भस्मबीज - भाग २१
पूर्वभाग
अभिजितच्या मनात नेहाला पडलेल्या स्वप्नाचे आणि देवप्पाने तिच्याशी गुप्तपणे केलेल्या संभाषणाचे गूढ अधिकच गडद होते. अभिजित मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असला तरी कल्लेश्वरची शक्ती थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याने त्याची चिंता वाढते. दरम्यान, यल्लाप्पाने पाठवलेले शास्त अनुयायी घराचे अभिमंत्रण करून कुटुंबासाठी तात्पुरते संरक्षणकवच निर्माण करतात. त्याला अडथळे वाढत असल्याचे जाणवताच कल्लेश्वर अधिक क्रूर शक्तीच्या शोधात हाकिनीचे आवाहन करतो आणि स्वतःचे रक्त व शक्ती अर्पण करून भूतडामरीचे नाव मिळवतो. गरुडाच्या माध्यमातून हा प्रसंग पाहिल्यावर देवप्पा हादरतो, कारण भूतडामरी ही साधी शक्ती नसून तिच्या आवाहनाचे परिणाम अत्यंत अनिश्चित आणि भयावह असू शकतात, याची त्याला आपल्या गुरूंची जुनी चेतावणी आठवते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २२ – क्रोध भैरव साधना
हाकिनीचं ते भयाण रूप बघितल्यानंतर, देवप्पा त्या रात्री झोपूच शकला नाही. भूतडामरीची शक्ती किती अमर्याद असू शकते, याचा विचार करता करताच त्याचं मन अस्वस्थ होत गेलं. छातीत धडधड वाढली, हातपाय थंड पडल्यासारखे झाले.
त्याने मोहिनी देवीला हात जोडून, कळवळून प्रार्थना केली आणि झोपायचा प्रयत्न केला. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात, त्याच्यासमोर एक शुभ्र, तेजस्वी आकृती उभी राहिली...मोहिनी, तिचं ते सौम्य तेज.
"आई," तो पुटपुटला, "मला मार्ग दाखव. आता एकट्याने हा भार मला पेलवत नाहीये."
"देवप्पा," ती तेजस्वी आकृती म्हणाली, "भूतडामरी ही साधीसुधी शक्ती नाही. ती पार्वती मातेच्या परिवारातली. आणि म्हणूनच, तिच्याविरुद्ध थेट काही करण्याची मर्यादा मलाही आहे."
देवप्पाने विचारलं, "मग आई, आम्ही काय करावं?"
आणि मग, त्या स्वप्नातच, देवप्पाच्या डोळ्यांसमोर एक प्रतिमा उमटली; आकाशात उंच उडणारा एक गरुड, आणि त्याच्या पंज्यांत, वळवळणारा एक काळाकुट्ट नाग.
ती प्रतिमा काही क्षण तशीच राहिली, स्पष्ट, तेजस्वी आणि मग हळूहळू मोहिनीच्या त्या शुभ्र आकृतीसोबतच विरून गेली.
देवप्पा दचकून जागा झाला, पहाटेचा फिकट प्रकाश खिडकीतून येत होता. त्याचं हृदय अजूनही धडधडत होतं.
त्याने डोळे मिटून ती प्रतिमा पुन्हा आठवायचा प्रयत्न केला; गरुड, नाग. पण तिचा नेमका अर्थ काय, हे त्याला लगेच उमगेना.
गरुड आणि नाग, हे शत्रुत्व तर मला माहितीये. पण मोहिनीने हेच का दाखवलं मला?
************************************************************************************************************************
गुढीपाडव्याच्या सकाळी, अभिजितच्या घरात एक उत्साही लगबग सुरू होती. स्वातीने पुरणपोळीचा बेत आखला होता, अनन्या आणि अथर्व गुढी सजवायला मदत करत होते, दारात रांगोळी काढलेली, आंब्याच्या पानांचं तोरण दारावर बांधलेलं.
"बाबा, जरा वर धरा हो," अथर्व त्या गुढीच्या काठीला आधार देत म्हणाला, "अगदी सरळ हवी."
अभिजितने हसत ती काठी नीट धरली, आणि गुढी उभी राहिली; सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारी.
नाश्ता आटपून, सगळे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच, अभिजितचा फोन वाजला.
"देवप्पा? इतक्या सकाळी?" त्याने उचलताच विचारलं.
पलीकडून देवप्पांचा आवाज आला, "अभिजित, ताबडतोब निघून ये. आजच्या आज."
"काय झालं?" अभिजितच्या आवाजात तात्काळ चिंता उतरली.
"सांगतो... सगळं सविस्तर सांगतो. पण फोनवर नाही. कल्लेश्वर काहीतरी असं सुरू करतोय, ज्याचे परिणाम खूप भयंकर असू शकतात. तुला सगळं प्रत्यक्ष समजावून सांगणं गरजेचं आहे. फोनवर एक शब्दही जास्त बोलणं सुरक्षित नाही. आपण लगेच भेटलं पाहिजे... वेळ आपल्या हातात फार कमी आहे."
फोन ठेवल्यावर अभिजित स्वातीजवळ गेला, तिला बाजूला घेत सगळं सांगितलं. तिच्या हातात अजूनही पुरणाची वाटी होती.
"स्वाती, मला आजच संध्याकाळी निघावं लागेल."
स्वातीचा चेहरा उतरला, पण गेल्या काही महिन्यांत तिला हे स्वीकारायची सवय झाली होती.
दुपारी, स्वाती स्वयंपाकघरात गोडाचं जेवण आवरत असताना, तिचा फोन वाजला...नेहाचा नंबर.
"स्वाती, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!" नेहाचा उत्साही आवाज आला. "काय चाललंय घरी? गुढी उभारली का?"
"हो, सकाळीच उभारली," स्वाती हसत म्हणाली. "तुलाही शुभेच्छा, नेहा. काय करतेयस आज?"
"काही खास नाही, घरीच आहे. सर कुठे आहेत? त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या होत्या."
स्वातीचा हसरा चेहरा किंचित उतरला. "नेहा, अभिजित आज संध्याकाळी यानाला निघतोय."
फोनवर एक क्षणभर शांतता पसरली. "इतक्या लवकर? म्हणजे... काहीतरी झालं का?"
"देवप्पांचा सकाळी फोन आला," स्वाती म्हणाली, आवाजात चिंता.
नेहा काही क्षण गप्प राहिली, मग म्हणाली, "स्वाती, मी पण येते संध्याकाळी सरांना निरोप द्यायला."
"ये ना, नक्की ये," स्वाती म्हणाली. "अभिजितलाही बरं वाटेल तुला बघून."
फोन ठेवल्यावर स्वातीने पुन्हा एकदा त्या गोडाच्या जेवणाकडे बघितलं; सणाचा दिवस, आनंदाचा दिवस, आणि तरीही आज पुन्हा एक निरोप, एक अनिश्चितता, त्या आनंदावर आपली सावली टाकत होती.
तिने दीर्घ श्वास घेतला, आणि स्वतःलाच समजावलं...आजचा दिवस तरी शक्य तितका चांगला करूया, उद्याची चिंता उद्या बघू.
दिवसभर घरात सणाचा उत्साह कायम राहिला; पूजा, गोडाचं जेवण, मुलांशी गप्पा पण अभिजितच्या मनात, त्या आनंदाच्या पडद्याआडही, एक चिंता सतत जाणवत राहिली. संध्याकाळी, बॅग भरून, त्याने पुन्हा एकदा सगळ्यांना मिठी मारली. नेहाही तोपर्यंत पोहोचली होती.
"सर, निघालात?" ती म्हणाली.
"हो, नेहा." अभिजितने तिच्याकडे बघितलं, मग आठवल्यासारखं म्हणाला, "आणि हो, जाण्याआधी एक-दोन गोष्टी सांगायच्या होत्या, ऑफिसबद्दल."
"बोला, सर."
"तो क्लायंट-प्रेझेंटेशनचा प्रोजेक्ट, जो मी अर्धवट सोडलाय त्याची फाईल शेअर्ड ड्राईव्हवर आहे. शर्माला सांगा, त्याने पुढे न्यावा, आणि माझ्या सूचना त्यात नोंदवलेल्या आहेतच." अभिजितने क्षणभर विचार केला. "आणि बॉसला मी आधीच सुट्टीची कल्पना दिली होती त्यांना सांगा घरगुती कारणास्तव मी १५ दिवस आधीच सुट्टी घेतलीय आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा संपर्कात राहीन."
नेहाने मान हलवली, "काळजी करू नका, सर. मी बघते हे सगळं."
"थँक्यू, नेहा. या सगळ्या गोंधळात तूम्ही किती सांभाळून घेताय."
"त्यात काय एवढं," नेहा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "तुम्ही निःशंक जा. जोपर्यंत स्वाती आणि मुलं मुंबईत आहेत, तोपर्यंत मी अधूनमधून येत राहीन, त्यांची खुशाली बघायला. तुम्ही त्याची काळजी करू नका."
"हे ऐकून खरंच बरं वाटलं, नेहा. स्वातीलाही आधार वाटेल." अभिजित म्हणाला.
स्वातीने जवळ येत नेहाचा हात धरला. "हो, नेहा, तू येत जा अधून मधून."
नेहाने मान हलवली, आणि सगळे खाली गेले. अभिजितची गाडी सोसायटीच्या गेटबाहेर पडेपर्यंत हात हलवत, त्या नव्या वर्षाच्या संध्याकाळी, एका नव्या, अनिश्चित प्रवासाला निरोप देत उभे राहिले.
गाडीत बसून, यानाच्या दिशेने निघताना, अभिजितच्या मनात एकच विचार घोळत राहिला. एक नवा, अनोळखी धोका, ज्याला तोंड द्यायला त्याला आता अधिक वेगाने तयार व्हावं लागणार होतं.
************************************************************************************************************************
रात्री कल्लेश्वर एकटाच त्या दगडी चौथऱ्यावर बसून होता. हाताची जखम आता बरी होत आली होती, पण मनातली अस्वस्थता तशीच होती.
हाकिनी...तिचं ते रूप त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहिलं; तो पशूसारखा पंजा, ती तीक्ष्ण नखं, ते मांसभक्षण. तो विचारही त्याला थरथरायला पुरेसा होता. आणि जर हाकिनीच इतकी भयंकर असेल, तर भूतडामरी कशी असेल? या विचाराने त्याचे मन चिंताग्रस्त झाले. भूतडामरी, हाकिनीहूनही उग्र, तिचा राग किती भयंकर असू शकेल, याची कल्पनाही त्याला भीतीदायक वाटत होती.
त्याने डोळे मिटले आणि विचार करू लागला, मी आजवर कित्येक विधी यशस्वीपणे केलेत; स्मशान-साधना, प्रेत-साधना, अगदी वेतालसाधनाही. प्रत्येक वेळी मी त्या शक्तींना माझ्या नियंत्रणाखाली ठेवलं. पण त्या सगळ्या शक्ती वेगळ्या आणि भूतडामरी...ती वेगळ्याच पातळीवरची आहे.
त्याला जुन्या तांत्रिक ग्रंथांतून, गुरुमुखातून कळले होते की भूतडामरीसारख्या उग्र योगिनी एकदा जागृत झाल्या, की त्यांना नियंत्रणात आणणं खूप कठीण असते...जवळजवळ अशक्य. काही जण तिच्या दर्शनानेच वेडे झाले होते असे ऐकले होते तर अपूर्ण माहितीच्या आधारे साधना उलटल्यामुळे काहींचे तर मृतदेहही सापडले नव्हते.
तो बराच वेळ त्या द्विधा मनःस्थितीत बसून राहिला; एका बाजूला, देवप्पा आणि अभिजितला रोखण्याची निकड. दुसऱ्या बाजूला, स्वतःच्याच अस्तित्वाला असलेला धोका.
तेरावी अमावस्या जवळ येतेय, त्याने स्वतःला बजावलं. आणि जर अभिजितची दीक्षा पूर्ण झाली, त्याचं कवच जागृत झालं तर माझी इतक्या वर्षांची प्रतीक्षा, माझी सगळी योजना यांना धोका आहे.
"नाही," तो शेवटी स्वतःशीच पुटपुटला, आवाजात एक जबरदस्तीने आणलेला निर्धार, जो त्याच्या आतल्या भीतीला पूर्णपणे झाकू शकत नव्हता. "इतक्या जवळ येऊन मागे हटणं शक्य नाही. भूतडामरीला बोलावणारच मी."
त्याच्या स्वतःच्याच आवाजातही, एक सूक्ष्म कंप होता जो त्याला स्वतःलाही जाणवला, आणि ज्याने त्याच्या मनातली ती अनिश्चितता आणखी गडद केली.
************************************************************************************************************************
यानाला पोहोचल्यावर, देवप्पाने अभिजितला जरा विश्रांती घेऊ दिली आणि मग त्याला हाकिनी आणि भूतडामरीबद्दल सांगितले.
"पण हे आपण रोखायचं कसं?" अभिजीतने प्रश्न विचारला.
"क्रोध भैरवाची सात्विक साधना. भैरवांचं हे रूप विशेषतः भूत-पिशाच्च, तांत्रिक आक्रमणं, आणि उग्र शक्तींपासून रक्षण करण्यासाठी उपासलं जातं. काही अनुभवी तांत्रिक क्रोध भैरवाची उग्र साधना करतात पण तुला ते शक्य नाही."
"आता तुला बाकी सगळ्या गोष्टींबरोबरच ही साधनाही करावी लागेल कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पुढच्या अमावास्येला हाकिनी त्याला विधी सांगेल.त्यानंतर तो भूतडामरीची माता, बहीण की प्रेयसी यापैकी कोणत्या रूपात साधना करतो त्यावर अवलंबून आहे की त्याला अमावस्येनंतर किती दिवस लागतील. " देवप्पाने आणखी माहिती पुरवली.
अभिजितने मान हलवली, आणि दुसऱ्या दिवशी देवप्पाने शस्त्रपूजेपासून सुरवात करायचे ठरवले.
************************************************************************************************************************
देवप्पाने पहाटेचं स्नान झाल्यावर, अभिजितला तलवार नदीच्या शुद्ध पाण्याने धुवायला लावली.
"शस्त्रपूजा म्हणजे नुसतं फुलं-अक्षता वाहणं नाही, अभिजित. ही तलवार तुझ्या...रक्षकांच्या कुळाचं जिवंत प्रतीक आहे, आणि तिची पूजा तीन टप्प्यांत व्हायला हवी; शुद्धीकरण, आवाहन, आणि अभिषेक." कोरड्या वस्त्राने तलवार पुसता पुसता देवप्पा म्हणाला. आणि अभिजितला शुद्धीकरणाचा मंत्र म्हणायला लावला,
ॐ अपवित्रः पवित्रो वा,
सर्वावस्थां गतोऽपि वा।
यः शस्त्रं स्मरेन्नित्यं,
स आत्मानं दुर्बलांश्च रक्षति॥
"दुसरा टप्पा आवाहन," देवप्पा पुढे म्हणाला. "शुद्ध केलेल्या तलवारीसमोर बसून, तिच्यात वीर-शास्ताच्या शक्तीचं आवाहन करायचं. संपूर्ण एकाग्रतेने, त्या शक्तीला बोलवायचंय, जणू तू खरंच तिच्याशी बोलतोयस."
"कसं ओळखायचं, आवाहन यशस्वी झालं की नाही?"
देवप्पाने स्मित केलं. "तलवारीचा स्पर्श बदलतो. आधी ती नुसती थंड धातू वाटेल, हळूहळू, आवाहन जसजसं पक्कं होईल, तसतशी ती आणखी जिवंत, आणखी प्रतिसाद देणारी वाटेल."
आणि शेवटी, अभिषेकाचा टप्पा. देवप्पाने एक छोटी सुई काढली. "आता तुझ्या स्वतःच्या रक्ताचा एक थेंब हवा, तलवारीवर."
अभिजितने आपलं बोट पुढे केलं, सुईने हलकी टोचून घेतली, आणि रक्ताचा तो थेंब तलवारीच्या पात्यावर पडू दिला.
"आता म्हण माझ्यामागोमाग" देवप्पा म्हणाला,
"अद्य रक्तस्य बिन्दुना
करोमि तेऽभिषेचनम्।
यदा कालः समेष्यति,
शत्रुरक्तेन पूरये॥"
ते शब्द उच्चारताच, तलवारीवरचा तो रक्ताचा थेंब हळूहळू पात्यात शोषला गेला, जणू ती तलवार त्याचं वचन आत्मसात करत होती.
शस्त्रपूजेचे तीनही टप्पे पूर्ण झाल्यावर, देवप्पाने अभिजितला उरलेल्या कुळाचारांबद्दल सविस्तर सांगायला सुरुवात केली.
"आता भस्म-तिलकाबद्दल पूर्ण तपशील सांगतो," तो म्हणाला. "रोज सकाळी, देवपूजेनंतर धूपातली राख कपाळावर आडवा पट्टा म्हणून लावायची. मग दोन्ही दंडांवर, खांद्यापासून कोपरापर्यंत मध्यभागी, एक बारीक रेषा. आणि शेवटी छातीच्या मध्यभागी, हृदयावर, एक छोटं वर्तुळ."
"या क्रमानेच का?" अभिजितने विचारलं.
"कारण प्रत्येक जागेचा एक अर्थ आहे," देवप्पा म्हणाला. "कपाळावरची रेषा विचारांची शुद्धता. दंडांवरची रेषा कृतीची शक्ती. आणि हृदयावरचं वर्तुळ भावनेची, हेतूची शुद्धता. जर तिन्ही एकत्र आली, तरच खरं संरक्षण मिळतं."
क्रोध भैरवाच्या साधनेसाठी देवप्पाने त्याला नैऋत्य दिशेला तोंड करून बसवलं, निळ्या-काळ्या आसनावर, मोहरीच्या तेलाचा दिवा समोर.
"डोळे मिट, आणि हे रूप मनात उभं कर," देवप्पा म्हणाला, आणि तो ध्यान-श्लोक म्हणून दाखवला, "रक्तवर्णं महाभीमं खड्गखप्परधारिणम्। भूतप्रेतपिशाचादि नाशकं क्रोध भैरवम्॥"
अभिजितने ते रूप कल्पिलं...रक्तवर्णी, हातात तलवार आणि कवटी, पण त्या भयाण रूपामागे एक संरक्षक तेज, जे फक्त वाईटालाच जाळणारं.
"आता मंत्र म्हण," देवप्पा म्हणाला. "ॐ क्रोध भैरवाय नमः."
अभिजीतने तो मंत्र १०८ वेळा म्हटल्यानंतर देवाप्पाने त्याला बीजमंत्रही दिला, "ॐ ह्रीं वं क्रोध भैरवाय नमः" "याचा फक्त माझ्या उपस्थितीत असतानाच जप करायचा" देवप्पाने सक्त ताकीद दिली.
"आजच्यासाठी एवढं पुरे पण उद्यापासून भस्मतिलक, अश्वप्रतीक आणि भैरव साधना तुला रोज करावी लागणार आहे आणि त्यात कोणत्याही कारणाने खंड चालणार नाही"
************************************************************************************************************************
कल्लेश्वर, हाकिनीच्या त्या प्रतिसादानंतर स्वतःच्याच भीतीशी झगडत होता. भूतडामरीला थेट बोलावणं त्याला अजूनही अशक्य वाटत होतं.
एका रात्री, त्याच्या जुन्या, धूळ खात पडलेल्या ग्रंथांच्या संग्रहात शोध घेता घेता, त्याच्या हाताला एक जीर्ण, चामड्याच्या बांधणीचा ग्रंथ लागला. अतिशय प्राचीन.
त्याने त्यातील ते पान उघडलं, आणि त्याचे डोळे चमकले…त्यात लिहिलेलं होतं, भूतडामरीसारख्या उग्र शक्तींपासून स्वतःचं रक्षण कसं करावं, याबद्दल. "जो कुणी भूतडामरीच्या मार्गावर पाऊल टाकतो, त्याने आधी स्वतःभोवती क्रोध भैरवाचं तांत्रिक कवच उग्र, तामसिक विधीनेच सिद्ध करावं."
कल्लेश्वरने पुढची पानं वाचली. स्मशानातली मध्यरात्रीची पूजा, रक्ताचा अभिषेक, आणि एक वेगळाच, अधिक भयाण मंत्र, जो साध्या "ॐ क्रोध भैरवाय नमः" पेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली, पण तितकाच धोकादायकही होता.
दुसऱ्या रात्री कल्लेश्वर यानाच्या जंगलातल्या त्या जुन्या स्मशानभूमीत पोहोचला; तीच जागा, जिथे त्याने कधीकाळी वेतालसाधना केली होती.
रात्र निःशब्द होती, इतकी की स्वतःच्या हृदयाची धडधडही त्याला ऐकू येत होती. काळाकुट्ट अंधार, आणि दूरवर कुठेतरी घुबडाचा घुत्कार.
"एकवीस रात्री...सलग, न चुकता " तो स्वतःशीच पुटपुटला.
त्याने जमिनीवर एक मोठं वर्तुळ आखलं, मध्यभागी चितेची राख गोळा करून एक ढीग रचला आणि मग एका काळ्या बकऱ्याचे मुंडके धडावेगळे करून त्या मुंडक्यातून गळणारे त्याचं ताजं रक्त त्या राखेवर शिंपडलं. रक्त राखेत मिसळताच राखेतील आधीच्याच असलेल्या जळक्या मांसाचा, कुजलेल्या हाडांचा तीव्र वास उठला, कल्लेश्वरने डोळे मिटले, आणि तो भयाण मंत्र म्हणायला सुरुवात केली,
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं क्रोधभैरवाय नमः।
अघोरमार्गी रक्षणाय, मम देहे कवचं कुरु।
मन्त्रतन्त्रप्रभावेभ्यः, सर्वतः मां परिपालय।
भूतप्रेतपिशाचेभ्यः, दुष्टशक्तिभ्य एव च।
अघोरकर्मसिद्ध्यर्थं, मां रक्ष रक्ष भैरव।
हुं हुं फट्। स्वाहा॥
स्मशानात कल्लेश्वरचा उग्र, तामसिक अग्नी हळूहळू भडकत चालला होता, इकडे यानाच्या घरात अभिजितची सात्विक ज्योत तितक्याच निष्ठेने तेवत होती आणि त्या दोन्हींपासून काहीसं दूर, अंधारातच, देवप्पाही स्वतःच्या एका गुप्त, अजून कुणालाच न कळलेल्या मार्गावर पावलं टाकत होता.
धन्यवाद...
धन्यवाद...
उद्या सकाळी वाचेन मी..
तुम्ही तज्ञ लोकांची मदत घेऊन
तुम्ही तज्ञ लोकांची मदत घेऊन तुमच्या कथांचे कॉपी राईट्स संरक्षित करा. अतिशय उत्तम, वेगळ्या पार्श्वभूमीवरील, वेगवान आणि अद्भुत डिटेलिंग असलेल्या या कथा खूप पोटेन्शियल आहेत. यूट्यूब वर तुम्ही अभिवाचन करू शकता.
वाचली
वाचली
छान सुरुये
आजचे सात्विक मंत्र आवडले
शेवटचा उग्र मंत्र वाचला नाही
..
धन्वंती ला मम
+११११
बाबो! डेजर आहे हे
बाबो! डेजर आहे हे
मस्त आहे हा भाग सुद्धा.
मस्त आहे हा भाग सुद्धा.
अरे झकास
अरे झकास 👌
आता क्रोधभैरव आला ! एकाच शक्तीची duotone साधना - सात्विक आणि उग्र. लै भारी. 👊
दैवी शक्तीच्या दृश्यात्मक रूपांप्रमाणेच इथेही duel iconography, their overlapping energies फार कल्पकतेने रचल्या आहेत लेखनात. बेस्ट. 👍
फार भारी लिहिताय.
फार भारी लिहिताय.
युद्धपुर्व तयारी दोन्ही पार्टीकडून जोरात सुरू आहेत.
मंत्र वाचतानाही डेंजर वाटले, विशेषतः तामसी साधना असलेले.