खेळ - सात सुरांचा


हा ऑक्टोबरला अचानक माझ्या मैत्रिणीचा फ़ोन आला. "मराठी 'सा रे ग म प' चे पास मिळालेत, आपण चौघांनी जायचं का?" त्याच दिवशीचा कार्यक्रम असल्याने लगेच निर्णय घेणं आणि निघणं गरजेचं होतं. तिचा नवरा माझ्या नवर्‍याचा मित्रच असल्याने माझा नवरा तयार झाला. मला मात्र मनापासून हा कार्यक्रम माझ्या मुलीने पहावा असं वाटत होतं. तिलाही देवाने गळा दिलाय, तीही शिकतेय तर तिला हा अनुभव उपयोगी पडेल अशी माझी भूमिका! पण तिच्या शाळेत त्याच दिवशी परीक्षा असल्याने तिने साफ नकार दिला. आमच्या घरात- सासरी आणि माहेरी, संगीतप्रेमी आणि संगीत शिकलेली माणसं भरपूर! त्यामुळे आम्हाला त्याची आवडही आहे, थोडीफार समजही आहे आणि गाण्याचा संचयही भरपूर आहे. त्यामुळे मलाही ही संधी सोडावीशी वाटत नव्हतं. एरवीसुद्धा चांगले स्पर्धक असल्यास आम्ही टीव्हीवर हा कार्यक्रम आवर्जून पाहायचो. मग काय पटापट तयारी केली आणि आमच्या गाडीने तो सात सुरांचा खेळ पहायला निघालो.

दुपारी अडीच वाजता निघालो ते साडेसहाला 'रवींद्र नाट्य मंदिरा'पाशी पोचलो. सातचं रिपोर्टींग होतं पण तिथे गेटातच कार्यक्रम दोन तास उशिराने सुरु होत असल्याची वर्दी मिळाली. आधीच्या दिवसाच्या भागाचं चित्रीकरण चालू होतं, त्याला उशीरा सुरूवात झाल्याने पुढचं सगळंच शेड्यूल कोलमडलं होतं. "आम्हाला वाटलं आदल्या दिवशीच्या भागाचं शूटींग आदल्या दिवशीच झालं असेल", माझी अक्कल मी नको तिथे पाजळलीच! आता दोन तास वेळ घालवणं भाग होतं. त्यात पोटपूजा, आजुबाजुच्या प्रदर्शनांना भेटी वगैरे करूनही राहिलेला वेळ मोबाईलवर टाईमपास करण्यात घालवला. सव्वानऊ वाजता रांगेत उभं राहण्याची सूचना मिळाली. कार्यक्रम आत्ता सुरू होईल या आशेने आम्ही सुखावलो. तब्बल पाऊण तास रांगेत उभं राहिल्यावर आत सोडण्यात आलं.

रांगेत मजेमजेशीर नमुने अनुभवायला मिळाले. बायकांची लगबग, सारखा अवतार नीट करणं चालू होतं. आम्ही संगीताचा आस्वाद घेण्याच्या उद्देशाने तिथे गेलो होतो. आम्ही बहुतेक मायनॉरिटीतच होतो. बायका एकदम नटूनथटून, जरीच्या भारी साड्या, दागिने, मेकप अशा सज्ज होत्या. मधूनमधून लिपस्टिक लावणे, केस विंचरणे वगैरे प्रकार चालू होतेच. आम्ही त्यांच्यासमोर अगदीच अजागळ दिसत असणार. त्यात दुपारचा प्रवास आणि खूप वेळ वाया गेल्याने चेहर्‍यावरचे भावही बघण्यालायक असावेत. काही लोक पास नसतानाही दुपारपासून बाहेर ताटकळत उभे होते. मग कळलं की अशा शो मध्ये कधीकधी जागा भरल्या नाहीत तर बाहेरून धरून पकडून लोक आणतात. त्यामुळे आपली वर्णी लागली तर लागली या हेतूने ते पाच पाच तास बाहेर थांबले होते.

आत सोडल्याबरोबर पुढच्या, मधल्या किंवा मोक्याच्या जागा मिळवायला लोकांनी एकच कल्ला केला. पुढच्या ३ रांगा स्पर्धक व त्यांच्या नातलगांसाठी रिझर्व्ड होत्या. उरलेल्या जागांसाठी धक्काबुक्की, भांडणं! बाप रे बाप!! या सगळ्या प्रकाराने स्तिमित झालेले आम्ही, डोअरकीपरने दाखविलेल्या सीट्सवर जाऊन टेकलो. त्यानंतरही आजुबाजूचे प्रेक्षक 'इथे कॅमेरा येईल ना? आम्ही टीव्हीवर दिसू ना?' अश्या बारीकसारिक चौकश्या नित्यनियमाने करत होते. मला कधी एकदा कार्यक्रम सुरू होईल असं झालं होतं. एकदा कार्यक्रम सुरू झाला की हे सगळं थांबेल आणि ज्याच्या ओढीने इथवर आलो तो कार्यक्रम पहायला मिळेल!

इतक्यात कार्यक्रम सुरू होण्याची घोषणा झाली. प्रथम बर्‍याच सूचना देण्यात आल्या. कधी, कुठे, कश्या टाळ्या वाजवायच्या किंवा वाजवायच्या नाहीत हे समजावून सांगण्यात आलं. थोडक्यात इथे उत्स्फूर्त प्रतिसाद किंवा नैसर्गिक वाहवा करण्याला बंदीच होती. सुरुवातीला टाळ्यांच्या कडकडाटाचं शूटींग झालं. पाच-सहा वेळा वेगवेगळ्या प्रकारे टाळ्या वाजवून हात खांद्यापासून दुखू लागले. या आवाजाचं 'डबिंग' नाही का चालत? एक वेडी शंका. एकदा हात समोर करुन टाळ्या वाजवा, एकदा हात डोक्यावर धरुन टाळ्या वाजवा - मला प्राथमिक शाळेतले बैठ्या कवायतीचे प्रकार आठवले.

नंतर एकेक वादक पधारले. मग सेलिब्रिटी जज- एक अत्यंत प्रसिद्ध गायक (मुद्दाम इथे कोणाची नावं लिहित नाही. त्याचं काही प्रयोजनही नाही. हा लेख वाचेपर्यंत तुम्ही तो कार्यक्रम पाहिला असल्यास कळेलच!) स्टेजवर आले. ते सर्वांशी अगदी सहजपणे बोलत होते, वादकांना सूचना देत होते. त्यांच्या वागण्यात, हालचालीत कुठेही भपका नव्हता. मध्येच ते पेटीवर हात फिरवत होते. मग निवेदिका आली. तीही चपळपणे सगळीकडे वावरत होती. तीही भावखाऊ वाटली नाही. त्या प्रसिद्ध गायकाच्या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. रीटेकच्या कृपेने त्यांच्या गाण्याचा आस्वाद मनसोक्तपणे चार-पाच वेळा घेता आला. प्रत्येक वेळा त्यांनी वेगवेगळ्या हरकती घेतल्याने कान तृप्त झाले.

त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. एकेक स्पर्धक येऊन गाऊ लागले. प्रत्येक गाण्याच्या आधी पाणी देणारा, मेकअप करणारा तत्परतेने हजर होत होता. आवश्यकतेनुसार 'टचअप' करत होता. प्रत्येक गाण्याआधी परीक्षकांनाही मेकअप करत होते. हा प्रकार जरा जाचक वाटला. स्पर्धकांना देण्यात आलेले पोषाखही वाखाणण्यासारखे(?) होते. त्यात त्यांचा 'मेकओव्हर, हेअरस्टाईल' सर्व काही वेगळंच (की विचित्र) केलं होतं. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या परफॉरमन्सवर झाला नाही तरच आश्चर्य! एक स्पर्धक वारंवार तिला घालायला दिलेल्या जॅकेटविषयी तक्रार करत होती. ते खांद्यात एव्हढं टाईट होतं की तिला हात दुमडून माइक तोंडाजवळ आणायलाही त्रास होत होता. एकंदरीतच गाण्यार्‍या लोकानी एव्हढे टाईट फिटिंगचे ड्रेस घालणं गाण्यासाठी कितपत सोयीचं आहे किंवा गैरसोयीचं आहे हे लक्षातच घेतलं जातं नसावं. त्यांच्या तक्रारीकडे फ़ारसं लक्ष दिलं गेलं नाहीच. त्या पोषाखाची वाखाणणी त्या सेलिब्रिटी जजने नंतर केलीच पण टीव्हीवर प्रोग्राम बघताना लक्षात आलं की ती कॉमेंट सोयीस्करपणे कट केलेली होती.

एकंदरीतच गायनापेक्षा जास्त टेन्शन या मेकओव्हर, हेअरस्टाईल, ड्रेस वगैरेचं तंत्र सांभाळण्याचच येत असावं. (माझ्यासारख्या बाळबोध विचाराच्या मुलीने असा पोषाख घालायला नकार दिला तर बहुदा तिला स्पर्धेतून हाकलून देत असावेत - माझा एक वेडा तर्क!) एकतर एव्हढ्या मोठ्ठ्या गायकासमोर आपलं गाणं सादर करायचं हे टेन्शन, त्यात दिवसभर शूटींगचा आणी प्रतिक्षेचा त्रास, त्यातच हे मेकओव्हरचं लफडं, तब्येतीची हेळसांड आणि खाण्यापिण्याचे वांधे! या सर्वांमुळे काही स्पर्धक तयारी आणि कुवत असूनही त्यांचे 'बेस्ट परफॉरमन्सेस' नाही देऊ शकले. या गोष्टीचं मला राहूनराहून वाईट वाटलं. माझ्या माहितीतली काही मुलं अशा स्पर्धांसाठी आपलं शिक्षण, करियर, संसार पणाला लावून येतात. वेळप्रसंगी खूप मोठ्ठा त्याग करतात, धोका पत्करतात. त्यांना सर्वांना या दुष्टचक्रातून जावं लागतं हे प्रकर्षाने जाणवलं. परीक्षकांचे रिमार्क कधीकधी विनोदी पण समर्पक वाटले, कधी परस्परविरोधी तर कधी एकमेकांची 'री' ओढणारे वाटले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे काही स्पर्धक भावुक झाले. परंतु, कौतुकाची गोष्ट म्हणजे एकानेही आपल्या चुकांचे समर्थन केले नाही. सर्व स्पर्धक त्याही परिस्थितीत आपलं सर्वस्व पणाला लावून मोठ्या आत्मविश्वासाने परफॉर्म करत होते. सर्वांची गाणी उत्तम झाली. आपण उगाचच नव्या तरूण पिढीला नावं ठेवतो, 'कष्ट करायला नकोत यांना' असं म्हणतो. पण पूर्वीच्या गायकांपेक्षा हल्लीच्या मुलांना संगीता व्यतिरिक्तही किती वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं पेलायला लागतात! त्यामुळे आपलं म्हणणं किती चुकीचं आहे हे त्यांनी जणू दाखवून दिलं. अशा या तोडीस तोड असलेल्या स्पर्धकांमधून एक महागायक किंवा महागायिका निवडणे किती कठीण आहे हे देखील जाणवले. Hats off to these contestants and judges!

एव्हढं सगळं पाहिल्यावरही, कार्यक्रम संपताक्षणी माझ्या मनात विचार आला की माझी लेक आली नाही याने तिचं फ़ारसं काही नुकसान झालं नाही. तिचा आवाज चांगला आहे पण ते सिद्ध करण्यासाठी तिने हे सगळं करणं जरुरीचं आहे का? हा प्रश्न मनात घोटाळत राहीला. अशा रीऍलिटी शोजमधे, सात सुरांच्या खेळात, इतर साठ गोष्टींना अवाजवी महत्त्व दिलं जातं, त्यामुळे त्यातली रीऍलिटी कमी होऊन शो-ऑफ जास्त वाटतो. पण यात दोष कोणाला देणार? कारण प्रेक्षकांनाही ग्लॅमरस गोष्टींचं आकर्षण जास्त असतं त्यामुळेच टीआरपी वाढवायला अशा गोष्टी करणं निर्मात्याला भाग पडतं. असो.

या अनुभवामुळे एका तासाच्या कार्यक्रमासाठी किती जणांना किती कष्ट घ्यावे लागतात आणि किती तंत्रं सांभाळावी लागतात हे लक्षात आलं.

-अभिश्रुती