उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही प्रामाणिक प्रश्न:
१. 'निरपेक्ष' प्रेम हे एकटे 'श्रीभगवंतच' करू जाणे
>> पण मग पूजेची-स्तोत्रांची(स्तुती),भगवंतावर प्रेम दर्शवण्याची/प्रेम असण्याची गरज काय (स्वत:च्या मानसिक समाधानासाठी सोडून)?
सगळ्यांवर सारखच प्रेम करेल ना तो भगवंत - तुम्ही प्रेम केलत किंवा नाही केलत तर!
आणि मग "कुणीतरी प्रार्थना केली आणि देव प्रसन्न झाला", "कुणीतरी काहीतरी केलं नाही आणि देव कोपला" अशा स्टोर्‍या कशासाठी?

२. जर मोक्ष हे सर्वोच्च ध्येय मानलं, तर देवांचे जे अवतार आहेत, ते कार्य झाल्यावर मूळ देवामधे विलिन का होत नाहीत? Why do they stay as seperate entity? (उदा. राम, नरसिंह, हनुमान)

३. जर इहलोकीच्या मृत्यूनं काहीच फरक पडत नसेल तर गजानन महाराजांच्या मृत्यूनंतर साईबाबा (का vice versa - I am not sure) का रडले की माझा बंधू गेला? मी-तुम्ही रडणं स्वाभाविक, कारण आपली समजच तेवढी! पण हे लोक तर ज्ञानी होते ना?

नानबा, मस्त !

माझ्या परिने उत्तर द्यायचा प्रयास करते Happy

१. तो निरपेक्षच प्रेम करतो. पुजा, स्तुती इ. या नवविधा भक्तीच्या प्रकारांमधे मोडतात. या मार्गांनी आपण त्याच्याशी अनुसंधान बांधण्याचा प्रयास करतो. पण या नवविधा भक्तींचे मूळ प्रेमच आहे. भक्ताचे भगवंतावरचे प्रेम, मग ते सकाम असेल किंवा निष्काम असेल. त्याने जरी कितीही प्रेम केले तरी ते स्विकारायची पात्रता ही आपल्या व त्याच्यातील अंतरावर ठरते. हे अंतर त्याच्या वरच्या प्रेमाने, सेवेने, श्रद्धेने, सबुरीने कमी होते. आपण म्हणतो ना, "देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी". आपली भक्ती म्हणजे आपले झोळी शिवणे, मजबूत करणे असते. त्याचे हजारो हातांनी देणे म्हणजे नुस्ते ऐहिकच असेल असे नाही. तो जे आपल्याला आपल्या बिकट प्रसंगात खंबीर पणे उभं रहायचं सामर्थ्य देतो, तेही त्याचे देणेच असते. आपल्या मधे क्षमाशिलता वाढवतो, तेही त्याचे देणेच असते.

"कुणीतरी प्रार्थना केली आणि देव प्रसन्न झाला", "कुणीतरी काहीतरी केलं नाही आणि देव कोपला" अशा स्टोर्‍या कशासाठी? >>>> हे तू कुठल्या व्रतांच्या कथांबद्दल म्हणत असशिल तर मलाही कधी कधी त्या अतीरंजित अवास्तव वाटतात. कदाचित त्या कथेमागची मूळ कल्पना आपल्याला माहित नसते आणि कानगोष्टीसारखी ती कथा काहीतरी विचित्र रुप धारण करुन आपल्या समोर येते.

माझ्या मते भगवंत ज्याची साथ सोडतो तो आपोआपच त्याची सत्कर्मांची पुण्याई/ पुर्वपुण्याई संपल्यावर रसातळाला जातो, जसे ज्या पाषाणांवर राम लिहिलं गेलं ते तरले आणि जे रामाच्या हातात होते पण साक्षात रामानेच हातातून सोडताच बुडाले. भगवंत अवतरतो ते सज्जनांच्या रक्षणासाठीच. त्या हेतूने कार्य करताना आपोआपच दुराचार्‍यांचे पारिपत्य होते. तो दुराचार्‍यांनाही वारंवार संधी देतो पण जेव्हा रावणाने लंकेतले सर्व कापड संपल्यावर सीतेची वस्त्रे आणून हनुमंताच्या शेपटीला गुंडाळा म्हटले तेव्हा अपराधांची परिसीमा झाली आणि हनुमंताने संधी देण्यासाठी वाढवलेली शेपुट पुर्ववत होते आणि लंका दहन घडते.

तसेच परमात्मा श्रद्धावानांच्या बाबतीत दुष्कृत्यांच्या शिक्षा सौम्य करुन देतो तर श्रद्धाहीनांच्या बाबतीत डोळ्यास डोळा हा न्याय त्याला बायपास करता येत नाही कारण वारंवार संधी देऊनही दुराचारी दुराचार करतच राहिला तर न्यायनिवाडा निर्गुण निराकार दत्तगुरुंच्या कक्षेतच जाऊन उभा होतो, परमात्म्याच्या इच्छाप्रांतात रहात नाही.

२) जे जे देहधारी झाले त्यांना विश्वाचे नियम लागू होतात आणि त्या नियमांना सामान्य मानवाप्रमाणे पाळले जाते व देह सोडावा लागतो. त्यातील चैतन्य त्याच्या मूळ रुपात म्हणजे दत्तगुरुंमधेच विलिन होते.
हनुमंत चिरंजीव मानले जातात व आजही आपल्या सुषुम्ना नाडीत खेळत असतात महाप्राण रुपाने.

३) हो, ही कथा वाचली आहे की श्री गजानन महाराजांच्या समाधीनंतर तिकडे साईंनी आकांत मांडला होता की माझा थोरला भाऊ गेला. गजानन महाराज व साई हे अंतस्थः एकच कारण ती सद्गुरुंची दोन रुपे फक्त. त्या कथेत कुणीतरी येऊन सांगितले नव्हते की महाराजांनी देह ठेवला पण त्याच सद्गुरुतत्वाने एक कार्य झाल्यावर तो देह ठेवल्याचे दुसर्‍या ठिकाणी वेगळ्या रुपात कार्यरत असलेल्या त्याच सद्गुरुंना हे कळणे साहजिकच आहे. त्यांचे रुदन हे आपल्यासारख्या सामान्यांसाठी आश्चर्याचे वाटू शकेल पण ते केवळ त्या घटनेचे दर्शक होते. पुढे महाराजांकडल्या अनेक भक्तांचा प्रतिपाळ साईंनी केला उदा. खापर्डे कुटुंब.

म्हाळसापतींच्या मांडीवर डोके ठेवून घेतलेली ३ दिवसांची समाधी आणि त्या दर्म्यान म्हाळसापतींच्या पुत्राचे निधन ह्या मधे म्हाळसापतींनी सद्गुरुआज्ञापालन तंतोतंत केले व पुत्रनिधनाने कोलमडून जाऊन साईंचा देह मांडीवरुन खाली ठेवला नाही. त्या पुत्राचे आयुष्य तेवढेच होते त्याप्रमाणे ते संपले (त्यांना नंतर पुन्हा पुत्र झाला होता). पण साईचा देह ३ दिवस सांभाळल्याने (त्याची अंत्यसंस्कार न केल्याने) साईं पुन्हा देहात आले व आपल्याला पुढे अनेक वर्षे त्यांचा सहवास लाभला.

छान लिहिले आहे अश्विनी!

आपली भक्ती म्हणजे आपले झोळी शिवणे, मजबूत करणे असते >> हा विचार खुप आवडला.

तसेच परमात्मा श्रद्धावानांच्या बाबतीत दुष्कृत्यांच्या शिक्षा सौम्य करुन देतो >>> हे अगदी पटले. एखाद्या श्रद्धावानाच्या नशिबात काही विनाकारण ख्रर्च उद्भवणार असेल, तर खर्च होईलच पण गरजु व्यक्तीला मदत करण्यात किंवा काही सेवेत होइल, पैश्याचे नुकसान होवुन त्यातुन मानसिक त्रास उद्भवणार नाही ह्याची काळजी तो घेतो.

बर्‍याच वेळा आपण अरिष्ट टळले किंवा थोडक्यात निभावले म्हणतो,ती ही त्याचीच कृपा. तु म्हटल्याप्रमाणे
त्याने जरी कितीही प्रेम केले तरी ते स्विकारायची पात्रता ही आपल्या व त्याच्यातील अंतरावर ठरते.

महेश,अश्विनी धन्यवाद!

नानबा! काय बोलू?:)
तुमचे प्रश्न, नुसतेच प्रामाणिक नाहीत, तर ते 'शेलके'ही आहेत! खूप बरे वाटले!
धन्यवाद!

अश्विनी छान सांगितले आहे! आपल्याला लिहताना पाहून बरे वाटले!:)

खरेतर एकच एक परम तत्व सर्वत्र व्यापुन राहिले आहे. अगदी तुमच्या माझ्यात, सजीव, निर्जिवात देखील.
आपण स्वतः ज्याचा एक छोटासा भाग आहोत, त्याला आपण पुर्णपणे कसे काय जाणू शकणार. उदा. एखाद्या थेंबाने पुर्ण समुद्र जाणण्याचा प्रयत्न करणे कितपत शक्य आहे ?
जाणण्यापेक्षा अनुभवणे आणि त्यात विलीन होऊन जाणे याचसाठी अनेक उपासना मार्ग आहेत.
ज्ञान, प्रेम, भक्ती, कर्म, इ. योग आहेत. सर्वसामान्य लोकांना आकलन होण्यास सोपे जावे यासाठी परमतत्वाची सगुण साकार रूपे अस्तित्वात आली. त्यायोगे सर्वत्र विखुरलेल्या चित्तवृत्ती एकत्र करून परम तत्वात विलीन करून टाकणे हेच सर्व ध्यान धारणा, उपासना मार्गांचे अंतिम ध्येय आहे.
खरेतर हा विषय सर्वात कठिण पण आहे, सोपा पण आहे.

अश्विनी, बर्‍यापैकी उत्तर पटली!
मागे महेश देशपांड्यांनी पण काही (वेगळ्या) प्रश्नांची छान उत्तरं दिलेली!
धन्स!

धन्यवाद नानबा :),
मी पण माझ्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न करतो:
१. पूजेची, स्तोत्रांची गरज भगवंताला नसते. हे सगळं भक्तासाठी. ज्या भगवंताची माझ्यावर एवढी कृपा आहे, तो भगवंत किती प्रेमळ आहे, तो कसा कृपाळू आहे हेच त्या स्तोत्रांतून तो स्वतःला सांगत असतो. स्वतःवर बिंबवत असतो अन् हे केल्याने त्याचे भगवंतावरचे प्रेम अधिकच दृढ होते. जसं की मला माझी सायकल खूप आवडते. मला असं वाटतं की माझी सायकल कधीच बिघडत नाही. मग मी ती रोज पुसतो, तिचं तेल पाणी बघतो. ही सायकलची पूजाच नाही का? अन् माझ्या मित्राला मी सांगतो की माझी सायकल कशी चांगली आहे. त्याला हे पण म्हणतो की तू सुद्धा ही सायकल घ्यावीस. हे सायकलचे स्तोत्र. हे रोज करण्याने तो स्वत: भगवंताच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. अश्विनीने हे सांगितलंच आहे. पूजा, स्तोत्रांची गरज भक्ताला वाटते. भगवंत तर भावाचा भुकेला! बाकी "देव प्रसन्न झाला" या गोष्टी म्हणजे दुसर्‍याला भक्तीची महती सांगणार्‍या कथा आहेत. अन् "देव कोपला" या कपोलकल्पित कथा आहेत.
२. देवांचे अवतार ही रूपे (प्रतीके) आहेत. उदा राम म्हणजे एकवचनी, आज्ञाधारक, शौर्य, सत्य इ. चे रूप आहे. तर श्रीकृष्ण हे प्रेम, व्यवहारचातुर्य इ. चे रूप आहे. देवी हे शक्तीचे रूप आहे. प्रत्येक भक्ताने या रूपांची भक्ती करताना ही रूपे ज्या गुणांची प्रतीके आहेत ते गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी रूपे अनेक असली तरी तत्व एकच. ही सर्व रूपे आली अन् कार्य करून गेलीही (विलीन झाली.). आपण भक्तांनी या रूपांना आपल्यात अजूनही स्थान दिलंय. कारण ते ज्या गुणांची प्रतीके आहेत ते गुण आपल्यात यावेत अशी इच्छा बाळगून त्यांना भजावे, त्यांची भक्ती करावी असं प्रकर्षानं वाटतं म्हणून ही रुपे आजही आहेत.
३. मला ही कथा माहित नाही. मी माझ्या परीने उत्तर देतोय. श्री साईबाबांच्या अनेक कथांतून असं दिसलंय की स्वतः साई हे भक्तांना होणार्‍या यातना पाहून कळवळत. परमेश्वराजवळ रडत, म्हणत असत की का तू इतका यांना छळतोस? का यांचा अंत पहातोस? तुला यांच्या यातना पाहून दयाबुध्दी कशी होत नाही? याच भावनेतून ते रडले असावेत. त्यांना असं वाटलं असावं की श्री गजानन महाराजांच्या जाण्याने त्यांच्या भक्तांची काय अवस्था होईल? आता त्यांनी कोणाकडे जावं? कोण त्यांचा वाली आहे? मी जरी सर्व जाणत असलो तरी त्यांना कोण समजावणार? आणखी एक शक्यता - अशा रडण्याने (महाराजांच्या) भक्तांना असाही संदेश जातो की ते अन् मी वेगळे नाहीत.
हे अश्विनीने छान सांगितलं आहे.

माझ्या अल्पमतीला जे समजले, जसे सुचले तसे टायपत गेलोय. काही चुकले असल्यास सांभाळून घ्या.

श्री जगन्नाथ कुंटेंचं "नित्य निरंजन" हे पुस्तक दुसर्‍यांदा वाचून कालच संपवलं. आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की कुठूनही हे पुस्तक आणून वाचावे. श्री कुंटे यांनी व्यक्त केलेले विचार अन् साधना कशी करावी हे खूपच छान समजावून सांगितले आहे. कृपया सर्व साधकांनी वाचावे ही विनंती.

नूतन,
हे पुस्तक मी अप्पा बळवंत चौकात विकत घेतलं. दुकानाचं नाव आठवत नाही पण चौकातून तांबडी जोगेश्वरी कडे जाताना डाव्या हाताला जी दुकानं लागतात त्यातलं अगदी पहिलंच दुकान. किंमत बहुतेक २०० ते २५० असावी.
त्यांची इतर पुस्तके:
१. नर्मदे हर हर
२. साधनामस्त
३. कालिंदी
प्रत्येक साधकाने नक्की वाचावीत अशी पुस्तके आहेत ही.

साधू आणि संवेग-

श्रीमद् भागवताच्या एकादश स्कंधात साधूंची जी ’पंचलक्षणे’ सांगितलेली आहेत ती अशी आहेत..

निरपेक्षं मुनिं शान्तं निर्वैरं समदर्शनम् |
अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यंघ्रिरेणुभि: ||श्री. भा. ११.१४.१६ ||

ती पंचलक्षणे म्हणजेच..

१) साधू हे ’निरपेक्ष्’ असतात.म्हणजेच अपेक्षारहित असतात. इहलोक आणि परलोकतील कोणत्याही भोगाविषयी अंत:करणात ’वासनाच’ उत्पन्न् न हॊणे, हीच् खरी ’निरपेक्षता’ म्हटली जाते.
२) दुसर् लक्षण म्हणजे त्यांच ’मुनीत्व’..म्हणजेच शास्त्रांनी प्रमाणभूत सांगितलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी,अखंड् धारणेचे मनन करणारेच ’मुनी’ होत.
३) ’शांत’ हे तिसरे लक्षण. देहाच्या ठिकाणी ’अहंतेचे’ न स्फ़ुरणे..कामक्रोध विरणे म्हणजेच ’शांती’ होय.
४) ’निर्वैर’..आणि
५)’समदर्शन’. म्हणजेच सर्वात केवळ परमात्माच पाहणे,.. समता प्राप्त झाली की ’निर्वैरता’ सहजच लाभते.

श्रीसंत एकनाथ महाराजांनी याविषयी लिहताना, आपल्या ’श्रीएकनाथी भागवतात’ म्हंटले आहे..

निरपेक्षता आणि माझें मनन | शांति आणि समदर्शन |
पांचवे तें निर्वैर जाण | पंचलक्षण हें मुख्यत्वे ||

पुढे ते म्हणतात..

कडेकपाटीं न रिघतां जाण | न सोशितां अतिसाधन |
हें हाता आल्या पंचलक्षण | विश्व उद्धरण त्याचेनि ||

अशी ही ’पंचलक्षणे’ ज्यांच्या ठायी प्रकटतात, त्यांच्याच हातून् ’शास्त्रोक्त’ लोकोद्धाराचे महतकार्य होत असते.

अशा लक्षणांनी ’युक्त’ हे स्वत: श्रीभगवंत आणि त्यांचीच ’रुपडी’ असणारी साधू-संत-सदगुरू’ ही असतात. म्हणूनच ’निरपेक्ष्’ प्रेम ही फ़क्त तेच करू जाणे.. आणि म्हणूनच ’आपण’ ही फ़क्त त्यांच्यावरच ’प्रेम’ करावे!

कारण... श्रीमाउली आपल्या हरिपाठात म्हणतात' जर एखाद्याला विनासायास श्रीभगवंताची नि:संदेह अनुभूती घ्यायची असेल..तर् एकच ’खात्रीचा उपाय’ आहे , तो म्हणजे..

ज्ञानदेव सांगे दॄष्टांताची मात |
साधूंचे संगती तरणोपाय || हरि.५.४ ||

हा ’उपाय’ जरी खात्रीचा असला..तरी आपल्यासारख्या सामान्यजनांना ’साधू’ कोठे ओळखता येतात? मग आता आपल कस होणार?.. पुढे कस जायच? हा खरा प्रश्न आहे..!

असे हे श्रीभगंवत्..सदगुरु हे जर सर्वावर सारखेच 'निरपेक्ष’ प्रेम करित असतील तर्, आपल्याला ’त्या’ प्रेमाचा अनुभव का येत नाही किंवा तो ’अनुभव’ वेगवेगळा का येतो-भासतो?
हे समजण्याकरता दोन उदाहरणे पाहू...

१]आकाशातील 'सुर्य’ हा अखंड ’प्रकाश’ देत असताना, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळा ’अंधाराचा’ अनुभव का येतो? सुर्याला अंधार म्हणजे काय हे जेथे माहीत असण्याचीच शक्यता नाही..तेथे त्याच्याच ’सत्तेने’ आपल्यालाच प्रकाश आणि अंधार हे दोन्ही अनुभव का येतात?

म्हणजेच श्रीभगवंताचा ’प्रेम-प्रकाश’ हा जरी 'अखंड-निरपेक्ष-सम’ असला तरीही, आपल्याला येणार्‍या अंधाररूपी 'वैषयिक’ प्रेमाचा अनुभव ही येतो आणि हा अनूभवही त्याच ’प्रकाशरुपी निरपेक्ष’ प्रेमाच्या सत्तेनेच येतो.

आता समजा आपण अंधारात आहोत आणि आपल्याला 'सुर्य’ पहायचा आहे. तो काही केल्या दिसेल का? नाही दिसणार! कितीही मेणबत्या,प्रखर झोताचे दिवे चालू करूनही नाही दिसणार! ’सुर्याला’ पहायला त्याचाच ’स्वयंभू’ असणारा प्रकाश् पाहीजे. तसेच जर आपल्याला श्रीभगवंतांच्या 'निरपेक्ष’ प्रेमाचा आणि श्रीभगवंतांचा अनुभव घ्यायचा असेल तर इतर् 'व्यवहारीक’ प्रेमाचा काडीचाही उपयोग होणार नाही.त्याकरिता अगोदर् आपल्याला त्या निरपेक्ष प्रेमाच्या 'योग्य’ बनाव लागेला आणि तेही त्याच प्रेमाच..म्हणजेच श्री स्वयंभू सदगुरुंच सहाय्य् घेऊन. तरच शक्य आहे अन्यथा कदापी नाही!

आता ही ’योग्यता’ कशी असते ते दुसर्‍या उदाहरणाने पाहू..

२]एखाद्यानदीमध्ये मासे रहातात्, तसेच बेडूकही रहातात आणि दगडही असतात. जर नदीतला मासा पाण्याबाहेर् काढला, तो पाण्याशिवाय तडफ़डून मरतो. ’पाणी’ हेच त्याचे ’जीवन’ असते. पण बेडूक हा पाण्यात आणि जमिनीवर् दोन्हीकडे आंनदात असतो.. आणि दगडाला काहीच फ़रक पडत नाही.

तसेच श्री परमेश्वराला भेटायला निघालेल्या ’साधकाची’ अवस्था-संवेग-तीव्रताही तीन प्रकारे विभागली जाते आणि त्यामूळे ’योग्यताही’!

१)तीव्र संवेग असणारा ’साधक’ हा ’माशासारखा’ असतो..तो परमेश्वराखेरीज-श्रीसदगुरूखेरीज राहूच शकत नाही.

२)मध्यम संवेगयुक्त साधक ’प्रपंच आणि परमार्थ’ यात बेडकाप्रमाणे भेद ठेवत नाही. परमार्थ न मिळाल्याने त्याला काही फ़रक पडत नाही..पण काही अंशी तो परमार्थावर् अवलंबून मात्र असतो.

३)मंदसंवेगयुक्त साधक रात्रंदिवस अखंड् सत्संगात राहिला, तरी त्याला परमार्थाची आवड हवी तशी निर्माणच होत नाही.

४)चौथा प्रकार म्हणजे ’खावो-पिओ-मौज’ करोवाला! त्यांना परमार्थाच काही देणघेणच नसत आणि त्यामूळे आपल काय अडतय असही त्यांना वाटत नाही!

म्हणजेच आपल्याच योग्यतेनुसार्-पात्रतेनुसार ..परमेश्वर हा वेगवेगळा भासणारच! आता ही 'योग्यता’ वाढवायची कशी? हा खरा दुसरा प्रश्न आहे!

तुम्ही फार सुंदर सांगत आहात.
मला हे वाचल्यावर असे वाटले की मी बहुतेक मध्यम संवेगयुक्त साधक आहे की काय Happy
आता दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर पण सांगा...

महेश, धन्यवाद! आपल्या भरतभूमीत झालेल्या सर्व संताना हा धन्यवाद जातो! अनुभवांनी समृध्द अशी 'ती' सर्व मंडळी 'सगुणाच' चालत बोलत रुपच आहेत!:)

मोक्षाची 'मूळ' संकल्पना समजावून घेणे जरूरी आहे. सदेह जीवनमुक्ती, विदेही मुक्ती तसेच भक्तिशास्त्रानुसार असणार्‍या सलोकता,समीपता,स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती ही समजावून घ्यायला हव्यात!

'मोक्ष' म्हणजेच मुक्ती हेच मनुष्याच्या दुर्लभ जिवनाच ध्येय आहे, असे म्हणताना हा देह 'दुर्लभ' का आहे हे ही समजावून घ्यायला हवे. तसेच शास्त्र, 'ज्ञानाशिवाय' मोक्ष नाही', असे ज्यावेळी ठणकावून सांगते त्यावेळी, 'ज्ञान' म्हणजे काय? कशाच ज्ञान? आणि ते कोठून मिळवायच, ते मिळाल्यावर काय होत?याचाही 'सारासार' विचार करायला पाहीजे.

जस 'प्रकाश' म्हंटल की प्रकाशाचा अभाव म्हणजेच 'अंधार' हे आपसूकच येते, तसच 'मुक्ती' म्हंटल की 'बंधन' आपसूकच येते. आता हे 'बंधन' कशाचे आहे आणि कोणाला आहे, कशामूळे आहे,ते दूर कस करायच हेही पहायला हवे.

या आपल्या ब्रह्मांडाचा एक नियम आहे. इथ जर 'कार्य' करायच असेल तर शरीर धारण करावेच लागते. आता शरीर पाहीजे म्हणजे 'प्रारब्ध' ही पाहीजे. कारण भोगायला बाकी कर्मफळ असल्याशिवाय नवीन शरीर धारण करण्याचा प्रश्नच येत नाही. हा नियम स्वतः श्रीभगवंतांचा असल्यामूळे 'अपवादाची' शक्यताच नाही. म्हणूनच सर्व संत-सद्गुरु ही या नियमाला अपवाद नाहीत.महासिध्द आणि वरच्या कोटीतले जे महात्मे असतात, त्यांना या 'कर्मफळात' ढवळाढवळ करता येते, पण तरीही हा 'नियम' कधीही मोडला जात नाही. आणि म्हणजेच त्या शरीरुपी प्रारब्धाला टाळले जात नाही.

आता 'विचार' करायला लावणारी गोष्ट म्हणजे.. स्वत: नित्यमुक्त असताना आणि तरिही 'अज्ञान' दूर करायचे 'कार्य' करायचे असताना, म्हणजेच त्याकरीता एका शरीराची गरज असताना, ते शरीर धारण करण्याकरिता लागणारे 'प्रारब्ध' ही संतमंडळी कोठून आणतात?:)

धन्यवाद!

कुणीतरी प्रार्थना केली आणि देव प्रसन्न झाला", "कुणीतरी काहीतरी केलं नाही आणि देव कोपला >> नानबा ह्या सगळ्या कहाण्या असतात. एवढ्याशा तिळावर साखरेची पुटे चढवून त्याचा हलवा केलेला असतो. त्यातला नेमका तिळ वेगळा वेचून काढायला लागतो. सगळ्यात आधी मी आणि तो परमेश्वर अशा दोन वेगवेगळ्या entities आहेत का? वेद तरी तसे सांगत नाहीत. ते तर म्हणतात - तत् त्वं असि!

हे कळल्यवर मुक्तीची व्याख्या पण करता येते - "मी मला जाणणे". पण नुसते असे म्हणून आपली वाटचाल होत नाही कारण मायेच्या आवरणात वाटचालीकरता 'सुरुवात' आणि 'शेवट' गरजेचे असते. म्हणून मग मी आणि परमेश्वर असे द्वैत केले. म्हणजे माझे साध्य 'काहीतरी' आहे जे माझ्याहून वेगळे आहे या विचाराने मी काहीतरी करायला लागतो आणि खेळ मांडला जातो. Happy

मायेचे आवरण इतके जाड असते की मला 'मी' म्हणजे कोण हेच कळत नाही मग 'तो म्हणजेच मी' हे जाणणे तर दूरच राहिले. बर्‍याचदा मला वाटते की मी म्हणजे हे माझे शरीर. पण ते तरी मला कुठे जाणता येते? मी फक्त त्याचा बाह्यभाग पाहू शकतो. पण आत? हे शरीर अनेक पेशींनी बनले आहे आणि प्रत्येक पेशीला स्वतंत्र अस्तित्व आहे मग 'मी' म्हणजे नक्की कोणती पेशी?

मुक्ती म्हणजे मला माझ्या सत, चित आणि आनंद या तत्वांची ओळख होणे. त्याच्या विरोधी तत्वांनी माया बनलेली असते आणि आपल्याला शिकवत असते बघ हे जे सगळे तुला जाणवते आहे ते खोटे आहे, सिमीत आहे, क्लेशकारक आहे. हे सगळे समजून घे माझ्याकडून मगच तुला कळेल अ-खोटे (सत), अ-सिमीत (चित), अ-क्लेशकारक (आनंद) म्हणजे काय ते. मगच तुला कळेल की तू कॉण आहेस ते. हे शिकवणारी ती महामाया जगदंबा!

सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा!

माधव, सावट खुप छान विचार!
पण काहि प्रश्न पडले आहेत.. आपण नेहमी ऐकतो की मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे आणि 'मोक्ष' म्हणजेच मुक्ती हेच मनुष्याच्या दुर्लभ जिवनाच ध्येय आहे. ८४ लक्ष योनींनंतर मनुष्य जन्म मिळतो, मनुष्य जन्म श्रेष्ठ कारण 'कर्म' स्वातंत्र्य मिळते.

प्राणी, पक्षी यांना ही परमेश्वराने राग, लोभ, दु:ख, आनंद ह्या भावना दिल्या आहेत, चांगले-वाईट कळण्याची बुध्दी दिली आहे, स्पर्श, संवेदना दिल्या आहेत, संवाद साधण्याची कला दिली आहे ( ती भाषा आपल्याला कळत नाहि हा भाग वेगळा ), एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ( मनुष्याने बंधनात ठेवले असेल तर ईलाज नाही ). मग कर्म दिले असेलच ना? जर कर्म आहे तर मोक्षाच्या दिशेने प्रवास ही आला. नामस्मरण, भक्ती नसतील ते करत पण देवळात आरती सुरु झाली आणि समोरच्या पांगार्‍याच्या झाडावर ओळीत शांत बसलेले पक्षी पाहिले की वाटुन जाते की त्यांचा ही मनाने सहभाग आहे त्यात.

आमच्या घरासमोरच्या मैदानात बरेचदा काही लोक चिमण्यांना दाणे खाऊ घालायचे, काही चिमण्या स्वत:चे पोट भरले की झाडावर जाऊन बसायच्या तर काही भरपुर दाणे खाऊन ही दुसर्‍याला खाऊ द्यायच्या नाहित, टोची मारुन ते खाणे हिसकावुन घ्यायच्या. इथे ही सद् आणि अपप्रवृत्ती दिसतेच ना? मग त्यातुन कर्माची निर्मिती होत नाहि का? की ते गणले जात नाहि कारण मनुष्य योनी नाहिये?

महेश धन्यवाद!

>>>निरपेक्ष प्रेम करणारे लोक नसतात असे नाही. तसेच विशुद्ध प्रेम ही भक्तीची पहिली पायरी आहे असे काही संतांनी सांगितले आहे. साधना / उपासना करताना सुद्धा अनेक पायर्‍या असतात. त्यामुळे त्या न मोजणे पटले नाही.

या तुमच्याच मतावर, आता तुमचच 'मत' जाणून घ्यायला आवडेल.:)

तसेच,
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महिम |
तस्मात उत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः |

हे तुम्हाला का आवडत, हेही जाणून घ्यायला आवडेल.:)

हसरी,
तुम्हाला हवी असणारी 'उपासना' तुम्हाला कशाकरिता करायची आहे, हे जर आता सांगितलत तर ती कशी करायची हेही आपल्याला जाणता येईल.:)

'आयुष्यातल्या अनेक प्रश्नांना ठराविक ट्प्यापलीकडे उत्तरे नसतात,' या तुमच्या 'आयुष्याबद्दलच्या दृष्टिकोणाच', कारण ही जाणून घ्यायची इच्छा आहे.

गौरी प्राणी योनी ही भोग योनी असते. मानव ही कर्म योनी असते.

प्रत्येक प्राण्याला स्वतःचा असा एक स्व-भाव असतो व तो त्याप्रमाणे वागतो. स्वसंरक्षणाची वगैरे जाणीव असतेच पण कुठलाही प्राणी आपण सत्कर्म करुया किंवा दुष्कर्म करुया या भावनेने काहीही करु शकत नाही. आणि म्हणूनच त्या जीवाचे प्रारब्ध भोगण्यापुरतेच जीवन असते. कर्म करुन (आपोआप होऊन नव्हे) प्रारब्ध निर्माण करणे आणि नष्ट करणे हे त्या योनीत शक्य नाही.

म्हणूनच नरजन्म हा सर्वश्रेष्ठ आहे. तिथेच आर या पार होता येते.

जा'मोहन'प्या, नमस्कार!

>>>त्यामुळे उपासनेची दृष्टी बदलणं, हे जास्त महत्वाचे आहे. देवता, नाव, गुरु, पुस्तक, किती वेळ ... याला फारसे अर्थ नाहीत. हे फक्त वेगळेवेगळे ऑप्शन्स आहेत..

आणि
१. आपण जन्म आणि मृत्यु यांच्यामध्ये असणारे एक छोटेसे जीवन जगतो असतो, याची जाणीव..
२. आपल्या हातात काहीही नसते, कुछ तय नही है, सिर्फ यही तय है, याची जाणीव.
३. माणसाचे जीवन अशाश्वत आहे, याची जाणीव असणे...

हे जे आपण लिहलत त्याची 'संगती'(दोन आपल्याच मतातील एकमेकास असणारा पूरकपणा) कशी लावायची? हे जाणुन घ्यायला आवडेल.:)

तुम्ही कधी मिरजेला, 'श्रीसंत वेणाबाईंच्या मठात' गेला आहात काय?

ते शरीर धारण करण्याकरिता लागणारे 'प्रारब्ध' ही संतमंडळी कोठून आणतात? >> सावट ऊत्तर कधी देणार या प्रश्णाचे?

ते शरीर धारण करण्याकरिता लागणारे 'प्रारब्ध' ही संतमंडळी कोठून आणतात? >> यावरुन एक आठवलं ! श्रीरामांनी वालीचा वध आडून बाण मारुन केला व युक्तीवाद केला होता की वाली हा शाखामृग आहे, अर्थात प्रारब्ध निर्माण झालंच. पण पुढच्याच अवतारात कृष्णाने आपले अवतारकार्य व्याधाने आडून मारलेल्या बाणाने संपवलं. तेव्हाही श्रीकृष्णाचे पाऊल हे व्याधाला मृग वाटले होते. तो व्याध म्हणजे पुर्वजन्मीचा वाली.

अर्थात वरील गोष्टीचा त्या प्रश्नाशी संबंध असू शकतो का ते सावट सांगतीलच Happy

माधवा!
नमस्कार! बर्‍याच दिवसांनी दर्शन दिले.:) बरे वाटले. सध्या काय वाचन चालले आहे?

'महामायेच' चालत बोलत रूप जे याच बीबी वर दिसते आहे त्याविषयी आपण काहीच कसे नाही लिहले?

>>>

(श्री)वेद तरी तसे सांगत नाहीत. ते तर म्हणतात - तत् त्वं असि!

आणि

हे कळल्यवर मुक्तीची व्याख्या पण करता येते - "मी मला जाणणे".

या वरच्या दोन्ही 'जाणण्यात' काही 'फरक' आहे का?

सावट, आपण जे प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरे कदाचित येथे देता येणार नाहीत.
म्हणुनच विचारत होतो की कोठे भेटू शकाल ? Happy

'महामायेच' चालत बोलत रूप जे याच बीबी वर दिसते >> सावट अहो तीच प्रश्ण घालते आणि उत्तरही तीच देते. आपण फक्त हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन शक्य तेवढे ग्रहण करायचे.

या वरच्या दोन्ही 'जाणण्यात' काही 'फरक' आहे का? >> हो पहिली सुरुवात आणि दुसरे गंतव्य! वेद ज्ञानदाते आहेत. या मायेत मिळवता येणारे सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे वेद. त्याच्या कणभर पुढे तर मुक्ती आहे. Happy

अश्विनी,
शतशः धन्यवाद!
संतचरित्रात संताच्या संगतीने, आशिर्वादाने प्राणीमात्रांना ही मुक्ती मिळाल्याचे, त्यांचा उद्धार झाल्याचे वाचले आहे, म्हणुन हा प्रश्न विचारावासा वाटला.

माधव,
जर तो आणि मी वेगळे नाहि तर आपण केलेली प्रार्थना त्याच्यापर्यंत कशी पोचते? प्रार्थनेत ताकद आहे आणि ती जर श्रद्धाभावाने केली असेल तर फळतेही हे अनुभवले आहे. तो जर महाकाय सागर आहे तर मी त्या सागरातल्या पाण्याचा एक थेंब, मग मी नक्की प्रार्थना कोणाला करते आणि ती त्याच्यापर्यंत पोचते कशी?

आपण जाणकार आहात आणि आपले विचार वाचुन ज्ञानात खुप भर पडतेय, पण खुप ( वेडेवाकडे ,
जसे मनात येतील तसे ) प्रश्न विचारुन दिलेल्या तसदीबद्द्ल माफ करा.

तुम्ही कधी मिरजेला, 'श्रीसंत वेणाबाईंच्या मठात' गेला आहात काय?

नाही..

मला जे प्रश्न विचारला आहे, त्याला पूरक म्हणून मी माझा आवडता मुद्दा, जो योगायोगाने इथेच उपलब्ध आहे... तो उचलतो.... Happy

प्रत्येक प्राण्याला स्वतःचा असा एक स्व-भाव असतो व तो त्याप्रमाणे वागतो. स्वसंरक्षणाची वगैरे जाणीव असतेच पण कुठलाही प्राणी आपण सत्कर्म करुया किंवा दुष्कर्म करुया या भावनेने काहीही करु शकत नाही.

त्यामुळेच मनुष्यजन्म हा श्रेष्ठ आहे, हा मला शुद्ध भोंदूपणा वाटत्तो... प्राणी हे क्रूर असतात, हे वाक्य मला खोटे वाटते... आणि ते तसेच आहे. भूक भागली की कोणताच प्राणी शिकार करत नाही... मनुष्याची शिकार मात्र सुरुच असते.. त्याला मर्यादा नसते आणि त्यासाठी सगळे षड्रिपु झाडून प्रत्येकजण हवेतसे वापरत असतोच... प्राणी असे करत नाहीत..... निसर्गनियमानुसार जितके घ्यायला हवे तितकेच ते घेतात..

आता, याला लोक ऑब्जेक्शन घेतील, की प्राण्याना पाप म्हणजे काय हे माहीतच नसते, त्याना ते करण्याची बुद्ध्ही नसते.. मान्य !!! पण म्हणून ते माणसापेक्षा जास्त निष्पाप असतात, हे सत्य तर लपत नाही...

प्राण्यांची ही अवस्था नवजात बालकात असते.... नंतर त्यावर 'मनुष्य'जातीचे संस्कार घडत जातात. आणि सगळा सत्यानाश होतो.... .. मुले निष्पाप असतात, यालाही लोक ऑब्जेक्शन घेतील.... म्हणतील, त्याना पाप म्हणजे काय माहीतच नसते.... मान्य!!!!! पण ती स्वच्छ असतात, हे सत्य तर तसेच रहाते !!

म्हणुनच मानवांपेक्षा इतर जन्म/योनी हे मला नेहमीच अध्यात्मिक पातळीवर वरच्या स्तरावरचे वाटतात.. ( माझ्या या विचाराला सगळेच माझे मित्र विरोध करतात... पण मला माझे मत नेहमी खरेच वाटते.. Proud ) मनुष्य ही या उच्च पातळीवरुन ढळलेली अवस्था आहे... आणि ही ढळलेली अवस्था असते, म्हणूनच तर धर्म, देव, उपासना यांची गरज आपल्याला असते... त्याना नसते!!! :) ... आता, हे सगळे उपचार करण्यासाठी आपल्याला इंद्रिये, मन ई आहे, हे निसर्गाने आप्ल्यावर केलेले उपकार आहेत. पण म्हणून आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरत नाही.....

एका खेड्यात एक हट्टाकट्टा शेतकरी असतो.. तो निरोगी असतो..

त्याचवेळी एक शेठजी आय सी यू त असतो.. त्याच्याकडे डॉक्टरांची टीम, औषधे, नर्सा, उप्करणे, तपासण्या आणि पैसे सगळे असते..... आता तो शेठही जर म्हणायला लागला की माझ्याकडे हे सगळे आहे, म्हणून मी त्याच्यापेक्षा जास्त निरोगी आहे... तर ते हास्यास्पद होईल की नाही???? Proud .. एवढ्या सगळ्या गोष्टी वापरुन शेठजीला ज्या अवस्थेला पोहोचायचे आहे, तिथे तो शेतकरी आधीच पोहोचलेला आहे!!!! त्यामुळे इन्द्रियांची जीवशास्त्रीय प्रगल्भता हे अध्यात्मिकदृष्ट्या निरोगी असल्याचा पुरावा ठरू शकत नाही.... मनुष्य आणि इतर यात मला हाच फरक वाटतो.... अपने पास सबकुछ है... पर उनके पास मां है !!! Proud

मला अध्यात्मिक मार्गाला लावलं ते इन्शुरन्स या विषयानं ! Human life is full of uncertain events called risks..... The outcomes are always unpredictable..... ही इन्शुरन्स या विषयाची सुरुवात आहे.... कारण रिस्क आहे, म्हणजे ती मॅनेज करायला लागणार.... रिस्क/लॉस चार प्रकारे मॅनेज होते... अ‍ॅवाईड करा, प्रिवेन्ट करा, रिस्क ट्रान्स्फर करा किंवा स्वतःच रिटेन करा... यातला तिसरा प्रकार म्हणजे इन्शुरन्स ....

मला ते वरचे इंग्लिश वाक्य आणि 'जग हे दु:खाने भरलेले आहे... .' 'जरामरण यातून सुटला कोण प्राणिजात?' या वाक्यांमध्ये कमालीचे साम्य वाटते.... इन्शुरन्स आणि अध्यात्म हे एकाच वाक्यापासून सुरु होतात, हे मला या पहिल्याच वाक्याने प्रथम जाणवले..... ( गंमत म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस करताना रोजच म्हातारा-आजारी मनुष्य-मृत्यु हे बुद्धाचे त्रिकूट बघुनही कधी ही जाणीव झाली नव्हती ... Happy ... अर्थात नुसते एवढे बघून ही जाणीव होणे इतके सोपे असते, तर सगळी मेडिकल कॉलेजेस आज बुद्ध् तयार करणार्‍या फॅक्टरीज झाल्या असत्या !! Proud ) आज मात्र रोज क्लेम बघताना १८ वर्षाच्या नवीनच पॉलिसी काढलेल्या मुलाचा अपघात, ते ६० वर्षाच्या ठणठणीत कधीही क्लेम न केलेल्या बाईला अचानक कॅन्सर होणे.... २ वर्षाच्या मुलाला झटके/आकडी येणे आणि डेंग्युने कुठला तरी मनुष्य अ‍ॅडमिट होणे... हे सगळे 'दिसते' ..... रिस्क ही नेहमी अनप्रेडिक्टेबल असते....

आता, प्राण्याना रिस्क नसते का? असते !!!! पण त्यांची रिस्क आणि आपली रिस्क यात खूप फरक आहे....... आणि गंमत म्हणजे हा फरक इन्शुरन्सच्या भाषेत आणि अध्यात्मिक भाषेत दोन्हींमध्ये सांगड घालून सुंदर समजतो... ते परत कधीतरी लिहिन....

त्यामुळेच मनुष्यजन्म हा श्रेष्ठ आहे, हा मला शुद्ध भोंदूपणा वाटत्तो
>> युजी कृष्णमूर्ती वाचा (वाचले नसल्यास) - तेही असच काहिसं सांगतात (पण कदाचित वेगळ्या अर्थानं)

पण ह्या पोस्ट्मधले तुमचे बाकीचे मुद्दे नाही पटले जामोप्या.
वाईट वागायची कपॅसिटी असून चांगलं वागणं वेगळं आणि वाईट वागायची कपॅसिटीच नाही म्हणून चांगलं वागणं वेगळं, असं मला वाटतं.

गंमत म्हणजे हा फरक इन्शुरन्सच्या भाषेत आणि अध्यात्मिक भाषेत दोन्हींमध्ये सांगड घालून सुंदर समजतो
>> नक्की लिहा.. आम्ही वाचतोय..

माधव, कधी अनुग्रह देणार मला?

जामोप्या, म्हणूनच तर प्राण्यांना आपण वाईट किंवा चांगलं (उदा. लबाड कोल्हा, चोरटं मांजर, प्रामाणिक कुत्रा) हे आपल्या दृष्टीकोनातून म्हटले तरी जे काही असतं ते त्यांचा नैसर्गिक स्वभाव असतो.

पण माणसाचे तसे नाही. माणसाला पुर्ण कर्मस्वातंत्र्य असल्याने तो फक्त प्रेय निवडून अत्यंत क्रुर बनू शकतो तसेच श्रेय निवडून नरजन्माचे सार्थकही करु शकतो. त्याला फुल्ल चॉईस असतो व जो हे स्वतःच्या आवडी निवडीपेक्षाही काय उचित आणि काय अनुचित हे जाणू शकतो आणि अंगी बाणवू शकतो त्याच्या नरजन्माला काही अर्थ प्राप्त होतो. नाहीतर एवढी मोठी संधी मिळूनही गैर वागून संधीची माती करु शकतो. एखादा हर्षद मेहता / तेलगी असत्याचा मार्ग धरुन लोकांचे पैसे लुबाडून श्रीमंत बनतात तर एखाद्या सिंधुताई सकपाळ रंजल्यागांजल्यांसाठी वेळ पडली तर हात पसरतात, एखादे आमटे कुटुंब डॉकटरकीचे करियर हे नोटा छापायचे यंत्र म्हणून न वापरता जंगलातील खितपत पडलेल्या आदिवासींच्या सेवेत (जी पर्यायाने भगवंताचीच सेवा आहे) घालवतात. हे चॉईस प्राण्या पक्षांना नाहीत.

Pages