
रांग शेरात सानी मिसर्याने काही जास्तीचे हाती येत नाही असे वाटते. तेच थोडेफार हात आणि हळवा शेराचेही. dont get me wrong.. हे शेरही छानच आहेत. पण उला मिसर्याने तयार केलेल्या अपेक्षा सानी मिसरा पूर्ण करत नाही एवढच. बाकी चु.भू.दे.घे.
छान
छान आहे...
पण बर्याच ठिकाणी मीटर गेलंय...
उदा.
रांगेमध्येच जीवन सरले
सांग मोजुनी कितवा आहे..!
पण हाच शेर सर्वात आवडला....
छान
छान आहे.
मतला आणि शेवटचा शेर आवडले. मचव्याचा शेरही छान आहे. आणि पुलस्तींच्या मताशीही सहमत आहे, ("चू. भू. दे. घे. सह).
-सतीश
मस्त हळवा
मस्त
हळवा खासच
सुधीर
वा!!! छान
वा!!! छान आहे गजल...
मतला आणि शेवटचे दोन खूप आवडले...
मचवा ही आवडला.. ह्या अर्थाचे इंग्रजीत एक saying आहे.. ते आठवले
बाकी पुलस्तीशी सहमत...
रांगेमध्ये चे रांगेमधे करुन मिटर पाळता येइल असे वाटते...
मतल्यामधले तमाहुन मधले हु पण जरासे खटकले..
चु.भु.दे.घे.
visit http://milindchhatre.blogspot.com
एकूणात
एकूणात गजलंच सुंदर! त्यातही शेवटचे २ शेर अप्रतिम!!
अभिजीत गजल
अभिजीत गजल आवडली. छोट्या बहरची गजल लिहिणं मलातरी कठीण काम वाटतं.
मचवा, वणवा, अफवा... आवडले.
बाकी, र्हस्व-दीर्घाची सूट किंवा नियम वगैरे.... मी कधी कधी कबूल असते तर कधी कधी सूट घ्यावी द्यावी या मताची.... पण मग गजलेच्या व्याकरणाचं काय? असाही विचार येऊन जातो... सगळच उल्टं-पाल्टं आणि माझं मलाच कळत नाही... पण नकळत 'व्वा' निघून गेलेला असतोच
त्यांची
त्यांची हृदये ‘दगडी’ झाली
मजला म्हणती हळवा आहे..!
हा आणि शेवटचा खूप खूप आवडले!
एकंदरीत छान गझल.
त्यांची
त्यांची हृदये ‘दगडी’ झाली
मजला म्हणती हळवा आहे..! >>>> आहा .... क्या बात है!
परागकण
दोन्ही
दोन्ही हातां पाचच बोटे
कसला डावा उजवा आहे..!
त्यांची हृदये ‘दगडी’ झाली
मजला म्हणती हळवा आहे..!
मस्तच
नरेन्द्र