गडांचा राजा, राजियांचा गड "राजगड"

Submitted by Yo.Rocks on 9 July, 2010 - 13:37

गडांचा राजा, राजियांचा गड "राजगड"... मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली नि म्हटले चला आता ट्रेकला सुरवात केली पाहिजे.. जाण्याचे आधीच ठरवले होते.. २६ - २७ जूनला "राजगड" !! कितीजण येतील ते माहित नव्हते.. पण मायबोलीचा 'योगायोग' मात्र नक्की होता.. नि माझे ट्रेकमेट्स ग्रुपमधील दोन मित्र !.. बाकी सगळ्यांना समस पाठवला पण शेवटी संख्या चारच झाली नि आम्ही शुक्रवारी रात्री दादरहुन सुटणार्‍या प्रायव्हेट गाडीत बसलो !
रात्री एकच्या सुमारास गाडी सुटली नि तोच 'नविन' चा फोन आला.. हा मायबोलीवर नविनच आयडी आहे नि ह्याच्याशी माझी काहीच ओळख नाही.. मायबोलीवरील दुर्गभ्रमंतीबद्दलचे लेख वाचुन हा उत्सुक झाला होता (कर्म माझे ! :P).. भ्रमर विहारकडुन नंबर मिळवला होता त्याने.. "मी पुण्यात आहे तेव्हा तुम्ही कधी पोह्चाल ते सांगा, मी येतो.." म्हटले ह्याने फारच लवकर कळवले.. 'पुण्याला टोल नाक्याला भेटु' म्हणत फोन ठेवला नि लक्षात आले जल्ला हा बसणार कुठे.. आमची गाडी फुल होती.. पुन्हा फोन केला पण हा काही फोन उचलेना.. शेवटी दोनच्या सुमारास पुन्हा फोन.. तेव्हा "तू थेट स्वारगेटला भेट !" असे सांगितले.. पण हा उत्साही-प्राणी आधीच टोल ना़क्याच्या वाटेला निघाला होता.. 'बघतो कसे काय ते' म्हणत त्याने फोन ठेवला.. आम्ही तीन साडेतीनच्या सुमारास तिकडे पोहोचलो.. पुन्हा ह्याचा फोन.. "मी अजुन इकडेच आहे... कोणतीच गाडी मिळत नाहीये... कितीही भाडे द्यायला तयार आहे पण कोणीच भेटत नाहीये.." म्हटले झाले याचे काही खरे नाही.. 'पुन्हा बघतो' म्हणत फोन ठेवला.. आम्ही एव्हाना पुण्यात(स्वारगेटला) पाचच्या सुमारास पोहोचलो.. ह्याला फोन लावला तर तो अजुनही तिथेच !! आम्ही केलेल्या चौ़कशीनुसार सकाळी साडेसहाची पुणे-वेल्हे एसटी होती.. तेव्हा कसेही करुन साडेसहापर्यंत येण्याचे त्याला कळवले.. पुन्हा अर्ध्याएक तासाने त्याचा फोन.. "मी अजुन इथेच आहे.. जमले तर पावणेसातपर्यंत येउ शकतो.. चालेला का.." पण आता आमचादेखील नाईलाज होता.. कारण पुढे उशीर होणे परवडणारे नव्हते.. शेवटी मी त्याला मुंबईस परतण्याचा सल्ला दिला.. 'बघतो कसे काय ते' म्हणत त्याने फोन ठेवला..
आम्ही कसाबसा रमतगमत वेळ काढला.. नि बरोबर साडेसहा वाजता एसटी हजर झाली.. स्वारगेट सोडले नि पुन्हा ह्याचा फोन.. ''मी शिवाजीनगरात आहे.. कुठे आहात.. ?'' झाले, ह्याला किती तीव्र इच्छा होती याची कल्पना आली.. पण आता येणार कसा तो प्रश्न होता.. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही त्याला आम्ही कसे जाणार आहोत ते सांगून ठेवले.. मार्गासनीला (एसटी भाडे स्वारगेट ते मार्गासनी- ३४ रु.) उतरुन पुढे गुंजवणे गावात जाणार आहोत असे सांगितले.. 'पुन्हा बघतो' म्हणत फोन ठेवला.. दीडएक तासाने मार्गासनी गाव आले.. आतापर्यंतच्या प्रवासात पावसाचे कुठलच चिन्ह नव्हतं.. म्हटले राजगड पण कोरडाच का ??
तिथुनच पुढे जीप करुन आम्ही गुंजवणे गावात पोहोचलो.. (जीपचे भाडे २०० रु. प्रत्येकी अंदाजे २०/- ) आमच्यासोबत अजुन तीन जणांचा ग्रुप उतरला होता तेव्हा आम्ही एकत्रच जीप केली.. हिरवाईतुन रस्ता काढत काढत जीपने अर्ध्यातासातच गुंजवणे गावात सोडले.. माझ्या फोनची रेंज नव्हती म्हणुन मी फोन बंद करुन ठेवला होता.. गावात पुरोहितांकडे ('आरण्यधाम गुंजवणे' हॉटेलचे मालक.. जिथे चांगली सोय आहे खाण्याची..) गरमागरम पोह्याची ऑर्डर देवुन आम्ही सभोवतालचा परिसर बघु लागलो.. छानसे नि छोटेसे गाव आहे.. नि तिथेच बाजुला एक छोटे मंदीर आहे.. बाकी सभोवतालच्या परिसरात शेतजमिनीच्या राईस प्लेटस मात्र लक्ष वेधुन घेत होत्या..

थोडेफार फोटोसेशन करुन आम्ही नाश्त्यासाठी परतलो.. नाश्ता करताना मित्राचा अचानक फोन वाजला.. समोरुन तोच.." कुठे आहात..? " गुंजवणे गावात आहोत म्हटल्यावर मी पाच मिनीटात पोहोचतोय.. थांबाल का.. ??" खल्लास.. काय ह्याची जिद्द.. आता आम्हाला उशीर जरी झाला असता तरी थांबलोच असतो.. हा इथवर आला कसा.. विचार करेस्तोवर हा भाई एका जीपमधुन हजर !!! एकटा जीप करुन आला होता ! 'तोडलस मित्रा' म्हणत आम्ही सगळ्यांनी हात जोडले !!! जल्ला आम्ही असतो तर 'कुणी सांगितलय एवढ धडपडायला' म्हणत मुंबईची वाट धरली असती ! पण हा पठ्ठा निव्वळ त्याची जिद्द, आवड नि आशेच्या जोरावर आम्हाला गाठु शकला ! बर ओळखही नव्हती ! ठरवुनही नव्हता आला.. त्याच्या कुण्या मित्राचे वडील वारले होते त्यासाठी पुण्यात आला होता.. तेव्हा इथवर आलो आहे तर आता ट्रेकची इच्छा पण पुर्ण करुन घेउ म्हणत तो राजगडावर येण्यास राजी झाला होता.. पुन्हा एकवार अजुन एका मायबोलीकराची ओळख थेट ट्रेकमध्येच झाली... Proud आता आमची संख्या पाच !

लवकरच नाश्ता आटपुन आम्ही मार्गी लागलो... ठरले होते पद्मावती माचीच्या गुप्तदरवाज्याने वरती जायचे ! पण मध्येच आम्हाला उचकी आली नि गुंजवण दरवाज्याची ओढ लागली.. पण आमच्याबरोबर वाटाड्या यायला कोणी तयार होईना तेव्हाच त्या वाटेचा अंदाज आला.. म्हटले जाउदे.. वरती लवकर पोहोचायचेय नाहीतर फिरत बसू म्हणत आम्ही नेहमीच्या वाटेने मार्गस्थ झालो ! Happy


(शिव, योगायोग, अनिरुद्ध नि नविन)

आम्ही जोशाने सुरवात केली.. वातावरण ढगाळ होते पण पाउस नव्हता... सभोवताली हिरवी पालवी पसरली होती.. नि अर्थातच राजगड धुक्यात हरवला होता.. नशिबाने फारसे ग्रुप नव्हते राजगडला जाण्यासाठी त्यामुळे अधिकच आनंद झाला... ही वाट तशी सोप्पीच आहे.. ठळक पाउलवाट आहे.. त्यातच ठराविक अंतराने सौरउर्जेच्या धर्तीवर चालणारे वीजेचे खांब आहेत.. त्यामूळे वाट शोधण्याचे कामच उरत नाही.. आम्ही सभोवतालचा परिसर न्याहाळत पुढे कूच करत होतो.. अर्ध्याएक तासातच बर्‍यापैंकी मोठे पठार लागले... तिकडुन राजगड बर्‍यापैकी दृष्टीपथात येतो.. ढग थोडेसे बाजुला झाले नि आम्हाला वाटेतच सुवेळा माचीवर असणारे ते सुंदर नेढे नजरेस पडले..

------------------------------------------------------------------------------


(वाट राजगडाकडे..)

अजुनपर्यंत म्हणावा तसा काही चढ लागला नव्हता.. जो आता सुरु व्हायला काही अवधी शिल्लक होता... डोंगरावरची पाउलवाट सुरु झाली नि ढगांशी झटापटीचा खेळही सुरु झाला... पावसाच्या इवल्या इवल्या थेंबाचा तुरळक शिडकावा सुरु झाला.. त्यांचा आस्वाद घेत आम्ही पंधरावीस मिनीटातच शेवटच्या टप्प्यात आलो.. ! मागे वळून पाहिले आतापर्यंतची केलेली वाटचाल दिसुन आली..

इथुनच पुढे काय ते म्हणाल ती किंचतशी अवघड वाट लागते ! थोडीफार निसरडी झाली होती म्हणुन काळजी घेत आरामात (!) आम्ही गुप्तदरवाज्यापाशी('चोर दरवाजा') पोहोचलो..

(ढग राहिले खाली.. आम्ही आलो वरती.. !)

गुप्तदरवाज्याशी येताच आम्ही जोरदार घोषणा सुरु केल्या.. शिवरायांचे नामस्मरण करत आम्ही चोरदरवाज्यातून प्रवेश केला.. गुप्तदरवाजा म्हटले तर वाकुनच आत शिरावे लागते नि तिथुनच मग गडावर येण्यास पायर्‍या आहेत..
DSC03916.JPG
(चोर दरवाज्यातून आत शिरताना मित्राने घेतलेला हा फोटु !)
-------------------------------------

(गुप्तदरवाज्यातुन वरती येणारा मार्ग !)
आम्ही गडावरती आलो नि हे पाहु की ते पाहू असे झाले ! पायर्‍या चढुन लागणारे हे छोटे पठार म्हणजेच पद्मावाती माची !! या गडाला तीन माच्या आहेत.. सुवेळा माची, संजिवनी माची नि पद्मावती माची..!!

आम्ही पहिले याच पद्मावती माचीवरील थोड्या उंचीवर असलेले पद्मावती मंदिराचे दर्शन घेण्याचे ठरवले.. हे गडावरचे प्रमुख देवीचे मंदीर.. या मंदिराचा जीर्णोध्दार झालेला आहे त्यामुळे सुस्थितीत आहे..

--------------------------------------------------------------------

मंदिरात असलेल्या खांबावरील कोरीवकाम छानच !
या मंदिरात तीस जण सहजगत्या झोपु शकतात इतकी जागा असल्याने वस्तीला येणारी ट्रेकर्स मंडळी याच जागेला प्राधान्य देतात.. या मंदिरासमोरच सईबाईंची समाधी आहे.. बाजुलाच दिपमाळेचा स्तंभ आहे..

याच मंदिराच्या एका बाजुस पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत.. आपल्याकडे सुज्ञ मंडळी बरीच असल्याने साहाजिकच दोन्ही टाक्यांत आपल्याला बराचसा कचरा दिसुन येतो !!!! या टाक्यांवर कचरा पडु नये यासाठी टाकलेली लो़खंडी जाळी बघुन तर किती काळजी घेतली जाते याचा प्रत्यय येतो... कारण ती बर्‍यापैंकी तुटलेली नि गंजलेली आहे.. !!! इतकी दुरावस्था होती तरी नाईलाज होता.. शेवटी अंदाज घेत आम्ही एका टाकीची पाणी भरुन घेण्यासाठी निवड केली.. (दुसर्‍या टाकीत तर दोन मेलेले बेडुक होते !!! ) असो.. या मंदीरात येण्यासाठी चढताना एक सुरेख तलाव लागतो.. या तलावाचे सौंदर्य काही औरच.. अत्यंत रेखीव नि सुबक बांधणी असेल याची लगेच कल्पना येते.. तलावात उतरण्यास समोरासमोरील भिंतीत दोन दरवाजे आहेत.. यालाच 'पद्मावती तलाव' म्हणतात..

-------------------------------------------------------------------

(पद्मावती तलावाचा नजारा.. मंदिराच्या परिसरातून..)

याच तलावाच्या एका बाजुस पडीक बांधकाम दिसते.. तिकडे दारुचे वा धान्याचे कोठार असावे..
पद्मावती मंदीराच्या जवळच अजुन एक सुस्थितीत असलेले घर दिसते..इकडेच पुरातत्व खात्याचे कर्मचारी राहतात.. तिथेच बाजुला रामेश्वरचे मंदीर आहे.. आम्ही गेलो तेव्हा या मंदिराचा दरवाजा बंद केला होता.. त्यामुळे तो उघडुन बघण्याच्या फंद्यात पडलो नाही.. तिथुनच पायर्‍यांनी आम्ही अजुन वरती गेलो..नि उजव्या बाजुस राजवडा नजरेस पडला.. अर्थातच भग्नावस्थेत ! सभोवार बांधीव चिरे दिसतात इथे..
त्याच वाटेने पुढे आले असताना अंबारखाना लागतो.. नि याच अंबारखानाच्या मागे बांधीव पाण्याचा तलाव आहे.. अंबारखानाच्या अगदी समोर एक खोली दिसली.. नेटवर त्याचा उल्लेख दारुकोठार म्हणुन आढळतो.. पण सदरेच्या नि राजवडयापासुन इतक्या जवळ दारुकोठार कसे असेल अशी शंका आली.. आम्हाला तरी ते धान्याचे कोठार असावे असेच वाटते.... या अंबारखान्याला उजवीकडे सोडुन अजुन पुढे गेलो नि महत्त्वाची वास्तू आढळली ती म्हणजे 'राजसदर' .. ह्या सदरेच्या मधल्या दालनात महाराजांची बैठक होती.. या राजसदरेचे खांब घाटदार दगडी बैठकीवर बसवलेले असतील याची कल्पना तेथील अवशेषांवरुन येते....

(राजसदर)
------------------------------------------

याच सदरेच्या वरच्या बाजुस झेंडा फडकवण्यासाठी जागा आहे.. इथुनच पुढे तीन वाटा फुटतात.. डावीकडील वाट गुंजावण दरवाज्याकडे वळते.. तिथुनच पुढे सुवेळा माचीवर देखील जाता येते.. तर उजवीकडील वाट संजिवनी माचीकडे.. या माचीकडे जाताना जर खाली उतरले तर पाली दरवाजा (राजगडाचे मुख्य प्रवेशद्वार) नजरेस येतो ! आम्ही या दोन्ही वाटांना बगल देउन सरळ बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट पकडली.. गडावरील सर्वोच्च असलेले ठिकाणा ढगांच्या धुक्यात दिसेनासे झाले होते..त्या पाउलवाटेने पुढे गेले असता बालेकिल्ल्याकडे जाण्यास एक पडिक दरवाजा आढळतो.. तिथेच पुढे काहि अंतरावर उजवीकडच्या कातळात कोरलेली चौकटी गुहा दिसते.. बाकी या वाटेने जाताना डावीकडच्या दरीत ऐटीने उभा असलेला गुंजावण दरवाजा लक्ष वेधुन घेतो..

इथुनच सुवेळा माचीवर जाणारी मळकी वाटही हिरवाईमध्ये उठुन दिसत होती.. काही मिनिटातच आम्ही अवघड असा भासणार्‍या कड्याच्या खाली येउन पोहोचलो.. इथुनच बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराला गाठता येते.. पावसामुळे ही वाटसुद्धा निसरडी बनली होती.. नि आधारासाठी बांधण्यात आलेले रॅलिंग तर अगोदरच तुटलेल्या अवस्थेत होते.. हा चढ बघुन आमच्याबरोबर आलेला नि आमच्यात वजनदार असलेला नविन जरा चाचपडलाच ! त्यातच बॅग घेउन चढायचे त्यामुळे तो सांशक होता.. पण आम्ही आहोत म्हणत त्याला प्रेरित केले.. नि आम्ही चढण्यास सुरवात केली.. मला आता कुठे ट्रेकिंग केल्यासारखे वाटत होते !! Proud (रॅलिंग नसती तर अजुन मजा आली असती.. )

तसा हा फार काही मोठा चढ नाहिये.. पण एक वैशिष्ट्य असे की या बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार खालुन काहीच दिसत नाही.. अर्धा चढ पार केल्यावर थोडे वळण घेतल्यावरच बालेकिल्ल्याचा बहुकोनी असा बुरुज असलेल्या दरवाजाचे दर्शन झाले !! अहाहा ! धुक्यामध्ये ह्या दरवाज्याची आकृती छानच वाटत होती..

पुन्हा एकदा शिवरायांचे नामस्मरण करत, 'हर हर महादेव' च्या घोषणा देत आम्ही या दरवाजाच्या पायर्‍या चढु लागलो... सुमारे आठ मीटर उंचीच्या दोन बुरुजांमध्ये हा भव्य दरवाजा(महादरवाजा) विसावला आहे.. प्रतापगडावर ठार मारण्यात आलेल्या अफजलखानाचे शीर ह्याच बालेकिल्ल्याच्या प्रवेश्द्वारावर एका कोनाड्यात मरणोत्तर आदराने बंदिस्त ठेवले होते असे इतिहासात म्हटले जाते..!

या प्रवेशद्वाराचा उंबरठा ओलांडला नि मागे वळुन पाहिले तर ढ्गांनी मोठाच्या मोठा पांढरा पडदा उभा केला होता..

अथवा याच दरवाज्यातुन समोरील खोल दरीचे नि सुबक बांधणीची अश्या 'सुवेळा माची'चे सुंदर दर्शन घडले असते.. पण ते भाग्य आम्हांस लाभले नाही.. ! तिथुनच आम्ही पुढे चढुन गेलो..

या दरवाज्यातुन प्रवेश केल्यावर समोरच वरच्या अंगास जननीचे मंदीर आहे.. हे पुर्नबांधणी करुन बांधलेले आहे..
दरवाज्यातुन आत शिरल्यावर दोन तीन असलेल्या पायर्‍या चढुन वर आलो नि लागलीच खाली दरीत पाहिले तर गडाच्या तटातील गुंजवण दरवाजा नि पदमावती माची पासुन सुवेळा माचीवर जाण्याच्या वाटेवर असणारी दिंडी यांचे दर्शन झाले.... तर समोर एव्हाना असलेला ढगांचा पडदा बाजूस सरला नि धुसर अशा वातावरणात आम्हाला सुवेळा माचीचे काही मिनीटांसाठी दर्शन झाले.. नशिब आमचे !

(गुंजवणे दरवाजा)
---------------------------------

(पद्मावती माची)
---------------------------------

(सुवेळा माचीकडे जाणार्‍या वाटेवरची दिंडी)
-------------------------------------

(धुसर दिसणारी सुवेळा माची)
=========================
फोटो काढेस्तोवर पुन्हा सुवेळा माची धुक्यात लपली गेली.. या दरवाजाच्या एका बुरुजावरच बसुन आम्ही पेटपुजा करुन घेतली.. इडलीचटणी नि टोमॅटो सॉस, पुरणपोळी, मालपोहे, सुतारफेणी अशा विविध खाद्यप्रकारावर ताव मारत आम्ही जेवण आटपले.. राजगडाचे नकाशे नि इतिहासाची माहिती नेटवरुन आणली होती तेव्हा क्षणभर विश्रांती घेताना इतिहासाची उजाळणी व्हावी म्हणुन आम्ही नविनला राजगडाचा इतिहास मोठ्याने वाचण्यास सांगितले नि काही काळासाठी इतिहासात रमलो..:)

आमचे नशिब चांगले होते कारण आम्ही उजव्या बाजुने असणार्‍या पायर्‍या चढुन बालेकिल्ल्याच्या मुख्य भागावर जायला निघालो नि नेमके आतापर्यंत तिथे गेलेले ग्रुप्स खाली उतरु लागले होते.. त्यामूळे गर्दीगोंधळ नव्हता.. नि अश्या शांततेत निसर्गाने नटलेल्या गडावर फिरण्यातच खरी मजा असते..

बालेकिल्ल्याच्या वरच्या भागावर जाण्यास असणार्‍या पायर्‍यांनी आम्ही वरती गेलो.. तिथे गेल्यावर वाटेतच चंद्रकोरासारखे खडकात खोदलेले छोटे टाके लागले.. बालेकिल्ल्याचे पिण्याचे पाणी हेच होते जे आता पिण्यायोग्य नाही..

इथुनच पुढे गेलो जिथे ब्रम्हर्षी मंदिर आहे.. 'मुरुंबदेव' नावाने ज्ञात असलेल्या ह्या डोंगरात ब्रम्हऋषीने तपश्चर्या केली होती... हे मंदीर खुप प्राचिन आहे.. तिथुनच आम्ही पुढे लगबगीने खालच्या बाजुस बालेकिल्ल्याच्या एका टोकास असलेल्या बुरुजावर गेलो.. याचे कारण इथेच भरगच्च ढगांच्या धुक्यात स्वराज्याचा भगवा जरीपटका मोठ्या दिमाखाने फडकत होता.. आजुबाजूचे काहीच दिसत नव्हते.. पण कड्यावर उभे राहुन जोरात असलेल्या वार्‍याला साद घालताना मजा येत होती.. त्यातच फडकणारा भगवा पाहुन छाती भरुन आलीच पाहिजे !

------------------------------------------------

आम्ही त्या दाट धुक्यातच फोटो काढुन घेतले.. येथील बुरुजाला 'उत्तरबुरुज' असे म्हणतात.. इथे एक चोरवाटेने येण्यास छोटा दरवाजा आहे पण तिथे मोठा दगड ठेवुन वाट बंद केलेली दिसली.. पण या दरवाज्यातुन येणारी वाट काही ठळकशी नजरेस पडली नाही.. नि दोरखंड वापरल्याशिवाय तरी शक्य वाटले नाही.. बाकी सभोवतालच्या धुंद मंद अश्या मस्त वातावरणात चहाची आठवण झाली नि माझ्या हौशी मित्राने आपली बॅग उघडली.. पाउस नाही बघुन लगेच ब्रम्हर्षी मंदीराच्या समोरच कागदी (!) चुल पेटवली गेली.. गुंजवणे गावातुन आणलेले दूध अजुनतरी चांगले होते.. त्यांमुळे आमचा चहाचा प्रश्ण सुटला होता..

ह्यांची चहा बनेपर्यंत सभोवताली फिरुन आलो..
याच मंदिराजवळ अजुन दोन पाण्याच्या टाक्या आढळतात.. नि अजुन एक गुहासदृश पाण्याची टाकी आहे.. जिथे पाणी दगडांतुन झिरपताना दिसले.... पण तिन्ही टाक्यांतले पाणी पिण्यायोग्य नाहीये.. एव्हाना मघासपासुन ढगांनी घेरलेला भगवा धुसर वातावरणातून मुक्त झाला नि मग खालील सुंदर दृश्य दिसले.. समोर भगवा नि मागे पदमावती माची.. अहाहा !

हिरवा शालु नेसलेली पद्मावती माची तर इथून जास्तच मोहक दिसत होती..

ब्रम्हर्षी मंदिराच्या मागेच पुन्हा उंच भागावर गेलो जिथे राजवाड्याचे अवशेषच शिल्लक आहेत.. इथे राजवाडा होता हे सांगणारा फलक देखील भग्नावस्थेत आहे हे सांगणे नकोच.. Proud

-------------------------------------------------------------------------------

याच परिसरात बालेकिल्ल्यावरील राजसदर नजरेस पडली.. ही सुद्धा भग्नावस्थेत आहे.. पण हे रुप बघुनही त्याकाळी काय वैभव असेल याची कल्पना येते.. विस्ताराने छोटी पण नेटक्या बांधणीची ही वास्तू असावी..ही सदर बघुन मन भारावून गेले..

-------------------------------------------------------------------------------------------

याच सदरेच्या डाव्या बाजुला कोठाराची पडकी इमारत दिसते.. फलक जरी 'दारुकोठार' असल्याचे दाखवत असला तरी सदरेच्या बाजुस दारुकोठार ही बाब पटली नाही.. सदरेच्या उजवीकडेच काही पुर्णतः भग्न अवस्थेतील इमारती चौथरे दिसतात..

जिथे बाजारपेठ नावाचा फलक दिसतो.. गडाच्या अगदी वरचे टोक असलेल्या या महत्त्वपुर्ण भागात बाजारपेठ हे देखिल काही पटले नाही..

आजुबाजूचे पडिक अवशेष बघुन झाले नि समोरच पुर्वेकडे ढगांची जत्रा नजरेत भरली.. पुन्हा बघतच राहिलो..!!

या दृश्याला पार्श्वभूमीला ठेवुन उडी मारतानाचा नेहमीचा 'स्टाईलीश' फोटो घेण्याचा माझा नि योगायोगचा असफल प्रयत्न झाला.. Happy शेवटी कंटाळुन आम्ही चहा झाली की नाही बघायला गेलो.. Happy परतताना ढगात लपलेल्या सुवेळा माचीने पुन्हा एकदा दर्शन दिले.. यावेळी 'डुबा हिल' ला खेटुन सुवेळा माचीकडे जाणारी वाट देखील नजरेस पडली..

(सुवेळा माची बालेकिल्ल्यावरुन..)
--------------------------------------------------------------

सुवेळा माचीकडे तोंड करुन असणारा बालेकिल्ल्यावरील आणाखीन एक बुरुज.. मागे दिसणारी तटबंदी काळेश्वरी बुरुजाच्या परिसरातील असावी.. नीटसे आठवत नाहीये..

तिथुन परतलो नि मस्तपैकी गरमागरम चहाचा आस्वाद घेतला.. माझ्या मित्राने 'पावसाळी वातावरण, सुसाट वारा नि पेटवण्यासाठी फक्त पेपर्स' अशा कठीण परिस्थितही अगदी 'परफेक्ट' चहा बनवला होता.. मान गये दोस्त ! Happy

नाश्तापाणी आटपुन आम्ही बालेकिल्ल्याचा उर्वरीत भाग बघुन आवरते घेण्याचे ठरवले.. शनिवारीच शक्य तितका राजगड बघण्याचे ठरवले होते.. अवतीभवती उनपावसाचा खेळ चालु असल्याने गडावरील हिरवाई सारखी भुरळ पाडत होती.. तर आकाशात ढ्गांचा स्वच्छंद खेळ सुरु होता.. दुरवर पहावे तर सह्याद्री कड्यांचा ढगांशी लपाछुपीचा खेळ सुरु होता... बॅगा उचलल्या तोच आमच्यावर राजगडासमोरील तोरणा प्रसन्न झाला नि त्याचे दर्शन घडले..

(तोरणा..)
तोरणाच्या मागील कोपर्‍यात असणारे लोहगड विसापूर तर उत्तरेस टि.व्ही चा टॉवर असलेला सिंहगड नि इतर सह्याद्री रांगा नजररेस पडल्या... ह्याच गडावरुन राजेसाहेबांनी सिंहगड फत्ते होताना पाहिला होता.. !

हे सारे न्याहाळताना ढगांची खाली भूभागावार पडलेल्या सावलींच्या आकृत्या बघतानासुद्धा मजा येत होती... त्यातलाच हा एक बदामी आकार.. Happy

इथुनच मग आम्ही संजिवनी माचीकडे तोंड करुन उभा असलेल्या बालेकिल्ल्याच्या टोकावर गेलो.. ह्या टोकावर जायचे तर बालेकिल्ल्याच्या उंच भागावरुन खाली सरकायचे.. इथेही पडझड झालेला छोटा बुरुज आहे ज्याचे तोंड संजिवनी माचीकडे आहे....आमचे नशिब इतके चांगले होते की आम्ही तिथे पोहोचत होतो नि ढगांचा विशाल असा पांढरा पडदा अचानक बाजुस सरला.. समोर पाहतो तर संजिवनी माची दिमाखत उभी..

------------------------------------------------------------------
आम्ही जसजशे त्या टोकाच्या अंतिम भागावर जाउ लागलो तसतशी संजीवनी माची आधिक उठुन दिसत होती..

--------------------------------------

इथुन एका कडेला जाउन मागे पाहिले तर बालेकिल्ल्याची एक बाजू पुर्णपणे नजरेत भरली..

(डावीकडे खालच्या बाजूस पाली दरवाजा, वरती पद्मावाती माची नि वरच्या बाजुस बालेकिल्ल्याची तटबंदी नि किल्ल्यावरील भगवा..)
--------------------------------------
अतिशय स्वच्छ वातावरणात दिसणारा उत्तरबुरुज नि मागे सिंहगडाजवळची दिसणारी डोंगररांग खासच वाटत होती..

तर खालच्या बाजूस दिसणारा 'पाली दरवाजा' रायगडच्या गोमुखी प्रवेशद्वाराची आठवण देवून गेला...

--------------------------------------------
संजीवानी माचीच्या दिशेने असणार्‍या बुरुजावर जाताना नव्याने पण अर्ध्यावरच सोडलेल्या डागडुजीचे बांधकाम दिसते.. कसले ते कळले नाही.. बाजुलाच खालील फोटोत दाखवलेले काही अवशेष दिसले.. एकंदर त्याची बांधणी बघून प्रातर्विधीची सोय असेल असा अंदाज आला..

-------------------------------------------------

(हि जागा पण मस्तच..)
जवळपास सगळ्या कोपर्‍यातुन फिरल्यानंतर आम्ही बालेकिल्ल्याचा निरोप घेण्याचे ठरवले.. एव्हाना दुपारचे तीनसाडेतीन वाजत आले होते नि आम्ही बालेकिल्ल्याची निमुळती वाट उतरु लागलो..

याच वाटेत दोन तीन ग्रुप भेटले जे आताशे वरती जाणार होते.. बरे , ते वस्तीलाही नव्हते !! आम्हाला आश्चर्यच वाटले.. फक्त बालेकिल्ला ,पदमावाती माची नि त्यातल्या त्यात थोडीफार सुवेळा माची घाईघाईत बघुन परतणे म्हणजे वेडेपणाच आहे... इथे यायचे तर वेळ काढुनच.. गडच तसा आहे.. मुख्य गडापासून जवळपासास दोन-अडीच किमी अंतराच्या पसरलेल्या डोंगराच्या दोन सोंडा म्हणजेच सुवेळा माची नि संजिवनी माची... या दोन माच्या म्हणजेचे गरुडाचे दोन पंख असे संबोधले जाते.. याच माच्यांच्या अस्तित्त्वामुळे राजगड म्हणजे मांड्या ठाकुन बसलेला भीम असाही उल्लेख पुस्तकात आढळतो.. या माच्यांचे स्वरुप हे स्वतंत्र किल्ल्यासारखेच आहे..आम्ही तर ठरवले होते जमेल तेवढा राजगड पहायचा.. प्रत्येक कप्पा नि कप्पा तपासयचा.. !!

बालेकिल्ला उतरलो नि आम्ही सुवेळा माचीकडे मोर्चा वळवला.. या माचीची बांधणी सुवेळी मुहुर्तावर येथील श्री गजाननाची पुजा करूनच झाली म्हणुन हिचे नाव सुवेळा माची ठेवले गेले असे म्हणतात तर काहीजण ही माची पुर्वेकडे असल्याने सुवेळा नाव पडले असे म्हणतात....

या माचीवर जाणारी आम्ही पाउलवाट पकडली नि अचानक ढगांचे आक्रमण झाले.. सुरवातीस ह्या माचीचा भाग हा बराचसा रुंद आहे जो डुबा टेकडी मागे गेली की अरुंद होत जातो.. आमचे पदक्रमण चालु असतानाच उजवीकडुन जोरात वार सुटला होता.. ढगांनी अपारदर्शक असे आच्छादन घातले होते.. तर या उलट डावीकडचा भाग मस्तपैंकी उन्हात लखलखत होता.. अजिब वाटत होते सारे.. !

ह्या वातावरणात आम्ही सारे रंगून गेलो होतो.. योगायोगची तर बोलतीच बंद झाली होती.. तर दुसरीकडे नविन भलताच खुष होता.. राजगडावर येण्याकरिता घेतलेल्या कष्टांचे चिझ झाल्याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते..

डावीकडे खाली गुंजवण दरवाज्याला सोडत आम्ही डुबा टेकडीजवळ पोहोचलो.. अर्थातच डुबा टेकडी पुर्णतः ढगांमध्ये डुबली होती.. डुबा का म्हणतात ते कुठे वाचनात आले नव्हते तेव्हा आम्हीच अर्थ लावून टाकला.. नेहमी ढगांमध्ये ही टेकडी डुबलेली असते म्हणुन डुबा टेकडी वा डुबा हिल !! Proud

(डुबा टेकडी[हिल] च्या पायथ्याशी आनंदात उडी माराणारा योगायोग)
--------------------
थोड्याचवेळात झाडांची टेकडी असलेल्या ह्या डुबा टेकडीला उजवीकडे सोडुन पाउलवाट थोडेफार असणार्‍या जंगलात शिरली..

--------------------------------
इथुनच काहि अंतरावर डाव्या हातास वीर मारुतींचे मुर्ती दिसली.. नि जवळच चौथरे नि त्यांचे काही अवशेष दिसुन आले.. इथेच म्हणे महाराजांचे निष्ठावान सेवक म्हणुन गणले जाणारे तानाजी मालुसरे, येसाजी केक अशा मावाळ्यांची घरे होती..

(माझा वेगळा प्रयत्न..)
सुवेळा माचीचा हा पहिला टप्पा संपतो नि पुढे काही अंतरतावरच या माचीवरील 'राजसदर' नजरेस पडते..
मस्तच !

या सदरेनंतरच ज्यासाठी राजगड प्रसिद्ध आहे ती तटबंदी सुरु होते.. येथील तटबंदी दोन टप्प्यात विभागल्याचे ऐकुन होतो.. नि वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही टप्प्याच्या शेवटी असणारा चिलखती बुरुज..!! आमची पहिल्या टप्प्यातली वाटचाल ढ्गांच्या धुसर वातावरणातूनच होत होती.. पहिल्या टप्प्यातील चिलखती बुरुज नजरेस पडला नि हळुहळू वातावरण स्वच्छ होउ लागले..

(चिलखती बुरुज..)
-----------------------------------------

------------------------------------------

(बुरुजाचा वरील भाग..)
या बुरुजावर असणार्‍या पायर्‍या नि दरवाजे अजुनही सुस्थितीत आहेत !! तशेच्या तशेच ! इथे काही काळ व्यतित करुन आम्ही ह्या बुरुजावरुन खाली उतरलो.. ह्याच बुरुजाच्या पायथ्याजवळ छोटे दरवाजे आहेत..

--------------------------
श्रीगणेशांची मुर्तीदेखील इकडेच दिसली..

हा टप्पा सोडुन आम्ही आता पुढच्या टप्प्यास सुरवात केली..जिथुन दुहेरी तटबंदी दिसुन येते..इथे प्रथम वाटेतच एक भला मोठा नि उंच असा खडक लागतो.. या खडकाच्या वरच्या भागातच एक छिद्र दिसले.. हेच ते नेढे ! राजगडावरील आण़खीन एक आकर्षण.. जे आम्हाला सकाळी चढताना इवलेसे दिसत होते ते नेढे अंदाजे १० फूट व्यासाचे वाटत होते.. आम्ही इथे पोहोचेस्तोवर ढगाळ धु़के (!) नाहीसे झाले होते नि संध्याकाळचे उन पडले होते.. आम्ही लागलीच या नेढ्याकडे मोर्चा वळवला.. या नेढ्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे थोडा रॉक क्लाईंब करावा लागतो.. माझे सहकारी वरती पोहोचले नि मग त्यांचा नेढ्यातील फोटो घेण्यासाठी मी अंदाजे बारा फुटी उंच अशा तटबंदीवर बसलो..

(नेढे नि आम्ही वेडे)
-------------------------
DSC04051.JPG
(नेढ्यातुन माझा मित्र शिव ने काढलेला फोटो.. एकुण तटबंदीच्या रुंदीचा नि ताकदीचा अंदाज येइल या फोट्वरुन..)

फोटोसेशन पार पडले नि लगेच मीसुद्धा त्यांना जाउन मिळालो.. कसला सुसाट वारा जात होता या नेढ्यातून.. ! खुप जपुन उभे रहावे लागत होते.. इथुनच माचीच्या दोन्ही बाजूचा दरवरचा परिसर अगदी स्पष्ट दिसत होता.. भूमीलगत सह्यद्रीरांगा उठुन दिसत होत्या तर वरती आकाशात ढ्गांनी बनलेले हिमपर्वत लक्ष वेधुन घेत होते..

---------------------------------------------------

---------------------------------------------------------

(साक्षात नंदी आकाशात..! )
तर दुसर्‍या बाजुस ढ्गांचा पट्टाच तयार झाला होता..!

इथुन खरे तर निघवत नव्हते पण अजुन अंतिम टप्पा बघायाचा शिल्लक होता.. ज्या खडकात हे नेढे आहे त्याला
'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात.. या खडकास समोरुन पाहिलेच की हत्तीसदृश आकृतीच वाटते..

(समोर हत्तीप्रस्तर नि मागे डो़कावणारी डुब टेकडी..)

इथुनच पुढे आम्ही कुच केले..इथेच एक गुप्त दरवाजाही दिसला..

आता आम्ही माचीच्या अंतिम टप्प्यात आलो... खालील फोटोवरुनच तेथील अतिशय उत्तम नि भरभक्कम अशा बांधणीचा अंदाज येइल..

---------------------------------------------------

(सुवेळा माचीची एक बाजू..)
-------------------------------------------------

(भक्कम असे बांधकाम..)
-------------------------------------------------
याच तटबंदीवरुन चालत आम्ही टोकापर्यंत पोहोचलो नि सुवेळा माची पुर्ण केल्याचा आनंद झाला.. इथेच समोर दिसणार्‍या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत क्षणभर विसावा घेतला..

------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------
इथुनच मग परतीची वाट धरली पण तटबंदीच्या दुसर्‍या बाजुने..

-----------------------------------------------------------------------

(जात्याचे अवशेष..)
पुन्हा ढगांचा कल्लोळ होण्यास सुरवात झाली.. नि आम्हाला पटापट चालणे भाग पडले.. सायंकाळचे सहा वाजत आले होते नि आम्ही दिलेली जेवणाची ऑर्डर साडेसहापर्यंत येणार होती.. शिवाय धुक्यामुळे अंधारही दाटुन येत होता...अर्ध्याएक तासातच आम्ही पद्मावती माचीवर येउन पोहोचलो.. बघतो तर ट्रेकर्सलोकांची गर्दी झालेली होती.. आतापर्यंतच्या भ्रमंतीमध्ये आम्हाला कुठेच गर्दी मिळली नव्हती हे विशेष.. पण आता बोंब होती.. मंदिरात जाउन पाहिले तर केवळ दोन माणसांपुरतीच जागा उरली होती.. पहारेकर्‍यांची खोलीदेखीली फुल झाली होती.. बाहेर झोपायाचे तर पावसाचा काही नेम नव्हता वर त्याता सुटलेली बोचरी हवा... ! यातच झोपावे काय या विवंचनेत असताना आमच्यातील एकाचे रामेश्वर मंदीराकडे लक्ष गेले..सकाळी हे मंदीर बंद होते पण नशिबाने अजुन कोणाचे लक्ष गेले नव्हते.. आम्ही लगेच वेळ न दवडता जागा बुक केली.. जागा पण योग्य.. फारतर सातचजण झोपु शकतील इतके.. आत छोटे शिवलिंग नि मारुतीची मुर्ती आहे.. आम्ही बॅगा ठेवुन अंथरुण पसरवुन बाहेर आलो नि कट्ट्यावर बसुन जेवणाची वाट बघत आम्ही आणलेले सटरफटर खाउ लागलो.. एव्हाना पद्मावती मंदीराच्या परिसरात बरीच वर्दळ सुरु होती.. बरेचसे संध्याकाळीच चढुन आले होते... अंधारही जवळपास झाला होता.. अचानक आकाशात तांबडे फुटले.. नीट उभे राहुन पाहिले तर तोरणाच्या पलिकडे क्षितीजावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे भासत होते.. त्यातच पांढरे शुभ्र ढगांनीसुद्धा वेगाने स्थलांतर सुरु केले.. परिणामी अत्यंत सुरेख देखावा आमच्या डोळ्यासमोर निर्माण झाला.. खरच निसर्गाची किमया होती.. नि आमचे भाग्यही होते !
यासंदर्भातील फोटो इकडे "प्रकाशचित्र" विभागात बघु शकता...
http://www.maayboli.com/node/17382

आतापर्यंतचा सर्वोत्तम ट्रेक मी अनुभवत होतो.. सगळे काही मनासारखे घडत होते.. एकंदर शनिवार अविस्मरणीय ठरला होता.. काही अवधीतच जेवण (झुणका भाकर) आले नि आम्ही टॉर्च नि मेणबत्तीच्या प्रकाशात खाणे सुरु केले.. दुसराकोणी येउ नये म्हणुन आम्ही दरवाजा आड केला होता.. पण त्यातच एका कुत्रीने प्रवेश केला.. झाल्लं म्हटले आता काय ही सहजासहजी बाहेर जाणारा नाही... नि तोपर्यंत आम्हाला झोप लागणार नाही... आमचे जेवण उरकेपर्यंत आम्ही तीला हाकलवण्याचा प्रयास केला नाही.. एव्हाना दोघेतिघे जागा आहे का पाहुन गेले... पण आधीच पाचजण नि त्यात कुत्री बघुन निघुन गेले.. Proud जेवण झाले नि आम्ही कसेबसे करुन तिला बाहेर ढकलले.. बाहेर बोचरी हवा सुरु होती पण आमचा नाईलाज होता.. म्हटले त्या मंदीरात जाउन झोप.. बाहेर पौर्णिमेच चंद्र आकाशात असल्याने राजगड चांदण्यात न्हाउन गेला होता.. पण वारा मात्र सोसाट्याचा होता.. कधी अचानक पाउस (जो पुर्ण दिवसाता पडला नव्हता) येइल याचा भरवसा नव्हता..

आता सकाळी लवकर उठुन गुंजावण दरवाजा नि संजिवनी माची बघण्याचा बेत आखला.. बाहेर असणार्‍या सुसाट वार्‍यामुळे हवामान भलतेच थंड होवुन गेले होते.. दार-खिडक्या लावुन घेतली तरी कुडकुडकतच रात्र काढावी लागली.. पण मंदीराच्या निवार्‍यामुळे आमची चांगलीच सोय झाली होती..
पहाटे लवकर उठलो... सुर्योद्य बघण्याचा मानस होता.. पण दाट धु़क्याने निराशा केली.. दुपार कधी होईल याचा पत्ताही लागणारा नव्हता.. पद्मावती मंदिराच्या परिसरातच असणार्‍या चहावाल्याकडुन कटींग घेतली नि आम्ही बॅगा उचलल्या..

गुंजावाण दरवाजा हा थोडा खालच्या बाजूस आहे.. सुवेळा माचीकडे जाणार्‍या वाटेखालीच मध्यावर हा दरवाजा लागतो.. पद्मावाती माचीपासून १०-१५ मिनिटातच आम्ही गुंजावण दरवाज्यापाशी पोहोचलो.. या दरवाज्याकडे जाणारी वाटदेखील निसरडी झाली होती.. इथेही डळमळीत रॅलिंगची सोय आहे.. Proud

-----------------------------------------------------------------------

चिखलपाण्यामुळे जरा जपुनच जावे लागले.. मोठ्या आकाराच्या आठ- दहा पायर्‍या उतरल्यावर ह्या दरवाजाखाली येतो.. तो बर्‍यापैकी भक्कम अवस्थेत आहे.. नेटवरीला माहितीनुसार तीन प्रवेशद्वाराचा उल्लेख दिसतो.. पण आम्हाला दोनच लागून प्रवेशद्वार दिसले..

------------------------------------------------------------------

(दरवाज्यावरील शिल्प..)
------------------------------------------------------------------

आम्ही दरवाजा पार केला नि ज्या वाटेने गुंजावण दरवाजा गाठला जातो ती वाट शोधु लागलो.. ही वाट फार कमी जण वापरतात.. ही वाट थोडीफार बिकट आहे..

त्यातच या वाटेत खुप गर्दझाडी आहेत.. वाट मिळाली पण पुढे झाडीत दिसत नह्वती.. शोधत शोधत कदाचित खाली उतरत गेलो असतो त्यामुळे वेळीच आम्ही आवरते घेतले.. म्हटले पुन्हा कधीतरी..!! इथवर येइपर्यंत आम्ही बरेच अंतर खाली उतरलो होतो नि आता पुन्हा त्याच वाटेने वरती यायचे म्हणजे सक्काळी फुकटचा व्यायाम... आल्या वाटेनेच माघारी परतेपर्यंत घामाघूम झालो.. पद्मावती माचीच्या सदरेवर बसुन थोडी विश्रांती घेतली नि संजिवनी माचीच्या दिशेने प्रयाण केले..

एकूण लांबी अडीच किमी असलेल्या ह्या माचीचा विस्तार सुवेळा माचीपेक्षा मोठा आहे.. ही माची पश्चिमेकडील डोंगराचा भाग फोडुन दुर्गम केली आहे.. पद्मावाती माचीकडुन जाताना उजवीकडे खाली पाली दरवाज्याला सोडुन ही वाट पुढे जाते.. या वाटेने जाताना डावीकडचे भलेमोठे खडक अंगावर आल्यासारखे भासतात.. इथे जाताना वातावरण खुपच खराब होते.. पायाखालची वाटच काय ती दिसत होती.. नि वाटेच्या दोन्ही बाजूंकडुन जोरकस थंडगार हवा नि पाण्याचे सुक्ष्मकण वाहणारे ढग यांचा प्रहार चालु होता.. साहाजिकच आम्ही संजिवनी माचीवरुन दिसणार्‍या निसर्गसौंदर्याला मुकणार होतो.. सुवेळा माचीप्रमाणेच ह्या माचीचे बांधकाम आहे.. इथेही राजसदर आहे.. वाटेत पाण्याच्या मोट्या टाक्यादेखील आहेत..

इथेही चिलखती बुरुज आहे..

( हे फोटोतील बाजीराव् [नविन] बायकोला भुलथाप मारून आले होते.. तेव्हा स्वातंत्र्य उपभोगताना..)

ही माची सुवेळा माचीपेक्षा अधिक मजबूत वाटली..त्याला कारण इथे असलेली दुतर्फा तटबंदी.. दोन तटांमध्ये तीन फूटांचे अंतर नि खोली अंदाजे १०-१२ फूट.. बरं या खोलीत उतरण्यासाठी पायर्‍यांच्या अनेक दिंड्या, दरवाजे.. अशा विविध बाबींनी ही माची नटलेली आहे..
या माचीच्या मध्यावरच डाव्या बाजूस तटात एक दरवाजा लागला.. तोच 'अळु दरवाजा' म्हणुन प्रसिद्ध आहे..

---------------------------------------

'राजगड-तोरणा' ह्या मार्गाची सुरवात ह्याच अळु दरवाज्यातून होते..
त्या दरवाज्याजवळचा परिसर बघून आम्ही पुन्हा तटबंदीतुन चालु लागलो.. ह्या माचीच्या शेवटी भक्कम बुरुज आहेच.. इथवर ट्रेकर्स मंडळी फार कमीच येतात.. या माचीवर फक्त आमचाच मुक्त वावर चालु होता.. खंत फक्त एवढीच की धुक्यामूळे माचीसभोवतलचा परिसर काहीच दिसत नव्हता..

---------------------------------------------------

(अजुन एक दरवाजा..)
---------------------------------------------------

( तटबंदीला असे बरेच दरवाजे आहेत.. )

पहाटेपासून असणार्‍या धुसर वातावरणात किंचीतही बदल नव्हता.. वेळेअभावी आम्ही घाईघाईतच पुन्हा परतीची वाट धरली.. या माचीवर बर्‍याच गोष्टी पहाण्यासारख्या, अभ्यास करण्यासारख्या आहेत.. पण वेळ हवा..

(परतीच्या वाटेत डावीकडे लागलेला भुयारी चोरमार्ग..)

(हा चोरमार्ग बाहेरील तटबंदीवर जातो..)

साडेदहाच्या सुमारास आम्ही पाली दरवाजा गाठला.. इथुनच उतरायला सुरवात करणार होतो..
पाली दरवाजा हा दोन भक्कम प्रवेशद्वारांचा आहे.. भव्य बुरुजात दिमाखदार असा हा दरवाजा आहे.. मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत..

-------------------------------------------
दरवाज्याची उंची नि रुंदी पण विस्तारीत.. दरवाजाच्या वर आणि बुरुजावर बांधलेले परकोट खासच..

-------------------

------------------

(पाली दरवाज्याच्या वरतून घेतलेला फोटो...)
----

------------------------
संरक्षणाच्या दृष्टीने ह्या दरवाज्याची बांधणी किती विचारात्मक केली असेल याची कल्पना आली....

इथुनच आम्ही राजगडचा निरोप घेत उतरु लागलो.. मुख्य प्रवेशद्वाराला संरक्षक कवच म्हणून की काय अजुन एक प्रवेशद्वार आहे..

ह्या मार्गातच पायर्‍यांची सोय आहे...

याच पायर्‍यांवरुन उतरत राजगडाच्या आठवणी साठवत आम्ही दुपारी १२ च्या सुमारास पाली गाव गाठले.. पाली गावातून यायचे तर आधी पाउलवाटा नि मग या पायर्‍या लागतात...
सात आठ घरांचे गाव असलेल्या या पाली गावात पोहोचलो नि एका घरात चहा घेतला.. चहा होइस्तोवर योगायोग नि नविन यांनी वार्‍यामुळे झाडाखाली पडलेले आंबे घेवुन आले.. ते छोटे आंबे टेश्टसाठी खासच..खाणापान उरकताना चौकशी केली तेव्हा कळले की 'वाजेघर'हून (पालीजवळचे गाव.. पालीहुन इथपर्यंत डांबरी रस्ता आहे) दुपारी १ ची स्वारगेटला जाणारी एसटी आहे.. एका गावाकर्‍याने तुम्हाला शॉर्टकटने सोडतो सांगितले नि आम्ही तयार झालो.. कारण ही वाट शेतमळ्यामधून जाणारी होती.. नि खरच आमचा ट्रेक अजुनही सुरूच होता.. आजुबाजूला असणारी शेती बघत नि कडेला झाडांखाली पडलेले आंबे खात आम्ही अर्ध्यातासातच डांबरी रस्त्याला जाउन मिळालो.. नाही म्हटले तरी बर्‍यापै़की शॉर्टकट होता.. नि मजेशीरदेखील..

(मित्राने काढलेला फोटो.. आंबा लै गोड !!... )
------------------------------------------------------------

-------------------------------

----------------------------------------------

तिथेच मग पुढे पंपाखाली फ्रेश होउन आम्ही एसटी थांब्याजवळ येउन बसलो.. एकची एसटी काही आली नाही.. पण तिची वाट बघत टपरीवरची भजी मात्र खायला मिळाली.. शेवटी हायवेपर्यंत सोडणार्‍या जीपने आम्ही वाजेघर सोडले.. पण राजगडाच्या आठवणी घेउनच...! उगीच नाही म्हणत काय.. '' गडांचा राजा... राजियांचा गड.. राजगड !! ''....स्वराज्याची पहिली राजधानी शोभतेच.. !

आता राजगड तोरणा करायचाय तेव्हा पुन्हा एकदा भेट होइलच.. Happy

(बाकी वर्णन बरेच लांबलेय.. पण गडच असा आहे की कितीही वर्णन केले तरी कमीच.. Happy )

समाप्त नि धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरेच यार, काहि काहि फोटो तर टक लावून बघण्यासारखे आलेत. अर्थात वर्णनही छान आहे.
किल्ल्यावरच्या अवशेषांकडे बघून मात्र वाईट वाटते. कल्पना करता येईल, इतकेही आता काही उरले नाही,

मस्त रे यो !!
राजगड खूप सही आहे.. एकदम भरभक्क्म आणि राजेशाही थाट वाटतो.. संजिवनी माचीचं सौंदर्य सुर्यास्ताच्यावेळी फारच खुलून दिसतं.. मी केलेला पहिला ओव्हरनाईट ट्रेक राजगडचा होता.. तुझा हा लेख वाचून परत एकदा सैर झाली.. Happy चोरदरवाजाने जाताना अशक्य फाटली होती.. कारण मधल्या पठारावर संध्याकाळी पश्चिमेकडून येणारं जोरदार वारं होतं... काहीकाही ठिकाणी अगदी रांगावं लागलं.. !!
रच्याकने, चोर दरवाजाने गेलास तरी भिकुला पॉईंटबद्दल काहीच कसं लिहिलं नाहीस ?

यो' शिपा कळलेलं आम्हाला तु तिकडे आहेस म्हणुन....... पुढच्या राजगडतोरणा ट्रेकसाठी माझे नाव फायनल कर..... कधी जाणार?

पराग, अरे तो कुठे चोरदरवाज्याने गेलाय? तो गुंजवण्याहून गेलाय नां?

भिकुल्यांच्या झापावरून जो रस्ता जातो, तो सहिये नां? मी ही त्याच नाकाडावरून गेलेय राजगडला.

धन्यवाद ! Happy
पराग.. मला नाहि रे दिसला तो.. Sad ऑडो म्हणतेय तसे वेगळी वाट असणार ! नेक्स्ट टाईम !

वैभवा.. नक्की रे सांगेन

वावावा! फोटो लय भारी. आणि प्रत्येक ट्रेकचं वर्णन अगदी मनापासून करतोस तू! वाचतानाही छान वाटतं फार.. ट्रेक करते रहो और लिखते रहो! Happy

यो सही रे , ऑ़क्टोबर नक्की रे. पुर्ण तयारीनिशी, शुक्रवारी रात्री निघुन सोमवारी रात्री परत.२ दिवस पुर्ण वरच राहयचं जेवणासकट सगळी तयारी घेउन जाउ रे . वैभ्या,सुर्या आणि मल्लीपण येइल. नील,विनय पण तयारच आहेत रे.
रायगड बघतच आहोत , पण ही राजांची पहीली राजधानी ना रे पहायलाच हवी.

योगी , धन्यवाद रे मला तर वाटलं होतं मी नाहीच चढू शकणार राजगड, पण तुझ्यामुळं जमलं बघ मला राजगडावर येणं. पण हे काय माझा एकही फोटो का नाही तिथे Wink
ती दिपमाळ अन तिथून दिसणारे डोंगर ...आहाहा मस्त !
गुप्त दरवाज्यातून वर येणारा मार्ग आधी दाखवला नाहीस ते बरं झालं नाहीतर मी आलेच नसते त्या गुप्त दरवाज्यातून Happy
बालेकिल्ल्याच्या वाटेवर मी ही अडखळले बरं का अन रेलिंग नको असे म्हणू नको रे मी कशी चढेन मग ? आताही फोटोतून चढताना हात गच्च पकडला होता त्या रेलिंगला Happy
वरून सुवेळा माची काय दिसत होती, अल्टिमेट !धुक्यातला फडकणार्‍या भगव्याचा फडफड आवाज गुंजतोय कानात.
राजवाड्याचे भग्नावशेष पाहताना भरून आलं नाही !
पुन्हा बालेकिल्यावरून दिसणारी सुवळा माची भारी !
आकाशातले अन जमिनीवरचे ढग अप्रतिम !
नेढे आणि वेडे फोटो काढताना रागावले मी तुमच्यावर, आठवतेय ना !
>>>इथुन एका कडेला जाउन मागे पाहिले तर बालेकिल्ल्याची एक बाजू पुर्णपणे नजरेत भरली..<<< काय मस्त फोटो काढलायस. हॅट्स ऑफ टू यू सर !
सदरेच्या आधीचा ( तुझा वेगळा प्रयोग ) भारी जमलाय. अगदी स्वप्न बघितल्या सारखा वाटतय Happy
गुंजावण दरवाज्याच्या वाटेवर मी तर बाई डोळे गच्च मिटूनच घेतले. तुम्ही सगळ्यांनी कधी खाली आणले ते कळलेच नाही मला Wink
नवीनचा चिलखती बुरुजावरचा फोटो ........शब्दच नाहीत !
योगी किती किती धन्यवाद देऊ तुला ? मला या जन्मात आता राजगड शक्या नाही असं मान्य केलं होतं मी. पण तू शक्य केलस ते !
मनापासून खुप,खुप धन्यवाद !

अफलातुन फोटो आणि त्याला साजेसा वृतांत.
यो, मनापासुन धन्यवाद राजगडाच्या सफरीबद्दल Happy

आरती२१, प्रतिसाद आवडला Happy

सगळ्यांचे खूप धन्यवाद ! Happy
@ भ्रमा.. कधीतरी नेम लागतोच रे चुकून.. Proud
@ घारुअण्णा.. जमवायचा नक्कीच प्रयत्न करेन, बराच अवधी आहे.. Happy
@ आरती.. तुझा प्रतिसाद मस्त मस्त.. Happy तू राजगड ट्रेक पुर्ण केलास नि जे काही अनुभवलस यातच मला समाधान आहे.. आनंद आहे.. धन्यवाद नि पुढच्या ट्रेकसाठी शुभेच्छा Happy
@ योगेश... आपल्या "फरक" चे लक्षात असू दे.. Wink

अरे माठ्ठ्यान्नो, जरा इथे आधी बोलत जा कि जाणार असला तर! Angry किमान गुन्जवण्यात तरी भेटलो अस्तो
शनिवारी सत्तावीसला ऑफिसमधुन थोडा लौकर निघुन मी साडेपाचला घरुन निघालो ते सन्ध्याकाळी साडेसातच्या सुमारास गुन्जवण्यात बाईकने पोराबरोबर पोचलो होतो Sad आधी माहित अस्ते तर अजुन लौकर गेलो अस्तो तिथे.
असो, पुढच्या वेळेस!

मस्त रे...मजा आली.
तुमच्या लिखाणातुन आणि फोटोतुन राजगडाच्या भव्यतेचे दर्शन घडले.
जय शिवाजी जय भवानी..

आणि हो तो जंगलातला फोटो खासच...

साल्या योग्या, लाज नाही वाटत? hope you will enjoy it म्हणून जळवायला. सालं या मलेरियाने पार पंगू करून सोडलय यार गेल्या महिनाभरात. सॉलीड जळली रे.... हे वाचुन! जाम मजा केलेली दिसतेय तुम्ही लोकांनी. ऐश करा लेको ! Happy

पण गडच असा आहे की कितीही वर्णन केले तरी कमीच.. >>> माझा दुसरा ट्रेक होता राजगड... गडांच वेड लावल तेही राजगडानेच... बालेकिल्ला, संजिवनी माची, पद्मावतीचे देऊळ, तलाव, चिलखती बुरुज, हस्तीप्रस्तर, नेढे, सुवेळा माची, चोरदिंडी, समोरचा तोरणा काय आणि कित्ती लिहू... वेड अगदी वेड लावतो हा गड...

पाच वर्षापुर्वी केलेल्या राजगड ट्रेकची आठवण झाली.... >>> हो ना... आणि ती टॉर्चच्या प्रकाशातील आपली पहिली भेट आठवली Happy

मस्त वर्णन
>>तोरणाच्या मागील कोपर्‍यात असणारे लोहगड विसापूर तर उत्तरेस टि.व्ही चा टॉवर असलेला >>सिंहगड नि इतर सह्याद्री रांगा नजररेस पडल्या
राजगड वरून लोहगड दिसणे तसे दुर्मिळ आहे... लकी आहात..

>>(समोर हत्तीप्रस्तर नि मागे डो़कावणारी डुब टेकडी..)
>>इथुनच पुढे आम्ही कुच केले..इथेच एक गुप्त दरवाजाही दिसला..
ह्या दरवाजावर माझी खुप दिवसापासून नजर आहे.. तो गुन्जवणे ला उतरेल बहूतेक.. तिथून एकदा उतरायचे आहे...

>>आम्ही दरवाजा पार केला नि ज्या वाटेने गुंजावण दरवाजा गाठला जातो ती वाट शोधु लागलो.. ही >>वाट फार कमी जण वापरतात.. ही वाट थोडीफार बिकट आहे..
पण आहे सही आहे ही वाट... जरासा घसारा आहे शेवटी...

पराग,
>>चोर दरवाजाने गेलास तरी भिकुला पॉईंटबद्दल काहीच कसं लिहिलं नाहीस ?
तो पॉईंट वाजेघर वरून गेला की येतो.. दोन्ही (गुंजवणे व वाजेघर ) मार्ग चोर दरवाज्यापाशी येतात.. गुंजवणे दारातूम यायला गुंजवणे गावातूनच यावे लागते... आधी वाजेघरची वाट लोक जास्ती वापरत. पण ९-१० वर्षांपासून गुंजवणे चे महत्व वाढायला लागले.. आताशी वाजेघरा कडे ST पण कमी असतात.. बहुतेक गुंजवणे च्या पलीकडे banglow स्कीम होत आहे त्यामुळे त्या बाजूला महत्व वाढले असेल...

कोणाला ट्रेकींग ची आवड लावायची असेल तर पहिल्यांदा राजगडावरच घेऊन जावे...

Pages