तरी हुंदक्यांना गिळावे किती?

Submitted by अभय आर्वीकर on 26 June, 2010 - 21:20

तरी हुंदक्यांना गिळावे किती?

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

कधी चाललो मी तुझ्या पावलांनी, कधी बोट हातात होते तुझे
तशी सांज येणार परतून कैसी, मनी प्राक्तनाने झुरावे किती?

जरी देह-काया चिरंजीव नाही, तळे भावनांचे तरी साचते
जरी घालतो बांध मी या तळ्यांना, हृदय फ़ाटतांना तुणावे किती?

जगी जीव अब्जो जरी नांदताती, फ़ुलांच्या-फ़ळांच्या डहाळ्या दिसे
परी शोधताहे नजर का तुला बा! स्मृतींचे खुमारे भुलावे किती?

’अभय’ विरह येतो नशीबी कुणाच्या, कुणाचेच दुर्भाग्य तैसे नसो
शिरी छत्रछाया अखंडीत लाभो, विधात्या तुला मी पुजावे किती?

गंगाधर मुटे
.............................................................................

गुलमोहर: 

>>झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

व्वाह !

गंगाधरजी...... सुमंदारमाला हे वृत्त निवडल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन..... शेरंवर अजून मेहनत घेता आली असती..... एकंदर गझलेचा मूड छान...

पुलेशु.

डॉ.कैलास

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

कधी चाललो मी तुझ्या पावलांनी, कधी बोट हातात होते तुझे
तशी सांज येणार परतून कैसी, मनी प्राक्तनाने झुरावे किती? - शेर आवडले.

ज्ञानेश यांच्या 'कळाले तुला बारकावे कुठे' ची आठवण झाली, अर्थातच आपली गझल पूर्णपणे भिन्न आहे, फक्त आठवण झाली.

वृत्ताची हाताळणीही आवडली. अभिनंदन!

संपुर्ण गझल सुंदर, आवडली.
पण
एक मेख आहे,
मनी प्राक्तनाने झुरावे किती?, हे नाही कळले.
म्हणजे प्राक्तन हा भोग, तो भोगावा लागतो वैगेरे...
पण... प्राक्तन आणि झुरतं? हि कल्पनाच पटत नाही.
आपण सांगाल तर बरे होइल!

मनी प्राक्तनाने झुरावे किती?, हे नाही कळले.

काही अनुभुती शब्दांच्या पलीकडल्या असतात. त्या व्यक्त करतांना शब्दात उतरतात असेही नाही,
मी एवढेच म्हणु शकेल की 'मनी प्राक्तनाने झुरावे किती?' हे वाक्य सदोष नाही.
पण त्याचे अर्थ लागत नसतील तर ते बदलावे लागेल. Happy

प्राक्तन म्हणजे नशीब........... यास्तव मनी प्राक्तनाने झुरावे किती? हे ठीकच आहे.

डॉ.कैलास

मला 'प्राक्तनाचा' शेर 'आई'वरचा वाटला. हे बरोबर आहे काय? नसेल तर कळावे.

काही अनुभुती शब्दांच्या पलीकडल्या असतात. त्या व्यक्त करतांना शब्दात उतरतात असेही नाही,
मी एवढेच म्हणु शकेल की 'मनी प्राक्तनाने झुरावे किती?' हे वाक्य सदोष नाही.
पण त्याचे अर्थ लागत नसतील तर ते बदलावे लागेल.

हे 'मला' पटू शकत नाही. प्रकाशित केलेले काव्य हे 'अंतीम' असायला हवे असे 'माझे' मत आहे. (उत्स्फुर्तही, पण तो भाग वैयक्तीक आहे.) (कोणताही वाद घालायचा हेतू नाही हे कृपया मान्य व्हावे. कवीबद्दल वैयक्तीक रोख असलेले हे लिखाण अजिबात नाही हेही कृपया नोंदले जावे अशी विनंती!) पण जे प्रकाशित केले ते सुयोग्यरीत्या समर्थनीय असायला हवे वा अस्पष्ट वाटू शकेल हे मान्य व्हावे असे मला वाटते. आपण रानडेंच्या म्हणण्यावर जे उत्तर दिले असतेत तर मस्त वाटले असते ते डॉ. कैलास यांनी दिले आहे असे जाणवते.

प्राक्तन = नशीब - याच दृष्टीने मी ती द्विपदी वाचली होती.

-'बेफिकीर'!

मला 'प्राक्तनाचा' शेर 'आई'वरचा वाटला. हे बरोबर आहे काय?

खरे तर गझलेचे पाचही शेर 'बाबांवर' आहेत. आणि ती एका कोवळ्या जीवाची अनुभूती आहे.
वडील गेल्याचे दु:ख सर्वानाच सारखे होत असेलही कदाचित.... परंतू
परंतू वयाच्या पंधराव्या वर्षी वडीलांचे जाणे आणि संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी कोवळ्या खांद्यावर येउन पडणे
अशा परिस्थीतीत होणारे दु:ख आणि त्याची तिव्रता, दाहकता शब्दातीतच असते.

बेफिकिरजी बाकी तुमचे मत योग्यच आहे.
परंतू कवी जेंव्हा लिहीतो तेंव्हा त्याचे अर्थ त्याला माहीत असणारच.
फक्त त्याला जे म्हणायचे ते शब्दात उतरले किंवा नाही हेच जास्त महत्वाचे असते.
आणि कवितेचे अर्थ वाचकांना उलगडण्यासारखे नसतील किंबहूना त्याचे अर्थ समजून सांगायची वेळ कविवर येत असेल तर कविने निष्कारण समर्थन करत बसण्यापेक्षा समजायला सुलभ (पटायला नव्हे) अशी शब्दयोजना करणेच जास्त सोयीस्कर असे मला वाटते.

प्राक्तन = नशीब - याच दृष्टीने मी ती द्विपदी लीहिली आहे.

डॉ. कैलास यांनी दिलेल्या उत्तरामुळे "मला जे म्हणायचे होते ते शब्दात उतरले आहे" अशी माझी खात्री पटली आहे.
त्यामुळे शब्दरचना बदलण्याचे औचित्यही संपले आहे.

गंगाधरराव,

आपण कदाचित 'नकळत' किंवा 'कळतेपणाने' बाबा या व्यक्तीला आई या व्यक्तीच्या दर्जाचे किंवा त्याहून महत्वाचे ठरवले आहेत हे अक्षरशः अप्रतिम!

(सध्या मी 'श्रीनिवास पेंढारकर - एक बाप' ही कादंबरी लिहितोय त्यादृष्टीने तर फारच योग्य!)

आपल्या व्यक्तीगत आयुष्यात आलेल्या अनुभवांना आपण गझलेत मांडलेत (शब्दरचना काहीही असो, पण ते महत्वाचे ठरावे) हे अत्यंत महत्वाचे आहे.

(आपल्या माहितीसाठी - माझे बाबा 'श्री. श्रीकृष्ण कटककर' यांनी त्यांच्या वयाच्या केवळ सहाव्या वर्षी 'पोळ्या लाटल्या' होत्या हे ऐकून मी स्वतःला जगायला नालायक ठरवतो. आपले वडीलही जाण्यापुर्वी आपल्याला 'जे' देऊन गेले आहेत ते 'समजावून सांगण्यासारखे' खचितच नसते. त्या गोष्टी, आपण म्हणता त्याप्रमाणे 'शब्दात मांडण्यासारख्या' अजिबात नसतात!)

आपण आपले आयुष्य 'लढवल्याबद्दल' मनापासून अभिनंदन!

-'बेफिकीर'!

बापरे! गंगाधरजी, काय लिहावे कळेना.
गझल छान पण अजून मेहनत घेता आली असती. मनीच्या भावना थेट उतरल्या आहेत काव्यात.
वयाच्या पंधराव्या वर्षी? तुम्ही बर्‍याच गोष्टींसाठी प्रेरणास्थान राहीलात, आणि यापुढेही असाल.

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

क्या बात है ! मस्त

जगी जीव अब्जो जरी नांदताती, फ़ुलांच्या-फ़ळांच्या डहाळ्या दिसे
परी शोधताहे नजर का तुला बा! स्मृतींचे खुमारे भुलावे किती?

ह्या शेरात '' गझल '' पित्यावर आहे हे जाणवते....... मीही बेफिकिरजी प्रमाणेच '' आई'' आधरित गझल समजत होतो......

मुटेजी,
आपण बेफिकिरजींची ''.... ' श्रीनिवास पेंढारकर - एक बाप ' ही कादंबरी... अवश्य वाचा..... माझ्यासारखे काही.... वाचक चातकासारखी ह्या कादंबरीच्या पुढील भागाची वाट पहात असतात...

डॉ.कैलास

गंगाधरराव, तुमचा दुसरा प्रतिसाद वाचल्यावर परत वाचली गझल आणि फार रिलेट झाले मग.

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती? >>> हा शेर तर सरळ घुसला! Happy

'तुणावे' म्हणजे काय?

शिवणे,ठीगळ लावणे यापेक्षा तुणणे चा अर्थ थोडा वेगळा आहे.

तुणणे म्हणजे रफु/रफ्फु करणे.

पण तुणणे या शब्दाचा वापर सतरंजी तुणणे,गोणपाट तुणणे यासाठी करतात. Happy

....!!

मलाहि तुमच्या दुसर्‍या प्रतिसादानंतर जास्त अर्थ लागला....

मायाळु ळुयामा,
ही कविता मी माझ्या वडीलांना समर्पित केली आहे.
पण व्यक्तिगत बाबींचे प्रदर्शन नको म्हणुण तसा उल्लेख केला नाही.

वडिलांना संबोधतांना 'तुमच्या' ऐवजी 'तुझ्या'
असे संबोधल्याने भुलभुलैय्या झाला आणि
वाचकांना सहज उलगडा झाला नाही.

वडील असो, आई असो अथवा अन्य कोणतीही प्रिय व्यक्ती असो
तिच्या अवेळी जाण्याचे दु:ख हुंदके न आवरता येणारेच असते
म्हणुन मी सर्वसमावेशक असे 'तुझ्या' हे एकेरी संबोधन वापरले.

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

व्वा, गंगाधरजी.... क्या बात है..

Pages