पन्नाशीतला महाराष्ट्र

Submitted by चिनूक्स on 6 May, 2010 - 10:37
सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रदिन नुकताच धडाक्यात साजरा केला गेला. भव्य रोषणाई केली गेली, हजारोंच्या समूहानं गाणी म्हटली. ठिकठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. या सार्‍या झगमगाटात आपल्या खर्‍या समस्या, विवंचना दुर्लक्षितच राहिल्या. आठ-दहा तासांचं भारनियमन, दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा किरकोळ समस्या कोणाच्याच खिजगणतीतही नव्हत्या. 'महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर होतेच आहे', असा निर्वाळा प्रत्येक राजकीय नेत्याने दिला.

खरं म्हणजे, गेली अनेक वर्षं समस्यांकडे डोळेझाक सुरूच आहे. बाहेरून आलेल्यांना मराठी येणं, दुकानांवरच्या पाट्या मराठीत असणं अशा गोष्टी राज्यकर्त्यांना व नागरिकांनाही महत्त्वाच्या वाटतात. मराठीच्या मुद्द्यावरून जितकं रणकंदन होतं, त्याच्या शतांशानेही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर चर्चा होत नाही. भारनियमन, दुष्काळ, नक्षलवाद, जातीयवाद यांचा सामना करण्यासाठी राजकीय नेते एकत्र येऊन काही ठोस भूमिका घेत आहेत, हे चित्र महाराष्ट्राने अजून एकदाही पाहिलेले नाही. मुळात आपल्या खर्‍या समस्या कोणत्या, आपले खरे प्रश्न कोणते, याबाबतच संभ्रम निर्माण व्हावा. खर्‍या समस्यांचं उच्चाटन करण्याचा वकूब नाही म्हणून बेगडी समस्या लोकांसमोर आणून 'हेच आपले खरे प्रश्न' असं सांगण्याची कला सर्वच राजकारण्यांनी अवगत केली आहे. त्यामुळेच बहुसंख्य नागरिकांनाही खर्‍या प्रश्नांकडे लक्ष देण्याची आवश्यकता वाटत नाही. आणि त्याचा परिपाक म्हणून आपण हल्ली महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असल्याच्या थाटात वागतो.

जिथे तलवारी उपसता येतात, तिथे सारासार विवेकबुद्धीला आपसूकच रजा मिळते. समृद्ध इतिहास, या इतिहासाचा वैचारिक, सांस्कृतिक वारसा जतन करण्याची, त्यातून काही शिकण्याची गरज मग वाटत नाही. सामाजिक विघटन वेगानं होत असूनही सर्व आलबेल असल्याची खोटी सुस्ती वेगाने पसरते. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत असतानाही निवडणुकीचा मुद्दा 'मराठी-अमराठी वाद' असतो. समोरच्याचं आडनाव जोशी, कांबळे की भोसले यावरून त्याच्याशी कसं वागायचं हे ठरवलं जातं. 'आमच्या भावना दुखावल्या होऽऽऽ' म्हणत वाहनं जाळली जातात. शिवाजी महाराजांची जागोजागी स्मारकं उभारण्याच्या नादात त्यांच्या किल्ल्यांची पडझड खपवून घेतली जाते.

मुंबई-पुणे-नाशिक-सॅन होजे-न्यू जर्सी यांच्यापलीकडेही एक महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात कुपोषण, भारनियमन, दुष्काळ, शिक्षण - आरोग्यसेवेचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, पराकोटीचा जातीयवाद, स्त्रीभ्रूणहत्या अशा काही समस्या आहेत. या समस्या परप्रांतियांना मराठी न येणं, मराठी दुकानदारांनी दुपारी दुकानं उघडी न ठेवणं किंवा दुकानावर मराठी पाट्या नसणं, यांपेक्षा कदाचित गंभीर नसतीलही. पण महाराष्ट्रातल्या या समस्यांचाही विचार व्हायला नको का?

महाराष्ट्रराज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या काही मान्यवरांनी त्यांची मतं नोंदवली आहेत. विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या या मंडळींना महाराष्ट्राचं आजचं स्वरूप अतिशय अस्वस्थ करतं. समस्यांचं निराकरण न करता आल्यानं राजकारण्यांनी धरलेला चुकीचा मार्ग आणि त्याला भुलून नागरिकांनी त्यांना दिलेली साथ, या पार्श्वभूमीवर ही मनोगतं कदाचित आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतील. या मान्यवरांना मात्र आजही राज्यकर्त्यांशी अनेक प्रसंगी संघर्ष करावा लागतो, हे पन्नाशीतल्या महाराष्ट्राचं दुर्दैव.

Pushpa_Bhave.jpg

श्रीमती पुष्पा भावे यांनी श्री. एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला होता. त्यानंतर मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतराचा प्रश्न असो, किंवा देवदासींच्या पुनर्वसनाचा, त्यांचा लढाऊ बाणा कायम राहिला. कोणाचीही भीडमूर्वत न राखता त्यांनी अनेक प्रसंगी शासनाला, राज्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना धारेवर धरलं.

गेली अनेक दशकं सामाजिक व राजकीय प्रश्नांसाठी राजकारण्यांशी दोन हात करणार्‍या श्रीमती भावे यांना पन्नाशीतल्या महाराष्ट्रासमोर असणारे प्रश्न अस्वस्थ करतात. महाराष्ट्राच्या सार्वत्रिक कंगालीकरणाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचं मनोगत...




Narendra_Dabholkar.jpg

महाराष्ट्राला पुरोगामी विचारवंतांची एक अतिशय देदीप्यमान अशी परंपरा लाभली आहे. या विचारवंतांनी महाराष्ट्रात अनेक स्थित्यंतरं घडवून आणली. आज मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात वैचारिक शैथिल्य निर्माण झालं आहे. पुरोगामी चळवळ मागे पडली आहे. शिवाजी महाराज-फुले-सावरकर-आंबेडकर यांच्या नावानं घोषणा करण्यातच धन्यता मानल्यानं समाजाची वैचारिक उत्क्रांती पूर्णपणे थांबली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हे उभ्या महाराष्ट्राला एक पुरोगामी विचारवंत म्हणून परिचित आहेत. अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ, 'साधना' मासिकाचं संपादन यांद्वारे त्यांनी महाराष्ट्राला आलेले वैचारिक शैथिल्य दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचं हे मनोगत...


Prakash_Amte.jpg

महाराष्ट्रात आज विकासाची बेटं तयार झाली आहेत. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांत जीवनमानाचा स्तर बराच उंचावला असला तरी महाराष्ट्राच्या अनेक भागांत रस्ते, वीज, पाणी, आरोग्यसेवा यांचा पत्ता नाही. पूर्व विदर्भातला आदिवासीबहुल भाग आजही विकासापासून वंचित राहिला आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकशाला आरोग्यसेवा आणि शिक्षण या दोन क्षेत्रांत मूलभूत क्रांती घडवून आणली आहे. लोकबिरादरी प्रकाल्पातील दवाखाना आणि शाळा हजारो आदिवासींच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरले आहेत.

मात्र शासनाचं या भागातील समस्यांकडे अजूनही म्हणावं तसं लक्ष गेलेलं नाही. नक्षलवादानं त्रस्त अशा या प्रदेशात खरं म्हणजे सर्वप्रथम विकास व्हायला हवा. त्यासाठी शासनाकडे पैसाही भरपूर आहे. गरज आहे ती इच्छाशक्तीची. मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. प्रकाश आमटे यांचं हे मनोगत...


Vikas_Amte.jpg

महाराष्ट्रात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागे पाण्याचा तुटवडा हेही एक कारण होतं. जलसंधारणासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला तरी अजूनही शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी काही मिळत नाही. शिवाय, कर्ज, नापिकी, शेतमालाला योग्य भाव न मिळणं, ही कारणं आहेतच.

यंदा महाराष्ट्रात अभूतपूर्व असा दुष्काळ पडला आहे. अगदी जिथे पाण्याची कमतरता अधीच नव्हती अशा आनंदवनातल्या विहिरीही यंदा कोरड्या पडल्या आहेत. आनंदवनात सुमारे चाळीस विहिरी आहेत. या सगळ्या विहिरी कुष्ठरोग्यांनी श्रमदानातून बांधल्या आहेत. शिवाय इथल्या जमिनीत पाणी मुरवण्यासाठीही अनेक प्रयत्न केले गेले आहेत. मातीत खोल खड्डे केले, बंधारे बांधले. अशा कामांमुळे तिथली भूजलपातळी कायम वरच राहिली. पाणी नाही, असं कधी झालं नाही. इथल्या बंधार्‍यांची रचनाही भन्नाट आहे. या बंधार्‍यांत जुने टायर, ट्यूब वापरले आहेत. या टायर व ट्यूबांपासून कॉलम बांधले आहेत. दोन कॉलमांच्या मध्ये वाळू-सिमेंट आणि कचरा यांचं मिश्रण वापरून हे बांध तयार केले आहेत.

डॉ. विकास आमटे हे या बंधार्‍यांचे, किंबहुना आनंदवनाचे शिल्पकार. आनंदवनाची स्थापना श्री. बाबा आमटे यांनी केली असली तरी आनंदवनाची संपूर्ण उभारणी केली ती डॉ. विकास आमटे यांनी. 'आत्महत्या केलेला शेतकरी सुटला. इतर हजारो शेतकरी रोज मरण भोगताहेत' असं म्हणणार्‍या डॉ. विकास आमटे यांचं महाराष्ट्रातल्या जलसमस्येबद्दल हे मनोगत...


Anand_Karve.jpg

विजेची अनुपलब्धता हीदेखील एक मोठी समस्या आहे. रोजचं दहा तासांचं भारनियमन ही आपल्या सवयीची गोष्ट आहे. विजनिर्मितीत वाढ होणं अत्यावश्यक असूनही त्या दृष्टीनं अजूनही फार सकारात्मक प्रयत्न झालेले नाहीत.

उसाच्या पाचटापासून इंधननिर्मिती करणारे, टाकाऊ धान्य आणि खाद्यावर चालणारं बायोगॅस संयंत्र बनवणारे डॉ. आनंद कर्वे हे गेली अनेक वर्षं शेती व ऊर्जानिर्मितीतील समस्यांचा अभ्यास करत आहेत. विविध वनस्पतींच्या लागवडीचं सोपं आणि किफायतशीर तंत्रं त्यांनी शोधली आहेतच, पण त्याचबरोबर शेतीसाठी लागणारी अनेक स्वस्त व उपयुक्त साधनं निर्माण करून त्यांनी जगभरातल्या अनेक शेतकर्‍यांचं आयुष्य सुखकर केलं आहे.

पर्यावरणक्षेत्रातलं नोबेल समजलं जाणारं अ‍ॅश्डेन पारितोषिक तीनदा मिळवणारे ते जगातले एकमेव संशोधक आहेत. अपारंपरिक ऊर्जानिर्मिती व शेतकर्‍यांच्या समस्यांबद्दल डॉ. आनंद कर्वे यांचं हे मनोगत...


Naseema_Hurjuk.jpg

महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी यांचे प्रश्न ज्याप्रमाणे दुर्लक्षित राहिले आहेत, त्याचप्रमाणे अजूनही कुटुंब, समाज व शासन हे तिन्ही घटक अपंग व्यक्तींबाबत उदासीन असल्याचं दिसतं. त्यांच्या शिक्षणाचे, नोकरीचे प्रश्न अनेक वर्षांनंतरही तसेच आहेत.

कोल्हापूरच्या श्रीमती नसिमा हुरजूक या गेली अनेक वर्षं अपंगांच्या पुनर्वसनासाठी लढा देत आहेत. अपंगांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या सातत्यानं प्रयत्न करत आहेत. 'हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो अपंगांना त्यांनी शैक्षणिक, आर्थिक व वैद्यकीय मदत दिली आहे. नसिमादिदींनी कोल्हापूरात अपंगांसाठी माध्यमिक शाळा सुरू केली आहे. अपंग मुलांना अनेक मैल प्रवास करून शाळेत जावं लागू नये, हा यामागचा उद्देश. या शाळेतील बाक, टेबलं अशा वस्तू इथल्या अपंग कारागिरांनीच तयार केल्या आहेत. मात्र शाळेच्या आठवी ते दहावीच्या वर्गांना अजूनही शासनाकडून परवानगी मिळालेली नाही. ही परवानगी मिळावी यासाठी त्या पुढच्या आठवड्यापासून आमरण उपोषणास बसणार आहेत.

काही वर्षांपूर्वी नसिमादिदींनी अपंगांना रोजगार मिळावा म्हणून कोकणात 'स्वप्ननगरी' ही संस्था सुरू केली. अनेक लहानमोठ्या उद्योगांच्या मदतीनं इथे राहणारे अपंग आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहेत. आंबा, काजू, फणस यांपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्नही अनेक अपंगांच्या उदर्निर्वाहासाठी मदत करतं. मात्र, शासनानं या वस्तूंच्या विक्रीवर चार टक्के व्हॅट कर लावला आहे. गेल्या वर्षी या करापोटी नसिमादिदींनी तब्बल चार लाख रुपये शासनाकडे जमा केले. यंदा चार टक्क्यांऐवजी बारा टक्के कर आकारण्याची सरकारची योजना आहे. मात्र, यावर्षीपासून अपंगांनी उत्पादित केलेल्या वस्तूंवर असा कर शासनानं आकारू नये, अशी त्यांची मागणी आहे.

आयपीएल सामन्यांतून मिळणार्‍या कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडणार्‍या पन्नाशीतल्या महाराष्ट्रात आजही शाळेला मान्यता मिळावी यासाठी, किंवा अपंगांना करातून सवलत मिळावी, यासाठी आंदोलन करावं लागतं, हे लांच्छनास्पद आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, आदरणीय श्रीमती नसिमा हुरजूक यांचं हे मनोगत...


Rohini_Hattangadi.jpg

पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात अभिव्यक्तीस्वातंत्र्याची होणारी गळचेपी हा मुद्दाही दुर्लक्ष करण्याजोगा नाही. यातूनच पुस्तकं जाळणं, ग्रंथालयं उद्ध्वस्त करणं, नाटकं बंद पाडणं, अशा घटना वारंवार घडत असतात. आजवर अनेक नाटकांना व रंगकर्मींना स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांचा त्रास सहन करावा लागला आहे. श्रीमती दुर्गाबाई भागवत, श्री. विजय तेंडुलकर, श्री. कमलाकर व लालन सारंग, श्री. अरविंद व सुलभा देशपांडे यांनी सेन्सॉरशिपविरुद्ध, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध निकरानं लढा दिला. अर्थात, आजही हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे.

श्रीमती रोहिणी व श्री. जयदेव हट्टंगडी यांनी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. काबुकी, यक्षगान यांचं सादरीकरण करणार्‍या रोहिणीताई पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या. 'अपराजिता' 'हिंदुस्तानी' , 'रथचक्र', 'होरी, 'कोहरा', 'कुत्ते', 'कमला' यांसारख्या हिंदी, मराठी भाषांतील असंख्य नाटकांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षक व समीक्षकांनी वाखाणल्या. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची बूज राखणारे उत्तम नाट्यरसिक कसे निर्माण करता येतील याबद्दल सांगत आहेत श्रीमती रोहिणी हट्टंगडी ...


Sachin_Kundalkar.jpg

भारतीय चित्रपटसृष्टीत महाराष्ट्राचं भरीव योगदान आहे. दादासाहेब फाळक्यांपासून सुरू झालेली ही परंपरा आज 'हरिश्चंद्राच्या फॅक्टरी'पर्यंत अखंडीत आहे. राजा परांजपे, व्ही. शांताराम, राजदत्त, जब्बार पटेल, अमोल पालेकर, सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर, उमेश कुलकर्णी या दिग्दर्शकांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले.

श्री. सचिन कुंडलकर हे आजचे आघाडीचे चित्रपट पटकथा लेखक व दिग्दर्शक. 'रेस्टॉरंट', 'निरोप', 'गंध' या त्यांच्या चित्रपटांची जगभरातल्या रसिकांनी व समीक्षकांनी दखल घेतली. मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीबद्दल त्यांचं मनोगत...


Chaitanya_Kunte.jpg

गेल्या काही शतकांचा इतिहास बघता, आणि खासकरून गेल्या पन्नास वर्षांचा आढावा घेता असं लक्षात येतं की, महाराष्ट्रात अतिशय समृद्ध अशी सांगीतिक परंपरा होती. पण दुर्दैवानं, स्वतःच्या परंपरांचं, इतिहासाचं जतन करावं, अशी मराठी माणसाची वृत्ती नाही.गेल्या पन्नास वर्षांत आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आपण फारसे प्रयत्न केले नाहीत. लावणी, कीर्तन यांचं अस्सल स्वरूप आज अभावानंच पाहायला मिळतं. हेच अनेक लोककलांच्या बाबतीतही म्हणता येईल. डॉ. सरोजिनी बाबर यांच्यासारखे संशोधक, किंवा लोकसंगीताच्या शास्त्रावर ज्यांनी अतिशय pioneering काम केलं ते श्री. अशोक. दा. रानडे यांसारखे काही तुरळक लोक आहेत की ज्यांनी लोकसंगीताच्या जतनासाठी काम केलं. पण हे काम संस्थांमध्येच अडकून राहिलं.

श्री. चैतन्य कुंटे या तरुण, प्रयोगशील संगीतकारानं गेल्या काही वर्षांत असंख्य नवनवीन प्रयोगांद्वारे महाराष्ट्राची सांगीतिक परंपरा जतन करण्याचे प्रयत्न केले आहेत. ठुमरी, चैती, कजरी, होरी या गानप्रकारांत मराठी रचना सादर करणं, तुकाराम, रामदास यांच्या रचनांना चाली लावणं, किंवा केशवसुतांपासून ते आजच्या पिढीतील कवींच्या कवितांना चाली लावून त्या सादर करणं, असे अनेक प्रयोग चैतन्यने यशस्वीरीत्या केले आहेत.

सांगीतिक वैभवाचं जतन व नवनवीन प्रयोगांबद्दल बोलत आहेत श्री. चैतन्य कुंटे...



ज्या मराठी भाषेच्या नावाने आपण तलवारी उपसतो, हाणामारी करतो, त्या मराठीच्या संवर्धनासाठी आपण नक्की काय करत आहोत? दुकानावरच्या पाट्या मराठीत केल्या, म्हणजे मराठीचं संवर्धन होईल, हे मानणं हास्यास्पद नाही का? वर्तमानपत्रं, दूरचित्रवाणी, जाहिराती, चित्रपट, आकाशवाणी अशा अनेक ठिकाणी आपण रोजच अतिशय चुकीची, भ्रष्ट अशी मराठी भाषा ऐकतो. वाक्यात दहा शब्दं असतील, तर त्यांपैकी पाच शब्द इंग्रजी भाषेतले असतात. शुद्धलेखन, व्याकरण यांचं महत्त्व तर आपण आता सपशेल दुर्लक्षितो. इंग्रजी बोलताना, लिहिताना चूक केलेली आपण खपवून घेत नाही, मात्र मराठी कशीही लिहिली, बोलली तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही.

श्रीमती सत्त्वशीला सामंत महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयात भाषा उपसंचालक या पदावर कार्यरत होत्या. १९८६ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व त्यानंतर 'मराठी शुद्धलेखन' या जिव्हाळ्याच्या विषयात संशोधन व लेखन यांत त्या व्यग्र असतात. मराठी भाषेचं संवर्धन कसं करता येईल, याबद्दल त्यांचं मनोगत..



Vivek_Velankar.jpg

आपले प्रश्न सोडवण्यासाठी, मूलभूत हक्क मिळवण्यासाठी आपण कायम राज्यकर्त्यांवर अवलंबून राहतो. एखादा 'साहेब' जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असतो. अशा काही निर्णयांमुळे आपल्या हक्कांची पायमल्ली होत असते, हे आपल्या गावीही नसतं.

श्री. विवेक वेलणकर व 'सजग नागरिक मंच' गेली अनेक वर्षं माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून सरकारी अधिकार्‍यांना व राज्यकर्त्यांना अनेक निर्णयांचा फेरविचार करण्यास भाग पाडलं आहे. विजेची दरवाढ असो, किंवा टेकड्यांवर बांधकामांना परवानगी देण्याचं प्रकरण असो, श्री. विवेक वेलणकरांनी माहितीच्या अधिकाराचा यथोचित वापर करून या प्रकरणांतील सत्य लोकांसमोर आणलं.

एक सजग नागरिक म्हणून आपली कर्तव्ये, व हक्क, आणि त्यांचा वापर, यांबद्दल सांगत आहेत श्री. विवेक वेलणकर..





***
डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, श्रीमती पुष्पा भावे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. आनंद कर्वे, श्रीमती रोहिणी हट्टंगडी, श्रीमती नसीमा हुरजूक, श्रीमती सत्त्वशीला सामंत, श्री. विवेक वेलणकर, श्री. सचिन कुंडलकर व श्री. चैतन्य कुंटे या मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

'बहु असोत सुंदर..' या गीताच्या वादनात सतार - अंशुमान सोवनी (आर्फी), व्हायोलिन - योगिनी देसाई, तबला - आदित्य देशमुख.

श्रीमती नसिमा हुरजूक यांचं छायाचित्र - श्री. शाहिद. प्रताधिकार - श्री. शाहिद.
गुलमोहर: 

पुष्पा भाव्यांनी प्रतिकांच्या डोलार्‍या बद्दल अगदी योग्य मांडले आहे.

दाभोळकर सर्व दोष सरकारला देतात, ते काही पटले नाही. जनता देखील तितकीच जबाबदार आहे. आयबिन लोकमतला चांगल म्हणत आहेत ते, ते ऐकुनच शॉक बसला. Happy

प्रकाश आणि विकास आमट्यांचे भाष्य आवडले.

कर्वे विषयाला धरुन मस्त बोलले. पण त्यांचा संवाद नंतर आटोपता घेतल्या सारखा वाटला. अजून बोलले असतील तर ऐकायला आवडेल.

रोहिणी हट्टंगडी केवळ नाट्य भुमीकेतूनच सर्व पाहत आहेत. महाराष्ट्राच्या वाटचाली बद्दल काहीच बोलल्या नाहीत, केवळ जाता जाता ओझरता उल्लेख बंद पाडण्यावरुन केला आहे. हे सर्व त्या नाटकाच्या भविष्याबद्दल बोलत आहेत का महाराष्ट्राच्या वाटचाली बद्दल हा मात्र प्रश्न पडला आहे.

सेम गोज फोर कुंडलकर. पन्नाशीतला महाराष्ट्र ह्यामध्ये ते "त्यांची वाटचाल" सांगत आहेत महाराष्ट्राची नाही. निदान सिनेमाचा आढावा तरी? की सिनेमा कसा बदलला वगैरे. अपेक्षाभंग !

एकुनच फिचर मस्त झाले आहे.

उत्तम संकलन. ऑडियो ऐकेन आज.

>>या सार्‍या झगमगाटात आपल्या खर्‍या समस्या, विवंचना दुर्लक्षितच राहिल्या. आठ-दहा तासांचं भारनियमन, दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा किरकोळ समस्या कोणाच्याच खिजगणतीतही नव्हत्या. << खरय. Sad

या मान्यवर व्यक्तींचे मनोगत इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

पुष्पा भाव्यांचे विचार खूप आवडले. भारावले.
बाकीचे ऐकते आहे.

चिन्मय- खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणेच अतिशय दर्जेदार आणि विचारांना चालना देणारे उत्कृष्ट काम.

मायबोली प्रशासनाचे धन्यवाद. कुठल्याही वृत्तपत्रात मी याहून चांगले एकत्रित विचार सुवर्णमहोत्स्वानिमीत्त वाचले नाहीत.

एक शंका- ज्यांना घरून ऐकायची सोय नाही आणि ऑफिसमधुन ऐकता येत नाही अशांसाठी लिखीत स्वरुपात उपलब्ध झाले तर जास्त लोकांपर्यंत पोचेल असे कळकळीने वाटते. नाहीतर भारतातील आणि महाराष्ट्रातीलच वाचकांनाच (नेहमीप्रमाणे) आपण दूर लोटतो आहोत. मुंबईपुणेन्युजर्सी पलिकडल्यांपर्यंत हे विचार पोचायचे असतील तर ते तसे उपलब्ध झाले पाहिजेत.

असो. योग्य तो निर्णय घ्यायला आपण समर्थ आहातच.

बहु असोत ची चाल काहीशी वेगळी वाटतेय ? की मलाच वाटते आहे?

रैना,
धन्यवाद. Happy

तू म्हणतेस तसं लिखित स्वरूपात ही मनोगतं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो.

'बहु असोत..'ची चाल मंगेशकर कुटुंबियांनी गायलेल्या चालीबरहुकुम आहे.

चिन्मय- खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणेच अतिशय दर्जेदार आणि विचारांना चालना देणारे उत्कृष्ट काम.
>>
अनुमोदन. Happy

मी पुष्पा भावे आणि आनंद कर्वे यांचे ऐकले. भावे खरंच छान बोलल्या आहेत. त्यांचे म्हणणे पटले. कर्व्यांनी पण छान माहिती सांगितली. मलाही केदार सारखेच वाटले की शेवटी त्यांचे बोलणे अचानक आटोपते घेतले असे. अजून ऐकायला आवडले असते.

मला आणखीन एक आवडलेली गोष्ट म्हणजे दोघेही स्वच्छ आणि शुद्ध मराठीत बोलले आहेत. कुठेही इंग्रजी किंवा इंग्रजीमिश्रित नाहीये. Happy

उरलेले ऐकेन आणि प्रतिसाद देईन.

आज रात्री घरी गेल्यावर ऑडीओ ऐकणार.
बाकी आमचा विदर्भ उपेक्षीत राहीला तो राहिलाच.
यावर सरकारनी काही नाही केलं.
नाही आमच्या विदर्भीय नेत्यानी.
मला तर या ५० शीचं मुळीच कवतीक नाय हाय बा......

पुष्पा भावे, आनंद कर्वे आणि नसिमा हुरजूक ह्यांचे ऑडिओ ऐकले.
पुष्पा भावे आणि आनंद कर्वे मस्त बोललेत आणि उकृष्ठ वक्क्ते वाटतात. Happy
पुष्पा भाव्यांच्या आणि नसिमा ह्यांच्या बोलण्यातली एक गोष्ट खटकली ती म्हणजे बहूतेक सगळ्या नकारात्मक गोष्टींचाच उल्लेख आहे. गेल्या पन्नास वर्षात आपण बर्‍याच काही गोष्टी करू शकलो असतो ज्या केल्या नाहित, ज्यामुळे आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पण मान्यवरांच्या नजरेत अश्या कुठल्याच गोष्टी नाहित का ज्या केल्याने आपली प्रगती झाली ? जे केलं ते सगळच वाईट होतं का की काहिच केलं नाही आणि त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वी जिथे होतो तिथेच राहिलो आहोत ?
आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे अगदी मान्य. पण त्या बरोबरच थोडासा सकारात्मक विचार मान्यवरांच्या बोलण्यातुन डोकावला असता तर अधिक आवडल असतं.
बाकीचे ऑडीओ ऐकेन घरून.

रोहिणीताईंने मांडलेले विचार मला तरी "आय स्पेशलिस्ट" किंवा विषयाच्या दृष्टीने अस्थानी वाटले नाही. उलट किती प्रचंड प्रयोगशील काळात त्यांनी काम केल्याचे जाणवले.

चिन्मय, सर्वप्रथम मनापासून धन्यवाद (आणि अभिनंदन) इतका चांगला उपक्रम हाती घेऊन हे विचार, ही माणसं आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी.
यातली प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र विचार आहे, एक स्वतंत्र पुस्तक आहे खरं तर... त्यांमुळे त्या सगळ्याच विचारांवर एका लहानशा पोस्टमधे 'चांगलं आहे, छान वाटलं' असं मत देणं म्हणजे या व्यक्तींचा, त्यांच्या कामाचा अनादर करण्यासारखे होईल असं मला वाटतं. पण तरीही ही लहानशी भाषणं ऐकून, त्यावर विचार करणं आणि त्यातल्या काही गोष्टी विचारात आणि आचारात आणायला जमलं तर 'महाराष्ट्राच्या पन्नाशीला' खरा अर्थ आहे.
पण एक मात्र प्रामाणिकपणे सांगावसं वाटतंय ते म्हणजे, वक्त्यांचा देश म्हणून एकेकाळी नावाजलेल्या महाराष्ट्रात आज वक्तृत्वकला फार स्वस्त झाली आहे असं वाटत असतानाच खूप दिवसांनी मराठीमधे व्यवस्थित भाषेत, योग्य रितीनी विचारांची मांडणी केलेली काही भाषणं या निमित्तानं ऐकायला मिळाली.
धन्यवाद.. Happy

'बहु असोत सुंदर' गीताची धून वाजवणारे वादक कलाकार अंशुमान, योगिनी देसाई आणि आदित्य देशमुख यांचेही मनापासून अभिनंदन Happy

धन्यावाद चिन्मय!
सुंदर अन्स स्तुत्य उपक्रम!

(केवळ समारंभापुरते भाषणे ठोकाणार्‍या राजकीय नेत्यांचा 'जय' करण्यापेक्षा देशात गेल्यावर अश्याच नेत्यांचा अनुयायी व्हायला नक्कीच आवडेल!-चंपक)

आमटे, दाभोळकर, हुरजूक, सामंत आणि वेलणकर आणि कुंटे ह्यांचे विचार ऐकले. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवरांचे विचार ऐकून छान वाटले. त्या त्या क्षेत्रातल्या समस्याही कळाल्या.

सामंत ह्यांनी मराठीची दुरवस्था होत आहे हे सांगितले खरे, पण मग आता पुढे नक्की काय करायला हवे हे ही सांगायला हवे होते. वेलणकरांनीसुद्धा माहिती अधिकाराचा वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं हे सांगायला पाहिजे होतं असं वाटलं. चैतन्य कुंटे ह्यांनी भारतीय संगीतावर मांडलेले विचार खरोखर आवडले. थोडक्यात छान आढावा घेतला आहे त्यांनी.

चिन्मय, हा उपक्रम सादर केल्याबद्दल तुला खरोखर धन्यवाद. आर्फी, योगिनी आणि आदित्य ह्यांनी गाणे छान वाजवले आहे. मलातर जी चाल वाजवली आहे ती एकच चाल माहिती आहे.

यात खरे तर अभ्यासू राजकीय व्यक्तींचा समावेश करणे आवश्यक होते. कारण शेवटी राजकीय व्यवस्था ही अम्मलबजावणीची अधिकृत व्यवस्था आहे. हे उत्तम आहेच पण कोलाज पद्धतीचे आहे. वरील लोक जे चांगले कार्य करीत आहेत त्या कार्याला राजकीय व्यवस्थेच्या पाठबळाने गतीच येणार आहे. वरील सर्वच मंडळी ही अ‍ॅन्टी गवर्न मेन्ट आहेत. त्यामुळे पराग म्हणतो त्याप्रमाने पॉझिटीव्ह असे काही झालेच नाही का? अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर विनाअनुदान तत्वावर तंत्रशिक्षण खुले केल्याचा महाराश्ट्राच्या वाटचालीवर काही परिणाम झाला की नाही. हा राजकीय व्यवस्थेने घेतलेला निर्णय होता . समाजातल्या दुर्बल घटकांसाठी राजकीय व्यवस्थेने काही केले की नाही ?
दुदैवाने महाराष्ट्रातल्या समाजसेवकांच्या वागण्याबोलण्यात फार लवकर एक प्रकारचा दर्प येऊ लागतो. व ते मांडीत असलेल्या विचारांपलिकडे काही विचार नाहीच अशा असहिष्णू पायरीवर ते येऊन ठेपतात....
मग ते लबाड रिक्षावाल्यांचे नेतृत्व करनारे बाबा आढाव असोत नाही तर हेल्मेट बन्दीला विरोध करणारे वेलनकर असोत...

चिनुक्स खूप छान बर्याच वर्षानी काहीतरी चांगल वाचाय्ला एकायला मिळालं अंमळ उशीरच झाला.शाळेत आसताना आनंवनात मी बाबांना भेटलो होतो त्यावेळी भाराउन काम करण काय असट्म ते पहीलं , आनुताई वाघांच्या आश्रमातही श्रमदानाला गेलोय.

दुदैवाने महाराष्ट्रातल्या समाजसेवकांच्या वागण्याबोलण्यात फार लवकर एक प्रकारचा दर्प येऊ लागतो. >> हे १००% सत्य त्यामुळेच सुरवातीला चांगला वाट्णारे राजकिय नेत्रुत्वही नंतर एकाच माळेचे मणी वाटतात

वरील recordings एकत्र करुन मायबोलीवर उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनापासुन धन्यावाद. सगळेचजन प्रत्यक्ष झोकुन देउन , निरपेक्षपणे काम करणारे लोक असल्याने त्यांच्या हेतुंबद्दल थोडीही शंका नाही.पण तरी देखील टोणगा ह्यांची पोष्ट काही अंशी पटली. राजकीय/प्रशासकीय व्यवस्थेने (जीला पर्याय नाही आणि आजतरी बहुसंख्य लोकांपर्यंत तीच्याशिवाय दुसरे कोणी पोहचु शकत नाही) केलेल्या चांगल्या कामालाही प्रतिनिधित्व मिळाले असते तर समतोल साधला गेला असता.

फचिन >> माहिती अधिकार कायदा, त्याचा वापर कसा करायचा ह्याची सविस्तर माहिती,त्याचे अर्जाचे नमुने हे सगळे सरकारी वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे. http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=1kSXE4TWqLljT9msf4uo6...|OHauHOc/niFcahXdNt21ew==
http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=4G3CqZD5nX9UOS2RtSJ6I...
http://dgipr.maharashtra.gov.in/DGIPRWEB/ShowDetail.aspx?SecId=R-SM
http://dgipr.maharashtra.gov.in/DGIPRWEB/ShowDetail.aspx?SecId=R-IO

हे सर्व त्या नाटकाच्या भविष्याबद्दल बोलत आहेत का महाराष्ट्राच्या वाटचाली बद्दल हा मात्र प्रश्न पडला आहे.
आमटे यांच कार्य हे तर असामान्य आहेच ...
बाकी नाटक,सिनेमा हा विषय आणि हे काही कलाकार सोडुन "महाराष्ट्रातील वाटचाल" म्हणुन मांडण्यासाठी बाकीच भरपुर आहे ...