प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676
मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम आणि पर्णा पेठे या दिग्गज कलाकारांच चार चौघी नाटक इथे आलं होतं.
चार चौघी गोष्ट आहे चार बायकांची. त्यांच्या समाज मान्य किंवा समाजा पेक्षा वेगळ्या निर्णयाची गोष्ट. एक आई आणि तिच्या विवाह बाह्य झालेल्या तीन मुली - ज्यांना तिने स्वतःच्या बळावर मोठं केलं आहे, दोन लग्नं झालेल्या आणि एक कॉलेज मध्ये शिकणारी. चौघींनी घेतलेले आणि घेतले म्हणून निभावत राहिलेले निर्णय..
स्वरदा, माझी मावस बहीण, माझी जाऊ आभा, आमची नणंद स्वाती आणि मी मिळून बघायला जायचं ठरलं होतं.
तसं दूरचं असलेलं आमचं नातं, सारखी वयं आणि सारख्या अनुभवांमधून जवळचं झालं आहे. ऐन वेळी स्वरदाला यायला जमलं नाही, "पार्थला कणकण आहे. आणि मिहीरचं Saturday क्रिकेट..."
नाटका नंतर आमची झकास चर्चा रंगली.
आभा म्हणे, "अगदी टोचलं गं जीवाला.. खरंच आपण आपले decision घ्यायला आणि own करायला हवे. नुसतं नवरा म्हणतो, सासू म्हणते म्हणून decision घ्यायचा नाही - आणि घेतला की no repentance!"
स्वाती म्हणाली, "अगं दरवेळी no repentance असं कसं म्हणतेस तू? what's owning a decision? आपण घेतलेले decision आपल्याला revisit आणि प्रसंगी revert करता यायला हवे - that is owning a decision! हे नाटकात दाखवलं तसं घेतला एकदा डिसिजन म्हणूनच त्याला चिकटून राहिलोय हेही काही खरं नाही.."
मी त्या दोघींच्या म्हणण्याचा विचार करतेय तोवर स्वाती कडून पुढचा punch आला - "हा हा हा - आपली स्वरदाच आहे बा - decision maker with no repentance? पार्थ च नाव 'पार्थ स्वरदा बर्वे' न ठेवायचा तिचा decision was just ok, you pick your battles! पण हा डोळस decision आहे, default नाही असंच कुणाला वाटणार नाही, हीच त्यातली खरी गंमत आहे! आणि ती जो पर्यन्त खरच तसं करत नाही, तोपर्यंत आपला मिहीर देशपांडे एकदम supportive!"
खरच हा समजूतदारपणाच दुबळेपणा तर होत नाही ना कधीतरी! मला वाटलं, "आपण आपले decision घ्यायला आणि own करायला हवे - मान्य! Also definitely pick your battles - प्रत्येक गोष्ट for sake of it करायची गरज नाही हे पण खरं आहे. पण मुद्दा हा आहे की, दर वेळी समजूतदारपणा दाखवला तर तो एक decision, जो मला चार चौघां पेक्षा वेगळा घ्यायचा असेल, तो जमतो का? जमेल का? आपल्याला? किमान पुढच्या पिढीला?" उत्तर तर नसतंच अशा प्रश्नांना..
तेवढ्यात स्वरदाचा फोन आला, "मी मिस केलं ना गं? कधीचं बघायचं होतं हे नाटक आपल्याला.."
मी म्हणाले "स्वरा, अगं काय हे, कधीतरी मिहीरला थांबू द्यायचं की घरी! केलं एखाद्या शनिवारी क्रिकेट मिस, तर काही जात नाही! त्याच्या लक्षात नाही आलं, तर तू सांग, अशा वेळेला लक्षात न येणं ही गोष्ट सोयीस्करच आहे ग.. पण तुझा ही कधीतरी टिपेचा स्वर लागू दे की!"
मग जाता जाता तिच्याकडे चहा घेऊन जायचं ठरलं. आता पार्थ बरा होता. तो आणि मिहीर झोपले होते. मिहीरच्या आई सांगायला लागल्या, "अगं तो कधी म्हणून क्रिकेट मिस करायचा नाही शनिवारचा! इतका नियमित.." मी न राहवून म्हटलंच, "हो ना मला स्वरदाचं खूपच कौतुक वाटतं, आठवडाभर घर आणि ऑफिस करून ती पण दमलेली असते. पण दर शनिवारी घरातलं, मुलांचं, सगळं बघते, मिहीर खेळायला जातो तेव्हा! म्हणून तर जमतंय त्याला नियमितपणे जायला... पण कधीतरी स्वरदाने स्वतःसाठी ठरवलेला एखादा प्लान असेल, तर मिहीरने एखाद्या शनिवारी घरचं करायला हरकत नाही, नाही का!"
काकू बघतच बसल्या एक क्षणभर माझ्याकडे, मग म्हणाल्या,"हो बाई, बहीण आहे तुझी! हुशारच आहेत मिहीर स्वरदा दोघेही.."
बाहेर पडल्याबरोबर स्वाती म्हणाली, "अगं काय हे मनू! तुझं तोंड म्हणजे तरी... असो, एकदम सिक्सरच मारलीस!!"
मला मनोमन वाटत राहिलं, खरंच एवढं चुकीचं होतं का स्वरदाची बाजू घेऊन बोलणं? तिला स्वतःच स्वतःला बोलता यायला हवं हे खरं आहेच, पण जेव्हा तिला नसेल जमत, तेव्हा तिच्या मागे कोणी उभं राहायला नको का? आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी असं कोणीतरी लागतंच.
त्यानंतरचा आठवडा दिवाळीसाठी तयारीत चांगलाच धावपळीत गेला. दिवाळीच्या निमित्ताने इकडे आसपास असलेल्या सर्व भावंडांना फराळाला बोलवलं होतं.
आठवडाभर रोज संध्याकाळी फराळाचा कार्यक्रम चालू होता. दर वर्षी प्रमाणे स्वरदा करंज्या करायला आली होती. स्वाती, मी आणि प्रमोदने मिळून चकल्या केल्या. Costco मधून लाडू आणले. इंडियन स्टोअर मधून शंकरपाळे आणले. आकाशकंदील लागला. दिव्याची माळ सजली..
दिवाळीचा दिवस आला. अद्वय आणि अस्मिने दारा समोर रांगोळी काढली, दारावर नवीन तोरण बांधलं. घरात मसाले भात आणि उदबत्तीचा मिश्र सुवास दरवळायला लागला.. आभाचे सकाळ पासून दोनदा फोन येऊन गेले - ती सगळ्यांसाठी कलिंगड कापून घेऊन येणार होतीच, पण तरीही "आणखी काही आणू का? काही last minute काम आहे का.." तिने विचारून घेतलं.. खरच या मुली माझी support system आहेत!!
एक एक करून सगळे यायला लागले. मुलांनी आल्या आल्या जेंगा चा खेळ मांडला, फराळ आणि चहा बरोबर पत्ते झाले.
दर वर्षी प्रमाणे स्वरदा आणि जाईच्या गाण्याने दिवाळी सूरमयी झाली.. खाऊ, खेळ, गाणी आणि गप्पांमध्ये दिवस अगदी छान गेला.
सगळे परत गेल्यावर घरात आणि मनातही एक गोड सुग्रास सुवास भरून राहिला होता. आता WhatsApp वर सगळ्यांचे मेसेज यायला लागले - "मस्त मज्जा आली आज प्रमोद आणि मनू!" "दर वर्षी प्रमाणे छान झाली दिवाळी.." "प्रमोद दरवर्षी इतक्या लोकांना दिवाळीला कसा काय बोलावतो आणि सगळं नियोजन किती झकास जमवून आणतो!" एकेक मेसेज लाईक करता करता शेवटच्या मेसेज वर थबकले. म्हटलं तर आगाऊ आणि म्हटलं तर गमतीशीर असा , "मला का बरं अनुल्लेखाने मारलं? ;)" मेसेज टाईप केला, पण मग म्हटलं, जाऊच दे, कशाला आपल्या तोंडाची वाफ दवडा!
फोन बंद केला. घर भर पडलेला पसारा दिसायला लागला. "छे! कसला तळकट वास भरून राहिला आहे घरात.. " म्हणत उदबत्ती लावली, खिडक्या उघडल्या आणि पसारा आवरायला लागले. दिवसभराचा शीण आता जाणवत होता.
थोड्या वेळाने पणत्या लावायचं लक्षात रहाव म्हणून लावलेला अलार्म वाजला. फोन वर WhatsApp ची notifications आलेली होती. मी ज्या मेसेजला रिप्लाय करायचं टाळलं होतं, तिथे आभा आणि स्वातीचे रिप्लाय आले होते - आभा म्हणे "प्रमोद आणि मनुची टीम आहे, दोघं मिळून घालतात हा सगळा घाट दर वर्षी!" तर स्वातीचा सिक्सर - "दादा, अरे आता नंतर काय विचारतोस नियोजन कसं करतो म्हणून? पुढच्या वर्षी मनू वहिनीला दिवाळीच्या आधी विचार काय मदत करू म्हणून!
"
छोटी, क्षुल्लक गोष्टच होती. कुणी प्रमोद च कौतुक केलं म्हणजे माझं कौतुक नाही असा अर्थ घ्यायचं मला कारणही नव्हतं, पण तरीही आभा आणि स्वातीचा रिप्लाय बघून मला खरंच खूप बरं वाटलं - मी invisible नाही, मी कुणाला तरी "दिसते आहे" असं वाटलं..
त्या क्षणी माझ्या डोक्यातही दिवाळीचा लख्ख प्रकाश पडला - चार चौघी नाटक बघितल्यानंतर झालेल्या आमच्या चर्चेमध्ये सगळ्यात मोठा मिसिंग राहिलेला पार्ट म्हणजे त्या चौघींची सपोर्ट सिस्टीम! त्या आपापले निर्णय निभावून नेऊ शकत होत्या कारण त्या एकमेकींच्या पाठीशी होत्या!!
मग पणत्या लावता लावता, अंगण उजळून निघालं.
एक पणती लावली की अंधार संपतो, पण अंगण उजळून टाकण्यासाठी खूप पणत्या लागतात - एकमेकींना उजळवण्यासाठी!
माझ्याकडे या गोष्टी साठी
माझ्याकडे या गोष्टी साठी मुखपृष्ठ image तयार आहे. २MB पेक्षा लहान आहे, पण upload होत नाही आहे. Any tips?
छान !!
छान !!