उपकरणे भाग – २ - भिंग संच (काम्पौंड लेन्स)

Submitted by विनायक.रानडे on 7 March, 2010 - 13:11

अस्थप्रग्रा (डिजीटल स्टिल कॅमेरा)

पारदरशी काचेचे दोन्ही पृष्ठभाग एकमेकास समांतर असतील तर एका बाजूला असलेली वस्तू काचेच्या दुसर्‍या बाजूने आकारमान न बदलता दिसते. जर पारदरशी काचेचे दोन्ही पृष्ठभाग किंवा कोणताही एक पृष्ठभाग गोलाकार फुगलेला असल्यास काचेच्या दुसर्‍या बाजूने वस्तूचे आकारमान मोठे झालेले दिसते. अशा काच पट्टीस "बहिरगोल भिंग" म्हणतात. ह्या उलट पारदरशी काचेचे दोन्ही पृष्ठभाग किंवा कोणताही एक पृष्ठभाग निमुळता गोलाकार असल्यास काचेच्या दुसर्‍या बाजूने वस्तूचे आकारमान कमी झालेले दिसते. अशा काच पट्टीस "अंतरगोल भिंग" म्हणतात.

छाया चित्रकारितेत वापरात येणारे भिंग म्हणजे एक काचेची पट्टी नसून बर्‍याच "बहिरगोल भिंग" व "अंतरगोल भिंग" काच पट्ट्यांचा एक संच असतो म्हणून ते भिंगसंच (कम्पौन्ड लेन्स) आहे.

lnfcs2.png

वरील आकृतीत एका भिंगसंच्याचा "छ" हा छेद बिंदू (फोकल पॉइंट) आहे. भिंग आणि "छ" बिंदूतील "अ१" ह्या अंतराला "सुस्पष्ट रेखीव अंतर" (फोकल लेंगथ) म्हणतात. "छ" ह्या जागेवर भिंगातून येणारी प्रकाश किरणे एकमेकास छेदून प्रतिमा संवेदकावर वस्तूच्या प्रतिमेला उलट झालेली दाखवतात. प्रतिमा पटलावर प्रतिमा संवेदक असतो. संवेदकाच्या आकारमानाशी संबंधित कोणत्याही भिंगाचे "सुस्पष्ट रेखीव अंतर" निश्चित केलेले असते. हे अंतर नेहमी मिली मीटर मापकाने मोजतात. उदा. १०, २५, ५०, ८०, १३५, १२०० मी.मी. "सुस्पष्ट रेखीव अंतराचे" (फोकल लेंगथ) भिंग असे असते. "अ१" व "अ२" हे अंतर जेव्हा तंतोतंत एक असते तेव्हा वस्तूची प्रतिमा जास्तीतजास्त सुस्पष्ट व रेखीव असते. ह्या दोन अंतरांना समान करण्याच्या क्रियेला "सुस्पष्ट करणे (फोकसींग)" असे म्हणतात. आधुनिक भिंगात सुस्पष्ट करणारी स्वयंचलित (ऑटिमॅटीक) सोय असते. "अ३" हे अंतर वस्तूची भिंगा जवळ असण्याची मर्यादा आहे. ही अंतराची मर्यादा सुस्पष्ट प्रतिमा दिसण्या करता आहे. मॅक्रो (मायक्रो नव्हे) पद्धतीने हे मर्यादा अंतर कमी करता येते. मर्यादा अंतर १ मीटर असल्यास मॅक्रो पद्धतीने ते २० सेंटिमीटर इतके कमी करणे शक्य असते.

भिंगाचे दोन प्रकार आहेत एक ठरावीक सुस्पष्ट अंतर (फिक्स फोकल लेन्गथ) व दुसरे सुस्पष्ट अंतराचा फेर बदल करू शकणारे(झूम फोकल लेन्गथ). मराठीतून मी ह्या प्रकाराला फेर भिंग असे नाव दिले आहे. बाजारात भिंगाच्या किमती प्रमाणे फेर मर्यादा उपलब्ध आहेत. उदा. ११ – ५५ मी.मी. किंवा ५ X, १० X, २४ X वगैरे फेर भिंग.


वर दाखवलेल्या बाणाच्या दिशेने भिंगसंचातिल विविध गटांचे अंतर बदलल्याने फेरभिंगाचा दृश्यकोन बदल साधता येतो.

प्रग्रातील म्हणजेच कॅमेऱ्यातील प्रतिमेचा आकार भिंगाच्या दृश्य कोनाशी (व्ह्युइंग ऍन्गल) संबंधीत आहे. मनुष्य आपल्या दोन डोळ्याने कोणत्याही दृश्याची आयताकृती प्रतिमा बघतो म्हणजेच दृश्य कोन ४० अंश रुंद व २७ अंश उंच असतो. ह्याला सामान्य दृश्य कोन समजले जाते. प्रतिमा ग्राहकातील संवेदक सुद्धा आयताकृतीच असतो. ज्या भिंगाचा ४० ते ४२ अंश रुंद असा सामान्य दृश्य कोन असतो त्या भिंगाला सामान्य भिंग (नॉर्मल लेन्स) म्हणतात. ह्या आकृतीत ठरावीक अंतरावर असणार्‍या वस्तूच्या प्रतिमेची उंची व संवेदकाची उंची सारखी असताना जर भिंगाचा दृश्य कोन ४० अंश रुंद व २७ अंश उंच असेल तर ते सामान्य दृश्य कोन भिंग गणले जाते. त्या दृश्यकोना पेक्षा जास्त अंशाचा कोन असलेल्या भिंगाला विस्तृत भिंग (वाईड लेन्स) तसेच सामान्य दृश्यकोना पेक्षा कमी अंशाचा कोन असलेल्या भिंगाला दूर भिंग (टेली लेन्स) म्हटले जाते.
महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा की दृश्य कोन जास्त अंशाचा असला तर रेखीव प्रतिमा अंतर कमी असते त्या उलट दृश्य कोन कमी अंशाचा असला तर रेखीव प्रतिमा अंतर जास्त असते. उदाहरणार्थ ४.८ X ३.६ मी.मी. आकाराचा संवेदक असेल तर ६० अंश दृश्य कोन असणार्‍या भिंगाचे सुस्पष्ट अंतर (फोकल लेन्गथ) ६.३ मी.मी. असेल आणि २३ अंश दृश्य कोन असणार्‍या भिंगाचे सुस्पष्ट अंतर (फोकल लेन्गथ) १८.९ असेल. तसेच २३.६ X १५.८ मी.मी. आकाराचा संवेदक असेल तर ६० ते २३ अंश दृश्य कोन असणार्‍या भिंगाचे सुस्पष्ट अंतर (फोकल लेन्गथ) १८ ते ५५ मी.मी. असेल. ह्याच कायद्याने संवेदक ३६ X २४ मी.मी. आकाराचा असल्यास ६० ते २३ अंश दृश्य कोन असणार्‍या भिंगाचे सुस्पष्ट अंतर (फोकल लेन्गथ) ३५ – १०५ मी.मी. असेल.
म्हणजेच तुमच्या अस्थप्रग्राचा संवेदक ज्या आकाराचा असेल त्यावर ठरावीक अंतरावर असणार्‍या वस्तूचा अपेक्षित प्रतिमा आकार साध्य करण्या करता संबंधित दृश्य कोनाची निवड करणे आवश्यक आहे. हे पुढील चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. २४ मी.मी भिंगाने त्या जागेची भव्यता जाणवते तर ७२ मी.मी भिंगाने झुंबराला महत्त्व दिले असून ति जागा गौण झाली आहे.

पुढच्या भागात द्रव स्फटीकाचा दर्शक (एल्सीडी डीस्प्ले) किंवा “दसद” माहिती मिळवा.

गुलमोहर: