प्रश्न..

मी प्रश्नांना म्हणालो, एकदा तरी एकटं सोडा!
जाता जाता हसत म्हणाले, " वेडा रे वेडा.."

मी हट्टालाच पेटलो, कडी कुलूप लावून,
अडगळीच्या खोलीत, अगदी गुपचूप बसलो.
त्यांच्याशी पुन्हा आता, बोलणार नाही कध्धी,
काही बाही विचारून, बेजार करतात अगदी.

अडगळीच्या अंधारात, बरेच हाती लागत होते,
काही स्वप्ने, काही इच्छा, दिलेले एक वचन खोटे.
काही क्षण नवे कोरे, काही जुने गढूळलेले,
काही माझ्या ओघळणार्‍या, अश्रूंसोबत वाहून गेले.

हरवलेली किती दिसांची, उत्तरेही सापडली,
तेव्हा अचानक काड्कन, वीज कुठेशी कोसळली.
काळजात धडधडलं, आभाळ फाटणार आता,
अवचित मी कळवळलो, "कुणी आहे का रे बाबा?"

कुठून तरी चार पाच, प्रश्न जवळ आले,
मी त्यांना बिलगताच, गलबलून गेले.
"पुन्हा कधी एकट सोडून, जाऊ नका मला,
तुमच्या शिवाय जगण्यातला, अर्थ निघून गेला."

-पमा