संपादकीय

आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी...

रेखोनी रांगोळी अंगणी या
फुले चौफुले रंगी भरु या
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी
चला चला त्वरा करा
आनंद झाला घरोघरी...

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून या वर्षी साठ वर्षं पूर्ण झाली. या साठ वर्षात कितीतरी गोष्टी बदलल्या. कितीतरी बदलल्याही नाहीत. मागे वळून पाहतांना कित्येक मैलाचे दगड दिसतात तसेच खाचखळगेही दिसतात. पुढे जाणारीच नव्हे तर काही उलट्या दिशेने वळणारीही पाऊले दिसतात. देशाबरोबरच स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहतांना आपल्याला फार वेगळा अनुभव येत नसतो. साठ वर्षांपूर्वीच्या स्वातंत्र्यासाठी वेडे झालेल्या व आपले सर्वस्व झुगारुन देणार्‍या त्या लोकांपेक्षा आपले आजचे जीवन कल्पनेच्याही पलिकडे वाटेल इतके वेगळे आहे. शिक्षण, प्रगती, सौख्य, सुबत्ता, आरोग्य या सगळ्या तेव्हाच्या स्वप्नांना मूर्त स्वरुप प्राप्त होऊन त्याने आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. पण त्याचबरोबर आपण हे सगळे मिळवताना काहीतरी गमावले आहे; आपल्या हातून काहीतरी निसटले आहे ही जाणीव आपला पाठपुरावा सोडत नाही. तुकोबांच्या "हासों रुसों आता वाढवू आवडी| अंतरीची गोडी अवीट ते|" मधली भावना कुठेतरी परकी वाटू लागते. हरवत चाललेली ही अंतरीची गोडी कुठली?

सणावाराचं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट पोटभर जेवून आपण जसे तृप्त होतो, तसा आपला 'आत्मा' खर्‍या अर्थाने तृप्त, समाधानी आणि संतुष्ट कसा होईल व कसा राहील? कधीही न विटेल एवढी अंतरीची गोडी आपल्याला कशी वाढवता येईल? "Eat Pray Love" नावाचे पुस्तक लिहिणारी एलिझाबेथ गिल्बर्ट म्हणते की मी अनुक्रमे चक्क याच तिन्ही मार्गांनी ते साध्य केलं. पण या प्रश्नाचं उत्तर खरं तर तुम्हां आम्हाला स्वतःचं स्वतःच शोधायचं आहे! ही अंतरीची गोडी आपल्याला किती वाढवता येईल याला मर्यादा म्हणजे आपल्याला ती किती वाढवायची आहे हीच आहे. आणि ही गोडी आपली जसजशी वाढेल तशी आपल्या कुटंबाची, सख्या-सोबत्यांची आणि तदनुषंगाने तेवढीच देशाचीही.

आपल्या मायबोलीच्या स्थापनेला गणेशचतुर्थीला अकरा वर्षे पूर्ण झाली. या वर्षी मायबोली ही एक Incorporated संस्था झाली आहे. याच वर्षी बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या सिऍटल येथे झालेल्या अधिवेशनात उत्तर अमेरिका आणि महाराष्ट्रात मराठी समाज आणि संस्कृतीसाठी केलेल्या कार्याबद्दल मायबोलीला सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मायबोलीच्या संस्थापकांनी आणि सभासदांनी आपल्या परीने ही अंतरीची गोडी मिळवण्याचे एक साधन जागते ठेवले आहे.

आपली भाषा, संस्कृती ही आपली एक ओळख असते आणि देश-प्रांताच्या सीमा बदलल्या तरीही आपली ओळख बदलत नाही; नव्हे, ती टिकवून ठेवण्याची उर्मी वाढते. पण या पलिकडे जाऊन आपली एक नागरीक म्हणून आणि एक माणूस म्हणूनही ओळख आहे. विश्वाच्या या अफाट पसार्‍यात कुठेतरी आपले शेजारी असतीलही, पण निदान आत्ता तरी आपणच स्वतःला जगातील सर्वात बुद्धीमान प्राणी समजतो. गेल्या काही हजार वर्षांचा इतिहास पाहीला, तर मात्र हा दावा करायला आपण खरच लायक आहोत का असा प्रश्न पडावा अशीच स्थिती आहे.

ठायी-ठायी माणसाच्या बेजबाबदारपणाचे पुरावे आहेत. गेल्या कित्येक शतकांच्या इतिहासात हेच दिसेल की आपणच लिहीण्याची, छापण्याची कला शोधली, पुस्तकांत आपल ज्ञान, आपली कला साठवून ठेवली आणि आपणच विजयाच्या उन्मादात मोठमोठ्या वाचनालयांना आगी लावल्या. सुंदर मूर्ती, इमारती उभ्या केल्या आणि मग त्यांचा विध्वंस केला. निरनिराळे शोध लावले आणि मग त्यातून माणसाच्याच मनाचा, देहाचा नाश करण्याची साधनंही शोधली. प्रेमाचा, शांततेचा संदेश देतांनाच अघोरी जातीयवाद, धर्मांधतेची बीजं रोवली. निसर्गावर मात करायला निघालो पण हे विसरलो की ते करताना कुर्‍हाड आपल्याच पायावर पडते आहे. भूकंप, चक्रीवादळं, त्सुनामी यासारखी न सुटणारी गणितं समोर आली आणि गडबडून गेलो. यंदाचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक Intergovernmental Panel on Climate Change आणि अल गोअर यांना जाहीर करताना नोबेल समितीने दिलेले निवेदन पुरेसे बोलके आहे - for their efforts to build up and disseminate greater knowledge about man-made climate change, and to lay the foundations for the measures that are needed to counteract such change. हा दृष्टीकोन, केलेल्या सगळ्या चुका सुधारतांना ठेवला, तरच पुढचा प्रवास सुखाचा होणार आहे.

हाती सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळुन घे प्राण तुझ्या पदरी,
आणा आणा निरांजना

आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी...

दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांपुढे मायबोलीचा हा आठवा 'हितगुज दिवाळी अंक' आपल्यापुढे ठेवतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या अंकाच्या निर्मितीत सहभागी झालेल्या सगळ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळेच हे आम्हाला शक्य झाले. अंगणात काढलेली सडा-रांगोळी, मिणमिणत्या पण ओजस प्रकाशात तेवणार्‍या पणत्या, वार्‍यावर झुलणारा आकाश-कंदील, चमचमणारे फटाके, उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, ठेवणीतले कपडे आणि दागिने, अत्तराचा घमघमाट, खास फराळाची धामधूम अशा प्रसन्न आणि सुमंगल वातावरणात हा दिवाळी अंकही भर टाकेल अशी आम्हाला आशा आहे.

दिवाळीच्या मंगल प्रकाशात आपल्या आयुष्याचा यापुढील पथ उजळून निघो व नव्या वर्षात पदार्पण करतांना, पुनरावलोकन करुन झाल्या चुका बरोबर करण्याच्या दृष्टीने आपले पाऊल पुढे पडो, ही प्रार्थना.

आपल्या सर्वांचाच जीवनकलश सौख्य, आनंद आणि अंतरीच्या गोडीने भरून वाहो आणि आपल्याबरोबरच इतरांच्याही जीवनाला तो चिंब करून सोडो, हीच दिवाळीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...

शुभ दीपावली !!!

या अंकाच्या बांधणीत ज्या अनेक मायबोलीकरांचा हातभार लागला त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. श्रेयनामावलीसाठी कृपया खालील दुवा पहा.

श्रेयनामावली