कुम्भालगढ आणि राणकपुर

Submitted by आशुतोष०७११ on 31 October, 2009 - 04:20

कुम्भालगढ -
कुम्भालगढ हा राजस्थानच्या मेवाड प्रांतातील एक अतिशय महत्वाचा किल्ला. हा कुम्भालमेर या नावानेही ओळखला जातो. राणा कुंभाने हा किल्ला १५व्या शतकात उभारला. महाराणा प्रतापचा जन्म देखील ह्याच किल्ल्यावर झाला. १९व्या शतकापर्यंत हा किल्ला उदयपुरच्या राजघराण्याच्या ताब्यात होता. २००० साली तो जनतेसाठी खुला करण्यात आला. दररोज सुर्यास्ताच्या वेळेस काही तासांसाठी हा किल्ला प्रकाशमान केला जातो. उदयपुरपासुन ८२ कि.मी.वर असणार्‍या ह्या किल्ल्याला पोचण्यासाठी सुमारे २ १/२ तासांचा वेळ लागतो. चितोडगडनंतर मेवाडातील हा एक महत्वपुर्ण किल्ला आहे.

IMG_0276_skw.JPGIMG_0279_skw.JPG

कुम्भालगढ समुद्रसपाटीपासुन १९०० मी. उंचीवर आहे. गडाची तटबंदी ३६ कि.मी. लांबीची आहे. असं म्हणतात की ह्यापेक्षा मोठी तटबंदी म्हणजे चीनची ग्रेट वॉल! मुख्य प्रवेशद्वारापासुन प्रासादापर्यंत ७ दरवाजे आहेत. किल्ल्यात एकूण लहान्मोठी मिळून ३६० देवळे आहेत. त्यापैकी ३०० जैनधर्मीय आणि उर्वरित हिंदुधर्मीय देवळे आहेत.

IMG_0281_skw.JPGIMG_0282_skw.JPG

ह्या किल्ल्याच्या तटबंदीबाबत दंतकथा अशी की राणा कुंभाने गडाला तटबंदी बांधण्याचे खुप प्रयत्न केले पण सगळे अयशस्वी ठरले.शेवटी त्याने एका स्थानिक साधुची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली. साधुने त्याला सल्ला दिला की यासाठी स्वतः साधुचाच बळी देण्यात यावा. साधुचे शिर जिथे पडेल त्या जागी देऊळ आणि धड जिथे पडेल त्या जागी तटबंदी उभारण्यात यावी. त्याप्रमाणे कुम्भालगढाची तटबंदी उभारण्यात आली.

IMG_0284_skw.JPGIMG_0285_skw.JPG

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार राणा कुंभ दररोज जवळपास ५० किलो तुप आणि १०० किलो कापुस जाळुन अरवली पर्वतरांगेतल्या शेतात रात्री राबणार्‍या शेतकर्‍यांसाठी प्रकाशाची सोय करत असे.

IMG_0286_skw.JPG

ईतिहास -
आज ज्या जागेवर कुम्भालगढ उभा आहे ती जागा पुर्वी जैनधर्मीय राजा संप्राती आणि त्याच्या घराण्याकडे होती. हे घराणे २ र्‍या शतकातील मौर्य सम्राटांचे वंशज होत.
कुम्भालगढाची रचना ही स्वतः राणा कुंभाची होती. हा गडदेखील त्याने स्वतःच्या देखरेखीखाली उभारला. राणा कुंभाचे साम्राज्य राजस्थानातल्या रणथंबोरपासुन ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरपर्यंत पसरलेले होते. त्याच्या अधिपत्याखाली एकूण ८४ किल्ले होते. त्यापैकी ३२ किल्ल्यांची संरचना ही स्वतः राणा कुंभाची होती. ह्या सगळ्या किल्ल्यांपैकी कुम्भालगढ सर्वात भव्य आणि विशाल!

IMG_0287_skw.JPGIMG_0289_skw.JPG

कुम्भालगढ हा मेवाड आणि मारवाड यांच्या सीमेवरील किल्ला. दुर्गम स्थानामुळे बरेचदा याचा ऊपयोग परकीय आक्रमणापासुन बचावासाठीच होई. १५३५ साली चितोडगड परकीयांच्या ताब्यात गेल्यावर मेवाड घराण्याचा वंशज बाल्यावस्थेतील राजकुमार उदयला ह्याच किल्ल्यावर सुरक्षित ठेवले होते.ह्याच राजकुमार उदयने पुढे उदयपुर शहर वसवले. शहेनशहा अकबर,आमेरचा राजा मानसिंग आणि मारवाडचा राजा उदयसिंग ह्यांच्या एकत्रित फौजांनी कुम्भालगढावर कबजा करेपर्यंत हा गड अजिंक्यच होता.

राणकपुर -
राणकपुरचे जैन मंदिर प्रसिद्ध आहे. ह्या जैन मंदिरासाठी सौम्य पिवळसर झाक असलेला संगमरवर वापरण्यात आला आहे. हे देऊळ एकूण १४४४ संगमरवरी खांबांवर उभे आहे. प्रत्येक खांबावर अतिशय सुंदर कोरीवकाम आहे. वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही दोन खांबांवरील कोरीवकाम सारखे नाही. असं म्हणतात की मंदिरातील खांब मोजणं अशक्य आहे.प्रत्येक खांबावर कोरलेल्या मुर्त्या एकमेकां सन्मुख आहेत.

IMG_0292_skw.JPGIMG_0293_skw.JPGIMG_0291_skw.JPGIMG_0295_skw.JPG

ह्या मंदिराची रचना चौमुखी आहे. ह्यामागील कारण असं की चार ही दिशा आणि पर्यायाने संपूर्ण विश्वव्यापी असे महावीर आहेत.

IMG_0296_skw.JPGIMG_0297_skw.JPG

ईतिहास -
ह्या मंदिराच्या निर्मितीबद्दलही खुप प्रवाद आहेत. १४ व्या किंवा १५ व्या शतकात याची उभारणी झाली असावी. राणा कुंभाच्या राजाश्रयाने ह्या मंदिराची उभारणी धन्ना शाह नामक सरदाराने केली.

IMG_0299_skw.JPGIMG_0301_skw.JPG

ही दोन्ही स्थळे कोणत्याच सहलीत समाविष्ट नसतात. पण ज्यांना काहीतरी हट के पाहण्याची आवड आहे,त्या उत्साहीजनांसाठी ही स्थळे मस्ट.

गुलमोहर: 

मस्तच. आत्ताच राजस्थानला जाउन आले. वेळेअभावी कुम्भालगढ ला जायचे राहीले पण राणकपुरचे जैन मंदिर पाहीले. अप्रतीम आहे. बघताक्षणी आ वासला जातो. आणि रखरखीत वाळवंटामधून आल्यावर हे संगमरवरी मंदीर पाहील्यावर तर डोळ्यांना खूपच शांत वाटते Happy . खरच राजस्थान ट्रिप मध्ये न चुकवण्या सारखी जागा आहे.

मस्त माहिती तोषा आणी फोटोस पण ,
राजस्थान हिंडुन आलो पण तु म्हणतोस तशी ही ठिकाण बघीतलेली नाहीत, मस्त माहिती लिहीलीयस पुन्हा जायची इच्छा होतेय फोटो बघुन Happy

वा मस्त माहिती आहे.

अमोल
------------------------------------------------------------------------------------मला इथे भेट द्या

स्वाती,साधना,केदार,स्मिता,श्रीराम,अमोल,अश्विनीमामी,मोहिनी,संपदा,चेतन्,रुनी आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. Happy

छान.