सारीपाट

विमानानं आकाशात झेप घेतली तसा आजूबाजूचा कोलाहल थोडा शांत झाला. सीट बेल्ट किंचित सैल करून, पायातले बूट खुर्चीखाली सरकवून ठेवता ठेवताच मालतीबाईंनी शेजारच्या खुर्चीत बसलेल्या लेकाकडे, सलीलकडे एक नजर टाकली.

'या दोन महिन्यांत किती वाळलं लेकरू…' त्यांच्या मनात आलं. मूळचा गोरा सलील खरंच पार रापला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं उमटलेली दिसत होती. केसांची एक चुकार बट त्याच्या कपाळावर उतरली होती. अगदी थकला भागलेला, क्लांत दिसत होता तो.

'कोणत्या जन्माचा बदला घेतला पोरीनं कोण जाणे? माझ्या राजबिंड्या लेकाची अगदी दशा करून टाकली पार…'

त्याच्या मिटल्या डोळ्यांवरून हळूच हात फ़िरवावेत नि त्याचा एक गोडसा पापा घ्यावा, अगदी तो लहानपणी शाळेतून आल्यावर घेत होतो तसा.... अशी अनिवार उर्मी त्यांच्या मनात दाटून आली. वय नि स्थळकाळाचं बंधन या दोन्हींच्या जाणीवेनं क्षणातच त्या उर्मीवर विजय मिळवला. समोरच्या स्क्रीनवर कुठलातरी अगम्य चित्रपट आता सुरू झाला होता. त्यात मन गुंतवायचा निष्फळ प्रयत्न त्या करू लागल्या. पण विचारांच्या कोलाहलात त्यातल्या कथानकाचा त्यांना काहीच उलगडा होईना. शेवटी थकून जाऊन, मान मागे टेकवून त्या शांत बसल्या. मिटल्या डोळ्यांपुढे सलील अन् हिमानीच्या उण्यापुर्‍या वर्षभराच्या संसाराची चित्रं थैमान घालतच होती. हातावर सलीलच्या आश्वासक नि उबदार हाताचा स्पर्श जाणवला तसं डोळे उघडून त्यांनी त्याच्याकडे बघितलं.

"दमलीस ना आई ? कसला विचार नको करूस आता. हे दिवस अगदी छान घालवूया आपण दोघं…."

"नाही रे राजा… दमायला काय झालंय मला? सगळी धावपळ, पॅकिंग, तू नि बाबाच
तर करत होतात…." कसनुसं हसून त्या म्हणाल्या खर्‍या, पण त्यांच्या डोळ्यांतलं झाकोळ सलीलनं लगेच हेरलं.

"आई, आता अजिबात विचार करायचा नाहीस तू हिमानीचा. मी पण विसरून जायचा प्रयत्न करतोच आहे नं? अन आयुष्यात एवढ्यातेवढ्यानं खचून जायचं नसतं, ही शिकवण तूच देत आलीस ना लहानपणापासून? आता तूच अशी हतबल होतेस… अशानं कसं होईल बरं?"

त्याच्या हळुवार आवाजातल्या प्रश्नाला उत्तर न देताच मालतीबाईंनी मान फिरवली. आपले डबडबलेले डोळे त्याला दिसू नयेत म्हणून.

"काय सांगू रे बाळा तुला? पोटच्या पोराचं दु:ख पाहिलं की आईचं काळीज तिळतिळ तुटतं रे. .." त्या मनातल्या मनात म्हणाल्या.

सलील आणखी काही बोलणार, तोच हवाई सुंदरी ज्यूस घेऊन आली. दोघांचं बोलणं अर्धवटच राहिलं.

सलील मालतीबाई नि दिनकररावांचा एकुलता एक मुलगा. मालतीबाई नि दिनकरराव हे अमेरिकेत तरुण वयात येऊन स्थायिक झालेल्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे. अमेरिकेतल्या इतर अनेक मराठी कुटुंबांप्रमाणे घरात मोकळं, आधुनिक वातावरण नि काळजात मात्र तेच जुनं मराठीपण जपणारे. सलील त्यांच्याच संस्कारात वाढलेला. अन म्हणून देखण्या, शिकलेल्या सलीलसाठी अमेरिकेतच वाढलेल्या कुटुंबातली तशीच मुलगी मिळावी ही इच्छा होती दोघांची . अन ती इच्छा पूर्ण झालीही. वर्षभरापूर्वी हिमानी लग्न करून घरात आली, तसं मालतीबाईंना अगदी
आभाळ ठेंगणं झालं होतं. सलीलच्या नोकरीच्या ठिकाणी, न्यूयॉर्कला तिलाही मनासारखं काम मिळालं अन् दोघांचा संसार सजवून देऊन मालतीबाई समाधानाने न्यू जर्सीच्या घरी परत आल्या होत्या. आता प्रतीक्षा होती फक्त एखाद्या गोजिरवाण्या नातवंडाची.

पण दोन महिन्यांतच सलीलचा घाबर्‍या घाबर्‍र्या फोन आला… "आई, ती… हिमानी घर सोडून जायचं म्हणतेय… तू अन बाबा या लवकर…"

रातोरात दिनकरराव मालतीबाईंबरोबर निघाले खरे पण दोघांना रस्त्यात काय बोलावं, हेही सुचत नव्हतं. सलीलच्या घरी पोचल्यावर हिमानीनंच दार उघडलं. त्या दोघांना बघून न बघितल्यासारखं करीत आपल्या खोलीत जाऊन तिनं धाडकन दार बंद केलं तसं मालतीबाईंचं काळीज चरकलंच.

उदासवाणा सलील सारं सांगत होता नि हिमानीचा हट्टीपणा, तापट स्वभाव दोघांच्याही लक्षात येत होता. सलीलची कुठलीच गोष्ट तिला पटत नव्हती. सारं तिच्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे, हा तिचा आग्रह असायचा. तिच्या बर्‍याच गोष्टी फारच विक्षिप्त वाटल्या तरी 'अल्लड आहे, समजेल हळू हळू' असा विचार करून, दोघांमधे तात्पुरता समझौता करून देऊन दोघं न्यू जर्सीच्या घरी परत आले होते. पण त्यानंतर मालतीबाई सतत धास्तावलेल्याच असायच्या. काय निरोप येईल म्हणून? अन् ती भीती सार्थच ठरली. उण्यापुर्‍या सात-आठ महिन्यांचा संसार मोडून हिमानी अखेर निघून गेलीच.

दोन्हीकडच्या वडीलधार्‍यांनी समजावण्याचा बराच प्रयत्न केला. पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. सलील तिच्या कल्पनेतल्या नवर्‍यासारखा नाही, असंच ती शेवटपर्यंत म्हणत राहिली. शेवटी सामानाची वाटणी करून, सारं विस्कटून, सलीलला घेऊन ते दोघं पुन्हा न्यू जर्सीला आले होते काही दिवसांपूर्वी. नंतर घटस्फोटाचे सारे सोपस्कार पार पडल्यावर काही दिवसांनी 'हिमानीचं कोणा दुसर्‍या शीख मुलावर प्रेम होतं नि म्हणून तिचं आधीपासूनच या लग्नात मन नव्हतं, आईवडिलांच्या दबावाखातर तिनं हे लग्न केलं होतं' असं उडत उडत कानावर आलं तेव्हा कशालाच काही अर्थ उरला नव्हता. सारा खेळ उधळल्या गेला होता.

दोन महिन्यांची सुट्टी घेऊन सलील न्यू जर्सीला आला नि मालतीबाईंच्या आतेसासूबाई गेल्याचा फोन आला. त्यांना जवळचं असं कोणीच नसल्याने त्या दिनकररावांच्या तिकडच्या बंगल्यात एकट्याच रहात असत. बंगल्याच्या बाजूला आऊटहाऊससारखी एक छोटी वास्तू होती. ती तात्या देशमुखांना भाड्याने दिली होती. ते मधूनमधून लक्ष ठेवीत असत. त्यांनीच हा फोन केला होता. आता जाऊन बंगला विकणं भागच होतं. बाकीही बरीच कामं होती. तेव्हा सलीलला घेऊन जावं, त्याला जरा बदलही होईल अन खरेदी विक्रीच्या व्यवहारात त्याची मदतही होईल, असा विचार करून दिनकररावांनी त्या दोघांना जायचा सल्ला दिला. हो-नाही करता करता सलील तयार झाला नि दोघेही तातडीने निघाले होते.

बंगल्याचं फाटक उघडून आत गेल्यागेल्याच मालतीबाईंचं लक्ष बागेकडे गेलं. तर्‍हेतर्‍हेची फुलं नुसती बहरली होती. आत्यांच्याने तर काहीच होत नसे. 'तात्या बरीच उस्तवार करतायतसं दिसतं बागेची..' त्यांच्या मनात आलं. तोच आऊटहाऊसचं छोटं दार उघडून म्हातारे तात्या हसत हसत पुढे आले.

"या या वहिनीसाहेब. वाटच बघत होतो मी. दमला असाल प्रवासाने."

सामान आत ठेवून परत आलेल्या सलीलची मालतीबाईंनी ओळख करून दिली. "सलील, हे तात्यासाहेब देशमुख. बंगल्याची देखभाल हेच करतात बरं का!"

उंचापुरा सलील लगेच तात्यांच्या पायाशी वाकला. पाठोपाठ मालतीबाईंनीही वाकून नमस्कार केला. "हे…हे काय छोटे मालक?" संकोचून ते दोन पावलं मागे सरकले.

"वा! वडीलधार्‍यांचा आशिर्वाद नको का घ्यायला?" मालतीबाई हसून म्हणाल्या.

"तो तर आहेच वहिनीसाहेब…." तात्यांच्या सुरकुत्यांनी भरलेल्या चेहर्‍यावर हास्य उमटलं.
"जेवण तयार आहे दोघांचं. रात्र बरीच झालीय. खाऊन घ्या नि आराम करा वहिनीसाहेब." बोलता बोलताच तात्यांनी बंगल्याचं दर्शनी दार उघडलं.

आत आल्याबरोबर एकदम प्रसन्न वाटलं मालतीबाईंना. 'घराची व्यवस्था वयाला न शोभेशा उत्साहानं ठेवलीय तात्यांनी!' मालतीबाईंना वाटलं. स्वच्छ, नीटनेटक्या खोल्या, सुबक मांडणी, अगदी सात वर्षांपूर्वी मालतीबाई नि दिनकरराव येऊन गेले होते, तेव्हा होतं तसं होतं सारं. आत्यांची खोली मात्र रिकाम्या पलंगामुळे उदास वाटत होती.

चार शब्द आत्यांबद्दल बोलून, थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर मालतीबाई नि सलील जेवायला बसले. मेथीची पीठ पेरलेली भाजी, कढी नि रेशमासारख्या मुलायम पोळ्या बघूनच त्यांचं पोट भरलं.पहिला घास तोंडात घालताच एकदम कसलीशी आठवण होऊन मालतीबाई थांबल्या.

"तात्यासाहेब, तुमची छोटी नात कशी आहे? झोपली असेल ना?" तात्या हलकेच हसले.

"आता ती छोटी कुठे राहिलीय वहिनीसाहेब? मैथिली…...ती काय! स्वयंपाक तिनंच तर केलाय तुमचा."

दाराआडून डोकावणार्‍या चेहर्‍याकडे आता कुठे मालतीबाईंचं लक्ष गेलं.

"ये, ये बाळ. लाजू नकोस अशी."

त्या मायेनं म्हणाल्या तशी बिचकतच ती पुढे झाली.

आपण सात वर्षांपूर्वी पहिलेली मैथिली हीच, यावर मालतीबाईंचा विश्वासच बसेना. 'तेव्हाची ती दोन वेण्या घालणारी, अल्लड, धडपडी मैथिली कुठे नि ही देखणी विशीतली पोर कुठे?' त्यांना वाटून गेलं. आश्चर्याने त्या थोडा वेळ बघतच राहिल्या.

ग़व्हाळ वर्ण, काळेभोर डोळे नि केसांचा एकच लांबसडक, दाट शेपटा. चेहर्‍यावरच्या बावरलेल्या भावानं ती अधिकच सुरेख दिसत होती.

"ही मैथिली? .." आश्चर्याने त्या उद्गारल्या.

सलील अनिमिष नजरेनं आपल्याकडेच बघतोय, हे बघून मैथिली संकोचल्यासारखी झाली.

सकाळी मालतीबाई उठल्या तरी सलील झोपलेलाच होता. खिडकीतून बाहेर बघताच त्यांना प्राजक्ताच्या झाडाखाली फुलं वेचणारी मैथिली दिसली. नुकतीच न्हायली असावी. ओलसर केसांचा भलाथोरला अंबाडा कसातरीच बांधल्यानं बटा चेहर्‍यावर पसरल्या होत्या. अंगात साधा धुवट गुलाबी फुलांचा सलवार कमीज नि पायात सपाता या वेशातही ती एखाद्या वनराणीसारखीच गोड वाटली मालतीबाईंना.

"हं…" एक उदास सुस्कारा सोडून त्या खिडकीजवळून दूर झाल्या. एरवी अशी गोड सून किती आवडली असती आपल्याला. पण आता ते शक्यच नाही. 'थोड्या काळाचा का होईना, लग्नाचा डाग लागलाय पोराला. तात्यांना कोणत्या तोंडानं विचारणार आहोत आपण?'

सलीलच्या आवाजानं त्यांचं विचारचक्र भंगलं.

"आई, उठलीस का गं? किती फ्रेश वाटतं नाही इथे? गेली सात आठ वर्षं मी आलो नाही, याचा आता पश्चात्तापच होतोय बघ मला.…"

"हो रे बाळा, अन् आज तुला इस्टेट एजंट सिन्हांकडे जाऊन यायचंय ना रे? बंगल्याची व्यवस्था लवकरच लावलेली बरी आता."

"आई, तुला एक विचारू? आपण हे घर विकलं तर देशमुख मंडळींची केवढी अडचण होईल गं. नाही का? इतक्या नाममात्र भाड्यात दुसरी व्यवस्था होणंही कठीणच!"

"सलील,…" मालतीबाई गंभीर झाल्या.

"मीही तोच विचार करतेय रे कालपासून. पण घर असंच ठेवून गेलो तर दिवसेंदिवस कठीण होईल बघ. मैथिलीचं लग्न झालं की मदतीला कोणी राहणार नाही. अशा अवस्थेत म्हातारे तात्यासाहेब तरी किती दिवस सांभाळणार ही एवढी मोठी वास्तू? मलाही काही कळत नाहीय बघ."

"बघू या आपण आई काहीतरी. आधी जाऊन तर येतो मी."
तयार होऊन सलील गेला, तशा मालतीबाई उठून आऊटहाऊसकडे आल्या. बाहेरचं दार बंदच होतं. टकटक करूनही आतून आवाज आला नाही, तशा दार ढकलून त्या हलकेच आत डोकावल्या.

समोरच्या खोलीत आरामखुर्चीवर तात्या बसले होते. मिटल्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्यांच्या. एक क्षणभर मालतीबाई चमकल्याच. परत फिरावं म्हणून त्या जायला निघणार, तोच चाहुलीनं तात्यांनी डोळे उघडले.

"या ना वहिनीसाहेब." पालथ्या हातानं त्यांनी अश्रू पुसले, तशा मालतीबाई जवळची खुर्ची ओढून हलकेच टेकल्या.

"काय झालं तात्या? कसली काळजी आहे तुम्हाला? घराची काळजी नका करू. मी ह्यांना सांगून दुसरीकडे जागा घ्यायला पागडी, वगैरेची सोय करीन बरं." त्या मृदू आवाजात म्हणाल्या.

"नाही नाही, वहिनीसाहेब. ती काळजी नाही हो. ते होईलच कसंतरी. पण.. काय सांगू तुम्हाला आता?" तात्यांच्या वृद्ध चेहर्‍यावर दु:ख झाकोळून आलं.

"नातीच्या लग्नाची काळजी करता होय तात्या तुम्ही? अहो, लाखात एक पोरगी आहे. कोणीही पसंत करेल. गुणी आहे हो. आल्यापासून बघतेय, कामाला लवलव, घर नीटनेटकं ठेवणं नि इतका गोड स्वभाव…."

"आता काही अर्थ नाही हो वहिनीसाहेब. कशाकशाला अर्थ नाही. मैथिलीनं काळं फासलं हो तोंडाला. पळून गेली होती एका पोराबरोबर काही दिवसांपूर्वी. सार्‍या नातेवाईकांमधे बभ्रा झालाय. अब्रू घालवली हो म्हातारपणी माझी. आईबापांच्या माघारी प्रेमानं वाढवली… पण शेवटी अपेशी ठरलो हो वहिनीसाहेब."

दोन्ही हातांत तोंड खुपसून त्यांनी एक जीवघेणा हुंदका दिला.

मालतीबाई एकदम सुन्नच झाल्या. 'इतकी गोड, सालस मुलगी… अशी निघाली? कोणाच्या बाह्यरूपावरून काही कळत नाही हेच खरं!'

मुकाट्यानं त्या परत फिरल्या. बसलेला धक्का इतका जबरदस्त होता की तात्यांचं सांत्वन करायचंही भान उरलं नाही त्यांना.

झाली गोष्ट सलीललाही सांगितली नाही त्यांनी. जणू आपल्या मनातल्या मैथिलीच्या प्रतिमेला का कोण जाणे पण तडा जावासा वाटतच नव्हता त्यांना.

काही दिवस असेच गेले. मालतीबाई मैथिलीशी नेहमीसारखंच बोलत असत, पण नजर मात्र तिचं सूक्ष्म निरीक्षण करीत असे. 'इतकी शालीन, सुरेख मुलगी. असं का करावं तिनं ?'

पण लगेच त्यांच्या मनात येई, 'आईबापावेगळी पोर. वेडं वय….....कुठलातरी आधार शोधायला गेली असेल बिचारी! केवळ एका घटनेवरून कोणाची पारख करणं तरी किती बरोबर आहे?'

सलीलची नजर बरेचदा मैथिलीचा शोध घेत असते, हे त्या मातृहृदयाला पुरेपूर कळलं होतं.

अन एक दिवस, अशाच खिडकीतून बाहेर बघणार्‍या मालतीबाईंना बागेतल्या हौदाच्या काठावर बसलेली मैथिली दिसली. कसल्याशा विचारात गढून गेल्यासारखी. पाऊल न वाजवता त्या मागून हलकेच जवळ गेल्या. त्यांच्या
चाहुलीनं मैथिलीनं वर पाहिलं. मोठमोठ्या डोळ्यांत पाणी तरळत होतं.

"काय झालं गं बाळ? इथे का बसलीस अशी?" तिच्या खांद्याला धरून त्यांनी हलकेच विचारलं.

उत्तरादाखल मैथिलीनं नुसतीच मान हलवली. मालतीबाईंच्या मनात तिच्याबद्दल एकदम कणव दाटून आली.

"मला नाही सांगणार? मावशी म्हणून तरी..."

तिच्या खांद्याभोवती हात टाकून तिला जवळ घेतल्याबरोबर मैथिलीला अनिवार रडू यायला लागलं.

"मी तशी नाही हो वहिनीसाहेब. कोणी विश्वासच ठेवत नाहीय माझ्यावर. मला लग्नाचं वचन दिलं होतं त्यानं. अगदी हुंडा न घेता, आजोबांना काही त्रास न देता साधेपणानं लग्न करणार होता तो माझ्याशी…पण…पण.."

"काय झालं मग?" मृदू स्वरात मालतीबाईंनी प्रश्न केला.

"आजोबा या लग्नाच्या विरुद्ध होते. तो चांगला नाही म्हणायचे ते. म्हणून त्याच्या गावी जाऊन लग्न करणार होतो आम्ही. पण ठरलेल्या वेळी तो आलाच नाही मला भेटायला. वाट बघून बघून मी घरी आले शेवटी. मी काहीही वावगं वागले नाहीय हो याशिवाय. तेवढी एकच चूक माझी. पण आयुष्यातून उठले मी. सगळीकडे लोक नावं ठेवतात मला…"

"अन् त्याचं काय झालं पुढे?" तिच्या डोक्यावर थोपटत मालतीबाईंनी प्रश्न केला.

"त्यानं….त्यानं लग्न केलं दुसर्‍या पैसेवाल्या मुलीशी. आठवड्याभरातच… मला कशाचंच वाईट नाही वाटत हो वहिनी. त्याच्याबद्दल तर काहीच वाटत नाही आता. पण मी उगाचच बदनाम झाले हो. अन् आजोबा… माझे लाडके आजोबा पण आता विश्वास ठेवत नाहीत माझ्यावर." तिला हुंदका आवरेना.

"उगी बाळ. रडू नकोस. मी बोलेन आजोबांशी."

तिला हरतर्‍हेने शांत करून मालतीबाई घरात घेऊन आल्या. सलील वर झोपला होता. थोडं गरम दूध देऊन नि पुन:पुन्हा समजावून त्यांनी तिला घरी पाठवलं.

रात्री मालतीबाई बराच वेळ जाग्या होत्या. मनात विचारांचं काहूर घेऊन…

'पोरीचा काय दोष या सार्‍यात? अन एक सांपत्तिक परिस्थिती सोडली तर सलीलला अगदी अनुरूप आहे मुलगी. त्याच्या संसाराचा उधळलेला खेळ अगदी प्रेमानं सावरेल असं वाटतंय मनाला. कामसू, देखणी, सुस्वभावी.

संसार म्हणजे जणू सारीपाटाचा खेळच. ज्याच्याबरोबर खेळायचं, तो सवंगडी खेळात रमणारा हवा. रंगून जाणारा हवा. दोघांची मनं जुळली पाहिजेत. नाहीतर खेळ मोडायला वेळ लागत नाही. अन एकदा मनासारखा सवंगडी मिळाला की मग उलट दुसर्‍याला जिंकू द्यायचा प्रयत्न करायला हवा दोघांनीही. म्हणजे खरी रंगत येते खेळाला…

इतक्या उच्चशिक्षित, सधन घरात वाढलेल्या हिमानीनं काय सुख दिलं आपल्या लेकाला? त्यापेक्षा ही साधीसुधी निर्व्याज पोरगी संसार सुखाचा करील त्याचा.'

सकाळी उठून, त्या सलीलला घेऊन बागेत गेल्या. तिथे सारंकाही त्याच्या कानावर घातलं. त्याचा होकार आला, तसे मग बराच वेळ दिनकररावांशी दोघं फोनवर बोलले. मनाशी काही एक निश्चय करून मालतीबाई मागील दारी गेल्या.

"या वहिनीसाहेब. मैथिली, चहा ठेव."

पूजेच्या तयारीत असलेले तात्या समोर येऊन बसले.

"माझं काम होतं जरा तुमच्याकडे तात्या."

"अं! मी बोलणारच होतो वहिनीसाहेब आपल्याशी. भाडं थकलंय ना? तुम्ही जायच्या आधी सोय करतोच मी..." तात्या ओशाळवाणे हसले.

"काय हे तात्यासाहेब? आजवर कधी भाड्याचं नाव काढलं का आम्ही? त्याहून फार मोठी गोष्ट मागायला आलेय मी."

"म्हणजे?..."

तात्यांना काहीच समजेना.

"आमच्या सलीलसाठी मैथिलीचा हात मागायला आलेय मी."

"काय म्हणता वहिनीसाहेब?? सारंकाही माहीत असून तुम्ही..."

"हं तात्यासाहेब. त्याबाबतीत एक शब्द बोलायचा नाही यापुढे कोणी. आमच्या घरच्या होणार्‍या सुनेबद्दल वावगं बोलायचं नाही कोणीच! लक्ष्मी होणार आहे ती आमच्या घरची…"

"अन् सलीलच्या बाबतीत घडलेलं सारंकाही ठाऊक आहेच तुम्हाला. तुमचा नि मैथिलीचा होकार असेल तर साखरपुडा उरकूनच घेऊ या. नाही का?"

तात्यासाहेबांची मान नुसतीच लटलट हालत होती. त्यांना हाताला धरून मालतीबाईंनी खुर्चीवर बसवलं.

"अन् हो, घर विकायचा विचार तूर्तास स्थगित केलाय आम्ही. अगदी नि:शंकपणे रहा आपण..."

आतल्या खोलीत बसलेल्या मैथिलीच्या डोळ्यांतून अनिवार पाणी वहात होतं.

अंगणातल्या प्राजक्ताला वेडा बहर आला होता.

-सुपरमॉम