चाऽऽऽय रेम…

सू
र्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर... आडवा डोंगरऽऽऽऽ
आन डोंगरावर त्या पसरला, चहा हिरवागारऽऽऽऽ

दिवसाची सुरूवात चांगल्या चहानं झाली की पुढचा सगळा दिवस चांगला जातो. तुमचं काय मत? सकाळची कोवळी किरणं खिडकीतून तिरीपतात. साधारण त्या वेळी पाय आपल्याला चहाच्या दिशेनं वळवतात. सकाळचा चहा आणि त्याबरोबर शांतपणे पेपर वाचणं म्हणजे काय आनंद असतो ते काय वेगळं सांगावं काय? दीडशे वर्षांनंतर जाताना, इंग्रज चहा आणि क्रिकेट मागे सोडून गेले. आता सायबाच्या देशापेक्षा दोन्ही गोष्टी आपल्याच देशात जास्त पॉप्युलर आहेत. ’हाय टी’ ते ’चहाची टपरी’ असं क्लास आणि मास अपील असलेल्या मोजक्या पेयांत चहा खूपच वर आहे.

महाराष्ट्रात लहानपण गेलं असेल किंवा महाराष्ट्राबाहेर वाढला असाल पण तुमचे आई/वडील मराठी असतील तर मग, चहाशी पहिली ओळख व्हायला तारूण्य यावं लागलं नसेल. अगदी लहानपणापासून सकाळ (आणि दुपारचीही) झोप चहाच्या सुगंधानंच चाळवली असेल. उकळतं पाणी, त्यात थोडं आलं, साखर, चहाची पावडर (aka चहापत्ती), दूध आणि थोडी सुगंधी वेलची पावडर. पृथ्वीवरचं अमृत तयार!! पिओ और पिलाओ!! एक से भले दो, दो से भले चार!!!

लहानपणी कुणाकडे गेलो की चहा विचारण्यावर आणि चहाच्या चवीवर घराचं इंप्रेशन ठरायचं. 'First Impression is the Last Impression’ ह्या न्यायानं बहुतेक वेळा ते खरंही ठरायचं. आई-अप्पांबरोबर आम्हालाही चहा आणणार्‍या घरच्या काकू-मावशींबद्दल एकदम आदर-बिदर वाटायचा ! पण ‘पुणे तिथे काय उणे’ असल्याने ‘ठिकठिकाणी स्वागताचे भलते नमुने’! काही ठिकाणी जिथे मोठयांनाच विचारलं जायचं, "चहा झालाय की चालेल अर्धा कप?", तिथे आमचा काय पाड लागणार! लहानपणी रेडियोवरच्या श्रुतीनाट्यात एक बाई प्रेमाने "चहा ठेवलाय हं भावोजी" म्हणायची, तेव्हा वाटायचं मोठेपणी आपल्यालाही कुणी ‘भावोजी’ वगैरे म्हणणार तर!! बाय दी वे, देशातल्या पुरूषप्रधान संस्कृतीचं ठळक उदाहरण म्हणजे, सणावारी किंवा काही कार्य म्हणून चार नातेवाईक जमले की बघा, बायकांची जेवणं होता-होताच दुपारच्या चहाची वेळ होते!

‘लहानपण सरायला सुरुवात झालीये’ हे समजायच्या बर्‍याच खूणांपैकी एक म्हणजे आई-वडिलांबरोबर नेहमीच्या दुकानात गेलं की दुकानदार तुम्हालाही चहा ऑफर करतात. कपातला अर्धा चहा बशीत ओतून, "घे रे… तू पण चहा घे. मोठा झाला की हा..." असं म्हणत तुमच्यासमोर कप किंवा बशी धरतात. असं ऐकलंय की पुण्यात दुकानदारानं बाजूच्या चहावाल्याकडून चहा मागवायचे दोन प्रकार आहेत! एक ’अण्णाचा चहा’ आणि दुसरा ’नानाचा चहा’! पहिला चहा ’बारक्या’नं खरंच आणायचा; दुसर्‍या प्रकारच्या चहाची वाट पाहून शेवटी कंटाळून गिर्‍हाईक निघून जातं!!

लहानपणी क्वचित कधी मिळणारा चहा ‘स्टेपल फूड’ होतो कॉलेज सुरू झाल्यावर. सकाळ सकाळचं लेक्चर असो किंवा कट्ट्यावर दुपार/संध्याकाळचा टाईमपास, जोडीला चहा असतोच. चहा आणि क्रीम-रोल किंवा समोसा-चहा पोटात टाकलं की बराच वेळ टाकी फुल्ल! कॉलेजकॅंटीनच्या मॅनेजरला "क्या अण्णा! एक चाय के लिए रोताय!" हा डायलॉग बरीच पोरं मारायची. ("तेरा एक, उसका एक करते दिनमें सौ चाय होताय!" कान कोरत मंद हसणारा अण्णा मनात हेच म्हणत असावा.)

परीक्षेच्या वेळेला तर आम्ही साताठ जण रात्री २-३ वाजता शिवाजीनगर किंवा स्वारगेट एस.टी. स्टॅंडवर चहा प्यायला जायचो. इतक्या अपरात्री अजून कुठे चहा मिळणार? तिथे वेटरनं हाताची बोटं ग्लासांत वरच्या बाजूनं टाकून, चार ग्लासेस एका हातात धरलेलं, ’थर्मामीटर’ पाणीही मिळायचं !

पुण्यातली अमृततुल्य ही एक ‘स्पेशल कॅटेगरी’ आहे. I can guarantee, तुम्ही जर ‘अमृततुल्य’ चहा टेस्ट केला असेल तर तुमचं मन आत्ताही तिकडे पोचलंय! मी मध्यंतरी पुण्याला गेलो होतो तेव्हा जमेल तेव्हा पटकन अमृततुल्यामधे चहा मारायचो; मग सकाळ, दुपार, संध्याकाळ काहीही असो! पुण्यात वाढलेल्या प्रत्येक मनात एक तरी हक्काचं ‘मयूरेश्वर भुवन’, ‘नागनाथ भुवन’ किंवा तत्सम काही नाव असतंच असतं!! अमृततुल्यचा अजून एक फायदा म्हणजे नवीन सिनेमाच्या जाहिराती वाचायला ’प्रभात’सारखा योग्य पेपर तिथे मधे मिळू शकतो.

’टपरी’वर मात्र छोट्या ग्लासात चहा मिळतो. गुलाबी थंडीत गरमागरम चहा पिताना, ग्लासच्या वरच्या कडेवर अंगठा आणि खालच्या कडेवर पहिलं बोट, असा ग्लास पकडावा लागतो! मित्र सिगरेट पेटवेपर्यंत, आपल्याला दोन ग्लास तसेच धरावे लागतात; पण आनंद असतो त्यातही. टपरीवरच्या चहाचा खरा आनंद कळतो लोणावळा-खंडाळ्याच्या पावसात! हिरव्याकंच दरीत झेपावत धुक्याआड लपणारे धबधबे, रिमझिमत्या पावसात, पाहताना शरीराबरोबर मन चिंब होतं. पोटात उतरणार्‍या चहाने त्या धुक्यासारखंच हलकं होतं. त्यात आपल्या जोडीला कळत-नकळतसा स्पर्श करणारा हात असेल तर आपसूक मन आभाळभर होतं!

चहासाठी अजून एक स्पेशल कॅटेगरी म्हणजे ’इराणी रेस्टॉरंट’! एका चहावर तासनतास बसा; ढुंकून कुणी म्हणणार नाही, "कृपया कामाशिवाय जास्त वेळ बसू नये"! ’जीन्स’ ही पॅंट असते आणि मुलींच्या हातातही सिगरेट दिसते हे ज्ञान कॅंपमधल्या ‘नाझ’ मधे मिळालं. प्रत्येक वेळी ‘नाझ’ पर्यंत जाणं व्हायचं नाही पण डेक्कनचं ‘गुडलक’ किंवा गरवारे कॉलेजसमोरचं ‘पॅराडाईज’ हे spots ‘पडीक’ बसायला मस्त होते. इराणी सढळ हाताने पट्टीचे समोसे भरलेली प्लेट समोर ठेवायचा…अजूनही ठेवत असेलच. पाहिजे तितके खा! ‘पहिल्यांदा वाढलेले समोसे’ वजा ‘प्लेटमधे राहिलेले समोसे’ म्हणजे ‘तुम्ही खाल्लेले समोसे’ ह्या पद्धतीनं इराणी पैसे लावतो. एकदम सोपा हिशोब! इराणी रेस्टॉरंटच्या लाकडी खुर्च्या मात्र एकदम comfortable असतात. ठिय्या मारायला perfect. जनरल टीपी इतकाच इराणी रेस्टॉरंटमधे अभ्यास मात्र एकदम मनापासून व्हायचा. इथे ‘Barnes & Noble’ मधेही शांतपणे अभ्यास करणारे लोक दिसतात पण त्यांच्या सोबतीला आपले रफी-किशोर नसतात!!!

रेल्वे स्टेशन ही तर ’city never sleeps’ सारखी जागा असते. ‘चाऽऽय रेऽऽम, कॉफ्फी…कॉफ्फेऽऽय’ असे आवाज सुरू झाले की प्रवासाची खरी मजा सुरू होते. गाडीच्या धडक, धडकबरोबर ताल धरून चहाचे घुटके घेत डेक्कन क्वीनच्या दरवाज्यात शांतपणे उभं रहायचं! आपोआप अवतीभवतीचं सगळं विसरायला होतं. स्टेशनवरच्याच काय पण गाडीतल्याही गर्दीतून चहा-कॉफीचं छोटे पिंप घेऊन ‘चाऽऽऽऽय रेऽऽम’ विकणारे कशी काय जागा काढतात? ’Will to survive’ जिद्दी असते हेच खरं.

चहाचा मझा असायचा ‘सवाई गंधर्व’ मधे. सलग तीन रात्रींभर रंगलेल्या मैफिली. आत्ता थोडा, नंतर थोडा, तल्लफ आली म्हणून, मित्रांबरोबर म्हणून, ‘तिच्या’ सोबतीसाठी मधेच सगळ्यांपासून हळूच कटून, थोड्यावेळाने मग परत सगळ्यांबरोबर असं करत भरपूर चहा व्हायचा. डिसेंबरच्या थंडीत हातातला चहा पोटात गेला की असं छान उबदार वाटायचं. गाणं-बजावणं गुणगुणत सकाळी घरी जायला निघालं की वाटेतलं पहिलं ‘अमृततुल्य’ पाहून गाड्या थांबायच्या!

मध्यंतरी इथे न्यू जर्सीत एका अफगाणी रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो होतो. रविवार दुपार होती आणि मालकही गप्पा करायच्या मूडमधे होता. मस्त जेवणानंतर त्यांचा ’शीर चाय’ (दुधाचा चहा) काय अप्रतिम होता! मालकाने तर चहाचे पैसेही घेतले नाहीत. तो म्हणाला तू भारतातला आहेस म्हणून तुला सांगतो. आपल्या शेजारी जरी पाहुणे आले तरी आपण त्यांना चहाला बोलावतो ना, त्याचे आपण पैसे कुठे घेतो? आजचा चहा तसाच समज. "These people don’t understand some nice things from our side of the world." कुठेतरी आतपर्यंत जाणवलं की इतकी वर्षे अमेरिकेत काढल्यानंतरही, मुलं कॉलेजमधे जायच्या वयाची झाल्यानंतरही, त्याच्यासाठीसुद्धा our side of the world म्हणजे अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान हाच भाग होता.

नुकतंच एकदा सकाळी लवकर ऑफिसला जाताना, महेश खानोलकरांनी व्हायोलीनवर वाजवलेली श्रीनिवास खळेंची गाणी गाडीत ऐकत होतो. अवतीभवती झाडं-पानं ‘fall colors’ नावाचा रंगोत्सव साजरा करत होती! सुरेल असं ‘बगळ्यांची माळ फुले..’ चालू होतं आणि चहाचा घोट घेत असताना अचानक समोर निळ्याभोर आकाशाच्या बॅकग्राऊंडवर, ऑक्टोबरच्या सोनसळी उन्हांत, बगळ्यांची माळ खरंच उडताना पाहिली.

सकाळी लवकर ऑफिसला जाताना गाडीत पिण्यासाठी मस्तपैकी चहा बरोबर ठेवायचा. गाडीसमोरून उडत जाणारी रंगीबेरंगी पानं असोत किंवा भुरभुरत्या बर्फाचे शुभ्रकण; ’तोडी’, ’सुहाग भैरव’ किंवा ’अहिर भैरव’च्या सुरांत हरवताना, चहाचा घुटका घ्यायचा आणि मनात म्हणायचं, ’अजी हुजूर! वाह चाय बोलिये'!!!

-संदीप चित्रे